पूर्ण समर्पित व्यक्तिमत्त्व

 विवेक मराठी  20-Aug-2018

1952 साली सातारा जिल्ह्यातून पुणे शहरात प्रचारक म्हणून नानांची बदली झाली. व्यक्तिश: माझा व त्यांचा निकटचा संबंध तेव्हापासून आला. अमाप परिश्रम व सामाजिक प्रतिकूलता यामुळे नानांचे शारीरिक स्वास्थ्य सदैव बिघडलेले असे. त्याही अवस्थेत त्यांचे नित्य संघकाम पूर्वीच्याच तळमळीने व उत्कटतेने चालत असे. नानांच्या बैठकीत बसणे, त्यांचा बौध्दिक वर्ग ऐकणे, त्यांच्याबरोबर चर्चा करणे हा विलक्षण अनुभव असे. विचारांची स्पष्टता, उत्कृष्ट शब्दरचना व प्रवाही ओघ यामुळे त्यांचा संवाद मनावर कायमचा ठसा ठेवून जात असे.

रा.स्व. संघाच्या कामाला सुरुवात होऊन 90 वर्षे होऊन गेली. पहिला कालखंड उपेक्षेचा होता. मैदानावर खेळणारी 'पोरेटोरे' काय करणार? असे म्हणून समाजातील बुजुर्ग या कार्याकडे तुच्छतेने पाहत असत. संघसंस्थापक पू. डॉ. हेडगेवार यांना पुण्यातील एका ज्येष्ठ विद्वानाने म्हटले होते, ''तुमची ही नागपुरी संत्री (विद्वानांच्या) पुण्यात खपत नाहीत.'' दीर्घकाळ अशी उपेक्षा सहन करीत पू. डॉ. हेडगेवार, त्यांचे सहकारी व अनुगामी यांनी अमाप परिश्रमातून ठिकठिकाणी समर्पित कार्यकर्त्यांची मांदियाळी निर्माण केली.

या मांदियाळीमध्ये 'प्रचारक' या संस्थेचे मोठे योगदान आहे. संघकामासाठी स्वत:ला पूर्ण वाहून घेणे, जीवनात दुसरा कोणताही उद्देश किंवा व्याप नसणे, संघटनेसाठी अखंड परिश्रम करणे हे प्रचारकाचे जीवनकार्य! असे अंगीकारलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या बळावर संघकार्याचे आजचे विशाल समाजव्यापी रूप उभे राहिले आहे. हणूनच प्रचारक संस्था हे संघकामाचे R.C.C Structure आहे, असे म्हटले जाते.

नाना पालकर हे अशा प्रचारकांचे अग्रणी. पुण्यात माध्यमिक शिक्षण चालू असतानाच त्यांचा संघकामाशी संपर्क आला. मूलत:च उत्कट मानसिकता असणारे नारायण हरी पालकर संघकामात गुंतून गेले. त्यासाठी आवश्यक ती बौध्दिक तयारी आणि शारीरिक परिश्रम या दोहोंनी त्यांचे जीवन व्यापून टाकले. परिणामत: महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडून नाना पालकर संघाचे पूर्णवेळ कायकर्ते म्हणून बाहेर पडले.

1945 ते 1955 हा काळ संपूर्ण देशातच अत्यंत खळबळीचा होता. संघकामासाठी तर तो प्रतिकूल होता. हिंदुत्व हा विषय कुचेष्टेचा, उपेक्षेचा होता. ब्राह्मणवादी म्हणून संघाची हेटाळणी होई. नाना पालकरांना कार्यक्षेत्र म्हणून मिळालेला सातारा जिल्हा सर्व दृष्टींनी अत्यंत प्रतिकूल होता. संघकामाला नुसता विरोध नव्हता, तर भीषण दहशत होती. परंतु त्या परिस्थितीत नानांनी तरुणांचे भक्कम संघटन बांधले. नानांची बौध्दिक क्षमता, वक्तृत्वशैली अत्यंत प्रभावी होती. त्या जोडीला विलक्षण परिश्रम, अखंड भ्रमण व सहज जाणवणारा सेवाभाव यामुळे नानांनी सातारा जिल्ह्यात छोटया-मोठया गावांतही संघशाखेचे जाळे उभे केले. मला उदाहरण आठवते ते कोळे नावाच्या छोटया गावाचे. या छोटया गावात बहुजन समाज व कोळी समाजच बहुसंख्य होता. चार-पाच हजार वस्तीच्या या गावात प्रभात 4-4 व 4-4 सायंशाखा चालत होत्या. संघशिक्षा वर्गाला मोठया संख्येने स्वयंसेवक येत असत. भोई समाजातील प्रमुख असलेले अण्णा भोई हे संघकामाचे जिल्हा कार्यवाहक म्हणून सातारा जिल्ह्याचे प्रमुख झाले. नानांच्या नेतृत्वाखाली सातारा शहरात व खेडोपाडी ठिकठिकाणी असे तरुणांचे संच निर्माण झाले.

नाना उत्तम कवी होते. संघकामाच्या आत्यंतिक व्यग्रतेतदेखील त्यांचे उत्कट काव्यलिखाण चालू होते. नित्य संघकामात त्यांनी रचलेली अनेक गीते आम्ही स्वयंसेवक म्हणत असू. अर्थात त्यांनी ही गीते रचली आहेत, ही माहिती मात्र आम्हा स्वयंसेवकांना क्वचितच होत असे. 1952 साली सातारा जिल्ह्यातून पुणे शहरात प्रचारक म्हणून नानांची बदली झाली. व्यक्तिश: माझा व त्यांचा निकटचा संबंध तेव्हापासून आला. अमाप परिश्रम व सामाजिक प्रतिकूलता यामुळे नानांचे शारीरिक स्वास्थ्य सदैव बिघडलेले असे. त्याही अवस्थेत त्यांचे नित्य संघकाम पूर्वीच्याच तळमळीने व उत्कटतेने चालत असे. नानांच्या बैठकीत बसणे, त्यांचा बौध्दिक वर्ग ऐकणे, त्यांच्याबरोबर चर्चा करणे हा विलक्षण अनुभव असे. विचारांची स्पष्टता, उत्कृष्ट शब्दरचना व प्रवाही ओघ यामुळे त्यांचा संवाद मनावर कायमचा ठसा ठेवून जात असे.

पुण्याच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांच्या बैठकीत नानांना आम्ही बोलावले होते. रात्री 10 ते मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या त्या बैठकीत नानांच्या संवादाने सर्वांची मने जिंकून घेतली. बैठक संपून पांगापांग झाल्यावर माझे डॉक्टर सहकारी मला म्हणाले, ''काय विद्वान माणूस आहे हा! कोण्या विषयात यांनी पी.एचडी. केली आहे?'' नानांनी संघकामाच्या ओढीमुळे पदवी परीक्षासुध्दा दिलेली नाही, हे कळल्यावर तो विस्मयचकित झाला.

वर उल्लेखिल्याप्रमाणे नानांनी लिहिलेली गीते संघशाखांवर म्हटली जात. कवी कोण? हे क्वचितच प्रकट होत असे. स्वत: नानांची या बाबतीत काय भावना असावी? पुण्याच्या शिवाजी मंदिर शाखेत स्वयंसेवकांचे एकत्रीकरण होत असे. शाखेवर गीत सांगितले गेले. नाना स्वत: शाखेवर उपस्थित होते. शाखा सुटल्यावर तरुणांचे छोटे-छोटे गट गप्पाटप्पा करीत उभे होते. एका कोंडाळयात कोणीतरी सहज म्हटले, ''अरे, माहीत आहे काय? आज जे पद्य म्हटले, ते नानाराव पालकरांनी लिहिलेले आहे!'' त्या कोंडाळयात पद्मनाभ नावाचा फटकळ स्वयंसेवक होता. त्याने पटकन प्रतिक्रिया दिली, ''हॅट! नाना बिना कोण मला माहीत नाही. हे गीत नानांचे नाही, हे संघाचे गीत आहे!'' गमतीची गोष्ट अशी की नाना पाठीमागेच उभे राहून हे ऐकत होते. ते पुढे आले, पद्मनाभला त्यांनी अक्षरश: वाकून नमस्कार केला व म्हणाले, ''तू माझे डोळे उघडलेस. खरेच हे गीत माझे नाही. सगळे काही संघाचेच आहे!''

नानांबरोबर व्यक्तिगत संवाद करण्याचा, चर्चा करण्याचा योगही मला अनेकदा आला. मी वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी होतो. वयाचे अंतर असूनही मुक्त संवाद चाले. संघकामाच्या विविध पैलूंची सखोल चर्चा होई. एका संवादात बोलता बोलता संघकामाच्या भविष्याविषयी त्यांनी त्या वेळी केलले एक विधान पटले, पचले नव्हते. ते म्हणाले, ''संघकामाची विचारांची समाजात इतकी बहुविध व्याप्ती होईल की, नित्य चालणारी शाखा हा त्याचा एकच निकष असणार नाही.'' नाना हे द्रष्टे चिंतक होते.

 पुण्यातील महाविद्यालयीन तरुणांचा सहलीचा कार्यक्रम सातारा रस्त्यावर अरण्येश्वर मंदिरात आयोजिला होता. तरुणांची मोठी संख्या उपस्थित होती. नानांच्या बौध्दिक वर्गात स्वयंसेवकांची त्यांनी सांगितलेली दोन रूपे याचे वर्णन तो बौध्दिक वर्ग एकलेल्या सर्वांच्या मनात कायमची ठसली असणार. नाना म्हणाले होते, ''मारुतीची दोन रूपे असतात - एक 'वीर' मारुती आणि दुसरा 'दास' मारुती. भूपकार करणारा आक्रमक गदाधारी मारुती हा 'वीर' मारुती आणि प्रभू रामचंद्राच्या पायाशी गदा बाजूला ठेवून नम्रपणे हात जोडून बसलेला तो 'दास' मारुती! स्वयंसेवकांची अशीच दोन रूपे असावीत. समाजात वावरताना संकटांचा सामना करताना तो 'वीर' मारुती व संघटनेत काम करताना तो 'दास' मारुती असला पाहिजे.'' हे बोलताना त्यांनी मंदिरातल्याच मारुतीच्या प्रतिमांकडे निर्देश केला होता.

विविध जबाबदाऱ्या निभावताना अखेरची वषर्े नाना संघाचे प्रांत कार्यवाह होते. स्वास्थ्य ठीक नसतानाही त्यांचा प्रवास व संघकामातील सहभाग यात उणेपण नव्हते. वयाची 50 वषर्े पूर्ण होण्याच्या आतच त्यांचे अकाली दु:खद निधन झाले. पूर्णपणे संघशरण, संघसमर्पित व समाजसमर्पित असे त्यांचे जीवन संघकार्यकर्त्यांना आजही प्रेरणा देत असते. स्व. सावरकरांनी वर्णन केलेल्या काव्यपंक्ती नानाराव पालकरांच्या जीवनाला लागू पडतात -

हे मातृभूमी, तुजला तन वाहियेले,

हे मातृभूमी, तुजला मन आर्पियेले।

तू ते अर्पिली नवी कविता रसाला,

लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला।

स्व. नाना पालकर यांच्या स्मृतीला विनम्र प्रणाम!