समलैंगिकता आणि समाज

 विवेक मराठी  14-Sep-2018

 

***ऍड. अंजली झरकर***

समलिंगी व्यक्ती आजही कुठेतरी दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वात (split personality) जगतात. न्यायालयाने जरी त्यांचा हक्क मान्य केलेला असला, तरी समाज अजूनही त्यांची हेटाळणी करतो, ह्या सत्य परिस्थितीमुळे हे लोक आपले स्टेटस उघडपणे सांगायला घाबरतात. अगदी निकाल आल्यानंतर काही लोकांनी उघडपणे या निकालाचा पुरस्कार केला, मात्र बहुसंख्य लोक - त्यातही समलिंगी महिला ज्या कुणी असतील, त्यांनी कुठेही खुलेआम याचा आनंद व्यक्त केलेला नाही. मुळात या गोष्टीकडे लोकांनी धार्मिक किंवा सांस्कृतिक गोष्ट म्हणून बघण्यापेक्षा शारीरिक आणि मानसिक पातळीवर घडणारी गोष्ट या दृष्टीने बघण्याची गरज आहे.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

 दि. 6 सप्टेंबर 2018ला सर्वोच्च न्यायालयाने नवतेज सिंह जोहर वि. भारतीय संघराज्य या याचिकेमध्ये भारतीय दंडविधान कलम 377 हे परस्पर संमतीने केल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना लागू पडत नाही असा निर्वाळा दिला, याचा अर्थ कलम 377 हे भारतीय दंडविधान कायद्यातून रद्दबातल ठरवण्यात आले असा अजिबात नाही. कलम 377 अजूनही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा समजला जातो. पण या निकालामुळे कलम 377 दाखल करण्याला काही मर्यादा किंवा पूर्वअटी लागू झाल्या. या निकालाचा थोडक्यात सारांश जर पाहायचा झाला, तर

- कलम 377 रद्द झालेले नाही.

- परस्पर सहमतीने असलेले समलैंगिक संबंध इथून पुढे कलम 377च्या कक्षेत येणार नाहीत.

- याचा अर्थ परस्पर सहमतीने दोन प्रौढ समलैंगिक व्यक्ती परस्परांशी लैंगिक संबंध ठेवू शकतात.

- लहान मुले आणि जनावरे यांच्याशी केला जाणारा लैंगिक व्यवहार कलम 377च्या कक्षेत येतो आणि तो इथून पुढेही गुन्हा समजला जाईल.

- जबरदस्तीने जर असे संबंध ठेवल्याचे सिध्द झाले, तरीही तो कलम 377अंतर्गत गुन्हा मानला जाईल.

या निकालाद्वारे कोर्टाने आणि कायद्याने पहिल्यांदा LGBT समाजाचा एकमेकांबरोबर राहण्याचा अथवा एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवण्याचा हक्क मान्य केला आहे. कोर्टाच्या मते ज्या ठिकाणी दोन प्रौढ समलिंगी व्यक्ती परस्पर इच्छेने आणि परस्पर सहमतीने एकमेकांबरोबर राहत असतील आणि लैंगिक संबंध ठेवत असतील, तर या संबंधांचे गुन्हेगारीकरण होऊ शकत नाही. कलम 377अंतर्गत अशा संबंधांचे गुन्हेगारीकरण हे एका अर्थाने भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 आणि कलम 21नुसार सुसंगत नाही आणि म्हणूनच ते घटनाबाह्य आहे. LGBT समाजाच्या लोकांना भारतात राहणाऱ्या इतर कुठल्याही लोकांसारखाच मानाने जगण्याचा हक्क आहे.

या निकालाबाबत समाजामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि बहुतांशी याचा सूर टिंगल आणि रागाचा आहे. याचे कारण कदाचित आपल्या समाजाच्या मानसिकतेमध्ये सापडू शकेल. जगात प्रमुख अशा मानल्या गेलेल्या बहुतेक धर्मांमध्ये असे संबंध वर्ज्य मानले गेले आहेत. जगाच्या पश्चिम भागात अब्राहम, त्याचे दोन पुत्र इसाक ज्याच्यापासून ज्यू वंशवेल सुरू झाली आणि इस्माईल - जो अरबांचा मूळ पुरुष मानला जातो, त्याच्यानंतर जन्माला आलेली ख्रिश्चॅनिटी आणि पैगंबरांच्या उदयानंतर जन्माला आलेला इस्लाम या सर्व घडामोडी होण्याच्याही पूर्वी अनेक शतके युरोपमध्ये सांस्कृतिकदृष्टया अग्रेसर राहिलेल्या ग्रीस देशात समलिंगी संबंध समाजमान्य होते. सॉक्रेटिससारखे विचारवंत स्वत: समलिंगी होते. त्याबाबत गुप्तता पाळली जात नव्हती. पूर्व गोलार्धाचा विचार करायचा झाला, तर भारतात खजुराहो येथे कोरलेली समलैंगिक शिल्पे असोत किंवा कामसूत्रासारखे प्राचीन ग्रंथ, त्याच्यामध्ये समलैंगिकत्वाचा उल्लेख आढळतो. पुरातन काळात भारतात असे संबंध असतील, तर याबाबतचे पुरावे काही पौराणिक कथा सोडल्या तर बाकी कुठे आढळत नाहीत. किन्नर लोकांचा उल्लेख प्रामुख्याने भारतीय ग्रंथात आढळतो. परंतु हे संबंध शिक्षेस पात्र होते असा सूर आपल्याकडील शास्त्रात फारसा येत नाही. त्यामुळे भारतीय समाजात असे संबंध असतील, तर ते गुप्त असू शकतील आणि त्यासाठी असलेले शिक्षेचे विधान आपल्या शास्त्रात सापडत नाही.

इस्लाम अर्थात या संबंधांचा निषेध करतो. त्यामुळे एकूण सर्वच इस्लामिक स्टेट्समध्ये आणि भारतात असलेल्या इस्लामिक शासनकर्त्यांच्या काळात समलैंगिक संबंधांना कुराणात सांगितल्याप्रमाणे कठोर शिक्षादेखील होत्या. रोमन कॅथॉलिक चर्चने पहिल्यापासून अशा संबंधांना मनाई केलेली आहे.

बायबलमधील 'लेविटिकस' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तिसरा चॅप्टरमध्ये स्पष्ट शब्दात समलिंगी संबंधांचा निषेध आढळतो. लेविटिकस 18:22मध्ये 'You shall not lie with a male as with a woman. It is an abomination'(एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषासोबत झोपणे घृणास्पद अपराध आहे) अशा स्वरूपाची आज्ञा आहे, जी समलिंगी संबंध वर्ज्य मानते.

कुराणामध्ये समलिंगी स्त्रियांना आणि पुरुषांना शिक्षा दिली पाहिजे, अशा स्पष्ट स्वरूपाच्या सूचना आढळतात. अर्थात विशेष म्हणजे त्यात समलिंगी स्त्रियांना समलिंगी पुरुषांपेक्षा कडक शिक्षेची तरतूद आढळते. वानगीदाखल कुराणातील सूर-अन-निसा 4:15मध्ये If any of your women are guilty of lewdness, Take the evidence of four (Relible) witness from amongst you against them; and if they testify, confine them to houses until death do claim them, or Allah ordine for them some (other) way (जर दोन स्त्रिया एकमेकांशी अश्लील वर्तन करताना आढळल्या, तर त्यांना ओळखणाऱ्या 4 साक्षीदारांची साक्ष घेऊन अशा स्त्रियांना अल्लाहचा त्यांच्यासाठी दुसरा कुठला आदेश येईपर्यंत मरेपर्यंत घरात डांबून ठेवण्यात यावे) अशा स्वरूपाचा हुकूम आढळतो.

आणि त्याच्याच पुढे 4:16मध्ये If two men among you are guilty of lewdness, punish them both. If they repent and amend, leave them alone; for Allah is Oft-returning, Most Merciful. (जर दोन पुरुष एकमेकांशी अश्लील वर्तन करताना आढळले, तर त्यांना शिक्षा करण्यात यावी. याउप्पर त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असेल, तर त्यांना अल्लाहच्या दयेवर आणि मर्जीवर सोडून देण्यात यावे) अशी आज्ञा लिहिलेली सापडते.

भारतामध्ये मनुस्मृती किंवा तिच्या अगोदर असलेले कायदा आणि शिक्षा विशद करणारे ग्रंथ, त्यांच्यामध्ये अशा संबंधांना गुन्हा मानून शिक्षा दिलेली आढळत नाही.

भारतात हे संबंध गुन्हा ठरवले ते 1860 साली आलेल्या ब्रिटिशकालीन भारतीय दंडविधान या कायद्याने. त्याच्यानंतर 89 वर्षांनी अस्तित्वात आलेली भारतीय राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा ठरवला गेला आणि भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वाशी विसंगत कायदा रद्दबातल ठरवण्याच्या अधिकाराचा वापर करत सर्वोच्च न्यायालयाने जवळजवळ 160 वर्षांनंतर, परस्पर सहमतीने होणारे समलिंगी संबध कलम 377च्या कक्षेतून बाहेर काढलेत.

मुळात या सबंधांकडे बघण्याचा दृष्टीकोन धार्मिक आणि सामाजिक राहिला आहे. त्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर बघण्याचे प्रमाण सर्वच समाजात कमी आहे. LGBT म्हणजे Lesbian, Gay, Bisexual आणि Transgender अशा चार घटकांच्या sexual orientationबद्दल हा मुद्दा येतो. लेस्बियन अर्थात दोन स्त्रियांमधले परस्पर लैंगिक सहसंबंध अधोरेखित करतात, तर गे दोन पुरुषांमधील लैंगिक आकर्षण दर्शवतात. बायसेक्शुअल हा प्रकार थोडा वेगळा पडतो, ज्यात व्यक्तीला विरुध्दलिंगी आणि समलिंगी दोन्ही प्रकारच्या संबंधांमध्ये रस असतो. मात्र समाजाला दाखवण्यासाठी असे लोक लग्ने करतात, पण त्यांचे समलिंगी संबंध एका बाजूला गुप्त रितीने सुरू राहतात. ट्रान्सजेन्डर लोक हे स्वत:ची स्त्री किंवा पुरुष ही जन्माने मिळालेली ओळख बदलण्यासाठी शस्त्रक्रियेचा आधार घेतात.

वैद्यकशास्त्राचा विचार केला, तर समलिंगी संबंधांबाबत अनेक अभ्यास आणि संशोधन केले गेले आहेत. सुरुवातीच्या काळातील संशोधनाचे निष्कर्ष या संबंधांच्या विरुध्द होते. मात्र आधुनिक वैद्यक मानसशास्त्र आणि त्यांचे निष्कर्ष समलिंगी व्यक्ती ही सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच मानसिकदृष्टया तंदुरुस्त असते, त्याची लैंगिक आवड ही सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा 'वेगळी' असते असे ठामपणे सांगते. सर्वोच्च न्यायालयाने याच मुद्दयाचा आधार घेत, दोन व्यक्ती त्यांचे खाजगी सहसंबंध लोकांच्या नजरेपासून एकांतात कुणालाही त्रास न देता कसे जपतात याच्याशी कायदा भंग होण्याचा संबंध कुठेही येत नाही, अशा आशयाचे मत वरच्या निकालामध्ये व्यक्त केले आहे. जिथे बळजबरीने लैंगिक संबंध ठेवण्याचा मुद्दा येतो, तिथे समलिंगी किंवा विरुध्दलिंगी हा वादच निर्माण होऊ शकत नाही, कारण 'संमतीविना संबंध' हा कायदेशीरदृष्टया बलात्कारच ठरतो, तो सर्वच संबंधांबाबत लागू आहे.

 

समलिंगी व्यक्ती आजही कुठेतरी दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वात (split personality) जगतात. न्यायालयाने जरी त्यांचा हक्क मान्य केलेला असला, तरी समाज अजूनही त्यांची हेटाळणी करतो, ह्या सत्य परिस्थितीमुळे हे लोक आपले स्टेटस उघडपणे सांगायला घाबरतात. अगदी निकाल आल्यानंतर काही लोकांनी उघडपणे या निकालाचा पुरस्कार केला, मात्र बहुसंख्य लोक - त्यातही समलिंगी महिला ज्या कुणी असतील, त्यांनी कुठेही खुलेआम याचा आनंद व्यक्त केलेला नाही. मुळात या गोष्टीकडे लोकांनी धार्मिक किंवा सांस्कृतिक गोष्ट म्हणून बघण्यापेक्षा शारीरिक आणि मानसिक पातळीवर घडणारी गोष्ट या दृष्टीने बघण्याची गरज आहे. हा प्रकार धर्माला कलंक नाही, तो त्यांच्या मानसिक आणि शारीरिक जडणघडणीचा भाग आहे, जो निसर्गाने त्यांना बहाल केला आहे, त्याबाबत ते लोकसुध्दा हतबल आहेत. त्यांची लैंगिक आवड अथवा इच्छा ते दाबू शकत नाहीत, त्यांना दाबणे भाग पाडले जातेय. बरे, लैंगिक दमन हे एका अर्थाने कुठल्याच समाजात मान्य नाही. आहार, निद्रा, भूक यासारखीच मैथुन ही एक आदिम प्रेरणा आहे. ती प्रत्येकामध्ये असते आणि तिला दाबून न टाकता त्या भावनेचा आनंद घेता आला पाहिजे, हे समाजमान्य तत्त्व आहे. खरी मेख कुठे आहे, तर फक्त दोन भिन्नलिंगी व्यक्तींमधील लैंगिक प्रेरणा जर त्यांनी समाजमान्य मार्गांनी भागवली, तर त्याला स्वीकृती मिळते. जर ती लैंगिक प्रेरणा दोन समलिंगी व्यक्तींमध्ये असेल, तर मात्र तिथे समाजव्यवस्था त्याला कडाडून विरोध करते. पण लक्षात घ्यावयाचा विषय असा आहे की आहार, निद्रा, तहान, मैथुन या आदिम प्रेरणा मनुष्यजन्मापासून सुरू झाल्या आहेत. समाजव्यवस्था नंतर आली. त्यामुळे एका अर्थाने समलिंगी व्यक्तीमधील लैंगिक प्रेरणा या कुणीतरी घडवल्या असे म्हणण्यापेक्षा त्या निसर्गचक्राचा वेगळेपणा म्हणा अथवा नैसर्गिक गुणसूत्रामधील गुण-दोष म्हणा, यामुळे निर्माण होतात. त्यात त्यांना गुन्हेगार मानण्याची गरज नाही. एक माणूस म्हणून त्यांची परिस्थिती समजून घेण्याची खरी गरज आहे. लैंगिक भावना वेगळया आहेत म्हणून ती व्यक्ती मनाने विकृत आहे, जगायला लायकच नाही असा जो समज आपल्या समाजात आहे, तो मात्र चुकीचा आहे. त्यांना त्यांच्या वेगळेपणासह समाजाने स्वीकारले पाहिजे. एक व्यक्ती म्हणून संविधानाने जो अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे, ते सर्व अधिकार त्यांना मिळणे, dignified life किंवा सन्मानाने जगायला मिळणे हा त्यांच्या हक्क आहे आणि त्यांचे लैंगिक वर्तन हा त्यांच्या जगण्याचा भाग आहे हे समजून जर त्यांच्याबरोबरची वागणूक थोडी सौहार्दपूर्ण झाली, तर हा सकारात्मक परिणाम असेल आणि तो व्हायला हवा. यासाठी एक तर समाजाने स्वत:चा दृष्टीकोन व्यापक करावा आणि LGBTच्या सदस्यांनी स्वत:ची ओळख समाजात स्वीकारावी. ह्या गोष्टी दोन्ही बाजूंनी घडल्या पाहिजेत.

या निकालाला अनेक गुंतागुंतींचे पदर लाभलेत. ज्या ठिकाणी दोन व्यक्ती समलिंगी असून त्या परस्पर संमतीने राहत आहेत, ती गोष्ट वेगळी; पण अनेक ठिकाणी मुलगा गे असेल, तर समाजात ही गोष्ट उघड पडू नये म्हणून त्याचे जबरदस्तीने लग्न लावले जाते. घरात आलेल्या सुनेवर बळजबरी करून तिला सासऱ्याबरोबर, दिराबरोबर किंवा नवऱ्याचे स्पर्म वापरून मूल व्हावे असे प्रयत्न केले जातात. कौटुंबिक न्यायालयात केसेस चालवत असताना अशा काळीज हेलावून टाकणाऱ्या कहाण्या मी प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. त्यामुळे प्रश्न असा पडतो की हे संबंध कायदेशीर झाले, तर गे मुलाबरोबर स्ट्रेट सेक्शुअल ओरिएंटेशन असलेल्या मुलींचे फसवणुकीने लग्न लावून देण्याचे प्रमाण कमी होईल का? अशी माणसे आता राजरोस आपले स्टेटस जाहीर करतील का?? कारण मुद्दा LGBTला विरोध असण्याचा नाही, पण त्या नावाखाली आयुष्य बरबाद करण्याच्या प्रकाराला कायद्याचा नक्कीच विरोध राहील.

अनेक समलैंगिक जोडप्यांचे सेक्शुअल ओरिएंटेशन हे बायसेक्शुअल असते - म्हणजे समाजात त्यांचे लग्न होऊन त्यांना कुटुंब वगैरे असते, पण त्यांचे गुप्त समलिंगी संबंध मात्र दुसरीकडे चालू राहतात. आज जरी न्यायालयाने या संबंधांना मान्यता दिली असली, तरी हे संबंध जर उघड केले, तर त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यात त्याची परिणती होऊ शकते. त्यामुळे अशी माणसे आपली ओळख दाखवायला कधीही पुढे येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या समलिंगी जोडीदाराची - विशेषत: जोडीदार अविवाहित असेल, तर त्याची कुचंबणा न्यायालयीन निकालाने संपत नाही.

दुसरा मुद्दा येतो - जर उद्या समलिंगी लोकांनी लग्न करायचे अथवा मूल जन्माला घालायचे ठरवले, तर त्या लग्नाला स्टेटस काय असेल? ज्या ठिकाणी फक्त दोन पुरुष अथवा दोन स्त्रिया आई-वडील या दोघांच्या भूमिकेत आहेत, अशा वेळी मुलाच्या शैक्षणिक, आर्थिक कागदपत्रावर कुणाचे नाव असेल आणि त्याला शासकीय परवानगी असेल का? उद्या या समलिंगी व्यक्तींच्या संपत्तीबाबत वाद उद्भवला, जन्माला घातलेल्या मुलाच्या कस्टडीबाबत वाद उद्भवला, तर त्याचे निवारण कसे करणार? थोडक्यात, दोन विरुध्दलिंगी व्यक्तींबाबत सहसंबंध, लग्न, घटस्फोट, फसवणूक, कस्टडी, पोटगी, वारसा हक्क, संपत्तीमध्ये जोडीदाराला असलेला अधिकार याबाबत जे कायदे आहेत, ते समलिंगी व्यक्तींना लागू पडत नाहीत. आज जर न्यायालय समलिंगी व्यक्तीचे अस्तित्व संविधानिक आहे आणि संविधानाने मान्य केलेले सगळे अधिकार त्यांना मिळायला हवेत असे सांगते, तर भविष्यात त्याबाबत नवीन कायद्यांची अंमलबजावणी अथवा जुन्या कायद्यात सुधारणा हे बदल पर्यायाने समोर येऊन ठेपतात. बाकी समाज आणि समलैंगिक समाज कितपत लवचीक दृष्टीकोन ठेवून त्याला सामोरे जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

7588942787