पालक वयात येताना

 विवेक मराठी  06-Aug-2018


 

कुमारावस्था हा आयुष्यातला फार सुंदर काळ असतो. या वयात व्यक्तिमत्त्वात अनेक बदल होत असतात, स्व-प्रतिमा तयार होत असते. हा एक प्रकारे बदलाचा काळ असतो आणि या वयाच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा असतो. अशा वेळी खरे तर पालक आणि मुले या दोघांवरही काम करण्याची गरज असते. पालकांना आपल्या वागणुकीत बदल करावे लागणार असतात आणि मुलांनी पालकांशी सुसंवाद साधायचा असतो.

ज्ञान दिल्याने वाढते, विचार दिल्याने त्याचा प्रचार होतो आणि एक नवी पिढी घडत जाते, नव्या विचारांना नवे 'आकार' येत जातात आणि कार्यकर्त्यांची एक नवी फळी तयार होत जाते. अशा या प्रकियेतून घडत गेलेल्या स्नेहल परब आणि गायत्री वैद्य यांच्या संकल्पनेतून 'आकार' अस्तित्वात आले. या आकाराची पहिली निर्मिती आहे 'पालक वयात येताना' ही पालकांसाठीची कार्यशाळा. या कार्यशाळेला आकार देणाऱ्या आणि आपल्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणाऱ्या मार्गदर्शक, दिशा सायकॉलॉजिकल काउन्सेलिंग सेंटरच्या शुभांगी खासनीस यांच्यातील मार्गदर्शकाची ही ओळख आणि नव्या पिढीला घडवण्यातले त्यांचे योगदान!

मूळच्या कोल्हापूरच्या असणाऱ्या शुभांगी खासनीस यांचे शिक्षण कोल्हापूरमध्येच वनस्पतिशास्त्र या विषयात झाले आहे. महाविद्यालयात असतानाच त्यांनी अनेक पथनाटयांमध्ये काम केले. याच काळात त्यांची सामाजिक कामांशी नाळ जुळत गेली आणि अनेक अनाकलनीय सामाजिक समस्या त्यांच्यासमोर उभ्या ठाकल्या. सामाजिक समस्यांची जाणीव आणि आपण त्या सोडवल्या पाहिजेत हा कल लक्षात घेऊन त्यांनी सामाजिक कार्याची पदवी घेण्याचे ठरवले. सामाजिक कार्याचा अभ्यास सुरू असतानाच त्यांनी समुपदेशनाचे अनेक कोर्सेस केले आणि तेव्हाच त्यांच्या कामाची दिशा ठरून गेली. याच दरम्यान त्यांचा विवाह झाला आणि त्या कोल्हापूरहून पुण्यात आल्या. पुण्यात सगळयाच आघाडयांवर जम बसवत असतानाच त्यांनी 2001मध्ये दिशा सायकॉलॉजिकल काउन्सेलिंग सेंटरची स्थापना केली. याच काळात काम करत असताना त्यांच्या लक्षात येत गेले की, आपल्याकडे जास्तीत जास्त केसेस या कुमारवयातल्या मुलांच्या असतात. त्यांचे आई-वडील आपल्या मुलांबद्दलची काळजी घेऊनच आपल्याकडे येतात. ती काळजी आपण काही अंशी दूर करू शकतो, असा विश्वास त्या वेळी मिळत गेला आणि मग एकूणच या वयातल्या मुलांसाठी काम करायचे, हे ओघानेच ठरत गेले. कुमारवयातील मुले आणि त्यांचे आई-वडील यांच्यातला संघर्ष हे या केसेसमधील मुख्य कारण होते. हा संघर्ष का होतोय हे लक्षात आल्यावर आपण याच कारणासाठी काम केले पाहिजे आणि ते काम त्यांनी कार्यशाळांच्या माध्यमातून करायला सुरुवात केली. पालक समुपदेशन कार्यशाळा याच काळात त्या घ्यायला लागल्या. एकीकडे पालकांसाठी कार्यशाळा तर दुसरीकडे किशोर वयातील मुलांचे समुपदेशन सुरूच होते. या गटाबरोबर काम करताना, अनेक केसेस हाताळून झाल्यावर जमा झालेल्या अनुभवावर आधारून त्यांनी दिशा सायकॉलॉजिकल काउन्सेलिंग सेंटरच्यावतीने समुपदेशनाचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला आणि यातूनच पुढे त्यांना कार्यकर्ते भेटत गेले. प्रसन्न रबडे आणि केतकी काळे हे दोन कार्यकर्ते त्यांनी आपल्या संस्थेतच तयार केले. या कार्यकर्त्यांचे सहकारी कधी झाले हे त्यांचे त्यांनादेखील उमगले नाही, इतके दोघे ते या कामाशी जोडले गेले.

शुभांगी खासनीस, केतकी काळे आणि प्रसन्न रबडे यांच्या एकत्रित कामाचा उत्तम नमुना बघायचा असेल, तर या तिघांनी संयुक्तपणे लिहिलेले पुस्तक - 'हे वयच वेडं असतं! अर्थातच स्व-प्रतिमा' हे आवर्जून वाचावे लागेल. प्रत्यक्ष समाजात केलेले काम आणि त्यातला सच्चेपणा याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना नक्कीच येतो.

कुमारावस्था हा आयुष्यातला फार सुंदर काळ असतो. या वयात व्यक्तिमत्त्वात अनेक बदल होत असतात, स्व-प्रतिमा तयार होत असते. हा एक प्रकारे बदलाचा काळ असतो आणि या वयाच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा असतो. खरे तर लहान वयातच आपल्यातला स्व-जागृत होत असतो. हा स्व-जागृत होण्याच्या आधी मुले पूर्णपणे आई-वडिलांवर अवलंबून असतात. आई-वडील सांगतील तसे वागत असतात आणि जेव्हा ही मुले वयात येऊ लागतात, तेव्हा अचानक आई-वडिलांना जुमानेनाशी होतात. आई-वडिलांना नेमका याचाच त्रास होऊ लागतो. खरे तर हा बदल हार्मोनल असतो, सगळयांनाच या बदलांना सामोरे जावे लागते आणि ते होताना अनेकदा संघर्षाची परिस्थिती उद्भवते. नेमके कसे वागावे हे पालकांच्या लक्षात येत नाही. पालक आणि मुले यांच्यातला हा विसंवाद वाढीला लागतो. त्यातून कधीतरी परिस्थिती हाताशी येते, तर कधी ती परिस्थिती हाताबाहेर जाते. अनेकदा पालक परिस्थिती हाताबाहेर गेल्यावरच समुपदेशनासाठी येतात, असेही त्यांनी सांगितले. अजूनही आपल्या समाजाची मानसिकता हवी तशी बदलली नाही. यातही दोन प्रवाह दिसतात - आमूलाग्र बदललेले पालक आणि अजून एकोणिसाव्या शतकातली मानसिकता असलेले पालक. त्यामुळे मुलांच्या वर्तनाचा एकच एक पॅटर्न आपल्याला काढता येत नाही. आणि म्हणूनच एकच एक निष्कर्ष, एकच एक उपाय यावर देता येत नाही, हे त्यांच्या बोलण्यातून ओघानेच लक्षात येत गेले.

या वयातल्या मुलांच्या वर्तनांमध्ये काही साधर्म्य असते, तर काही मुलांच्या वर्तनामध्ये काही वेगळेपणही जाणवत असते. या बदलाच्या काळामध्ये पालकांचे वर्तन कसे असते, यावर त्या मुलामध्ये काय बदल होणार हे अनेकदा ठरत असते आणि त्यातून परिस्थिती हाताबाहेर जाणार की आटोक्यात राहणार, हेही लक्षात येते.

अशा वेळी खरे तर पालक आणि मुले या दोघांवरही काम करण्याची गरज असते. पालकांना आपल्या वागणुकीत बदल करावे लागणार असतात आणि मुलांनी पालकांशी सुसंवाद साधायचा असतो. पण यातही अनेकदा अडचणी येत असतात. यात कधी तरी घरातल्यांचे प्रेशर असते आणि कधी तरी मुलांना स्वत:लाच बोलायचे नसते. अशी कोणतीही परिस्थिती असू शकते आणि त्यात महत्त्वाची ठरते ते 'स्वीकारा'ची भावना. मुले आणि पालक या दोघांनीही जर ही भावना ठेवली, तर अनेक समस्यांना उत्तरे मिळतील, अशी आशाही शुभांगी खासनीस यांनी व्यक्त केली. नेमके या गोष्टीवर काम करण्यासाठी त्या पालकांचे प्रबोधन करण्यासाठी कार्यशाळा घेत होत्या. मध्यंतरी वाढलेल्या कामाच्या व्यापात या कार्यशाळा बंद झाल्या, पण आता त्यांच्याच विद्यार्थिनी असणाऱ्या स्नेहल परब आणि गायत्री वैद्य यांनी शुभांगी खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली 'आकार' या संस्थेची स्थापना केली आहे आणि त्याअंतर्गत 'पालक वयात येताना' या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

या कार्यशाळेची वैशिष्टये सांगताना त्या म्हणाल्या, ''पालक आणि मुलं यांच्यावर काम करावं लागत असलं, तरी यांच्या कार्यशाळा आणि समुपदेशन वेगवेगळया पध्दतीने आणि वेगवेगळया वेळी केलं जातं. आजच्या मुलांना जास्त कशाची गरज असेल तर ती लैंगिक शिक्षणाची!! या संबंधी असणारी त्यांची उत्सुकता जर कमी केली, तर अनेक प्रश्न आपोआप सुटतील अशी परिस्थिती आहे आणि त्याचे परिणाम खरोखरच सकारात्मक असतील. या कार्यशाळा घेताना पालकांना आणि मुलांना सहानुभूतीच्या ऐवजी आपण सहानुभाव देतो, त्यातून हा विषय भावनिकदृष्टया हाताळला गेला की त्यातले तिढे सुटायला मदत होते.''

आता पालकांसमोरची आव्हाने वेगळी आहेत. दहा वर्षांपूर्वीचे प्रश्न आता बदलले आहेत. त्यामुळे आव्हानेही बदलली आहेत. मुलांची वर्तन वैशिष्टये बदलली असली, तरी करिअर आणि त्यासंबंधातून येणारे ताण तसेच आहेत. किंबहुना हे ताण वाढत आहेत. पालकांच्या मुलांकडून असणाऱ्या ग्लॅमरस करिअरच्या अपेक्षा आणि त्यातून मुलांवर येणारे ताण वाढत आहेत, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.

आताच्या काळातला पालकांचा सगळयात मोठया चिंतेचा विषय असेल तर तो, मुलाला किंवा मुलीला गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नसणे हा आहे. या चिंतेचा पुढील काळात एक मोठा सामाजिक प्रश्न होण्याची चिंताही शुभांगी खासनीस आणि त्यांचे सहकारी प्रसन्न रबडे यांनी व्यक्त केली. या वयाच्या मुलांचा आपल्या पालकांबरोबर असणारा संवाद तसा चांगला असतो, पण हे चित्र सगळयाच कुटुंबांमध्ये दिसत नाही. इथेही परत पालकांच्या वर्तनावरून मुलांच्या संवादाचे निकष ठरत असतात. परिपूर्णता कुठेच नसते, पण त्यातून येणारा विसंवाद खूप घातक असतो. दोन टोकांच्या मतांमध्ये पालक आणि मुले भरडली जातात. म्हणून पालकांनी बदलाची भूमिका स्वीकारली, तर अनेक प्रश्न चांगल्या पध्दतीने हाताळले जाऊ शकतात. पालक कसे वागतात यावर बरेचदा त्यांच्यामधले संबंध ठरत असतात. हे संबंध चांगले व्हावेत यासाठीच अधिकाधिक कार्यशाळा यापुढे घेणार आहोत, असेही त्या म्हणाल्या. या कार्यशाळांमध्ये पालक-मूल संवाद, स्वीकाराची भावना, पालकांचे वर्तन प्रकार आणि सुसंवाद या मुद्दयांना स्पर्श केला जातो.

दिशा सायकॉलॉजिकल काउन्सेलिंग सेंटरच्या या कामात शुभांगी खासनीस यांच्यासह त्यांचे सहकारी प्रसन्न रबडे हेही चांगले, सकारात्मक सहकार्य करत आहेत. अशा कार्यकर्त्यांच्या आत्मीय तळमळीतूनच समुपदेशन या विषयाला वेगळे आयाम मिळतील, अशी खात्री या तिघांशी बोलताना मिळत गेली.

संवाद वाढला पाहिजे - स्नेहल परब

''माझ्या बालपणाकडे तटस्थपणे पाहताना आणि सध्या आजूबाजूला सतत दिसणाऱ्या किशोरावस्थेतील प्रश्नांनी मी अस्वस्थ होत होते आणि यासाठी काही तरी केलं पाहिजे, असंही वाटत होतं. कुटुंब म्हणून आई-वडील आणि मूल यांचे संबंध न्याहाळताना त्यांच्यात संवाद वाढला पाहिजे, वाढलेलं अंतर कमी झालं पाहिजे, या विचाराने मी आणि माझ्या नवऱ्याने या कार्यशाळा घेण्याचं ठरवलं आणि शुभांगी खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली गायत्री वैद्यबरोबर आता या कार्यशाळा आम्ही घेतो आहोत.''

 

पालकांना त्यांची भूमिका स्पष्ट होईल- गायत्री वैद्य

''पालक वयात येताना हा विचार केला, तेव्हा मनात हेच होतं की मुलांबरोबर पालकसुध्दा पालक म्हणून काही बदलांतून जात असतील. मुलांमध्ये होणाऱ्या बदलांना सामोरं जाताना त्यांना बरेच प्रश्न पडत असतील. मुलांना समजून घेणाऱ्या पालकांनादेखील समजून घेण्याची गरज वाटली आणि या कार्यशाळेचा विषय सुचला.

माझे पालकसुध्दा 'माणूस' आहेत, हा विचार खूप उशिरा केला गेला. पण या कार्यशाळेतून पालकांसमोर त्यांची भूमिका नक्कीच स्पष्ट होईल आणि मूल आणि पालक दोघांमधला संवाद अधिक चांगल्या पध्दतीने घडेल हीच अपेक्षा आहे.''

 

-अर्चना कुडतरकर -9594993034