सगुण 'श्री' साकारताना

 विवेक मराठी  08-Sep-2018

गणेशमूर्ती तयार करणं ही कला आहे. या कलेतून मूर्ती साकार करताना मूर्तिकाराला आत्मिक आनंद होत असतो. गणेशमूर्ती साकारणं ही निव्वळ तांत्रिक प्रक्रिया न राहता त्यात कलाकाराच्या भावभावना गुंतलेल्या असतात. कमर्शिअल आर्टिस्ट असलेले आणि गेल्या 45 वर्षांपासून अधिक काळ 'श्री'ची मूर्ती घडवणारे मूर्तिकार अविनाश लेले यांनी कलाकाराच्या या भावनांना शब्दरूप दिलं आहे.

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

पहाटेचे पावणेचार वाजले होते. मी कारखान्यात नेहमीसारखाच लवकर येऊन कामाला बसलो होतो. रात्री उशिरापर्यंत कामं करून कारखान्यात काम करणारी मुलं जागा मिळेल तिकडे पथाऱ्या पसरून आडवी झाली होती. मी आपल्या जागी कामाला येऊन बसलो. मुलांनी झोपायच्या आधी फिरकीवर गणपतीच्या मूर्ती ठेवल्या होत्या आणि माझ्या कामाची सोय करून ठेवली होती.

प्रत्येक शांततेला आपापलं अंग असतं. पहाटेच्या निरव शांततेला मांगल्याचं अंगं आहे आणि गेल्या अनेक वर्षांत ते माझ्या परिचयाचं झालं आहे. दोन्ही बाजूला दिवे, बाजूला ठरावीक रंगांच्या बाटल्या, वॉटर कलरच्या टयूब्ज, आखणीसाठीचे ब्रशेस आणि फिरकीवर गणपतीच्या मूर्ती ह्या चित्राने अनेक वर्षांचे आषाढ-श्रावण बघितले आहेत. क्वचित प्रसंगी रिपरिप पडणाऱ्या पावसाच्या थंडाव्याबरोबर केवडयाचा सुगंधही कारखान्यात फिरून गेला आहे. आजही अंगावर शहारा आणणारी ती दिव्य अनुभूती श्री गजाननाची होती, ह्यात शंका नाही.

फिरकीवर माझ्यासमोर असलेली गजाननाची मूर्ती यंदा शंभराव्या वर्षात पदार्पण करणार आहे. गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षं गणपतीबाप्पा ही मूर्ती माझ्या हातून घडवून घेतोय. ही आणि अशा अनेक मूर्ती बाप्पाने घडवून घेतल्या आहेत. 'घडवून घेणं' हेच म्हणणं सयुक्तिक ठरेल. कारण माझ्या कामात कर्ता मी असलो, तरी करविता श्रीगणेश आहे ह्याची खात्री आहे. इतकी वर्षं लोकांनी मला दिलेली संधी ही त्यांची देवावरची अखंड श्रध्दा आणि मूर्तिकार म्हणून माझ्यावर दाखवलेला विश्वास ह्याचं प्रतीक असल्याचं मला वाटत आलं आहे.

आपण साकार करतोय ते परमेश्वराच्या अव्यक्त शक्तीचं सगुण रूप आहे, त्या शक्तीचं ते मानवी आकलनासाठीचं रूपांतरण आहे, हा इतका आध्यात्मिक विचार माझ्या मनात गणपती करताना कधी नसतो. समोर आलेली मूर्ती भक्तवत्सल दिसेल, सामान्यांना भावेल, त्यांना आशादायक वाटेल अशी आश्वासकता देवाच्या डोळयांमधून उतरेल अशा प्रकारे ते रंगवणं हेच माझं त्या त्या क्षणीचं काम असतं.

एका मातीच्या गोळयाचा ईश्वर स्वरूपात रूपांतर व्हायच्या प्रवासाचा मी एक साक्षीदार असतो. लाकडाच्या छोटया-मोठया कोरण्या, रंग, ब्रशेस हे केवळ त्या प्रवासातली साधनं नाहीयेत, तर हे सगळे प्रवासातले सोबती असतात. हातातली कला ह्या सगळयांना घेऊन चालत असली, तरी त्यांना मार्ग दाखवायला आणि योग्य ठिकाणी आणून सोडायला श्रध्दा असावी लागते. ती श्रध्दा असली की बाप्पा प्रेमाने मार्ग दाखवतो. मग हवं ते स्वरूप आपसूक आकारायला लागतं. बालगणेशाच्या रूपात खटयाळ हास्य दाखवता येतं, कृष्णरूपातलं प्रेम व्यक्त करता येतं, प्रचंड रूपातून आश्वस्त करता येतं किंवा दागिन्यांनी नटलेलं वैभवही दाखवता येतं. गंडस्थळमदमस्तक असो, इवले इवले डोळे सुपासारखे कान असो वा विशाल उदर, गणरायावर विश्वास ठेवला की हवं ते रूप बरहुकूम साकारता येतं. त्यासाठी श्रध्दा हवी.

भगवंताच्या कृपाप्रसादामुळे मनुष्यात कला प्रसवत असते. श्रीगणेशाच्या सगुण साकार रूपाने परमात्मा सामान्यांवर कृपा करत असतो. अशा परमेश्वराची मूर्ती साकारून इतरांनाही त्या कृपेचे लाभार्थी बनवण्याच्या प्रक्रियेत आपण एक माध्यम असणं, ह्यासारखा दुसरा आनंद नाही.

समोरच्या फिरकीवरचा गणपती आणि मी - आमच्या दोघांमध्ये अनेकदा शांततेच्या क्षणी तिसरा कुणीही नसतो. श्रीगणेशमूर्ती घडवणं, रंगवणं ह्यातला ह्यात भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग कायम एकत्र चालतात, अशी माझी धारणा आहे. कामाच्या मौसमात चहूबाजूंना आणि डोक्यात कायमच गणपती ह्या एकाच विषयामुळे नकळत होत असलेली भक्ती आणि दुसरीकडे कर्मापासून न होणारी फारकत हा मला एक अनोखा संगम वाटतो. 

पूजन झाल्यावर ज्या मूर्तीच्या जवळही सामान्य मनुष्य जात नाही, ती मूर्ती माझ्या अगदी काही इंचावर असते. अखेरचा हात फिरवायला, मूर्तीचे डोळे रंगवून त्यात भाव ओतायला मी त्या मूर्तीच्या समक्ष असतो. गेली अनेक वर्षं हे सान्निध्य लाभलं आहे. त्यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. हा सहवास म्हणजे प्रचंड ऊर्जा आणि सकारात्मकता ह्यांचा स्रोत आहे. कामाच्या वेळी आलेल्या अडचणींवर मात करत पुढे जायचं धारिष्टय ह्या सहवासात असतं. आणि सगळयात महत्त्वाचं म्हणजे अपार आनंद आणि समाधान ह्या सान्निध्यात असतं. गणपतीची कामं चालू झाली की, सर्व कारखान्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य पसरतं. शेवटच्या दीड-दोन महिन्यांमध्ये ते अगदी टिपेला असतं. मात्र सगळे बाप्पा आपल्या घरी गेले की हा चैतन्याचा स्रोत अचानक लुप्त होऊन गेल्याचा अनुभव अनेकांना येतो. श्रीगजानन आपापल्या भक्ताच्या घरी जाताना ते सोबत घेऊनच जात असावा.

मातीला एकदा बाप्पाचा आकार आला की आमच्यासाठीही तो केवळ एक 'मातीचा गोळा' राहत नाही. त्या क्षणापासून तो 'गणपती' झालेला असतो. आणि म्हणूनच आमच्या कारखान्यात 'मूर्ती' हा शब्द वर्ज्य आहे. 'गणपती' हा शब्द वापरायचा अलिखित नियमच कारखान्यात बनून गेला आहे.

पार्थिव श्रीगणेशाची स्थापना व्हायला लागल्यावर तात्पुरत्या काळासाठी स्थापन होणाऱ्या मूर्तींमध्ये कल्पकता यायला सुरुवात झाली. गेल्या तीस-चाळीस वर्षांत वैविध्य मांडायला कलाकारांना अधिक वाव मिळाला. इतर आराध्यांच्या स्वरूपात गणपती मांडला जाऊ  लागला. कल्पनेत जो विचार होता, तो प्रत्यक्षात आणायची कलाकारांना संधी मिळाली. गणेश मूर्तिकला ही एक वेगळी शाखा विकसित झाली.

मात्र कलेच्या स्वातंत्र्यात सामान्यांच्या भावनांचं भान ठेवायचा विचार कलाकारांना ह्या वेळी गणपतीने दिला. मूर्ती करताना कलेच्या चौकटीत राहून पावित्र्य राखायचा विचारही कलाकारांना गणपतीने दिला.

एक मूर्तिकार म्हणून गणपतीबाप्पाने मला अलिप्तता शिकवली आहे. वर्षभर मेहनत करून, शेवटचे काही महिने रात्रंदिवस काम करून घडवलेली मूर्ती त्या त्या भक्ताच्या हातात देताना दीर्घकाळाची भावनिक गुंतवणूक सोडवावी लागते. काही काळातच त्या मातीच्या मूर्तीचं रूपांतर प्राणप्रतिष्ठा केलेल्या दैवतात होणार असतं आणि मी त्या क्षणाचा एक दूरस्थ साक्षीदार असतो.

श्रीगणेशमूर्तींचा व्यवसाय हा एक आर्थिक व्यवहार कधी असू शकत नाही. त्यात कोरडी देवाणघेवाण नसते. भक्तांच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात. प्रत्येक भक्ताच्या मनात एका देवाची एक प्रतिमा असते, माझ्यासारखे मूर्तिकार हे तिला मूर्त स्वरूप द्यायचं माध्यम असतात आणि प्रत्येकाच्या प्रतिमेला न्याय द्यायची जबाबदारी सांभाळावी लागते. कर्ताकरविता बाप्पा असला, तरी माध्यमाला चुकण्याची मुभा नसते. तो चोखच असावा, अशी अपेक्षा असते.

गणेशमूर्ती रंगवून पूर्ण तयार होईस्तोवर आणि साचे वापरून मूर्ती गिऱ्हाइकाकडे सुपुर्द करेस्तोवर काही वेळा गणपती प्रत्यक्ष अनुभूती देतो, तर काही वेळा विविध पंथाचे, वेगवेगळया पार्श्वभूमीतून आलेले त्याचे चाहते विलक्षण चांगला अनुभव देऊन जातात.

त्यातलंच एखादं हौशी कुटुंब असतं. गणपतीबाप्पावर प्रेम करणारं. 3-4 फुटी मूर्ती घरात बसवणारे असतात. घरातले सर्व आवर्जून नटूनथटून गणपती आणायला येणारे. घरातल्या स्त्रिया सोन्याने मढून गणपती घ्यायला येणाऱ्या. म्हातारी बाप्पाची पूजा करणारी. ''देवा, तूच मला सर्व दिलंस! देवा, सुखी ठेव रे बाबा! माझी नौका वाचव!'' एका वाक्यात पाच पन्नास वेळा 'देवा, देवा' म्हणत देवाला आळवणारी असते. गणपतीच्या पुढयात बसल्यावर टचकन सहजगत्या डोळयातून आसवं गाळते.

दुसरं एखादं कुटुंब उत्साही असतं. बाप्पाची मूर्ती निवडताना चोखंदळ असतं. हिऱ्याच्या व्यापारातला पैसा केवळ बाप्पाच्या कृपेने येतोय, ह्याची त्यांना जाण असते. घरात 6-7 फुटी सजावट करतात. मूर्ती सजवण्यासाठी भरपूर वेळ घालवतात. बाप्पावर अगाध श्रध्दा असते.

एखादं साधारण कुटुंब असतं. दीडच दिवसाचा गणपती, पण त्यातही उत्सव साजरा करतात. हवी तशी मूर्ती मिळण्यासाठी आणि रंगवून घेण्यासाठी अनेक खेटा घालतात. मांडव घालून, सजावट करून उत्साहाने बाप्पाला घेऊन जातात. 

एखादं सनातनी कुटुंब असतं. सोवळंओवळं पाळणारं. ह्यांचा गणपती नवसाला पावणारा. दीड दिवसात ह्यांच्या घरी किती माणसं दर्शनाला येतात आणि किती जेवून जातात, ह्याचा हिशोबच नसतो. शंख वाजवून पारंपरिक पध्दतीने गणपती घरी नेतात. घरी दर्शनाला गेल्यावर अगत्याने स्वागत करणारं.

एखादा मोठा परिवार असतो. मूर्ती रंगीत संगीतच असायला हवी ह्याचा हट्ट करतात. शक्य तेवढा भडक बाप्पा त्यांना आवडतो. ''आजी, मूर्ती मोठी आहे, वजन होईल, कशी नेणार?'' ह्या प्रश्नावर ''देवाचा भार आपण काय घेणार! देवच स्वत: घरी येणार! नेऊ डोक्यावर!'' असं म्हणून अडीच-तीन फुटी मूर्ती सरळ डोक्यावर 4-5 किलोमीटर सहज चालत नेतात.

ही आणि अशी अनेक कुटुंबं बाप्पाच्या भक्ताच्या रूपात येतात. गणपतीबाप्पावर प्रचंड श्रध्दा असणारी! बाप्पावर जिवापाड प्रेम करणारी!

हे सर्व जण बाप्पा घरी येणार हे सौभाग्य समजतात. बाप्पासाठी उत्साहात उत्सव साजरा करतात. 2-4 महिने आधीच बाप्पाच्या आगमनाचे वेध लावून घेतात आणि त्याच्या स्वागताची जय्यत तयारी करून बाप्पाला प्रेमाने व्हीव्हीआयपी ट्रीटमेण्ट देतात. जातिपंथाच्या चौकटीत लोक वेगवेगळया उपासनापध्दती जोपासतात. श्रध्देचा एक धागा मात्र सर्वत्र समान असतो.

आणि ह्याच सर्वांसाठी प्रेमाने गणपतीबाप्पा तयार करणारे, आनंदाने रंगवणारे अनेक गणपती कारखान्यातले माझ्यासारखे कितीतरी मूर्तिकार, कलाकार! हातातली कला ही बाप्पाचीच कृपा ह्या श्रध्देवर मी ठाम असतो. जे जे छान रंगलेलं आहे त्याचा कर्ताकरविता बाप्पाच आहे, ह्याची खात्री असते. दिवसरात्र मेहनत करून जो बाप्पा घडवायचा, तो त्याच्या घरी जाणार ह्या विचाराने गलबलून येतं, तरीही तटस्थपणे बाप्पाला त्याच्या भक्ताच्या हातात देत असतो. सगळे बाप्पा आपापल्या घरी गेल्यावर कारखान्यांमध्ये आणि मनामध्ये येणारं रितेपण दरसाली झेलत असतो. अशाच अनेक कलाकारांपैकी मीही एक! दर वर्षी दोन्ही बाजूंचा साक्षीदार असणारा. गणपतीबाप्पा जाताना आणि येताना एकच गजर उत्साहाने करणारा!

मंऽऽऽऽगलमूर्ती !!! मोऽऽऽरया!!!!

शब्दांकन - सारंग लेले

 

अविनाश लेले

9323413962