खानदेशाने केली पाणीटंचाईवर  मात

 विवेक मराठी  18-Sep-2018

विविध संस्था सर्वत्र जलसंधारणाची विविध कामे करीत आहेत. गावकऱ्यांच्या सहभागातून खान्देशातील आणि मराठवाडयातील काही गावांत लहान-मोठी कामे झाली आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या जलसंधारणाच्या या कामांचे नियोजन रा.स्व. संघाच्या ग्रामविकास विभाग व जलगतिविधीच्या माध्यमातून झाले आहे. त्याचा आढावा घेणारी लेखमालिका.

संघशाखेतले स्वयंसेवक व ग्रामस्थ मिळून भोणे गावात ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबवितात. सेंद्रिय शेतीपासून ते ग्रामस्वच्छतेपर्यंत, यात गाव हिरिरीने सहभागी होते. असे विविध उपक्रम राबविणारी गावाची एक ग्रामविकास समिती आहे. समितीच्या माध्यमातून चालणाऱ्या विविध उपक्रमांपैकी जलसाक्षरता हा एक उपक्रम.

भोणे परिसरातील नदी खोलीकरणात

दहा कोटी लीटर पाणीसाठा

2016 या वर्षातील उन्हाळयाचे दिवस होते. दुष्काळाचे वर्ष असल्याने शिवार तसे रखरखीतच होते. शेतालाच काय, पिण्याच्या पाण्याचीदेखील समस्या गडद झाली होती. ठिकठिकाणी जलसंधारणाची कामे होतात, पण आपलेच गाव त्या बाबतीत मागे का? असा प्रश्न भोणे गावाला नेहमी पडायचा. एका सायंकाळी गावाबाहेरच्या महादेव मंदिर परिसरात गाव गोळा झाले. शंभर-दीडशे लोक जमलेले. जलयुक्त शिवार, शिरपूर पॅटर्नवर चर्चा झाली. लातूरला होतेय तसे लोकसहभागातून नदी खोलीकरण करून पाणी अडवू या, असा संकल्प त्या रात्री ठरला नि गावातील तरुणाई कामाला लागली. कोणत्या मार्गाने कोण योगदान देऊ शकेल, हे निश्चित झाले. अनेकांनी निधीत योगदान दिले, तर काहींनी कामाच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी वेळ द्यायचे ठरविले.

भोण्याचे शिवार काळया कसदार जमिनीचे. मुरमाड वा बरड जमीन नाही. शिवारातून 4 वेगवेगळे नाले वाहतात. त्यापैकी कयनी ही नदी. पावसाळयात 600 मि.ली.पेक्षा अधिकचे पाऊसमान होत असल्याने हे चार महिने हे नदीनाले वाहतात. या नाल्यांवर ठरावीक अंतरावर सिंचन विभाग व कृषी खात्याने सिमेंटचे बांध बाधलेले. परंतु सगळया बंधाऱ्यांची उंची नदीच्या तळाला समांतर. त्यामुळे बंधारे बांधूनही नदीत पाणी कधी अडलेच नाही.

दरम्यान पाणी अडविण्याच्या क्षेत्रात व सेवा कार्यात काम करणारे काही संघकार्यकर्ते डॉ. हेमंत पाटील यांच्या घरी एकत्र आले. त्यात डॉ. हेमंत पाटील, योगेश्वर गर्गे, सागर धनाड, प्रमोद मोघे, सतीश पाटील व स्वत: मी असे जमलो होतो. त्या वेळी झालेल्या नियोजनातून भोण्यात 600 मीटर लांब खोलीकरण झाले. शिरपूर पॅटर्ननुसार खोल डोह करून पाणी साठविण्यात आले. त्या वर्षी सुमारे 2 कोटी लीटर इतका तो जलसाठा होता.

हा पहिला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. कयनी नदीवरील या खोलीकरणाचे फायदे दिसून आल्याने आणखी भरीव काम करू या, असा गावाने निश्चय केला. मदतीला संभाजीनगर येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान ही संस्था पुढे आली. या वेळी कयनी नदीसह सारवे नाल्याचे, लेंडी नाल्याचे व बघा नाल्याचेही खोलीकरण करण्याचे निश्चित केले.

दुसऱ्या टप्प्यात 3 गावांत 5 नाल्यांचे खोलीकरण

पहिल्या टप्प्यातील जलसंवर्धनाचे फायदे दिसू लागल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील 3 नाल्यांचे खोलीकरण व्हावे, असा गावातील तरुण शेतकऱ्यांनी निर्धार केला. या वेळी प्रत्येक नाल्यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्यात आली. या वेळी 80 हजार रुपये इतका निधी लोकसहभागातून एकत्रित करण्यात आला. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी 2016च्या खोलीकरणासाठीच्या डिझेल अनुदानाची जोड दिली. अशा प्रकारे 2 लाख रुपये लोकसहभाग व 4 लाख 40 हजार ही उर्वरित रक्कम औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान या संस्थेने उपलब्ध करून दिली.

नोव्हेंबर महिन्यात सारवे नाला, लेंडी नाला व बघा नाला या तीन वेगवेगळया नाल्यांच्या खोलीकरणास 28 नोव्हेंबर 2017ला प्रारंभ झाला. सुमारे 22 दिवस हे काम चालले. त्यातून सारवे नाला 66 मीटर लांब, 15 मीटर रुंद व 2 मीटर खोल करण्यात आला. लेंडी नाला 1200 मीटर लांब, 8 मीटर रुंद व 2 मीटर खोल झाला. बघा नाल्याचे सुमारे 400 मीटर लांब, 10 मीटर रुंद व 2 मीटर खोलीकरण करण्यात आले. अशा प्रकारे 2 कि.मी.पेक्षा अधिक नाले खोलीकरण झाले.

डिसेंबर महिन्यात गिरणा धरणातून पाण्याचे आवर्तन सुटणार असल्याने खोलीकरणाचे काम योजनापूर्वक नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात करण्यात आले. पाटचाऱ्यांमधून वाया जाणारे पाणी या नाल्यांमध्ये वळवून या तिन्ही नाल्यांच्या खोलीकरणात सुमारे 5 कोटी लीटर जलसाठा झाला.

लोणेमध्ये व महंकाळयातही खोलीकरण

नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातील भोणे येथील कामापासून लोणे व महंकाळे येथील गावकऱ्यांनी प्रेरणा घेत कयनी नदी व बघा नाला खोलीकरणाचे काम हाती घेतले.

लोणे येथे सुमारे 800 मीटर लांब, 15 मीटर रुंद व अडीच मीटर सरासरी खोल असे काम झाले, तर महंकाळयात 510 मीटर लांब नाला खोल करण्यात आला. या ठिकाणीही सुमारे 1 लाख 75 हजार इतका लोकवाटा गोळा झाला. उर्वरित रक्कम लोणे येथे महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानने व महंकाळयात जनकज्याशरणजी मुंदडा धर्मार्थ न्यास जळगाव या संस्थेने दिली. या दोन्ही ठिकाणी मिळून 5 कोटी लीटर जलसाठा झाला आहे.

2016पासून भोण्यात हा जलसंवर्धनाचा यज्ञ सुरू आहे. ग्रामविकास देवगिरी प्रांतप्रमुख विनयजी कानडे, ग्रामविकास प्रांत संयोजक प्रभाकर उर्फ बापू रावगावकर, जलगतिविधी प्रांतप्रमुख सर्जेराव वाघ यांचे सतत मार्गदर्शन असते. तसेच ग्रामविकास विभागीय संयोजक शांताराम शिंदे, जलसमिती प्रमुख संजय भास्कर पाटील, दिनेश पाटील, अरुण पाटील, प्रताप निंबा पाटील (लोणे), भिका पटेल (महंकाळे), महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानचे पराग पंचभाई व किरण देवरे यांचे सहकार्य होते. रा.स्व. संघाचे क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, जनकज्याशरणजी ट्रस्टचे भगवतीप्रसाद मुंदडा, जिल्हासंघचालक राजेशआबा व जिल्हा कार्यवाह किशोर चौधरी यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

 जुनोने, भोणे, लोणे व महंकाळे मिळून सुमारे 10 कोटी लीटर पाणी भूगर्भात जिरविले जात आहे. या मार्गाने जलस्तर वाढविण्यात येत असून धरणाची साइट नसताना नदीनाल्यात डोह तयार करून एक प्रकारे लघुसिंचन बांधच बांधला गेलाय. यामुळे सुमारे 200 विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सुमारे 2 हजार एकर इतक्या शेतीला या पाण्याचा फायदा होतोय. विहिरी फक्त जिवंतच झाल्या नाहीत, तर विहिरींचे पाणी दोन ते तीन महिने अधिक काळ टिकते.

पाणी पातळी वाढल्याने झाली कारले व कापसाची लागवड

खोलीकरणात पाणी जिरल्याने ऐन मे-जून महिन्यात शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. परिणामी भोण्यातील काही शेतकऱ्यांनी कारले या भाजीपाला पिकाची लागवड केली, तर अनेकांना बागायती कापसाची लागवड करता आली. ऐन टंचाईच्या कालखंडात पिकांना व गुराढोरांच्या प्यायच्या पाण्याची सोय झाल्याने परिसरात आनंद व्यक्त केला जातोय.

नांद्रयात टँकरमुक्तीच्या संकल्पाची पूर्तता

भोण्याप्रमाणेच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नांद्रा हे पाण्याचे मोल जाणणारे एक गाव. पावसाळा संपला की गावात पाणीटंचाई सुरू व्हायची आणि मग सुरू व्हायचा टँकरने पाणीपुरवठा.

दिवसाकाठी 3 टँकर पाणी नांद्रयाला मिळायचे. त्यात नियमितता कधीच नव्हती. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळांनी बेजार नांद्रयाचे गावकरी यातून कशी सुटका होईल या विवंचनेत होते. जिथे 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा उपक्रम असेल, तिथे पोहोचून आपल्या गावी काही करता येईल का? असा ते सतत विचार करीत. असा विचार करणाऱ्यांपैकी एक होते डॉ. आधार पाटील. भोणे, ता. धरणगाव येथील नदी खोलीकरण पाहून ते उत्साहित झाले. शासकीय मदतीशिवाय गावकऱ्यांच्या सहभागाने आपल्याही गावात पाणी जिरवू या, अशी खूणगाठ बांधूनच ते तेथून गावी आले.

नदी खोलीकरणात तरुणांचा सहभाग

नांद्रा - जामनेर तालुक्यातील पळासखेड-शेंदुर्णी मार्गावरचे 2700 लोकवस्तीचे गाव. अजिंठाच्या डोंगरातून उगम पावलेली सोनद नदी या गावची जीवनदायिनी. परंतु नांद्रयाच्या अलीकडेच अनेक बंधारे झाल्याने तेथेच पाणी अडते. जे पाणी उरते, तेही पुराच्या रूपात वाहून जाते. त्यामुळे पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली. रा.स्व. संघाचे जलगतिविधी प्रमुख दत्तात्रेय मोहिते यांनी मार्गदर्शन केल्यानंतर गावकऱ्यांचे एकत्रीकरण झाले. नदी खोलीकरणावर शिक्कामोर्तब झाले. त्यासाठी बारा जणांची जलसमिती गठित करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षक रमेश तुकाराम पाटील हे समितीचे अध्यक्ष. डॉ. आधार पाटील यांनी सरपंचपदावरून उतरून खोलीकरणाच्या कामासाठी पूर्ण वेळ देऊ  केला. गावकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कामात सहभाग दिला.

नदी खोलीकरणासाठी गावकऱ्यांनी केलेला सामूहिक प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळे गावाचा सामूहिक शक्तीवरील विश्वास दृढ झाला. गावकऱ्यांनी गोळा केलेल्या 1 लाख रुपये लोकवाटयाला औरंगाबाद येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानच्या आर्थिक साहाय्याची साथ मिळाली. नदीतील गाळ व मुरूम वाहतुकीसाठी गावातील दहा बारा ट्रॅक्टर जुंपले होते. त्यामुळे नदी भरपूर खोल झाली, परंतु बांधावर माती टाकायची गरज पडली नाही. लोकांनी शेतात, खळयात व रस्ता तयार करण्यासाठी ही माती व मुरूम वापरला. सुमारे 500 मीटर लांब नदीचे खोलीकरण झाले. त्यात 20 फूट खोल दोन डोह करण्यात आले. या डोहांमध्ये पहिल्याच पावसाळयात नदीला आलेल्या पुराचे पाणी साठले. हा पाणीसाठा सुमारे सव्वादोन कोटी लीटर आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर या डोहांच्या काठावरच असल्याने, पहिल्याच पावसापासून गावाची टँकरपासून मुक्तता झाली. अशा प्रकारे नांद्रा गावाने टँकरमुक्तीचा संकल्प पूर्ण केला.

लौकीत डोह निर्मितीतून साधले जलसंधारण

शिरपूर पॅटर्नमुळे ख्याती पावलेल्या शिरपूर तालुक्यातील लौकी या गावाने आपल्या तालुक्याच्या ख्यातीला साजेसेच काम केले आहे. सुमारे पावणेचार लाख रुपये खर्चून दोनशे मीटर लांब व 17 फूट खोल असे दोन डोह शिवारातून वाहणाऱ्या नाल्यात केले. त्यामुळे या डोहांमध्ये पाणी मुरून लाखो लीटर पाणी भूगर्भात साठणार आहे. त्याचा फायदा म्हणजे या भागातील बोअरवेलना व विहिरींना पाणी उपलब्ध होऊ  शकेल.

  लौकी हे संघाच्या ग्रामविकास विभागाचे विविध उपक्रम राबविणारे गाव. गावात जलसंधारणाचा उपक्रम राबविला जावा, यासाठी या वर्षीच्या उन्हाळयात वेळोवेळी ग्रामस्थांच्या बैठकी झाल्या. बैठकीला शिरपूर तालुका ग्रामविकास समिती प्रमुख जयपाल देशमुख, शिरपूर तालुका जलगतिविधी प्रमुख मनीष भावसार यांनी मार्गदर्शन केले. त्यांना धुळे जिल्हा गतिविधीचे आशिष अग्रवाल व रवींद्र खैरनार यांचे सहकार्य मिळाले. त्यातून झालेल्या नियेजनातून जलसमिती गठित करण्यात आली. भीमसिंग राजपूत हे या समितीचे प्रमुख. 15 दिवस चाललेल्या खोलीकरणातून सुमारे 1000 ट्रॉल्या गाळ व मुरूम काढण्यात आला. येथेही महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानने आर्थिक मदत केली. पहिल्या पावसात दोनपैकी एका डोहात पाणी साचले व मुरलेदेखील. त्याचा फायदा पाणीपातळी वाढीतून लगेच जाणवला.

खान्देशात संघाच्या ग्रामविकास विभागात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जलसंधारणाची कामे करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे.