शिक्षणाचे कर्मस्थळ लडाख

 विवेक मराठी  06-Aug-2018


 

निसर्ग आणि संस्कृती यांच्या सहभागाने शिक्षण क्षेत्रात नवे प्रयोग करणाऱ्या सोनम वांगचुक यांना यंदाचा 'मॅगसेसे' पुरस्कार जाहीर झाला आहे. सोनम वांगचुक यांनी लडाखमधील छोटयाशा गावात राहून अभियंता होण्याचे स्वप्न पाहिले आणि प्रतिकूल परिस्थितीशी आनंदाने हातमिळवणी करीत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आपल्या मूळ निवासाकडे - गावाकडे परत आले. तेथूनच त्यांच्या शिक्षणविषयक कार्याला सुरुवात झाली. लडाखमधील महाविद्यालयीन तरुणांना एकत्र घेऊन 1988 साली SECMOL या संस्थेची स्थापना केली. या शिक्षणपध्दतीचा आढावा सोनम वांगचुक यांच्याकडून घेताना शिक्षणाचे कर्मस्थळ लडाख असल्याचे जाणवले.

 - प्राची रवींद्र साठे

'Children need neither our Pity nor our rage, they need our love, respect and the right environment to bloom. Let us give them that!'

वरील वाक्य आहे पाठयपुस्तकातील! या पाठयपुस्तकात सुरुवातीलाच शिक्षकांना उद्देशून दिलेल्या प्रस्तावनेची या वाक्याने सुरुवात झाली आहे. 'विद्यार्थ्यांना दया, राग नको, तुमच्याकडून फक्त आदर हवा आहे' असे सूचक मार्गदर्शन करणारी, शिक्षणाचे खरे मर्म समजणारी व्यक्ती म्हणजे लडाख प्रांतातील सोनम वांगचुक.

एप्रिल, 2018च्या दुसऱ्या आठवडयात लडाख येथील शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्याचा योग आला आणि शिक्षणविषयक मूलभूत विचार प्रत्यक्षात कसे आणता येतात याचे प्रशिक्षण मिळाले.

सोनम वांगचुक यांनी अभियंत्याचे शिक्षण घेतले. लडाखमधील छोटयाशा गावात राहून अभियंता होण्याचे स्वप्न पाहिले आणि प्रतिकूल परिस्थितीशी आनंदाने हातमिळवणी करीत शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर साहजिकच नोकरीकडे न वळता आपल्या मूळ निवासाकडे - गावाकडे परत आले. तेथूनच त्यांच्या शिक्षणविषयक कार्याला सुरुवात झाली.

लडाख भौगालिकदृष्टया शीत प्रदेश आहे. तेथील तापमान हिवाळयात उणे 20 (-20o)पर्यंत खाली उतरते. अशा काळात साहजिकच तेथील जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे तेथील शिक्षण व्यवस्थेवरही दीर्घकाळाचे झालेले परिणाम जाणवतात.

सोनम वांगचुक जेव्हा शिक्षण संपवून परत आपल्या प्रदेशाकडे गेले, तेव्हा त्यांनी तेथील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास केला. इ. दहावी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण केवळ शेकडा 5 इतके होते. वातावरणामुळे शाळा दीर्घकाळ बंद असत. या सगळयाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी शिक्षणविषयक धोरण तयार केले. हे करताना त्यांच्याजवळ होती निव्वळ दुर्दम्य इच्छाशक्ती आणि शिक्षणाचा समजलेला खरा अर्थ!

लडाखमधील महाविद्यालयीन तरुणांना एकत्र घेऊन 1988 साली SECMOL (The Students Education and Cultural Movement of Ladakh) या संस्थेची स्थापना केली. SECMOL या नावातच शिक्षण व सांस्कृतिक गोष्टी हातात हात घालून गेल्या पाहिजेत हा स्पष्ट संकेत होता. याद्वारे दहावी नापास विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्या कौशल्यगुणांना विकसित करण्यासाठी अभ्यासक्रम तयार केला गेला.

विद्यार्थी अभ्यासक्रमामध्ये व परीक्षेत अनेक कारणांनी नापास होतो. पण असे असले, तरी तो विद्यार्थी 'माणूस' म्हणून जीवन जगण्यास सक्षम असतो, या विचारधारेवर काम सुरू झाले. कौशल्याला वाव देणाऱ्या विषयांमध्ये प्रशासन, दुकानदारी, खाद्यपदार्थ खरेदी-विक्री व्यवहार, इमारत बांधणी, प्रसारमाध्यम, दुग्धव्यवसाय, सौर ऊर्जा उपकरणे, बागकाम, टाकाऊतून टिकाऊ अशा विषयांचा समावेश करण्यात आला.

या वरील विषयांच्या अभ्यासक्रमाचे वैशिष्टय म्हणजे तो लडाख या प्रदेशातील आव्हानांना उत्तरे शोधणारा होता. निसर्गाशी लढा देण्यापेक्षा त्याच्याशी हातमिळवणी करून त्याला आपलेसे केले पाहिजे, या विचारधारेवर विद्यार्थ्यांना निसर्गातील घटकांचा अभ्यास करण्याचे धडे येथे दिले जातात.

इमारत बांधकाम अभ्यासक्रमात प्रामुख्याने तेथील अतिथंड हवामानात आतील तापमान सामान्य कसे राहील, याला महत्त्व दिले जाते. ते करताना त्या दृष्टीने जितकी शास्त्रीय माहिती आवश्यक आहे, तितकी माहिती दिली जाते. त्या प्रदेशात जे साहित्य उपलब्ध असते, त्याच्या साहाय्याने इमारत कशी बांधू शकतो, याचे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. कितीही वेळा प्रयोग करता येतात. सूर्याची कक्षा कुठून कुठे असणार आहे, सूर्याची गती कोणत्या दिशेने सरकणार आहे, तापमानाची नोंद कशी घ्यायची या घटकांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. उपलब्ध नैसर्गिक घटकांवर या ज्ञानाचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक शिकवले जाते. आज या शाळेच्या वास्तूत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इमारती आहेत. या इमारती उणे तापमानातही ऊब देतात आणि ही शाळा हिवाळयातही चालू असते. 'Learning by doing'चा उत्तम वस्तुपाठ आम्हाला तेथे अनुभवायला मिळाला.

लडाखमधील माणसे लडाखमध्येच रहाणार आहेत, त्यात तेथेच जास्त आनंददायी पण सुरळीत जीवन कसे जगता येईल? असा विचार करून कामाला सुरुवात झाली आणि आज इतक्या वर्षानंतरही SECMOL उत्तम प्रगती करीत आहे. 'To make Ladakh an example for the mountain world when all the children get meaningful education that prepares them for a life of dignity and harmony with nature' असे ध्येयवाक्य समोर ठेवून SECMOL आज वाटचाल करीत आहे. या भेटीनंतर महाराष्ट्रातील बदलत्या तापमानाला सामोरे जाणारी, या इथल्या निसर्गाशी हातमिळवणी करणारी सशक्त पिढी घडवली पाहिजे, असे बीज सर्वांच्या मनात रुजले आणि खूप तापमान असलेल्या आपल्या प्रदेशात अशा प्रकारच्या इमारती निर्माण करू शकतो का? असा विचार करीतच आम्ही तेथून बाहेर पडलो.

SECMOL चळवळ चालू असतानाच सोनम सर शालेय शिक्षणाचाही अभ्यास करीत होते. लडाखसारख्या प्रदेशात NCERTने तयार केलेला अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला जात होता. लडाखमधील भौगोलिक, सांस्कृतिक जीवनापासून कितीतरी अंतरावर असणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी कंटाळवाणा ठरत होता. त्यातच हवामानामुळे शाळेच्या वार्षिक नियोजनात खंड पडत असे.

सोनमसरांनी त्यावर संशोधन केले. पालक, समाज, शिक्षक व विद्यार्थी या चार घटकांच्या मदतीने (लडाखमधील प्राथमिक शिक्षणात परिवर्तन करण्यासाठी) 1994 साली 'Operation New Hope' या कार्यक्रमाची आखणी केली. शासन, स्वयंसेवी संस्था आणि गावकरी यांच्या मदतीने एक कृतियुक्त कार्यक्रम तयार केला.

प्रथमत: लडाखमधील विद्यार्थ्यांना आपला वाटेल असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. अभ्यासक्रमावर आधारित पाठयपुस्तके तयार करण्यात आली.

Try to be a human beings not just a teaching Machine.

Do not teach only a subjects but rather teach us students.

या वाक्याने या पाठयपुस्तकाच्या पहिल्या पानावर विद्यार्थ्याने शिक्षकाला उद्देशून लिहिलेला उतारा आहे. या उताऱ्यातील पहिल्या वाक्यापासूनच पुस्तकाचे वेगळेपण लक्षात येते. 'Theme based approach' हे या पाठयपुस्तकांचे वैशिष्टय आहे. भाषा व गणित यांची सुंदर गुंफण केली आहे. 'संवादा'चे माध्यम वापरले आहे, त्यामुळे हे पाठयपुस्तक नसून माझा मित्र/मैत्रीण माझ्याशी गप्पा मारत आहे, असेच वाटते. विद्यार्थी खऱ्या अर्थाने हसतखेळत ज्ञान मिळवतात. Bright Head, skilled Hands and kind Heart या तीन 'H'वर लडाख शिक्षण पध्दतीचा पाया रचला आहे.

एकंदरीत शिक्षण पध्दतीसाठी मूलभूत संकल्पनांचे खरे मर्मस्थळ या लडाखमध्ये आम्हास अनुभवास मिळाले. शिक्षणातील सर्व शक्यतांचा अभ्यास करण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना कसे देता येऊ शकते, याचा वस्तुपाठ मिळाला.

आज शिक्षणक्षेत्रात सगळीकडे 'स्वामित्व' भाव वाढीस लागत आहे. अशा वेळेस शिक्षणात असे निर्माण करा, ज्याची पुनरावृत्ती इतरांना सहज करता येईल - It must be easily reapplicable, असे सहज जाता जाता सोनमसरांनी सांगितले आणि शिक्षणाची ही 'मर्म'बंधातील ठेव मनात जपत आम्ही लडाखमधील शिक्षणाच्या पाऊलखुणा बरोबर घेऊन परतलो.

9869409726

[email protected]