परिचय ध्येयनिष्ठ नेतृत्वाचा

 विवेक मराठी  01-Aug-2018

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज जरी समाजाच्या सर्व स्तरात दिसत असला, तरी काळाच्या ओघात त्यांच्यावर आलेल्या संकटांवर त्या त्या सरसंघचालकांनी घेतलेल्या अचूक निर्णयांमुळे संघाचे आजचे अस्तित्व आहे. संघसंस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, ऋषिरूप श्री गोळवलकर गुरुजी, श्री बाळासाहेब देवरस, श्री रज्जूभय्या व श्री सुदर्शनजी या पाच संघ नेतृत्वामुळे संघ विकसित झाला. या पाच व्यक्तींचा त्याग, कष्ट, चिकाटी, नेतृत्व, संघटन, राष्ट्रप्रेम, आध्यात्मिक दृष्टी, सेवा कार्य, सर्वदूर व्याप्ती व त्यापेक्षा एक स्वयंसेवक असे एकूणच नेतृत्वगुणांचे दर्शन लेखक अशोक इनामदार लिखित 'अनासक्त कर्मयोगी पाच सरसंघचालक' ह्या पुस्तकात आपल्याला होते.

- नेहा जाधव

एखादी संघटना निरंतर टिकण्यामागे त्या संघटनेची नेतृत्वशक्ती कारणीभूत असते. काही वेळा परिस्थिती बदलते, त्याप्रमाणे ती संघटनाही बदलते. बदलत्या परिस्थितीमध्ये जो नेता संघटनेची दिशा, ध्येय, मार्ग बदलतो, तो संघटनेच्या अधोगतीला जबाबदार असतो. पण जो नेता ध्येय ढळू न देता परिस्थितीत बदल घडवून आणतो, ती संघटना चिरकाळ टिकते. जर ध्येय हे राष्ट्राच्या हिताचे असेल, तर त्यातून जनहिताची क्रांतीच होते. अशीच एक संघटना गेली 9 तपे संकटांवर मात करत राष्ट्रबांधणीचे कार्य करत आहे. तिचे नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. वर्षानुवर्षे टिकलेली हे एकमेव संघटना आहे. या संघटनेमध्ये कोणीही मोठे नाही. राष्ट्र ही प्रथम भावना, त्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही ही संघाची नीतीच म्हणावी लागेल. पण तरीही सर्वांना योग्य दिशा दाखवण्यासाठी बलशाली नेतृत्व हवेच. सरसंघचालक म्हणजे नेतृत्व करणारा प्रमुख. डॉ. हेडगेवार यांनी 1925 साली संघाची स्थापना केली, तेव्हापासून आजतागायत टिकलेला संघ हे संघाला लाभलेल्या योग्य नेतृत्वाचे फलितच म्हणावे लागेल.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज जरी समाजाच्या सर्व स्तरात दिसत असला, तरी काळाच्या ओघात त्यांच्यावर आलेल्या संकटांवर त्या त्या सरसंघचालकांनी घेतलेल्या अचूक निर्णयांमुळे संघाचे आजचे अस्तित्व आहे. संघसंस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, ऋषिरूप श्री गोळवलकर गुरुजी, श्री बाळासाहेब देवरस, श्री रज्जूभय्या व श्री सुदर्शनजी या पाच संघ नेतृत्वामुळे संघ विकसित झाला. या पाच व्यक्तींचा त्याग, कष्ट, चिकाटी, नेतृत्व, संघटन, राष्ट्रप्रेम, आध्यात्मिक दृष्टी, सेवा कार्य, सर्वदूर व्याप्ती व त्यापेक्षा एक स्वयंसेवक असे एकूणच नेतृत्वगुणांचे दर्शन लेखक अशोक इनामदार लिखित 'अनासक्त कर्मयोगी पाच सरसंघचालक' ह्या पुस्तकात आपल्याला होते.

हे पुस्तक वाचल्यावर संघाचा कालानुरूप त्याग लक्षात येतो. या पुस्तकात स्वातंत्र्यपूर्वकाळातील, स्वातंत्र्यकाळातील, गांधीहत्येच्या काळातील संघ आढळतो. त्या वेळची परिस्थिती एकूणच स्वातंत्र्य मिळवण्याची होतीच, त्याचबरोबर हिंदू एकसंघ होण्याची होती. डॉ. केशव हेडगेवार यांनी हे अचूक जाणले व हिंदूंना एका छताखाली आणले. त्यांची स्वातंत्र्याप्रतीची तळमळ लेखकाच्या लिखाणातून समोर येते. ''प्रौढांनी पुढाकार घेतला असता, तर तरुणांनी लढयात उतरण्याची गरज भासली नसती!'' असे उद्गार डॉक्टरांनी एका प्रसंगात काढले होते. जी कर्मभूमी माझी आहे, त्यावर परकीयांचा हक्क नाही असे भर न्यायालयात सांगून प्रामाणिक शिक्षेला सामोरे जाणाऱ्या प्रसंगात डॉक्टरांचा स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिकपणा समजतो. हिंदूंनी संघटित व्हावे यासाठी डॉ. हेडगेवारांची मृत्यू दारात असतानाची तळमळ या पुस्तकातून दिसते. आपल्यानंतर ही धुरा सांभाळण्यासाठी त्यांनी गोळवलकर गुरुजींची निवड केली. ती किती अचूक होती हे गुरुजींनी त्यांच्या कार्यकाळात सिध्द केले. परमार्थ, धर्म व देश अशी गुरुजींची त्रिसूत्री होती. गुरुजींचे व्यक्तिमत्त्व ऋषीसमान होते. ते द्रष्टे होते. संघाचे नेतृत्व करताना अनेक संप्रदायांनाही दिशा दाखवण्याचे काम त्यांनी केले. गांधीहत्येवेळी संघाची भूमिका त्यांनी प्रामाणिकपणे मांडूनही त्यांना कारावास भोगावा लागला. त्या वेळी खऱ्या अर्थी संघाचा संकटकाळ होता. पण त्या वेळी गुरुजींचे नेतृत्व यावर मात करण्यास शक्ती देत होते, असे म्हणायला हरकत नाही.

संघाचे तिसरे नेतृत्व म्हणजेच सरसंघचालक मधुकर उर्फ बाळासाहेब देवरस. ते वयाच्या बाराव्या वर्षापासून डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली वाढलेले. गांधीहत्येनंतर दुसरे आलेले संकट म्हणजे आणीबाणी. त्या वेळची परिस्थिती त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळलेली दिसते.

त्यानंतर कमी काळ लाभलेले सरसंघचालक म्हणजे रज्जूभैया. अत्यंत हुशार, अभ्यासू रज्जूभैयांनी सहा वर्षांच्या अल्पकालावधीसाठी सरसंघचालक हे पद भूषवले. लोकसंघटन हा त्यांच्या कार्याचा पायाच म्हणावा लागेल. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले. हिंदू हितासाठी पायाला भिंगरी, तोंडात साखर हे तत्त्व त्यांनी सांगितले. या पुस्तकात असलेले पाचवे सरसंघचालक कुप्प. श्री. सुदर्शनजी. संघाच्या सीमा अमर्याद आहेत हे जगासमोर आणणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्याही कार्याचा आढावा या पुस्तकात आढळतो.

248 पानांचे हे पुस्तक पाचही सरसंघचालकांच्या त्यागाचे दर्शन करून देते. या पुस्तकाची भाषा, मांडणी सामान्यांना समजेल अशी आहे. अशोक इनामदार यांच्याबद्दल सागांयचे तर ते स्वयंसेवक नाहीत. जीवघेण्या अपघातानंतर बहुविकलांग झाले, पण त्यांची लेखन शैली, त्यांच्या अंगी असलेले कौशल्य आणि अध्ययन शिस्त दाखवते. भारतीय विचार साधना, पुणे या संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले असून, डॉ. अशोक कुकडे यांनी त्यास प्रस्तावना लिहिली आहे.

 8692051385

पुस्तकाचे नाव - अनासक्त कर्मयोगी पाच सरसंघचालक

लेखक - अशोक इनामदार

प्रकाशक - भारतीय विचार साधना, पुणे

आपल्याला सदर पुस्तक घरपोच हवे असल्यास 9673388491 या क्रमांकावर लेखकाशी संपर्क साधावा.