रग रग हिन्दू मेरा परिचय

 विवेक मराठी  17-Aug-2018

अटलजींचं यथार्थ वर्णन करण्यासाठी 'रग रग हिन्दू मेरा परिचय' या त्यांच्याच काव्यपंक्ती समर्पक आहेत. यामध्ये त्यांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान सामावलं आहे. त्यांच्या जीवनात ठायी ठायी याचे दाखले आहेत. संघस्वयंसेवक, पत्रकार, राजकीय नेता, सजग विरोधी पक्षनेता, कर्तव्यकठोर पंतप्रधान आणि त्याच वेळी जागं असलेलं संवेदनशील कवीचं मन. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले हे सगळे पैलू नजरेसमोर आणले तरी त्यात त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचं प्रतिबिंब दिसतं. ते सहिष्णू होते, समन्वयवादी राजकारणी होते, कारण त्यांना हिंदुत्वाचा, हिंदू असण्याचा नेमका अर्थ उमगला होता. त्यांच्याठायी असलेली सगळी गुणवैशिष्टयं ही त्यांच्यातल्या सच्च्या हिंदुत्ववाद्याची ओळख आहे. सहिष्णुता आणि हिंदुत्व या दोन परस्परविरोधी संकल्पना आहेत असा भ्रम आज बाहेरच्या जगात निर्माण केला जात असल्याने हे आवर्जून नमूद करावं लागत आहे.

ऋषिमुनींची वैभवशाली परंपरा लाभलेल्या या भारतदेशातले ते आधुनिक ऋषी होते. विजनवास न पत्करता, राष्ट्रहितासाठी अवघं आयुष्य समर्पित करणारे ऋषी. एकाच व्यक्तीमध्ये इतक्या सद्गुणांचा समुच्चय ही देवदुर्लभ गोष्ट. अटलजींना हे सद्गुणांचं वरदान लाभलं होतं. त्याचं त्यांनी निगुतीने जतनच केलं नाही, तर संवर्धन केलं आणि आपलं अवघं जीवनच राष्ट्रार्पण केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो वा जनसंघ, जनता पार्टी असो वा भारतीय जनता पक्ष.. ही सगळी माध्यमं होती अटलजींच्या कार्याची. त्या त्या माध्यमातून त्यांनी काया-वाचा-मन-बुध्दीने राष्ट्राची सेवा केली.

'राष्ट्र प्रथम' याचं अष्टौप्रहर भान ठेवून त्याप्रमाणे वर्तन असणारे अटलजी त्यांच्या संघटनेतील, राजकीय पक्षातील सहकाऱ्यांना जितके प्रिय होते, आदरणीय होते, तितकाच आदरभाव त्यांना भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षातील लोकांकडून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मिळाला. अगदी सक्रिय राजकारणापासून दशकभराहून अधिक काळ दूर राहिल्यावरही त्यांच्याविषयीची राजकीय आणि सर्वसमान्य लोकांच्या मनातली आत्मीयता कणभरही कमी झाली नाही, याला कारण होतं त्यांचं जगणं. अजातशत्रुत्वाचं, निर्मोही-निष्कलंक जगण्याचं उदाहरण असलेलं त्यांचं आयुष्य. अनेक राजकीय चढउतारांशी सामना करताना त्यांनी मनाची शांती आणि समत्व कधी ढळू दिलं नाही. भारताचं विभाजन होऊन तयार झालेल्या पाकिस्तानशी जेव्हा वेळ आली, तेव्हा दोन हात करायला मागेपुढे न पाहणारे अटलजी, त्यांच्याच समोर मैत्रीसाठी हातही पुढे करत होते. ही केवळ राजकीय मुत्सद्देगिरी नव्हती, तर त्यापलीकडची आत्मीयता होती. जगात आणि भारतासह शेजारी राष्ट्रांत शांतता नांदायला हवी असेल तर सर्वांशी सुसंवाद हवा, स्नेहपूर्ण संबंध हवेत याची त्यांना जाणीव होती. आणि असे संबंध केवळ राजकीय पातळीवरूनच नव्हे, तर सर्व स्तरांवरून राखले जायला हवेत असं त्यांना वाटत असे. अशा विचारसरणीमुळे चौदा वर्षं बंद असलेल्या या दोन देशांमधलं क्रिकेट सुरू करण्यासाठी त्यांनी उत्तेजन दिलं. पाकिस्तानच्या दौऱ्यावर निघालेल्या भारतीय चमूला निरोप देताना त्यांनी सांगितलं, ''खेल ही नही, दिल भी जितिए।'' मनं जिंकण्याला सर्वोच्च प्राधान्य देणारा आणि विरोधकांची मनं जिंकून घेणारा असा हा नेता होता.

कविमनाचा राजकीय नेता हीदेखील दुर्मीळ बाब. ते केवळ कविमनाचे नव्हते, तर त्यांच्यातल्या कवीला त्यांनी कायम जागं ठेवलं होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या या दोन अभिन्न बाजू होत्या. त्या दोन्ही बाजू कायम देशहितासाठीच उपयोगात आल्या. संघस्वयंसेवक झाल्यानंतर त्यांच्यातील कवीला देशभक्तिपर रचनांचं लागलेलं वळण शेवटपर्यंत कायम राहिलं. आपल्या सहकाऱ्यांमध्ये दुर्दम्य विश्वासाचं बीजारोपण करणारा आणि ते प्रत्यक्षात येण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारा असा हा नेता होता. भारतासारख्या देशात जेव्हा हिंदुत्ववादी विचारसरणीवर टीका करण्यात धन्यता मानणारेच बहुसंख्य होते, त्या वेळी भारतीय जनता पक्षासारख्या हिंदुत्वाची कास धरणाऱ्या पक्षाची स्थापना होत असताना, 'अंधेरा छटेगा... कमल खिलेगा' हा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनात जागवणारा आणि त्यासाठी दिवसरात्र एक करणारा हा नेता होता. केवळ चार दशकांच्या वाटचालीत भाजपाने लोकसभेत पूर्ण बहुमत प्राप्त करण्यापर्यंत केलेला प्रवास हे अटलजी आणि अडवाणी या दोघांच्या कुशल नेतृत्वाला, कार्यकर्ता घडणीला आलेलं यश आहे.

अटलजींनी आयुष्यात ज्या ज्या भूमिका निभावल्या, त्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देत नवे मापदंड निर्माण केले. विरोधी पक्षनेता म्हणून लोकसभेत जबाबदारी पेलताना, विरोधासाठी विरोध नव्हे तर राष्ट्रहितासाठी आवश्यक तिथे विरोध आणि राष्ट्रहितासाठी गरजेचं असेल तेव्हा सरकारला संपूर्ण सहकार्य हे त्यांचं धोरण असे. त्यांच्या अजातशत्रुत्वामागे त्यांनी पाळलेलं हे धोरण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात 1994 साली जिनिव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेसाठी जाणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व अटलजींकडे अालं. हा त्यांच्यात वसत असलेल्या सम्यक दृष्टीकोनाचा सन्मान होता. बाबरी पतनानंतर झालेल्या या परिषदेला मुस्लीम राष्ट्रांची उपस्थिती लक्षणीय असणार होती. भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या परिषदेत आपली बाजू समर्थपणे मांडत अटलजींनी आपली आणि पर्यायाने देशाची छाप तिथे उमटवली.

देशाच्या पंतप्रधानपदी तीन वेळा विराजमान होणारे, बिगरकाँग्रेसी असलेले ते एकमेव नेते. सुमारे 30 पक्षांची मोट बांधून तयार झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं यशस्वी नेतृत्व करत भारतासारख्या खंडप्राय देशात असा प्रयोगही यशस्वी होऊ शकतो, हा चमत्कार त्यांनी घडवला.

जगातल्या शक्तिशाली अण्वस्त्रधारी राष्ट्रांमध्ये भारताची गणना होण्यासाठी अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेणारे आणि त्या चाचणीनंतर झालेल्या टीकेच्या भडिमाराच्या वेळीही घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहणारे, त्याचं समर्थन करणारे कणखर आणि दूरदृष्टीचे पंतप्रधान त्यांच्या रूपात या देशाला लाभले, हे या देशाचं भाग्य. पंतप्रधान म्हणून अथक काम करत या देशासाठी त्यांनी वैविध्यपूर्ण योगदान दिलं.

सुमारे 50 वर्षांच्या राजकीय योगदानानंतर जेव्हा त्यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली, तेव्हा तिचंही काटेकोर पालन केलं. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की, अटलजींचं पूर्ण आयुष्य म्हणजे, 'रग रग हिन्दू मेरा परिचय' आहे. अगदी निवृत्तीच्या संन्यस्त कालखंडापर्यंत.