म्हाळगी प्रबोधिनी आणि अटलजींची दूरदृष्टी

 विवेक मराठी  31-Aug-2018

***रवींद्र माधव साठे***

 अटलजी 1999मध्ये देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. दरम्यानच्या काळात 2000 साली केशवसृष्टी, भाईंदर येथे म्हाळगी प्रबोधिनीचे दिमाखदार संकुल उभे राहिले आणि या संकुलाचे लोकार्पण करण्यासाठी 6 जानेवारी, 2003 रोजी अटलजी स्वत: भाईंदर येथे आले. देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते आणि तेसुध्दा अटलजींसारख्या व्यक्तीच्या हस्ते प्रबोधिनीचे लोकार्पण ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट होती.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
 https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे. 

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील एक पर्व संपले. अटलजी गेल्यानंतर भारतातील कोटयवधी लोकांना आपल्या घरातील एका सदस्याचे निधन झाले असेच वाटले. 17 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील भाजपाच्या दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील मुख्य कार्यालयातून अटलजींची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत मीही सहभागी झालो होतो. अंत्ययात्रेला अलोट जनसागर लोटला होता. भारताच्या सर्व राज्यांमधून पुरुष व महिला कार्यकर्ते व नागरिक आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घ्यायला आले होते. 2006पासून अटलजी केवळ सक्रिय राजकारणातूनच नव्हे, तर एका अर्थाने सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले होते. असे असूनही त्यांच्या अंत्ययात्रेस व अंत्ययात्रेच्या मार्गावर लोकांनी जी अभूतपूर्व गर्दी केली, ते बघता अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाची महानता लक्षात आली. अंत्ययात्रेच्या मार्गावरील प्रमुख रस्ते त्या वेळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे भाजपाच्या कार्यालयात दुसऱ्या एका मार्गाने पोहोचण्यासाठी मी व माझ्यासोबतचा एक कार्यकर्ता, असे आम्ही दोघे जण सायकल रिक्षाने गेलो. ती रिक्षा चालविणारा मुसलमान होता. त्याने आम्हास कार्यालयाच्या जवळ सोडले व त्यास रिक्षाचे पैसे दिल्यानंतर जाता-जाता तो म्हणाला की, ''साब कुछ भी कहो, यह आदमी जीवन में अपना नाम पीछे छोडके गया।'' एका गरीब व सामान्य सायकल रिक्षावाल्याची अटलजींबद्दलची भावना त्यांनी लोकांच्या हृदयामध्ये निर्माण केलेल्या स्थानाविषयी बरेच काही सांगून जाते.

अटलजींच्या अंत्ययात्रेत सामील झालो, त्या वेळी अटलजी आणि म्हाळगी प्रबोधिनी यांच्यामधील ॠणानुबंधांच्या गतस्मृतींना मनात उजाळा मिळाला.

अटलजी आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांचे नाते तसे 1993पासूनचे. ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही संस्था स्थापन झाली, ते स्व. रामभाऊ म्हाळगी आणि अटलजी यांचा घनिष्ठ परिचय जनसंघ काळापासूनचा होता. म्हाळगी प्रबोधिनीच्या व्यासपीठावर अटलजी पहिल्यांदा आले ते मधुकरराव महाजन पुरस्काराच्या निमित्ताने 1993मध्ये. अटलजी त्या वेळी सत्तापक्षात नव्हते. म्हाळगी प्रबोधिनीने 1990 सालापासून मधुकरराव महाजन स्मृती पुरस्कार योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सामाजिक, वैचारिक व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस आलटून-पालटून पुरस्कार दिला जायचा. 1993 हे वर्ष वैचारिक क्षेत्रासाठी राखीव होते आणि त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार व 'माणूस'कार श्री.ग. माजगावकर यांची निवड करण्यात आली होती. पुरस्काराची रक्कम होती 5000 रुपये आणि मानपत्र इ. अटलजी हा पुरस्कार देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आले होते. अटलजी अशी व्यक्ती होती की तिला संपूर्ण देशाचा 'कॅनव्हास' माहीत होता. भारतातील प्रत्येक राज्य, त्याचा सांस्कृतिक, सामाजिक इतिहास, वैचारिक आंदोलने, पत्रकार इ. गोष्टींचे त्यांना ज्ञान होते. त्यामुळे श्रीगमा या व्यक्तीबद्दल त्यांना काही सांगावे लागले नाही. आपल्या भाषणात त्यांनी श्रीगमांचे व्यक्तित्व, त्यांची लेखणी, महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रातले 'माणूस'चे योगदान या गोष्टी सहजपणे आपल्या वक्तव्यातून उलगडल्या. विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी त्यास दाद दिली.

अटलजी 1999मध्ये देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. दरम्यानच्या काळात 2000 साली केशवसृष्टी, भाईंदर येथे म्हाळगी प्रबोधिनीचे दिमाखदार संकुल उभे राहिले आणि या संकुलाचे लोकार्पण करण्यासाठी 6 जानेवारी, 2003 रोजी अटलजी स्वत: भाईंदर येथे आले. देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते आणि तेसुध्दा अटलजींसारख्या व्यक्तीच्या हस्ते प्रबोधिनीचे लोकार्पण ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट होती. अर्थात हे सर्व घडले स्व. प्रमोद महाजन यांच्यामुळेच. प्रमोदजी त्या वेळी म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्षही होते. स्व. रामभाऊ म्हाळगींच्या नावाची संस्था आणि प्रमोदजींचा स्नेहरूपी आग्रह यामुळे अटलजी या कार्यक्रमास जातीने उपस्थित राहिले.

अटलजींनी भाषणाची सुरुवात करतानाच रामभाऊ म्हाळगींची एक आठवण सांगितली. रामभाऊ म्हाळगींनी पंचवार्षिक योजनेसंदर्भात एकदा भाषण दिले होते. त्या वेळी यशवंतराव चव्हाण केंद्रीय मंत्री होते. यशवंतरावांनी त्यावरील चर्चेचा समारोप करताना म्हाळगींच्या भाषणाचा संदर्भ दिला व ते म्हणाले की, ''नियोजनाचा जनसंघवाल्यांशी काही संबंध नाही, कारण नियोजन या मंडळींचा विषयच नाही.'' त्या वेळी मलाही असे वाटले आणि रामभाऊ म्हाळगींनी आमच्या बैठकीत पुढे निवेदन केले की ''आपण राजकारणात आलो आहोत. देशसेवा आपले लक्ष्य आहे. परंतु जर आपण निवडणुकीच्या राजकारणात येणार असू, सत्तेत येण्याचा प्रयत्न करणार असू, तर त्यासाठी सर्व विषयांची माहिती आपण प्राप्त केली पाहिजे व शासन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे.'' यानंतर रामभाऊ म्हाळगी अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची निर्मिती करणार होते. परंतु त्यांचे दुदैवी निधन झाले. अटलजींनी म्हाळगी प्रबोधिनीच्या स्थापनेमागची पृष्ठभूमी विशद केली व प्रबोधिनीचे महत्त्व पटवून त्यांनी प्रबोधिनीच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

अटलजींनी आपल्या भाषणात पुढे राजकीय नेतृत्व आणि नोकरशाहीची यंत्रणा यातील दरी वाढत असल्याची खंत व्यक्त केली. ''मतदार कोणास समर्थन देतील हे कोणी सांगू शकत नाही, परंतु जो निवडून येतो, तो प्रशासनाच्या बाबतीत अनभिज्ञ असेल तर लोकशाहीची परिभाषा बदलेल व ते केवळ शासनतंत्र ठरेल. राजकीय नेत्यांना आज नोकरशाहीवर अवलंबून राहावे लागते. माहिती व सल्ला देणे हे नोकरशाहीचे काम असते. परंतु त्याची शहानिशा करून, परखून ते व्यवहारात आणण्याची जबाबदारी मात्र राजकारण्यांची असते. पण आज ती जबाबदारी स्वीकारण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. जे लोक राजकारणात येऊ इच्छितात किंवा राजकारणात सक्रियतने उतरलेले आहेत, ते स्वत:ला बौध्दिकदृष्टया तयार करत असल्याचे दृश्य फारसे दिसत नाही. या पृष्ठभूमीवर म्हाळगी प्रबोधिनी करत असलेले कार्य व त्याच्या स्थापनेमागचा हेतू प्रशंसनीय आहे. लोकप्रतिनिधींच्या सर्वंकष प्रशिक्षणाची अत्यंत आवश्यकता असून प्रबोधिनीसारख्या संस्थेचा हा अशा प्रकारचा देशातील पहिला प्रयत्न आहे. प्रशिक्षणाचे स्वरूप काय असेल हे प्रबोधिनी ठरवेल. प्रशिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि शासनसुध्दा निरंतर आहे. त्यामुळे अधिकाधिक राजकारण्यांनी, लोकप्रतिनिधींनी त्याचा लाभ घेतला पाहिजे व लोकशाही बळकट होण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.'' केशवसृष्टीतील सर्व प्रकल्प बघून अटलजींनी आपणास सुखद आश्चर्य वाटल्याचे सांगत ते शेवटी म्हणाले की ''आता पुढे कोणी म्हणणार नाही की नियोजन हा या मंडळींचा विषय नाही.''

त्याच वर्षी अटलजी पुन्हा एकदा जून 2003मध्ये म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आले होते. निमित्त होते भाजपाच्या चिंतन बैठकीचे. या बैठकीत केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्री व भाजपाशासित राज्यांतील मुख्यमंत्री असे मिळून 27 जण उपस्थित होते. यांत तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, प्रमोद महाजन, विद्यमान पंतप्रधान व गुजराथचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मनोहर पर्रिकर, वसुंधराराजे यांचा समावेश होता. या वेळी अटलजी प्रबोधिनीत वास्तव्यास राहिले. भारतीय राजकारणातील हा पहिला प्रसंग व देशातील पहिले पंतप्रधान, जे कोणत्याही सरकारी विश्रामगृहाशिवाय अथवा हॉटेलशिवाय एखाद्या खाजगी संस्थेत दोन दिवस मुक्कामी राहिले आणि म्हाळगी प्रबोधिनीस तो मान मिळाला, हा प्रसंग आम्हास अतिशय अभिमानाचा व संस्थेच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण होता.

अटलजींचा निवास हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने प्रेरणादायी होता. त्यांनी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा जवळून परिचय करून घेतला. जातीने चौकशी केली, त्यांच्या व्यक्तिगत परिचयाचे भाग्य मलाही लाभले. त्यांच्या सान्निध्यात दोन दिवस राहावयास मिळाले. म्हाळगी प्रबोधिनीने, प. बंगालमधील माकपाप्रणीत डाव्या आघाडीच्या दीर्घकाळ टिकाऊ सत्तेच्या रहस्याचा एक अभ्यास अहवाल तयार केला होता. प. बंगालमध्ये डाव्या आघाडीच्या सत्तेस त्या वेळेस 26 वर्षे पूर्ण झाली होती. आमच्या अहवालाचे इंग्लिशमध्ये नाव होते 'Left Front Rule in West Bengal : Genesis, Growth and Decay'. आम्ही अटलजींना या अहवालाची एक प्रत दिली. त्यांनी या अहवालाचे कौतुक केले व त्याच्या मुखपृष्ठावरील नावाकडे नजर टाकत मिश्कीलपणे हसले व त्यांनी विचारले, ''सचमुच Decay हो रहा है क्या?'' तेव्हा डाव्या आघाडीची प. बंगालवरील पकड मजबूत होती. विरोधी पक्षामधील कोणतेही नेतृत्व ज्योती बसूंना टक्कर देऊ शकेल अशी परिस्थिती नव्हती. अटलजींना याची कल्पना होती, म्हणूनच त्यांनी हा विनोद केला व ते खळखळून हसले.

अटलजींच्या आमच्याकडील निवासात त्यांच्या हस्ते आम्ही एका हापूसच्या आंब्याच्या झाडाचे रोपण केले. तीन वर्षांनी त्या झाडास आंबेही लागले. अटलजींना आंबे आवडतात हे माहीत असल्याने दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आम्ही आंब्याची पेटी पाठविली. अटलजींनी ते आंबे खाल्ले आणि त्यांचे साहाय्यक, झिंटा यांच्याकरवी आंबे रुचकर असल्याची पोचपावतीही दिली, हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते.

अटलजी हे त्यांची अमोघ वाणी व वक्तृत्व याबद्दल प्रसिध्द होते. त्यांनी राजकीय भाषणे गाजविली आहेतच, तशीच त्यांनी अ-राजकीय भाषणेही बऱ्याच ठिकाणी केली आहेत. त्यांच्या अशा निवडक 25 अ-राजकीय भाषणांचे संकलन करून म्हाळगी प्रबोधिनीने 'राजनीती के उस पार' हे पुस्तक 2006 साली प्रकाशित केले. ज्येष्ठ सिने पत्रकार व अटलजींचे नि:सीम भक्त सुधीर नांदगावकर यांची ही मूळ संकल्पना व त्यांनीच या पुस्तकाचे संकलन व संपादन केले. या पुस्तकात सामाजिक, साहित्यिक, कला, विविध महापुरुषांवरील भाषणांचा समावेश आहे. हे पुस्तक तयार झाल्यानंतर ते प्रकाशित करण्यापूर्वी अटलजींना ते पुस्तक दाखविण्यासाठी प्रबोधिनीची काही मंडळी त्यांच्याकडे गेली होती. यात स्वत: बाळासाहेब आपटे, विनय सहस्रबुध्दे यांचा समावेश होता. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील पुस्तकाचे शीर्षक बघून अटलजी मिश्कीलपणे म्हणाले, ''पुस्तक की कल्पना तो अच्छी है, लेकिन अच्छा, आप मुझे राजनीति के उसपार भेजना चाहते हो क्या?''

अटलजींच्या उपस्थितीत व तत्कालीन उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत यांच्या हस्ते संसदेच्या ग्रंथालयाच्या सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रबोधिनीच्या या कार्यक्रमात अटलजींनी केलेले भाषण हे त्यांचे शेवटचे सार्वजनिक भाषण होते, कारण त्यानंतर अटलजी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात पुन्हा येऊ शकले नाहीत.

यानंतर तर प्रकृतीच्या कारणास्तव घरी राहिले ते मृत्यूपर्यंत. 2011मध्ये अटलजींच्या 86व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या मौखिक आणि लिखित साहित्याचे, फोटोंचे संकलन करून प्रबोधिनीने 'समग्र अटलजी' या नावाने 'डिजिटल डॉक्युमेंटेशन' हा प्रकल्प सुरू केला. अटलजींच्या विचारवैभवाचे वाहक ठरलेल्या त्यांच्या लिखित व उच्चारित शब्दांचा महान ठेवा येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, हा या प्रकल्पमागचा उद्देश! माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी दिल्लीत एका देखण्या कार्यक्रमात त्याचे उद्धाटन केले होते. मात्र अटलजी त्यास उपस्थित राहू शकले नाहीत.

अटलजींचा संस्थाजीवनावर विश्वास होता, म्हणूनच भाजपासारखी राजकीय संघटना संस्था स्वरूपात उभी राहिली, विकसित झाली. ती उभी करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. प्रबोधिनीसारख्या संस्थाजीवनाच्या विकासात अटलजींचे मार्गदर्शन आम्हासही लाभले.

अटलजी एक श्रेष्ठ संसदपटू होते. राजकीय नेत्यास व कार्यकर्त्यांस जी प्रगल्भता लागते, ती त्यांच्यापाशी होती. लोकप्रतिनिधींनी स्वत:स बौध्दिकदृष्टया सिध्द केले पाहिजे, लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी ओळखली पाहिजे, त्याची राजकीय जाण विकसित झाली पाहिजे असे त्यांचे मत होते आणि या त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचे काम म्हाळगी प्रबोधिनी गेल्या 36 वर्षांपासून करत आहे. अटलजी प्रबोधिनीत ज्या खोलीत वास्तव्यास राहिले, त्यास आम्ही 'व्यास' कक्ष हे नाव दिले आहे. प्रबोधिनीत कोणी पाहुणे संस्था बघण्यासाठी आले, तर त्यांना हा कक्ष आम्ही अभिमानाने दाखवितो. यापुढे या कक्षात गेल्यानंतर त्यांच्या केवळ आठवणीच राहतील, मात्र त्या प्रबोधिनीच्या आगामी वाटचालीस सतत प्रेरणा देत राहतील. अटलजींना म्हाळगी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली!

- महासंचालक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी

[email protected]

9820007064