आयुष्यात कधीही कंजूस बनू नका...

 विवेक मराठी  10-Sep-2018

संपत्ती जमा होऊ लागताच काही जणांना ती नुसती वाढवत राहण्याचे वेड लागते. म्हणजेच पैसा जमवणे आवडते, पण तो खर्च करणे जिवावर येते. अशा लोकांना कंजूस किंवा कवडीचुंबक म्हटले जाते. कंजूस व्यक्तीबाबत बोलताना शेक्सपिअरच्या नाटकातील शायलॉक किंवा आचार्य अत्रे यांच्या कवडीचुंबक नाटकातील पंपूशेठ सावकाराचे पात्र हटकून आठवते. कवडीचुंबक व्यक्तींचे आयुष्य दयनीय असते, कारण त्या धनाने श्रीमंत असतात, परंतु मनाने दरिद्री राहतात. त्यांना समाजात मान मिळत नाही. माणसाने भरपूर संपत्ती मिळवावी, पण अतिउधळेपणा आणि अतिकंजूस अशी स्वभावाची दोन्ही टोके गाठू नयेत.

 कृपण, कंजूस, मक्खीचूस, चिक्कू, चिंधीचोर अशा विविध नावांनी कवडीचुंबकांची हेटाळणी केली जाते. अर्थात त्याची त्यांना फारशी लाज नसते. पैसा वाचवणे चांगले, पण नुसता साचवणे वाईट. एक म्हण आहे की 'संपत्ती ही विरजणासारखी असते, नुसती साचवत गेल्यास काही दिवसांनी त्याला कुबट वास येऊ लागतो. म्हणूनच आपण विरजण जसे ठरावीक काळाने हलवतो, तसाच संपत्तीचाही विनिमय करत राहावे.' पण कृपण माणसांना या शहाणपणाशी देणे-घेणे नसते. ते अगदी एका रुपयासाठीही जीव टाकतात. एका संस्कृत सुभाषितात यांची सोपी व्याख्या केली आहे.

अदाता पुरुषस्त्यागी धनं संत्यज्य गच्छति।

दातारं कृपणं मन्ये मृतोऽप्यर्थं न मत्र्चति॥

(जी व्यक्ती आपल्या संपत्तीचा उपयोग लोककल्याणासाठी अथवा दानधर्मासाठी करत नाही, ती कमवलेले धन मागे ठेवून या जगातून निघून जाते. मरेपर्यंत पैशाचा असा हव्यास बाळगणाऱ्या माणसांना समाजात कृपण (कंजूस) म्हणून ओळखले जाते.)

व्यवसायात एकदा अशाच एका कंजूस स्पर्धकाशी माझी गाठ पडली होती. एका काँट्रॅक्टसाठी आम्ही दोघांनीही बोली लावली होती. पण तो होता पैशाचा लोभी. कंत्राटाच्या रकमेतील एक पैसाही कमी करणार नाही, अशी भूमिका त्याने घेतली. त्याच्या या हट्टी वृत्तीमुळे काम देणाऱ्या कंपनीने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. मलाही त्या कंपनीने रक्कम कमी करून मागितली. मी आडमुठी भूमिका न घेता कुठे बचत करता येईल ते तपासले आणि दीर्घकालीन फायद्याचा विचार करून कंपनीला सवलत देऊन ते कंत्राट पदरात पाडून घेतले. मोठया उलाढालीच्या व्यवहारांत कंजूसपणा नेहमी घातक ठरतो, हे व्यावसायिकांनी ध्यानात ठेवावे.

काही दिवसांपूर्वी मी एक जुने पुस्तक वाचत होतो. सन 1850मध्ये प्रकाशित झालेल्या व एफ.एस. मेरीवेदर लिखित या पुस्तकाचे नाव आहे 'लाइव्हज ऍंड ऍनेक्डोट्स ऑॅफ मायझर्स'. यामध्ये इतिहासात होऊन गेलेल्या कवडीचुंबकांचे किस्से, तसेच कंजूसपणावर थोर लेखकांचे, तत्त्वज्ञांचे उद्गार नमूद केले आहे. कवडीचुंबक कसे विक्षिप्त आणि हास्यास्पद पध्दतीने जीवन घालवतात, हे वाचताना खूप करमणूक झाली. गंमत म्हणजे त्यातील अनेक जण पुनर्जन्म घेऊन आजही आपल्या आसपास वावरत आहेत की काय, असे वाटते.

काही कवडीचुंबक निरुपद्रवी असतात. त्यांना खरेदी करायची नसते, निव्वळ विंडो शॉपिंगचा आनंद लुटायचा असतो. ते विक्रेत्यांशी किमतीबाबत फार घासाघीस करत बसतात. विक्रेत्यांना अशा ग्राहकांचा अंदाज असतो. तेही मग अव्वाच्या सव्वा भाव सांगून मनातून हसत यांची तारांबळ बघत बसतात. काही कंजूस आपल्या पैशाला इतके जपतात की त्यांच्याकडे किती संपत्ती आहे, हे कुटुंबातील कुणालाच ठाऊक नसते. ते पत्नीच्या अथवा मुलाबाळांच्या नावाने पैसा ठेवत नाहीत. मरणाच्या दारात उभे राहिले तरी इच्छापत्र करत नाहीत. त्यांची अखेरची अवस्था दयनीय असते. मृत्यूनंतर वारस त्यांच्या फोटोला साधा हारही घालत नाहीत. एका चिक्कू गृहस्थांना अर्धांगवायू झाला होता. चेकवर सहीसुध्दा करता येत नव्हती, तरी त्यांनी मरेपर्यंत पत्नीला किंवा मुलांना पॉवर ऑॅफ ऍटर्नी दिली नाही. त्यांच्या संशयी स्वभावाला कुटुंबीय इतके वैतागले की, त्यांचे निधन झाले तेव्हा मुलांच्या तोंडून ''अच्छा हुआ, बुढ््ढा मर गया, छुटकारा मिल गया'' असे कडवट उद्गार निघाले. कद्रू वागून माणसे काय मिळवतात, हा प्रश्न मला पडतो.

चांगल्या मार्गाने भरपूर पैसे मिळवावेत, ते व्यवसायासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी खर्च करावेत आणि आनंदात जगावे, ही माझी विचारसरणी आहे आणि त्याचे मूळ संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेल्या उपदेशात आहे.

जोडोनिया धन, उत्तम वेव्हारे, उदास विचारे, वेच करी॥

कृपण माणूस या उपदेशाचा उत्तरार्ध कधीच पाळत नाही आणि म्हणूनच सुखी, आनंदी व समाधानी राहत नाही. कंजूस लोकांच्या वर्गात मोडणारा, पण जास्त उपद्रवी असा आणखी एक गट म्हणजे फुकटचंबू लोकांचा. फुकटचंबू माणसाच्या मनोवृत्तीचे नेमके वर्णन करणारी 'मुफ्त का चंदन, घिस मेरे नंदन' ही हिंदी म्हण आपल्या कानावरून गेली असेलच. असे फुकटे बहाद्दर इतरांसाठी उपद्रवी ठरतात. पुष्कळसे श्रीमंत कंजूस लोक पैसा वाचवण्यासाठी मुद्दाम दरिद्री जीवनशैली अंगीकारतात. 'स्वस्त ते मस्त' या तत्त्वाने जगतात आणि प्रसंगी आत्मक्लेश सोसतात. यात ते इतर क़ुणाला फसवत नसतात. पण फुकटचंबू व्यक्ती तशी नसते. एखादी गोष्ट फुकटात पदरात पाडून घेण्यासाठी वेळप्रसंगी ती इतरांचे नुकसानही घडवू शकते.

माझ्या माहितीचे एक प्रचंड श्रीमंत गृहस्थ आहेत. संपत्ती इतकी अफाट, की पुढच्या सात पिढयांनी बसून खाल्ली तरी संपणार नाही. तरीही यांना फुकटेगिरीचे आकर्षण. इंटरनॅशनल कॉल करायचा झाला की हे गृहस्थ पलिकडच्या व्यक्तीला नेहमी मिस कॉल देणार. समोरच्या व्यक्तीने कॉल लावला असल्यास मनमुराद बोलणार. पैसे वाचवण्यासाठी यांनी मोबाइलही ठेवलेला नाही. बाहेर वावरताना गरज पडलीच, तर भेटेल त्याचा मोबाइल विनासंकोच मागून घेतात. फोन झाल्यावर मोठया अदबीने विचारतात, ''याचे पैसे किती देऊ?'' त्यांच्या नावाचे आणि श्रीमंतीचे दडपण आलेला समोरचा माणूस गडबडून जातो आणि म्हणतो, ''काहीतरीच काय सर? उलट आपली सेवा करताना धन्य वाटले.'' अशा वेळी या गृहस्थांच्या मनात कॉलचे पैसे वाचले म्हणून खुशीचे तरंग उमटतात. फ़ुकटचंबू व्यक्ती स्वत:च्या घरी मोजून मापून खातील, पण इतरांच्या मेजवानीत पोटाला तडस लागेपर्यंत खाणार. कृपया आहेर आणू नयेत, असा मजकूर आमंत्रणपत्रिकेत वाचल्यावर यांना हायसे वाटते. फुकटचंबूंना कुणी जिवलग मित्र नसतात ते या वृत्तीमुळेच.

आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचे आर्थिक नुकसान करणारी अशी फुकटचंबू माणसे मला मुळीच आवडत नाहीत. फुकट मिळतंय तर ओरपून घ्या, ही मनोवृत्ती माणसाला किती नीच पातळीला नेते, याचे उदाहरण मी प्रत्यक्ष पाहिले आहे. पूरग्रस्तांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत मिळत होती, त्या रांगेत माझ्या ओळखीतील एक संपन्न स्थितीतील गृहस्थ जुने कपडे घालून उभे राहिले होते. माझी अन् त्यांची नजरानजर होताच ओळख चुकवून ते दुसरीकडे पाहू लागले. पैशाच्या मोहापायी माणूस किती निर्लज्ज बनतो? मी माझ्या आई-वडिलांचा शतश: आभारी आहे. गरिबीतही त्यांनी आम्हा भावंडांच्या मुखात साधासा घास घातला, परंतु आम्हाला कधी लाचार आणि फुकटचंबू बनू दिले नाही.

फुकटेगिरीची मनोवृत्ती एकदा लक्षात आली, की त्या व्यक्तीला इतर लोक टाळू लागतात. कधीकधी धूर्त बदमाशही अशा फुकटया लोकांना जाळयात सावज म्हणून पकडू शकतात. एका श्रीमंत गृहस्थांना लकी ड्रॉमध्ये बक्षीस लागल्याचा फोन आला. पलीकडच्या व्यक्तीने फ्री गिफ्ट घेऊन जाण्यासाठी एका हॉटेलमध्ये सपत्निक येण्याचे आमंत्रण दिले. आमंत्रितांसाठी फुकट भोजनाची व्यवस्थाही असल्याचे मधाचे बोट लावले. त्याला हुरळून हे गृहस्थ गेले. साखरपेरणी करून गंडवणारी एक टोळी तिथे तयार होतीच. तुम्ही थोडेसे पैसे गुंतवल्यास तुम्हाला आयुष्यभर अमके-तमके फुकट मिळेल, या आमिषाला ते फुकटे गृहस्थ बळी पडले आणि त्यांनी पदरचे पैसे गुंतवले, जे पुढे बुडाले. या व्यवहारात त्यांना 40-45 हजार रुपयांचा फटका बसला. 'देअर इज नो सच थिंग ऍज ए फ्री लंच' ही इंग्लिश म्हण त्यांच्या चांगलीच लक्षात राहिली असेल.

मित्रांनो! श्रीमंती असूनही फुकटेगिरीने राहणे किंवा 'फुकट ते पौष्टिक' ही मनोवृत्ती बाळगणे कामाचे नाही. त्यापेक्षा समाजातील गरिबांना, गरजूंना आपल्या साठवणीतून हिस्सा देण्याची वृत्ती यायला हवी.

 (या लेखांवर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून ते आपल्या प्रतिक्रिया, सूचना, विचारणा [email protected] या पत्त्यावर पाठवू शकतात.)