सेकंड इनिंगला हवा मोकळा श्वास

 विवेक मराठी  07-Aug-2018

 उतारवयातील एकलेपणात  खरी गरज असते ती कोणीतरी मन समजून घेण्याची आणि एकमेकांची काळजी घेण्याची. म्हणूनच समविचारी सोबत मिळाली, तर उर्वरित आयुष्य कंटाळवाणं होत नाही. बाकी सगळे असले, तरी असा छान मित्र किंवा मैत्रीण हवीच आयुष्यात. समाजाने आणि संबंधित सर्वांनी समजूतदारपणे या नात्याला मान्यता द्यावी आणि सेंकड इनिंगला मोकळा श्वास घेऊ द्यावा.

सारं काही मार्गी लागावं, स्थिरस्थावर व्हावं, जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊन जोडीदाराबरोबर स्वच्छंद, मुक्त जगावं असं ठरवावं आणि अचानक जोडीदाराने जगातून एक्झिट घ्यावी..

अशी अनेक उदाहरणं पाहण्यात आहेत. मागे राहिलेली व्यक्ती काही काळ एकलेपणा सहन करतेही, पण हळूहळू तो असह्य व्हायला लागतो. पुनर्विवाह करायचं ठरवलं, तर अनेक प्रश्न निर्माण होतात. आई/बापाच्या जागी दुसऱ्या कोणाला पाहणं मुलांना कठीण जातं.

अशी दोन उदाहरणं परिचितांचीच आठवताहेत. मध्यमवयीन तो, कॉलेजला जाणारे तीन मुलगे (त्यापैकी एक जुळं). दुर्धर आजारात पत्नीचं निधन झाल्यानंतर काही कालावधीनंतर त्याने पुनर्विवाह केला. मुलांना बहुधा ते आवडलं नसावं, कारण शिक्षण संपल्यानंतर तिघंही आपापल्या मार्गाने गेले. संबंध तुटले नसले, तरी दुरावा आलेला समजत होता.

दुसऱ्याची पत्नी दोन मुलं - मुलगा आणि मुलगी - लहान असतांना वारली. ह्याने एकटयाने मुलांना वाढवलं. दोघं छान शिकली, लग्नं झाली. दोघंही परदेशी स्थायिक झाली. ह्याला एकटेपण सहवेना. मग स्वत:च लग्नाच्या खटपटीला लागला. कुठल्याशा मॅरेज ब्युरोत नाव नोंदवलं. तिथे एक आवडली. जमलं लग्न. ही बातमी पोरांना कळवली, तसे दोघंही धावून आले.. लग्नाला उपस्थित राहाण्यासाठी नाही, ते मोडण्यासाठी! बरंच आकांडतांडव करून त्यांनी अखेर ते मोडलंच. हे चुकीचं आहे, मुलांनी एकटया पडलेल्या आई/बापाच्या मनाची घालमेल समजून घ्यायला हवी, हे सारं खरंय. पण तसं क्वचितच होताना दिसून येतं.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुनर्विवाहामुळे प्रॉपर्टीवरून वाद होतो. लिव्ह इन रिलेशनशिपनेही ह्याच समस्या उद्भवू शकतात. ह्या सर्व प्रश्नांना वळसा घालून सुवर्णमध्य काढायला हवा. अगदी विवाहबध्द होऊन किंवा नुसतंच एकत्र राहायला हवं असं नाही. प्रवास, लंच/डिनर, मैफली, नाटकं, सिनेमा, प्रदर्शनांना सोबत जाण्यासाठी, वाचन, संगीत, चित्रप्रदर्शनांची वा अन्य अशाच आवडी असणारा/री समविचारी जोडीदार त्या वेळी सोबत असला/ली तरी चालेल, नाही का? आपल्यासारख्याच आवडीनिवडी, छंद असलेल्या मैत्रिणी/मित्र लाभतीलच असं नाही. मग तसा मित्र वा मैत्रीण सुदैवाने भेटला/ली तर छानच. सुरेख चित्रपट वा नाटक पाहताना आपल्याइतक्याच रसिकतेने त्याचा आस्वाद घेईल, मैफलीमध्ये मनापासून दाद देईल अशी मनासारखी सोबत मिळाली, तर काय हरकत आहे?

अर्थात अशा मैत्रीवरही कुजबुज, चर्चा, टीकाटिप्पण्या होणारच. भुवया उंचावून तिरकस शेरे मारले जातील. पण तिकडे दुर्लक्ष करायची आणि टीकेला तोंड द्यायची हिंमत हवी. कायमचा सहनिवास मिळणार नसला, तरी काही काळासाठी असा आनंददायक सहवास मिळाल्यास कोणाची हरकत नसावी. ही गोष्ट अर्थातच अजूनही लोकांच्या पचनी पडत नाही. गढुळलेल्या नजरांना घाणच दिसते.

वास्तविक पाहता लोकांनी अशा नात्याकडे पाहाताना थोडी परिपक्वता दाखवायला हवी. एकलेपणाला कंटाळलेल्या दोन प्रौढ व्यक्ती कोणत्याही बंधनाविना चार घटका आनंदाने एकमेकांच्या सहवासात घालवत असतील, तर कोणालाही त्यात नाक खुपसायचं अजिबातच कारण नाही. त्यांनी कायम कंटाळवाणं जीवन एकलेपणाने जगावं, ही अपेक्षा का? खंबीर राहून हवं तसं आनंदी जगावं. समाजमान्यता मिळते हळूहळू आणि नाही मिळाली, तर चक्क दुर्लक्ष करावं. जरा हिंमत दाखवली, तर सुरुवातीला बोलणारा समाजही नंतर गप्प बसतो.

लोकांकडे, नातेवाइकांकडे किती लक्ष द्यावं, हे आपणच ठरवावं. अशी समविचारी सोबत मिळाली, तर उर्वरित आयुष्य कंटाळवाणं होत नाही. बाकी सगळे असले, तरी असा छान मित्र किंवा मैत्रीण हवीच आयुष्यात. ते स्थान अन्य कोणी घेऊच शकत नाही. आनंदाचे चार क्षण मिळावेत अशा वेळी, बस्स...

इथेही पुरुषाला झुकतं माप दिलं जातं. त्याच्याकडे कनवाळूपणे पाहिलं जातं. विधुर बाप मैत्रिणीबरोबर हिंडला-फिरला, तर मुलं सहन करू शकतात. परस्त्रीशी असणारे त्याचे संबंध चालवून घेतात. पण विधवा आईचा मित्र त्यांना खपत नाही.

मुलांसकट सर्वांनाच तोंड देण्याइतकी हिंमत नसते प्रत्येकाजवळ. समाजभय असतं मनात. खरं तर त्यात काय वावगं आहे? हे स्वत:लाच समजवायला हवं. मुळात ती आपली गरज आहे, हेच त्या व्यक्तीने सर्वप्रथम मान्य करायला हवं आणि नंतर त्याप्रमाणे निर्णय घेऊन त्यावर ठाम राहण्याची हिंमत हवी.

समाजाने, नात्यातील लोकांनी थोडा उदार दृष्टीकोन ठेवायला शिकलं पाहिजे. ह्या नव्या नात्याला कोणाची हरकत असायचं काहीच कारण नसावं.

लग्न किंवा लिव्ह इनपेक्षा अशी मैत्री कमी धोकादायक आणि सोपी आहे. नाहीच जमलं, तर कोणत्याही कटकटींशिवाय बाय बाय करायचं. आवश्यक तेव्हा समविचारी जोडीदाराची कोणत्याही अटीतटींशिवाय साथ मिळणं एवढीच खरी गरज असते अनेकांना. संबंधित सर्वांनी ती ओळखून समजूतदारपणे मान्यता द्यावी. तशी मानसिकता तयार व्हायला हवी.

समाजभय हा एक बागुलबुवा असतो, फक्त हे वयाच्या माध्यान्ही समजायला हवं. समाज बदलणं कठीणच. पण म्हणून मन मारून राहायचं की समाज गेला खड्डयात म्हणून हव्या तशा निवडीचं व निर्णयाचं स्वातंत्र्य घ्यायचं? कोणी आपल्या आयुष्यात किती दखल द्यायची, हे आपणच ठरवायला हवं. समाजाच्या भीतीने मोकळेपणी हसून बोलायचीही चोरी. लगेच नजरा रोखल्या जातात, काहीतरी लफडं आहे अशी चर्चा सुरू होते. बघणाऱ्यांची नजर दूषित असते. त्यापेक्षा नकोच ती भानगड म्हणून साधी मैत्री करायलाही कचरतात माणसं. बरोबर हिंडणं-फिरणं तर दूरच. ही मानसिकता बदलायला हवी.

लोकहो, एकल्या जिवाला मोकळा श्वास घेऊ  द्या. अशा मैत्रीकडे निखळ नजरेने बघायला शिका. आणि समाजाचा तुमच्या मैत्रीला विरोध असेल, तर तिकडे दुर्लक्ष करायची धमक दाखवा. आयुष्य हवं तसं जगायचा हक्कच आहे प्रत्येकाला. जगा आणि आनंदाने जगू
द्या. कोणताही चश्मा न लावता अशा नात्याला फुलू द्या. बस!

 

प्रतिसादाचे आवाहन

या विषयावर आपल्याला व्यक्त व्हायचे असल्यास आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. आपल्या प्रतिक्रिया विवेकच्या सानपाडा कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा [email protected] वर पाठवाव्यात. निवडक प्रतिक्रियांना प्रसिध्दी देण्यात येईल.