'सेवा समर्पण'च्या निमित्ताने

 विवेक मराठी  10-Aug-2018

विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या विविध विषयांवरील व्याख्यानांचे संकलन असलेला 'स्पिरिच्युअलायझिंग लाइफ' हा  इंग्रजी ग्रंथ आहे. या ग्रंथाचा मराठी भावानुवाद 'सेवा समर्पण अर्थात आध्यात्मिक जीवनाची साधना' या नावाने साकारला आहे. या मराठी ग्रंथाचे प्रकाशन 23 ऑगस्टला मुंबईत सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते आणि 24 ऑगस्टला पुण्यात माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विवेकानंद केंद्राच्या ग्रंथसंपदेची माहिती, तसेच 'सेवा समर्पण' पुस्तकातील एक प्रकरण देत आहोत.

 विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे जीवनव्रतींच्या प्रत्येक तुकडीसाठी चाळीस व्याख्यानांची एक मालिका घेत असत. ती व्याख्याने संपादित करून 'साधना ऑॅफ सर्व्हिस' या नावाने इंग्लिशमध्ये प्रसिध्द करण्यात आली. केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे 1989 साली 'सेवा साधना' या नावाने त्याचा अनुवाद प्रसिध्द करण्यात आला. एकनाथजींनी मूळ इंग्लिश पुस्तक पाहिले होते, पण त्याच्या संपादनाबाबत ते समाधानी नव्हते. त्यामुळे एकनाथजींच्या इच्छेप्रमाणे त्या व्याख्यानांच्या पुनःसंपादनाचा प्रयोग हाती घेण्यात आला. एकनाथजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ही व्याख्याने तीन खंडांत एका ध्वनिफीतीसह प्रकाशित करण्यात आली. परंतु ध्वनिफीतीची गुणवत्ता फारशी चांगली नसल्याने या तीन खंडांची स्वतंत्र ग्रंथात पुनर्मांडणी करण्याची कल्पना पुढे आली. ध्वनिफितीतील काही व्याख्याने अपूर्णही होती आणि काही व्याख्यानांत मुद्दयांची पुनरावृत्तीही होती. ग्रंथाला परिपूर्णता यावी, यासाठी एकनाथजींच्या पूर्वलेखनाची मदत घेण्यात आली आणि त्यातून मूळ इंग्लिशमध्ये 'स्पिरिच्युअलायझिंग लाइफ' हा ग्रंथ सिध्द झाला. 'सेवा समर्पण अर्थात आध्यात्मिक जीवनाची साधना' हा त्याचा मराठी भावानुवाद आता प्रसिध्द होतो आहे.

1970 साली स्थापन झालेले विवेकानंद स्मारक आणि त्यानंतर दोनच वर्षांत 1972 साली कन्याकुमारीत उभे राहिलेले विवेकानंद केंद्र आता पन्नाशीच्या उंबरठयावर उभे आहे. केंद्राने आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे केंद्राच्या कामासाठी देणाऱ्या गैरसंन्यासी तरुण-तरुणींची मोठी फौज त्यानंतरच्या काही वर्षांत उभी केली आणि त्यातल्या अनेकांना ईशान्य भारतात शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्यासाठी पाठवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी 33 वर्षे संघकार्यासाठी देशभ्रमण करताना कार्यकर्त्यांना उद्देशून जी विचार-मांडणी केली, तीत आणि एकनाथजींनी केलेल्या मांडणीत विलक्षण साम्य आहे. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे यशवंतराव केळकर यांनी याच प्रकारची मांडणी केल्याचे आढळून येते. श्रीगुरुजी, ठेंगडी, केळकर यांनी केलेली मांडणी आणि एकनाथजींनी केलेली मांडणी ही त्या त्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कार्यप्रेरणा देण्यास पुरेशी होतीच, त्यात खरी ताकद होती ती सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही संघटनेच्या कार्यकर्त्यांना उपयोगी पडू शकेल असे पाथेय देण्याची.

प्रस्तुत ग्रंथ त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे. केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निवेदिता भिडे यांनी सुमारे 400 पृष्ठांच्या या मूळ इंग्लिश ग्रंथाचे संपादन केले असून, केंद्राच्याच जीवनव्रती म्हणून काही वर्षे काम केलेल्या सुनीता करकरे यांनी त्याचा मराठी भावानुवाद केला आहे. मराठी प्रकाशन विभागाने स्थापनेपासूनच्या गेल्या तीन दशकांत 124 पुस्तके प्रसिध्द केली. सेवा समर्पण हे 125वे. केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाने प्रसिध्द केलेली सर्वच पुस्तके संस्कारक्षम आणि केंद्र कार्याचा धागा पुढे नेणारी. 'युगनायक' हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर लिहिले गेलेले शंभरेक पानांचे छोटे चरित्र. मूलत: स्वामीजींच्या जन्माला 150 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा स्वर्णलता भिशीकर यांनी ते लिहिले आणि गेल्या पाच वर्षांत त्याच्या लाखभर प्रती संपल्या. 'प्रेरणादीप' हे विवेकानंद केंद्रातर्फे शाळांत व महाविद्यालयांत घेतल्या जाणाऱ्या भारतीय संस्कृती परीक्षांसाठी रवींद्र गोळे यांच्याकडून मुद्दाम लिहवून घेतलेले पुस्तक. दोन वर्षांपूर्वी हे पुस्तक परीक्षेसाठी तयार करण्यात आले आणि त्यात महात्मा जोतिबा फुले, स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता, गाडगे महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांची छोटेखानी चरित्रे मुलांना अभ्यासासाठी देण्यात आली व त्यावर परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांमध्येही लाखापेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले. त्यांनी ती चरित्रे या निमित्ताने वाचली, अभ्यासली.

समाजाचे घटक असणारे आपण सर्वच जण या ना त्या प्रकारे समाजातील कुठल्या ना कुठल्या कार्याशी, संघटनेशी जोडले गेलेले असतो. भले आपण त्यात सक्रिय असू किंवा नसू. परंतु त्या कार्याशी आपला संबंध येतोच. मग त्यात आपण राहतो ती गृहनिर्माण संस्थाही असू शकते. अशा संघटनांचे कार्य करताना कार्यकर्ता म्हणून काय पथ्ये पाळावीत, यावरही विवेचन करणारे एक व्याख्यान या ग्रंथात आहे. ते केंद्राच्याच नव्हे, अन्य कुठल्याही कार्याशी जोडल्या गेलेल्या कुणालाही मार्गदर्शक ठरावे असे आहे.

--------------------------------------------------------------- 

 संघटना आपल्या रक्तातच नाही का?

'सेवा समर्पण' या ग्रंथातील एक प्रकरण

जीवनाचे ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी व्यक्तीचे जीवितकार्य याविषयी आपण चर्चा केली. आतापर्यंतची चर्चा व्यक्ती आणि त्याचे जीवनातील कार्य याबाबत होती. स्वामीजींनी दाखविलेल्या कर्मयोग, भक्तियोग, राजयोग आणि ज्ञानयोग या चार मार्गांपैकी आपण कर्मयोग अर्थात इतरांची सेवा करण्याचा मार्ग अनुसरत आहोत. ज्या व्यक्तीला त्याचे जीवितकार्य गवसले आहे आणि त्यानुसार त्याने समाजसेवा करण्याचा निर्धार केला असून त्यावर सखोल विचार केला आहे, त्याला या परिणामकारक व सातत्यपूर्ण अशा समाजसेवेसाठी संघटित काम करण्याची निकड लक्षात येईल. संघटितपणे काम केल्यास जास्तीत जास्त काम करता येते. विचार करणाऱ्या आणि आपले जीवन सार्थकी लावण्यासाठी वचनबध्द असलेल्या कोणत्याही व्यक्तीला संघटित प्रयत्नांचा भाग बनण्यास व समविचारी लोकांसमवेत काम करण्यास केव्हाही आवडेल. अशा प्रकारे तुमच्या जीवनातील ध्येय तुम्हाला संघटितपणे कार्य करण्यास प्रवृत्त करते.

पण संघटन आपल्या रक्तात आहे का? इतिहास असे सांगतो की, आपल्यामध्ये सामूहिकपणे व शिस्तबध्द रितीने काम करण्याचा अभाव आहे. आपला मत्सर आणि शत्रुत्व इतरांना खाली खेचते. आपण भारतीय संघटित काम करण्यासाठी सक्षम नसल्याचा आपला लौकिक आहे. आपल्याकडे असे सांगतात की, 'संघे शक्ती: कलौयुगे' (अर्थात, कलियुगात संघटनेमध्ये शक्ती आहे) तरीही आपण संघटित होण्यातील असमर्थताच व्यक्त करत असतो. हा पैलू जीवनाच्या एखाद-दुसऱ्या गोष्टीशी संबंधित नाही, तर आपला संपूर्ण इतिहास भारतीयांचे हे निराशाजनक वैशिष्टय दर्शवितो. येथील राजकीय क्षेत्र, आक्रमकांविरुध्दच्या लढाया, क्रीडा, व्यापार, कंपन्या, भागीदारी व्यवसाय, ऐहिक कार्यक्रम, आध्यात्मिक साधना या कशातही सुसंगती दिसत नाही. कोठेही एकता आढळत नाही.

आपल्यातील सर्व भेद विसरून एखाद्या सामाईक कारणासाठी एकत्र येऊन ते यशस्वीपणे पार पाडले आहे, असे आपल्या भारतीयांमध्ये दिसत नाही. खरे तर व्यक्तिवाद हा आपला राष्ट्रीय बाणा आहे. उलट संघटितपणा हा पाश्चात्त्यांचा जीव की प्राण आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात ते नेहमीच चांगल्या संघभावनेचे प्रदर्शन करतात. त्यांचे क्रीडाप्रकार, संगीत, प्रार्थना या सर्वातच संघटित प्रदर्शन दिसते. व्यक्ती गौण आहे, गट मुख्य आहे. या संघटित व शिस्तबध्द कार्याला व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि व्यक्तिवादाचा अभाव असल्याचे सांगून आपण ते झिडकारतो. म्हणूनच असे म्हटले जाते की, संघटन भारतीयांच्या रक्तातच नाही.

स्वार्थामुळे संघटित काम अशक्य

समजा, एकाद्या धंद्यासाठी चार जण भागीदार म्हणून एकत्र आले; परंतु त्यातून काही फारसे भवितव्य दिसत नसेल तर काय होते? प्रत्येकाला वाटते इतरांमुळे धंदा बसला आणि म्हणून धंद्यात सुधारणा करायची असेल तर बाकीच्या तिघांना काढून टाकले पाहिजे. प्रत्यक्षात धंद्याच्या अपयशाची कारणे शोधून काढणे हा उद्देश असला पाहिजे, परंतु प्रत्येक जण त्याचे खापर इतरांवर फोडतो. तो स्वत:ला कधीही दोष देणार नाही. त्यामुळे जर धंद्यात खोट आली तर भागीदारी संपुष्टात येते. जर धंदा भरभराटीला आला तर प्रत्येकाला असे वाटते - बघा, चार लाखांचा नफा झाला, पण आम्ही चार भागीदार आहोत. त्यामुळे नफाही चार भागात विभागला जाणार. मला फक्त एक लाखच मिळणार. तेव्हा काहीतरी शक्कल लढवून इतर तिघांना भागीदारीतून बाहेर काढले पाहिजे किंवा एकेक करून त्यांना डच्चू दिला, तर नक्कीच माझी भरभराट होईल.

म्हणजे भरभराट झाली तरी भागीदारी मोडकळीला येते. कारण भरभराटही वाटून घ्यायची असते हे आपण शिकलेलो नाही. व्यक्तित्ववादी! 'जर चार लाखाचा फायदा झाला, तर प्रत्येकाने एकेक लाख घ्यावेत. अखेर आम्ही सर्वांनी एकत्रित काम केले आहे. मला एक लाखात समाधान मानता आले पाहिजे. बाकीचे तिघे जण नसते, तर मला हे एक लाखही मिळाले नसते. तेव्हा जगा आणि जगू द्या. दुसऱ्यांनाही लाभ मिळो. माझाही फायदा होवो. माझा नफा प्रत्यक्षात इतरांशीच संबंधित होता.' भारतीय माणूस हे तत्त्व विसरतो आणि धंद्यात नफा झाला तरी दुसऱ्यांचे पाय ओढतो. भागीदारीत हा कोणता धंदा करेल? तर इतर भागीदारांना हाकलून देण्याचा. आपली सारी बुध्दी तो धंद्यात लावणार नाही. दुसऱ्या माणसाला आपल्या मार्गातून कसे हटविले पाहिजे, यावर बुध्दी खर्च करेल. याला काय म्हणावे! आपल्या व्यक्तिकेंद्री दृष्टीकोनामुळे आपल्याला संघटितपणे काम करणे शक्य होत नाही.

मत्सरामुळे संघटितपणे काम करणे अशक्य

सर्वांनी मिळून युध्द कसे करावे हेही आपल्याला माहीत नाही. सर्वांनी मिळून भरभराटीचे आयुष्य कसे जगावे, सर्वांनी मिळून व्यवस्थापन कसे करावे, सर्वांनी मिळून धंदा करा करावा हे आपल्याला कळतच नाही. सर्वांनी मिळून कसे खेळावे, खेळांमध्ये कसा भाग घ्यावा हे आपल्याला समजत नाही. खेळांमध्येही काही प्रमाणात टीमवर्क असतेच. हॉकीमध्ये गटातील प्रत्येकाला काहीतरी कामगिरी सोपविलेली असते. गोलकीपर कुठेही जाऊन गोल करू शकत नाही. त्याला निर्धारित ठिकाणी थांबून गोलचे रक्षण करावे लागते. पण जर त्याने असा विचार केला की, 'मी खेळतोय, पण गोल करण्याचे श्रेय दुसऱ्यालाच मिळत आहे. मला नाही हे आवडत. त्याने गोल केला हे सगळे जण बघत आहेत. मी काही गोल केलेला नाही. मीच ते केले पाहिजे. मी बॉल स्वत:च घेईन आणि गोल करेन. तो कोण करणार? मी करेन गोल.' मग तर खेळाचा खेळखंडोबा होईल.

हॉकी आणि फुटबॉलमध्ये सर्व खेळ चेंडू एकाकडून दुसऱ्याकडे जाण्याभोवती फिरत असतो. जो मोक्याच्या ठिकाणी असेल त्याच्याकडे तुम्ही चेंडू फेकता, कारण तो तशा महत्त्वाच्या ठिकाणी आहे. मग तो बॉल दुसऱ्याकडे टोलवतो. दुसरा तिसऱ्याकडे टाकतो आणि अखेर गोल कोणी चौथाच खेळाडू करतो. जरी संपूर्ण टीमने त्यासाठी प्रयत्न केला, तरी गोल करण्याचे श्रेय त्या अंतिम खेळाडूकडे जाते. पण जर व्यक्तित्ववाद आला, तर प्रत्येक खेळाडू असा विचार करेल. त्या खेळाडूनेच गोल कशाला करायला पाहिजे? मी गोल करेन म्हणून मी चेंडू दुसऱ्याकडे टाकणारच नाही. मी तो कोणालाच देणार नाही. मी गोल करायचा प्रयत्न करेन. मी गोलपर्यंत बॉल घेऊन जाईन. खेळामध्येही तुम्हाला दिसले की, खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्तीचा अभाव असतो. किमान खेळ तरी या साऱ्यापासून मुक्त असायला पाहिजेत. म्हणूनच क्रीडामंडळे खेळांचे आयोजन करत नाहीत. टीम बनविण्यापासूनच मतभेद सुरू होतात. खेळ तर दूरच राहिला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुध्द संघात कोणाचा अंतर्भाव करायचा? तेथूनच मतभेद सुरू होतात. कोणता खेळाडू योग्य ठरेल? कोणता खेळाडू कार्यक्षम आहे? याचा काही विचारच नाही.

आपण एकीच्या भावनेने खेळ खेळू शकत नाही. आपण शत्रूच्या विरोधात एक होऊ शकत नाही. तुम्ही व्यवस्थापन चालवू शकत नाही. आपल्या सार्वजनिक कामांची स्थिती बघा. इतकेच काय, तुम्ही एक वाचनालय चालवू शकत नाही. शाळा चालवू शकत नाही आणि दवाखानाही चालवू शकत नाही. मग नगरपालिका कशी चालविणार? नगरपालिका बघा, शहर आराखडा समित्या, सार्वजनिक स्थळे, सार्वजनिक ग्रंथालये, सरकारी दवाखाने बघा! त्यांची काय स्थिती आहे! जेथे जेथे लोक एकत्र येतात तेथे तेथे ते एकत्रित काम करून दाखवू शकत नाहीत. आणि म्हणून भारतीय लोकांबाबत असे म्हटले जाते की, ते संघटित कामासाठी योग्य नाहीत.

मत्सर किंवा द्वेष आपल्याला त्रास देतो. तुमच्या गटात कोणी चांगले काम केले, तर त्याला कोणी दाद देत नाही. तुमच्या मनात प्रथम कोणती भावना येत असेल तर ती असते मत्सराची. कोणी प्रगती करत असेल तर इतरांना आनंद होत नाही. 'लोक त्याचेच कौतुक करतात. कोणी माझ्याबद्दल काही म्हणत नाही' असे म्हणत तुम्ही दु:खी होता. तुमच्या मनात अशा गोष्टी सर्वप्रथम येतात. जर कोणी एखादी इमारत बांधली, त्यात धंदा किंवा व्यवसाय सुरू केला आणि पाच वर्षांत त्याने स्वत:चे घर घेतले, तर लोक त्याच्या परिश्रमाचे कौतुक करणार नाहीत. 'हा माणूस अतिशय उद्योगी आहे. अवघ्या पाच वर्षांत तो स्वत:च्या पायावर उभा राहिला. कर्ज घेऊन सुरुवात केली, पण सगळे कर्ज फेडले, आता स्वत:चे घर आहे. दोन दुकाने आहेत, किती वेगाने प्रगती केली याने', पण असे कौतुक करण्याऐवजी त्याचे शेजारी, इतकेच काय त्याचे मित्र त्याच्याविषयी मत्सर बाळगतील. 'एवढी प्रगती कशी केली याने! मला का नाही करता आली?' सतत मत्सर धुमसत राहतो!

आत्मकेंद्रित असल्याने संघटितपणे काम करणे अशक्य

तुम्ही नेहमी स्वत:ला सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी मानता! प्रत्येक गोष्टीचे मोजमाप तुमच्याप्रमाणे व्हावे! एखाद्या घटनेबाबत पाहताना आपण म्हणतो ही घटना 1920 साली घडली किंवा इसवीसनपूर्व 800 वर्षे किंवा विक्रम संवत 2000मध्ये घडली. परंतु आत्मकेंद्रित व्यक्तीला कोणी ख्रिस्त नसतो, विक्रमादित्य नसतो, कोणीच नसते! तो प्रत्येक गोष्टीकडे कसे पाहतो? माझ्या पूर्वी आणि माझ्यानंतर मी सगळया गोष्टींच्या केंद्रस्थानी आहे. तुम्ही माझ्यापासून अंतराचे मोजमाप करा. तुम्ही कुठे गेलात! मी येथे आहे. दुसरी व्यक्ती माझ्यापासून किती पुढे किंवा मागे आहे? प्रत्येक गोष्ट त्याच्या स्वत:पासून सुरू होते. तो व्यक्तिवादी मनाचा कल आहे. त्यामुळे भारतीयांना अन्य लोक व्यक्तित्ववादी, आत्मकेंद्री समजतात. तेव्हा भारतीय लोक काही महान साध्य करतील अशी शक्यताच नाही. ते म्हणतात, तुमचे संगीत बघा ते व्यक्तिगत आहे; पाश्चात्त्य संगीत बघा ते सामूहिक आहे. तुमचे नृत्य व्यक्तिगत आहे, तुम्ही व्यक्तिगत गाता, तुमच्या साऱ्या कृती व्यक्तिगत आहेत. तुमचे तत्त्वज्ञानही तसेच आहे, असा ते शेरा मारतात. तुमचे तत्त्वज्ञान 'अहम'पासून सुरू होते. 'अहम् ब्रह्मास्मि'ची सुरुवात तुमच्यापासून होते. तुमचे तत्त्वज्ञानही असे आहे की, तुम्ही स्वत:ला विसरूच शकत नाही. त्यात तुम्ही स्वत:ला या विश्वाचे केंद्र मानता.

ही विधाने योग्य असोत वा नसोत. ती तुम्हाला विचारात तर घ्यावीच लागतील! आजूबाजूला बघितले तर त्यात तथ्य असल्याचे तुम्हाला आढळेल. निदान तसे दिसते तरी. सगळे व्यक्तिगत दृष्टीकोन, कोणताही सामूहिक प्रयत्न नाही. सामूहिक प्रयत्नांची आवडही नाही. भागीदारी, खेळ अशा सांसारिक गोष्टीमधील स्वार्थ एकवेळ समजू शकतो, पण आध्यात्मिक गोष्टीतही तेच! दोन संन्यासी एकत्र येऊ शकत नाहीत. दोन गृहस्थ मोठया मुश्किलीने का होईना एकत्र येऊ शकतील, पण दोन संन्यासी शक्यच नाही. कोणाला असे वाटेल की, या आध्यात्मिक गुरूंनी सर्व सांसारिक गोष्टींचा त्याग केला आहे. त्यांचे व्यक्तिगत असे काय असेल? तेव्हा या गोष्टीपासून मुक्त असणारे हे संन्यासी आणि साधू तत्परतेने एकत्र येतील. पण ते शक्य नाही!

संकुचित मनोवृत्तीमुळे संघटित काम अशक्य

मला आठवते की एकदा कोणीतरी विविध धार्मिक पंथांची बैठक आयोजित केली होती. भारतामध्ये वैष्णव, शैव, लिंगायत, जैन, बौध्द आणि इतर पंथ आहेत. शिखांमध्येही पंथ आहेत. तेव्हा एका संघटनेच्या एका महानुभावाने या सर्व पंथोपंथांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. धर्माला चालना मिळावी व लोकांच्या गरजा काय आहेत ते ध्यानी यावे, यासाठी काही हितकर चर्चा होतील अशी अपेक्षा होती. हे सर्व धार्मिक पंथ आहेत. सगळीकडे जडवादाचा प्रसार होत असल्याने धर्माला चालना मिळावी असे या लोकांना वाटत होते. त्यामुळे सर्व लहान-मोठया धार्मिक नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 'प्रयत्न चांगला आहे' प्रत्येकाने म्हटले, 'हो, आम्ही येऊ. किमान एक दिवस आपण एकत्र आले पाहिजे व चर्चा केली पाहिजे' त्याचा अन्वयार्थ लक्षात न घेता ते म्हणाले, 'आम्ही येऊ'. परंतु जेव्हा एकत्रीकरणाची वेळ जसजशी जवळ येऊ लागली, तेव्हा आयोजकांपुढे मोठीच समस्या उभी राहिली. 'जेव्हा ते येतील तेव्हा त्यांची बसण्याची व्यवस्था कशी ठेवायची? मंचावर त्यांची आसने कशा पध्दतीने मांडायची? उजवीकडे कोण बसणार आणि डावीकडे कोण बसेल? मध्यभागी कोण विराजमान होणार?' एक खराखुरा प्रश्न, महाभयंकर समस्या! मध्यभागी कोणाला बसवावे? कारण याला महत्त्व आणि अग्रस्थान मिळेल आणि इतरांना ते आवडणार नाही. एखादा आध्यात्मिक नेता मध्यभागी असेल तर इतर म्हणतील, 'हे काय? असा अपमान करायला त्यांनी आम्हाला इथे बोलावले आहे का?' या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्या संघटनेतील काही विवेकी लोकांनी गोलाकार बसण्याची व्यवस्था केली. कारण गोल कुठून सुरू होतो हे कोणालाच कळत नाही! सगळे प्रश्न सुटले!

ब्रिटिशांच्या शासनकाळात एकदा भारतातून विविध राजे लंडनला गेले. महाराजांना माहीत नव्हते, पण ब्रिटिशांनी कोणता राजा महत्त्वाचा आहे आणि कोणता नाही याचा स्वत:हून एक क्रम निश्चित केला. तरीही पतियाळा, सिंदिया, नेपाळ, भूतान, राजस्थान, मेवाड, कोल्हापूर, होळकर इ. महाराजांची बसण्याची कशी व्यवस्था करायची हा प्रश्न ब्रिटिशांना पडलाच. साहजिकच कोणीतरी पहिले येणार. जो शेवटी येणार त्याला वाईट वाटणार. यावर तोडगा काय? तेथेही त्या मंत्र्यांनी काहीशी अशीच व्यवस्था केली. गोलाकार व्यवस्था करण्यात आली. राज्य सचिवाच्या डावीकडून त्यांनी राजांना त्यांच्या क्रमाप्रमाणे बसविण्यास सुरुवात केली. अर्थात, शेवटची व्यक्ती त्या मंत्रीमहोदयांच्या उजव्या बाजूला आली. त्यामुळे त्या व्यक्तीला आनंद झाला. 'मी मंत्रीमहोदयांच्या उजवीकडेच होतो.' असे त्याला वाटले, जरी प्रत्यक्षात तो शेवटी होता. मंत्र्यांच्या डावीकडील राजानेही स्वत:ची समजूत काढली. 'अखेर मंत्रीमहोदय माझ्या उजव्या हाताला होते.' असल्या बालिश गोष्टींबाबत माणसे स्वत:लाच महत्त्व देतात.

एकदा एका संन्याशाबरोबर माझी चर्चा चालू होती. अगदी अनौपचारिक चर्चा होती. मी म्हणालो, ''जर काही संन्यासी एकत्र आले, तर आपण काहीतरी करू शकू.'' ते म्हणाले, ''नाही, नाही, असे करू नका. अजिबात करू नका. संन्याशांना एकत्र आणण्याची चूक करू नका.'' मी म्हणालो, ''आपणास का बरे एवढी धास्ती वाटत आहे?'' ते म्हणाले, ''हे बघा, आपण सर्व जण अद्वैती आहोत. दोन नव्हे, तर एक अद्वैत, द्वैत नाही! लक्षात ठेवा, आपण सर्व अद्वैती आहोत आणि आम्ही दोन जणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत नाही. 'एकमेवाद्वितीयम्'!'' थोडक्यात, राजकारणी असोत की खेळाडू, व्यापारी असोत की धार्मिक नेते ते एकमेकांबरोबर काम करू शकत नाहीत असे आपल्याला आढळून येईल. देशातील प्रत्येकाचा तो एक सर्वसाधारण अनुभव आहे.

अर्थात, लोक एकत्र येतच नाहीत असे नव्हे. त्यांनी एकत्र येण्यामागे कोणती प्रेरणा असते? आपण पाहतो अनेक लोकांना एकत्र आणून, मोठमोठे मोर्चे निघतात, संघटना स्थापन होतात, राजकीय पक्ष स्थापन होतात. मोठी मोठी सत्रे होतात. राजकीय सभा होतात आणि बरेच काही होते. जर एकी नसेल तर ते एकत्र कसे येतात? त्यामागे एक कारण आहे. लोकांना भांडायची इतकी हौस असते की, ते मोठया प्रमाणावर भांडू इच्छितात, म्हणून ते एकत्र येतात. तुम्ही फक्त दहा जण असाल, तर भांडण्यात काय मजा आहे? दहा जणच भांडणार असतील तर अखिल भारतीय स्तरावर कोण भांडेल! आपला अखिल भारतीय पक्ष असेल, किंवा शक्य असल्यास जागतिक पक्ष असेल तर कितीतरी मोठया प्रमाणावर भांडता येईल.

लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपीनचंद्र पाल हे स्वातंत्र्यचळवळीतील तीन दिग्गज होते. या त्रिकूटाला 'लाल, बाल, पाल' असे ओळखले जाई. मला वाटते बिपीनचंद्र पाल यांनी एकदा गमतीने म्हटले होते, ''पाहा हे ब्रिटिश अगदी मोजके आहेत आणि आपली लोकसंख्या केवढी प्रचंड आहे. त्यांच्याशी लढण्यात आपल्याला फार कष्ट पडायला नकोत. मोठया प्रमाणावर दारूगोळा, शस्त्रास्त्रे किंवा मोठया प्रयत्नांची गरज नाही. आपण फक्त एकत्र आलो तरी स्वराज्य मिळू शकेल. आपण सर्व जण मिळून थुंकलो तरी ब्रिटिश साम्राज्य त्यात वाहून जाईल!'' दुसरा माणूस म्हणाला, ''होय, आपले देशवासी पहिल्या भागासाठी तयार होतील. ते एकत्र थुंकतील, पण ते एकमेकांवर थुंकतील. आपल्या महान नेत्याने आपल्याला थुंकायला सांगितले आहे. तेव्हा आपण त्याच्यावर किमान एवढे तरी उपकार करायला हवेत. पण ते परस्परांवरच थुंकतील.'' हे आपल्याबद्दलचे विदारक चित्र आहे. आपण एकत्र येऊन काम करू शकत नाही.

एक आर्यसमाजी नेता असे म्हटल्याचे मला स्मरते की, 'विशेषकरून हिंदूंना संघटित करणे म्हणजे बेडकांचे एकत्र वजन करण्यासारखे आहे.' समजा, तुम्ही एक तराजू घेतला. त्याच्या एका पारडयात एक किलोचे वजन ठेवले आणि दुसऱ्या पारडयात तेवढया वजनाचे बेडूक टाकायला लागलात, तर तुम्हाला ते काम कधीच पुरे करता येणार नाही. पोत्यातून काढलेले बेडूक एका जागी राहणारच नाहीत. एक बेडूक उडी मारून कुठेतरी पसार होईल. दुसरा बेडूक वजन करणाऱ्या महाशयांच्या डोक्यावर उडी घेईल. दुसरे बेडूक काही स्वस्थ बसणार नाहीत. ते उडया मारत इकडेतिकडे जातील आणि वजन करणे राहील बाजूला. भारतीयांना संघटित करणे हे बेडकांचे वजन करण्याइतकेच अवघड काम आहे. आपल्याबद्दल लोकांची अशी धारणा आहे.

एकत्र काम करमे गरजेचे. पण ते शक्य आहे? ते आपल्या रक्तात आहे?

आता आपण कर्मयोगाचा मार्ग निवडलेला आहे. जर काम नीट आणि वेगाने करायचे असेल, तर ते एकत्रितपणे केले पाहिजे. ते संघटितपणे केलेले काम असायला हवे. पण आपल्या वर्तमान कार्यपध्दतीबाबत असे म्हटले जाते की, 'आपण सामूहिक कामाकरिता जन्मलेलोच नाही. संघटन आपल्या रक्तात मुळीच नाही. त्यामुळे आपण एकेकटयानेच काम करावे हे बरे. संघटित कामाचा विचार करू नका. कारण ते तुम्ही करू शकणार नाही. भारतात ते अशक्य आहे.' भारतीयांबाबत बहुतांश लोकांचे मत असे आहे. पण असे खरेच आहे का? पुढील प्रकरणात आपण ते बारकाईने तपासून पाहू.

 

-----------------------------------------