तदात्मता : कवी अनिल

 विवेक मराठी  24-Sep-2018

तदात्मता म्हणजे? आपण तेच होऊन जाणं. तदात्म म्हणजे मी तेच आहे असं जाणवून होणारी अपार आनंदाची अनुभूती. समाधी अवस्थेची पहिली पायरी म्हणजे तदात्मता. मन ब्रह्ममय होऊन जाणं व मनात केवळ आनंद भरून राहणं म्हणजे तदात्म होणं. इथे अनिलांनी सहस्ररश्मी सूर्याची पहिली कोवळी किरणं भूमीवर उतरतात, तेव्हा ती साऱ्या सृष्टीला कशी मायेने गोंजारतात याचं वर्णन केलं आहे.

जेव्हा फुलांच्या पाकळयांवरी सूर्याचे किरण खेळू लागती

आणि कळिकांच्या अंगाभोवती मायेची जाळी विणू पाहती

केळीची कवळी लुसलुशीत पाने हळुवार कुरवाळती

अमलताशाच्या फुलझुंबरांत शिरून पिवळे झोत पाडती

उसांच्या असंख्य तुऱ्यांवरती प्रकाशलहरी डोलत जाती

रुपेरी राखी रंगांच्या लाटा हिरव्या शेतात उसळविती

दूर्वांकुरांच्या अग्रांवरती लाख टिकल्या उजळतात

कवडशांतून धूलिकणांच्या विश्वाचा विस्तार पाजळतात

तेव्हा संवेदना अबोध काही तदात्मतेची थरारून जाते

प्रीतिचा पहिला स्पर्श जाणवून सारे अंगांग शहारून येते!

 आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच कवी 'अनिल' यांच्या 'अजुनी रुसूनि आहे', 'कुणी जाल का सांगाल का' आणि 'वाटेवर काटे वेचीत चाललो' या गीतरूपाने अमर झालेल्या काही सुंदर दशपदी आपल्या परिचयाच्या आहेत.

दशपदी हा काव्यप्रकार अनिलांनीच रूढ केला. दशपदी ही दहाच ओळींची बांधीव व एकसंध रचना. पण त्यांच्या मते तो काही ठरवून जाणीवपूर्वक बांधलेला रचनाप्रकार नव्हे. तरीही त्यांच्या बऱ्याच कविता याच दहा ओळींच्या रचनाबंधात आल्या व त्याला दशपदी हे नावही रूढ झाले. अनेकदा अनिलांनी शेवटची ओळ आधी लिहिली व मग आधीच्या लिहिल्यात, असे म्हणतात.

दशपदीमधे एकच विचार, एकच आशय सलग मांडला जातो.

दशपदी ही मनात आविष्कृत होतानाच या रूपात येते, त्यामुळे ती वाचताना आशय आणि शब्द हे अगदी नेमके असेच हवे होते असं वाटलं पाहिजे. आणखी काही हवं होतं किंवा हे उगीच आलं असं वाटू नये व वाचल्यानंतर संपूर्णतेची भावना जाणवायला हवी, असं अनिल दशपदीबाबत म्हणत. शब्दात जे सांगता आलं ते व त्यापलीकडची जाणीव आपल्या अतींद्रिय मनाला देईल ते, याचं दर्शन दशपदीतून मला झालं असं ते म्हणत. अनिलांच्या 'तदात्मता' या सुंदर दशपदीतून असाच अतींद्रिय अनुभव आपल्या अंतर्मनाला स्पर्शून जातो.

तदात्मता म्हणजे? आपण तेच होऊन जाणं. तदात्म म्हणजे मी तेच आहे असं जाणवून होणारी अपार आनंदाची अनुभूती. समाधी अवस्थेची पहिली पायरी म्हणजे तदात्मता. मन ब्रह्ममय होऊन जाणं व मनात केवळ आनंद भरून राहणं म्हणजे तदात्म होणं.

इथे अनिलांनी सहस्ररश्मी सूर्याची पहिली कोवळी किरणं भूमीवर उतरतात, तेव्हा ती साऱ्या सृष्टीला कशी मायेने गोंजारतात याचं वर्णन केलं आहे. पहिल्या आठ ओळी वाचताना आपणच तो कोवळा, उबदार, मऊ स्पर्शाचा किरण होऊन प्रवास करतो.

अनिलांच्या एका एका ओळीत एक वेगळं सुंदर निसर्गचित्र आहे. आपल्याला ते दिसतं, इतकंच नाही, तर आपण त्याचा भाग आहोत असं वाटू लागतं. अन मग शेवटच्या दोन ओळीत आपणही त्या अनुभूतीने श्रीमंत होऊन जातो!

तदात्मता

दिवसभर पृथ्वीचं भरण-पोषण करणारा, तिला निरनिराळे ताप देणारा, ॠतू देणारा, तिच्याकडच्या मोठमोठया जलाशयांची वाफ करून सोडणारा सूर्य सकाळच्या पहिल्या प्रहरी मात्र आई झालेला असतो. निजलेल्या लहानग्याला आईने हळुवार लाडिक हाका मारून हळूच केसावर हात फिरवून गाणं गुणगुणत उठवावं, तसा रात्रीच्या अंधारात स्तब्ध झालेल्या, निजलेल्या सृष्टीला पुन्हा दिवसभराच्या कामासाठी जागं करायला सूर्य त्याचे सर्वात सुंदर कोवळे किरण पाठवतो.

ती सुंदर सकाळ मी पाहत असतो.

तो हलकेच वर येतो. आपला सारा ताप पोटात दडवून सुखद सोसवणारं तेज घेऊन तो उगवतो. आपल्या मुठी उघडून सोबत आणलेले कोवळे सोनेरी किरण हलकेच उधळतो. ते पृथ्वीवर सगळीकडे उतरतात, विखुरतात....

कुणी एक फुलांच्या पाकळयांना गुदगुल्या करत त्यांच्याशी खेळतो, त्यामुळे डोळे उघडल्या उघडल्या फुलं प्रसन्न हसू लागतात.

कळयांना उमलायला अजून थोडा वेळ आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती नाजूक जाळं विणून कुणी तिष्ठत बसतात!

तिकडे केळ उभी आहे. तिची ती तेजस्वी पोपटी पानं कुरवाळायचा मोह काही किरणांना होतो. त्या लुसलुशीत स्पर्शाने तेही सुखावतात!

काही जणांना आणखी सोनेरी, आणखी तेजस्वी बनायचं असतं. मग ते अमलताशाच्या फुलांच्या घोसांवर झेपावतात. हळूच त्या घोसांत शिरतात व तिथून बाहेर डोकावताना ते पिवळंधम्म झुंबर प्रकाशाने लखलखू लागतं. पिवळया प्रकाशाचे झोत पाडत डुलत राहतं.

उसांच्या करकरीत पात्यांवर डुलणारे असंख्य अलवार तुरे त्यांना किरण स्पर्श करू जाताच शहारतात अन त्यांच्यातून आनंदाची एक लहर डोलत जाते. सगळया हिरव्या शेतातून  तुऱ्याच्या रुपेरी राखाडी रंगाची उधळण होते.

उसाच्या फडाला घुसळून काढणारे किरण दूर्वांच्या अंकुरांवर मात्र हलकेच जाऊन टेकतात. त्यांच्या अग्रांवर पहाटे येऊन विसावलेल्या दंवबिंदूंना त्या किरणांचा स्पर्श होतो अन क्षणात ते हिरवं बेट लक्ष लक्ष तेजबिंदूंनी चमचमू लागतं!

मोठया वृक्षांनी, घरांनी या स्नेहदूतांना अडवलेलं असतं. पण त्यांची मायेची असोशी त्यातूनही वाट काढत जमिनीकडे झेपावतेच. कुठल्या तरी फुटक्या कौलारातून, कुठल्यातरी झाडाच्या फांदीतून वाट काढत ते कवडशाच्या रूपाने झोकून देतात.

बाजूच्या अंधुक प्रकाशात उठून दिसणारा तो कवडसा कधी निरखून पाहिलाय तुम्ही? तो तर साऱ्या विश्वाचं प्रतिरूपच असतो जणू. विश्वाच्या अनंत अंधाऱ्या पोकळीत आपली चमचमणारी आकाशगंगा असावी अन त्यात ग्रहगोल तारे फिरत राहावेत, तसे त्या उजेडाच्या पट्टयात धूलिकण तरंगत असतात.

 तो पाहताना काही वेगळीच जाणीव माझ्या मनात उमलत जाते. अनंत विश्वाच्या पसाऱ्यात मानवाचं भंगुर अस्तित्व एखाद्या तरंगत असलेल्या धूलिकणाइतकंच. पण तो धूलिकणही त्या रचनेचा एक भागच!

विश्वाच्या रचनेतली सारी पंचतत्त्वं त्या कणातही आहेत.

सृष्टी अन सूर्य दोघे मिळून नव्या दिवसाला असं हळुवारपणे जागं करतात. ते पाहताना मी स्वत:ला विसरून गेलेला असतो. मीच तो किरण होऊन फुलांना, तुऱ्यांना, पात्यांना हलकेच स्पर्श करत असतो. मीच त्या दंवबिंदूतून डोकावत असतो. सगळीकडे फक्त प्रेम अन आनंद भरून राहिलेला असतो. मीही या साऱ्या सौंदर्यात मिसळून गेलो आहे, या कल्पनेने मी थरारून जातो. माझं वेगळं अस्तित्व मला जाणवेनासं होतं. ही जाणीव अशरीर असते. बुध्दीलाही न कळणारी, अबोध, अगम्य असते. ती शब्दात मांडता येत नाही. चित्रांत रेखता येत नाही. कुणाला  दाखवता वा सांगताही येत नाही. कारण ती वेगळेपणाने अनुभवायची गोष्टच नाही.

त्या क्षणांतला तो भरून ओसंडणारा आनंद, ते दिवसाबरोबर उमलत असणारं प्रेम, ती पसरलेली किरणांची माया या साऱ्यात मी विरघळून जातो. विलय पावतो. ही तदात्मता अनुभवताना मी हरवून जातो. माझं मीपण उरतच नाही....

ते लडिवाळ किरण मलाही हळुवार आलिंगन देतात, तेव्हा कोण कुणाला भेटतंय तेही भान उरत नाही. त्या अलवार अवर्णनीय अनुभूतीने माझं सर्वांग पुलकित होतं. प्रेमाच्या या पहिल्या स्पर्शातला रोमांच मी विश्वाकार होऊन अनुभवतो!

9890928411