नेणिवेच्या पातळीवर भेडसावणारा वास्तव अनुभव

 विवेक मराठी  30-Jul-2018


 'मानव विरुध्द तंत्रज्ञान' हा विषय यापूर्वी अनेकदा चित्रपटांमध्ये येऊन गेलेला आहे. लेथ जोशी हीदेखील मानव आणि तंत्रज्ञान यातल्या संघर्षाची गोष्ट असली, तरी खऱ्याखुऱ्या, रोजच्या जगात आणि आजच्या काळात घडणाऱ्या गोष्टींचा, सूक्ष्मातिसूक्ष्म अशा नेणिवेच्या पातळीवर (सबकॉन्शस लेव्हलवर) अथवा मनाच्या गाभ्यात केला जाणारा विचार एक तत्त्व म्हणून घेऊन त्यावर पूर्ण लांबीचा चित्रपट (फीचर फिल्म) बनवण्याची उदाहरणं विरळ असतात! लेखक-दिग्दर्शक मंगेश जोशींचं यासाठी खास कौतुक करायला हवं.

- हर्षद सहस्रबुध्दे 

सगळयाच व्यवसायात अथवा उद्योगांमध्ये वृध्दी होण्याकरिता 'कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट' म्हणजेच 'कायझन' हे व्यवस्थापनाचं तत्त्व बरीच वर्षं वापरलं जातं. सततचा बदल किंवा सुधारणा ही वृध्दीकरता अत्यावश्यक गोष्ट आहे, हे जगमान्य सूत्र आहे. बदल (चेंज) आणि सुधारणा (अपग्रेडेशन) करत असतानाच काही वेळेस, काही घटकांचा बळी जातो. अशा वेळेस सुधारणा, बदल या गोष्टी खरंच इतक्या महत्त्वाच्या आहेत का? हा प्रश्न पडतो. आजूबाजूला बदल घडत असताना एखाद्याने जर ठरवलं की, न बदलता, आपण तटस्थ/निश्चल राहायचं, जसे आहोत तसंच रहायचं आणि जे-जे घडेल ते फक्त बघत राहायचं - थोडक्यात, जुनी तत्त्वं आणि कार्यपध्दती कवटाळून बसायचं आणि परिस्थितीसमोर सरेंडर करायचं, तर काय होईल? तटस्थ अथवा निश्चल वृत्ती अंगीकारणाऱ्या अशा व्यक्ती अफाट वेगाने घडणारे बदल आणि तंत्रज्ञानात घडणाऱ्या सुधारणा यामुळे गिळंकृत होतील का? की या सगळया रेटयापुढे त्यांचा निभाव लागेल? हे संपूर्ण द्वंद्व त्याचा भावनिक धांडोळा घेत पावणेदोन तासात उलगडण्याचं आव्हान, दिग्दर्शक मंगेश जोशी समर्थरित्या पेलतात.

लेथ जोशी हा नवा चित्रपट म्हणजे आतून अस्वस्थ करणारा पण वास्तवाची जाणीव करून देणारा एक अप्रतिम असा दृक-श्राव्य अनुभव आहे. काळानुसार बऱ्याच गोष्टी बदलत जातात. हा बदल छोटया पावलांनी होत असतो. माणसं, पेहराव, चालीरिती, तंत्रज्ञान, यंत्रं, फॅशन, इमारती, रस्ते, सरकारे, घरं, गाडया, वापरायच्या वस्तू - सगळंच लक्षणीयरित्या बदलत असतं. झपाटयाने, कधीकधी तर आपल्याही नकळत. आपण या बदलाचा कधी खुशीने स्वीकार करतो, कधी नाखुशीने, तर बरेचदा तटस्थ राहून फक्त निरीक्षण करत असतो. एकासाठी खूप मोठा असणारा अथवा वाटणारा एखादा बदल, दुसऱ्यासाठी तितकाच मोठा बदल असेलच असं नाही. आजूबाजूला घडणाऱ्या या बदलांकडे आपलं कधी लक्ष जातं, तर कधी जातही नाही. आपल्या रोजच्या परीघाबाहेर काय घडामोडी सुरू आहेत, नक्की कुठल्या प्रकारचे बदल होत आहेत याकडे बरेचदा आपलं लक्षही नसतं. अगदी पुसटशी कल्पनादेखील नसते. या घडणाऱ्या बदलांना सामोरं कसं जायचं, हे मात्र फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून असतं.

'मानव विरुध्द तंत्रज्ञान' हा विषय यापूर्वी अनेकदा चित्रपटांमध्ये येऊन गेलेला आहे. लेथ जोशी हीदेखील मानव आणि तंत्रज्ञान यातल्या संघर्षाची गोष्ट असली, तरी खऱ्याखुऱ्या, रोजच्या जगात आणि आजच्या काळात घडणाऱ्या गोष्टींचा, सूक्ष्मातिसूक्ष्म अशा नेणिवेच्या पातळीवर (सबकॉन्शस लेव्हलवर) अथवा मनाच्या गाभ्यात केला जाणारा विचार एक तत्त्व म्हणून घेऊन त्यावर पूर्ण लांबीचा चित्रपट (फीचर फिल्म) बनवण्याची उदाहरणं विरळ असतात! लेखक-दिग्दर्शक मंगेश जोशींचं यासाठी खास कौतुक करायला हवं. अश्विनी गिरी, चित्तरंजन गिरी, ओम भूतकर आणि सेवा चौहान यांचा अप्रतिम आणि सहजसुंदर अभिनय, मंगेश जोशींची सकस पटकथा व दिग्दर्शन, मकरंद दंभारेंचं सफाईदार संकलन, सारंग कुलकर्णीचं दर्जेदार पार्श्वसंगीत आणि पियुष शाहचं दमदार ध्वनिआरेखन लेथ जोशीला लाभलंय.

प्रत्येक माणसाला कसली न कसली इनसिक्युरिटी जाणवत असते. कसलीतरी अनामिक अशी भीती भेडसावत असते. 'लेथ जोशी' ही अशाच एका सुप्तावस्थेत असणाऱ्या भीतीची कहाणी आहे. एक प्रकारे आपल्या सगळयांची कहाणी आहे. उद्योगधंदे, त्यातलं तंत्रज्ञान काळानुसार झपाटयाने बदलतंय. मशीनरी, टेक्नीक्स झरझर बदलत आहेत. आज जे नवीन, अद्ययावत आहे, ते उद्या जुनं होणार आहे. नवीन बदल आणि नव्या तंत्रज्ञानानुसार आपणही बदलतोय. बदलायला हवंय का? नाही बदललो, तर काळ आपल्याला मागे सारेल का? या नव्या, तंत्रज्ञानाच्या नित्यनवीन टेकूंवर चालणाऱ्या जगात आपण निरुपयोगी किंवा कुचकामी ठरू का? या अत्यंत महत्त्वाच्या, सोशल तसंच पर्सनल इनसिक्युरिटीचा, 'लेथ जोशी' हा सिनेमा, जाणीव आणि नेणीव या दोनही पातळयांवर वेध घेतो. लेथ जोशी पाहताना आत कुठेतरी तुटतं, गलबलून येतं. सिनेमा म्हणून 'लेथ जोशी' इथेच जिंकतो. भव्यदिव्य तंत्रज्ञानाचा, स्पेशल इफेक्ट्स इत्यादीचा भपकेबाज वापर न करता, फक्त आवश्यक तेवढंच आणि तिथेच तंत्रज्ञान वापरून बनवलेला हा एक ऑॅनेस्ट सिनेमा आहे. खराखुरा आणि हृदयापासून बनवलेला. साधा, सोपा, तरीही अपेक्षित परिणाम साधणारा.

अश्विनी गिरी, चित्तरंजन गिरी, ओम भूतकर आणि सेवा चौहान अशी कलाकारांची जबरदस्त फळी घेऊन दिग्दर्शक मंगेश जोशी, फ्रंटफूटला येऊन बॅटिंगला सुरुवात करतात ती शेवटपर्यंत न थांबण्यासाठीच. सगळेच प्रमुख कलाकार एक से एक. सहज, जिवंत आणि प्रभावी अभिनय करणारे. चित्तरंजन गिरींचं विशेष कौतुक करावसं वाटतं. अतिशय मेहनत घेऊन उभा केलेला त्यांचा 'लेथ जोशी' काळजात घर करतो. डल, आतमध्ये कुठेतरी खूप खोलवर आघात झालेली, हरलेल्या मानसिकतेची निदर्शक अशी देहबोली, कायम टोन डाउन केलेली अशी संवादफेकीची शैली, आवाजाचा प्रभावी वापर, क्षणार्धात बदलत जाणारे चेहऱ्यावरचे भाव या सर्वांमुळे त्यांचा लेथ जोशी खराखुरा वाटतो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा हा विद्यार्थी जबरदस्त अभिनेता आहे. चित्तरंजन गिरी मराठी भाषिक नसूनही त्यांनी मराठमोळा जोशी सफाईदारपणे साकारला आहे.

अश्विनी गिरी नेहमीप्रमाणेच फॉर्ममध्ये. सहजसुंदर आणि प्रसन्न. ओम भूतकर हादेखील अत्यंत गुणी अभिनेता. जोशींचा समंजस तरीही प्रॅक्टिकल असा कुलदीपक म्हणून तो खासच शोभलाय. सेवा चौहान (आजी) आणि ओम (नातू) यांची जुगलबंदी जबरदस्त. सेवा चौहानांच्या वाटयाला खास संवाद आले आहेत. लेथ जोशी (बाबा) जुन्या पिढीचे प्रतिनिधी. अश्विनी गिरी (आई) आणि ओम भूतकर (मुलगा) हे नवीन तंत्रज्ञान अंगी बाणवून सुधारणा करत, शिकत राहणारे नव्या पिढीचे प्रतिनिधी. सेवा चौहान यांनी रंगवलेलं अंध आजीचं पात्र मोठं आकर्षक. मनाने तरुण, जॉली, पण अंध असल्याने नातू आणि सुनेवर अवलंबून असणारं असं हे पात्र आहे.  आयुष्याची संध्याकाळ जवळ आलेली असताना बदलांना नाकारणारं लेथ जोशींचं हताश, खचलेलं असं मुख्य पात्र, आई-मुलाची लढाऊ वृत्ती, जबरदस्त आशावाद, हुरूप, त्याला असलेली प्रयत्नांची जोड, आजीच्या पात्रातून उभा केलेला मॅनेजरियल रोल असं, एखाद्या कंपनीचं लघुरूपातलं मॉडेलच जोशी कुटुंबात साकारलं गेल्याचं आपल्याला दिसतं.

उद्योगात झालेल्या, कंपनीच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या बदलामुळे गेलेली लेथ जोशींची नोकरी, त्यामुळे आलेली अस्वस्थता, त्यांचे प्रयत्न, त्यांच्या अंतर्मनात डोकावतानाचे प्रसंग हे सर्व टिपताना सिनेमा संथ, कंटाळवाणा आणि बराचसा डिप्रेसिंग होण्याची दाट शक्यता होती. पण तसं होत नाही. त्याचबरोबर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा तरल चित्रपट जाणीव आणि नेणीव ह्या दोन्ही पातळयांवर घडतो. ही अनुभवायची गोष्ट आहे. या गोष्टीशी, लेथ जोशींच्या हताश मानसिकतेशी एकरूप होऊन हा सिनेमा पाहणं गरजेचं आहे. जोशी वगळता,  बाकीच्या तीन पात्रांमधले संवाद, नोकझोक, खटके, हलकीशी मजामस्ती, रोजच्या घटना, प्रासंगिक विनोद अशा घटकांच्या प्रभावी वापरामधून विनोद आणि कारुण्य यांचा उत्कृष्ट मिलाफ आणि समतोल 'लेथ जोशी'मध्ये साधला गेलाय.

अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक यांना याचं पूर्ण श्रेय जातं. प्री-क्लायमॅक्स सीनलाच सिनेमा संपला असता तर बरं झालं असतं असं राहून-राहून वाटतं. एवढया व्हेग, तरीही मोठा आवाका असणाऱ्या विषयावर सिनेमा बनवला असला, तरीही त्याला निश्चित असा शेवट/कन्क्लूजन असणं महत्त्वाचं ठरतं. तसा निश्चित, चटका लावून जाणारा पण अत्यंत प्रॅक्टिकल असा शेवट 'लेथ जोशी'ला आहे. हा सिनेमा दीर्घकाळाकरिता डोक्यातून जाणार नाही. ठरवूनही काढता येणार नाही. कोळिष्टकासारखा चिकटून बसणार तो मेंदूत - निदान काही वर्षं तरी!            

 9826416455 [email protected]