सामाजिक कार्यकर्त्यांना गौरविण्याचे नातू फाउंडेशनचे व्रत

 विवेक मराठी  01-Jan-2019

पुण्यातील नातू फाउंडेशनतर्फे, ग्रामीण भागात ध्येयवादी वृत्तीने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गेली अठ्ठावीस वर्षे आदरपूर्वक गौरव करण्यात येत आहे. या निमित्ताने फाउंडेशनच्या  कार्याचा हा सविस्तर परिचय.

मीण भागात ध्येयवादी वृत्तीने सातत्यपूर्ण रितीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, नातू फाउंडेशनतर्फे दर वर्षी गौरव करण्यात येत असतो. या फाउंडेशनच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या महादेव बळवंत उर्फ भाऊसाहेब नातू यांना पुणे जिल्ह्यातील काही गावे ब्रिटिश आमदनीत इनाम म्हणून मिळाली होती. या गावांचा शेतसारा वसूल करण्याचे अधिकार नातू कुटुंबाकडे होते. ज्या इनाम गावांचा वसूल आपण घेतो, त्या गावांमध्ये आपण विशेषत्वाने काही केले पाहिजे असे त्यांना मनापासून वाटत होते. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात या गावांसाठी ग्रामीण विकासाचे काही उपक्रम राबविले. आपल्याला परंपरेने अथवा वारसा हक्काने संपत्ती प्राप्त झाली आहे, त्यामुळे वंचित समाजासाठी व देशासाठी तिचा विनियोग झाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पश्चात ग्रामविकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना मदत करण्यासाठी त्यांनी नातू फाउंडेशनची स्थापना करून इच्छापत्राद्वारे सर्व संपत्ती फाउंडेशनला दान केली. या त्यांच्या कृतीस त्यांच्या पत्नीची - म्हणजे कमलताई उर्फ सुलोचनाताईंची पूर्ण संमती होतीच. अशा प्रकारची मनोधारणा असणाऱ्या व्यक्ती समाजात अपवादानेच आढळतात.

कमलताई नातू यांचे महत्त्वाचे योगदान

कमलताई नातू या पुण्यातील अहिल्यादेवी हायस्कूलच्या शिस्तप्रिय मुख्याध्यापिका म्हणून त्या काळी ओळखल्या जात असत. 1987मध्ये महादेव बळवंत उर्फ भाऊसाहेब नातू यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात कमलताईंनी नातू फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त या नात्याने भाऊसाहेब नातू यांच्या स्मृतिदिनी, म्हणजे 9 जानेवारीला, ग्रामीण विकासात सातत्यपूर्ण काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समारंभपूर्वक जाहीरपणे सत्कार करण्यास सुरुवात केली. सामाजिक कार्यास नुसत्या देणग्या न देता आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे ध्येयवादी वृत्तीने समाजासाठी निरलसपणे वेचणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, त्याचा त्याग व काम समाजापुढे यावे ही त्यामागची भावना होती. भाऊसाहेब यांच्या इच्छेस खरे मूर्त स्वरूप दिले ते कमलताई यांनीच! भाऊसाहेबांप्रमाणेच कमलताई यांनीसुध्दा 'सुलोचना नातू ट्रस्ट' स्थापन करून आपल्या हयातीतच आपली स्वकष्टार्जित संपत्ती त्यानावे करून टाकली. स्वत:च्या मालकीचे राहते घर त्यांनी भारतीय विद्या भवनला देऊन टाकले. 2001मध्ये कमलताई नातू यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात कमलताईंचे निकटचे सहकारी ब्रिगेडियर प्रताप जोशी यांनी धुरा सांभाळली. 2008मध्ये ब्रिगेडियर जोशी यांचे निधन झाल्यानंतर अन्य विश्वस्त दत्ता टोळ व चंद्रशेखर यार्दी यांच्याकडे फाउंडेशनची जबाबदारी आली आहे.

1991पासून दर वर्षी नातू फाउंडेशनतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांना नातू पुरस्कार व विविध सामाजिक संस्थांना सातत्याने देणग्या देण्यात येत आहेत. यंदाचे हे एकोणतिसावे वर्ष आहे, हे विशेष नमूद करण्यासारखे आहे! गेली 28 वर्षे न चुकता दर वर्षी 9 जानेवारीला पुण्यात हा जाहीर कार्यक्रम होत आलेला आहे. आत्तापर्यंत एकूण सुमारे सव्वादोन कोटीहून अधिक रकमेच्या देणग्या प्रामुख्याने ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना देण्यात आलेल्या आहेत. पुरस्कार अथवा देणगी देण्यात येणाऱ्या ग्रामीण भागातील सामाजिक संस्थांचे काम विश्वस्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन बघण्यावर भर देण्यात येतो.

पुरस्कारप्राप्त मंडळींमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात काम करणारी कार्यकर्ते मंडळी असली, तरी महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत सातत्यपूर्ण काम करणारे डॉ. राम गोडबोले, अतुल जोग, रवी सावदेकर या प्रमुख कार्यकर्त्यांनाही नातू पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. आज समाजात सुपरिचित असणाऱ्या डॉ. विकास आमटे, डॉ. अभय बंग यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना नातू फाउंडेशनतर्फे दोन दशकांपूर्वीच पुरस्कार देण्यात आलेले आहेत. पुरस्कार प्रदान कार्यक्रमासाठी यापूर्वी सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहिलेली आहेत. यात नानाजी देशमुख, बिंदुमाधव जोशी, बाबासाहेब पुरंदरे, मेधा पाटकर, भाई वैद्य, सिंधुताई सपकाळ, प्रकाश जावडेकर,
डॉ. माधवराव चितळे, डॉ. गिरीशराव बापट, डॉ. हिम्मतराव बावस्कर यासह अनेकांचा समवेश आहे.

पुरस्कारांचे यंदाचे स्वरूप

 ग्रामीण भागासाठी ध्येयवादी वृत्तीने बारा वर्षांहून अधिक काळ शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासविषयक कार्य करणाऱ्या व्यक्तीस 'महादेव बळवंत नातू पुरस्कार' देण्यात येतो. रोख 1 लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील नर्मदाकिनारी वसलेल्या कसरावद तालुक्यात शैक्षणिक सेवा कार्य करणाऱ्या भारतीताई ठाकूर यांना यंदाच्या वर्षी 'महादेव बळवंत नातू पुरस्कार' देण्यात येणार आहे. नर्मदालय संस्थेच्या माध्यमातून एक तपाहून अधिक काळ तेथे प्रत्यक्ष राहून त्यांचे हे सेवा कार्य चालू आहे.

 याशिवाय एका उच्चशिक्षित व पाच वर्षांहून अधिक काळ सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यास 'सेवाव्रती  पुरस्कार' देण्यात येतो. रोख 25 हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पालघर या महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यात पाच वर्षे राहून शैक्षणिक कार्य करणाऱ्या दीपाली गोगटे या तरुण कार्यकर्तीला यंदाचा 'सेवाव्रती पुरस्कार' देण्यात येणार आहे.

मराठवाडयात ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक सेवा कार्य करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षणव्रती डॉ. स्वर्णलता भिशीकर यांच्या हस्ते येत्या 9 जानेवारी रोजी पुण्यात या पुरस्कारांचे वितरण होत आहे.

सध्या श्रध्देने नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांमधील महाराष्ट्रीय लोकांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात मोठे आहे. अशांपैकी काही जणांनी तरी परिक्रमेच्या निमित्ताने भारतीताई ठाकूर यांच्या कामाला प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे. दीपाली गोगटे यांचे काम तर  महाराष्ट्रातच आहे, त्यामुळे प्रत्यक्ष भेट देण्याच्या दृष्टीने जास्त सोयीचे आहे. पर्यटनासाठी देश-विदेश पालथे घालणाऱ्या मराठी माणसाने या सामाजिक उपक्रमांना भेटी देण्याचे मनावर
घेण्याचेच तेवढे बाकी आहे!

 नर्मदाकिनारीच्या वंचित व मागास मुलांच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या भारतीताई ठाकूर

 नर्मदाकिनारी असलेली शिक्षणाची दारुण परिस्थिती लक्षात घेऊन भारतीताई ठाकूर यांनी 14 मुलांपासून सुरू केलेले शैक्षणिक काम आता सुमारे 1700हून अधिक वंचित व मागास मुलांपर्यंत पोहोचले आहे. 'नर्मदालय' या संस्थेची स्थापना करून त्याद्वारे सध्या मध्य प्रदेशमधील खरगोन जिल्ह्यात हे मोठे शैक्षणिक कार्य चालू आहे.

भारतीताई ठाकूर यांनी 2005मध्ये आपल्या दोन मैत्रिणींसह 3200 किलोमीटर लांबीची नर्मदा परिक्रमा पायी 152 दिवसांत पूर्ण केली. परिक्रमेदरम्यान त्यांच्या लक्षात आले की नर्मदाकिनारी असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. शाळा आहेत, पण मुले शाळेत आठवडा-आठवडा गैरहजर असतात, कारण मुलांना शाळेची गोडी नाही. शिक्षक तर आळीपाळीने गायब असतात ते वेगळेच. शाळेत जाणाऱ्या 70-80 टक्के मुलांना लिहिता-वाचताही येत नाही, इतकेच काय, स्वत:चे साधे नावसुध्दा लिहिता येत नाही. परिक्रमेदरम्यान तेव्हाच भारतीताईंचा मनोमन निर्णय झाला की शिक्षणाच्या कामासाठी पुन्हा या भागात परत यायचे. त्यानुसार नाशिकमधील शासनाच्या तोफखाना प्रशिक्षण केंद्रातील वीस वर्षांच्या नोकरीनंतर त्या स्वेच्छानिवृत्ती घेऊन शैक्षणिक काम चालू करण्याचे स्वप्न घेऊन नर्मदाकिनारी दाखल झाल्या.

लेपा गावात 2009पासून एका धर्मशाळेत अनौपचारिक शाळेच्या कामास सुरुवात झाली. त्यापाठोपाठ भट्टण बुजुर्ग व छोटी खरगोन या गावांतही कामास सुरुवात झाली. आज या तिन्ही गावांत औपचारिक शिक्षण देणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळा असून त्यात एकूण 350 विद्यार्थी आहेत. याशिवाय नर्मदाकिनारी असलेल्या परिसरात 15 गावांत अनौपचारिक शिक्षण केंद्रे चालविली जातात. ती 'नर्मदालय' नावाने ओळखली जातात. यातून सुमारे 1700 मुले दररोज तीन तास सहभागी होत असतात. येथील शंकर केवट या विद्यार्थी-कार्यकर्त्याने पोर्टेबल सोलर ड्रायर बनविला असून डॉ. अनिल काकोडकर यांनी आपल्या प्रत्यक्ष भेटीत त्याचे विशेष कौतुक केले होते.

येथे 'नचिकेता' हे वसतिगृह चालविण्यात येत असून त्यात नर्मदा धरणाजवळील अलीराजपूर जिल्ह्यातील अत्यंत मागास अशा भिल्ल समाजातील 34 आदिवासी मुलांचा निवास आहे. ही मुले तेथील शूलपाणी भागातली 'भिलाला' या भटक्या जमातीमधील आहेत. येथील स्थानिक महिलांसाठी 'निवेदिता शिवण केंद्र' नर्मदालयातर्फे सुरू करण्यात आले आहे. त्यात मध्य प्रदेशातील पारंपरिक दोहडची निर्मिती करण्यात येते. दोहड रात्री अंगावर पांघरण्यासाठी वापरतात. गेल्या वर्षीची या केंद्राची विक्री सुमारे 14 लाख रुपये इतकी होती.

आपल्या निवृत्तीनंतरच्या पेन्शनमधून नर्मदालयाचा सुरुवातीचा खर्च भारतीताई स्वत:च करत असत. आज या कामाचा पसारा वाढत जाऊन त्याचा गाडा सुरळीत चालण्यासाठी भारतीताई ठाकूर देणग्यांतून वर्षाला 60 लाख रुपयांचा निधी गोळा करत असतात.

 -----------------------------------------------------------

आदिवासी पाडयात अनौपचारिक शिक्षणाचे उपक्रम राबविणाऱ्या दीपाली गोगटे

 दीपाली गोगटे यांनी जव्हारमध्ये प्रत्यक्ष पाच वर्षे राहून, पालघर जिल्ह्यातील जव्हार व विक्रमगड तालुक्यात आदिवासी मुलांसाठी अनौपचारिक शिक्षणाचे प्रयोग केले आहेत. आदिवासी मुले औपचारिक शिक्षणात कोमेजतात, तर निसर्गाच्या सान्निध्यात फुलतात हे लक्षात घेऊन त्यांनी आदिवासी मुलांसाठी 'धडपड प्रयोगशाळा' व 'विना बुका, या शिका' यासारखे अभिनव उपक्रम राबविले.

संस्कृतमध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेल्या दीपाली गोगटे यांनी पत्रकारितेची शिक्षण घेतले असून प्रत्यक्ष मात्र त्या समाजाचे प्रश्न मांडण्यापेक्षा स्वत: सोडविण्यात पुढाकार घेण्यात अधिक रमल्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मराठवाडयातील लातूर जिल्ह्यातील अनसरवाडा येथे कसरतीचे खेळ करून अथवा भिक्षा मागून पोट भरणाऱ्या गोपाळ समाजासाठी काही काळ काम केले. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात किशोरी मुलींसाठी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून वर्षभर काम केले. 

जव्हार येथील आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या मिलिंद थत्ते यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या आदिवासी पाडयांवर वयम् संस्थेच्या माध्यमातून काम करू लागल्या. आदिवासींसाठी नाही, तर त्यांच्यासह सहभागातून काम करणे या प्रमुख भूमिकेतून त्यांच्या विविध उपक्रमांची रचना करण्यात आलेली आहे. ग्रामसभा सक्षमीकरण ही या उपक्रमांची मध्यवर्ती संकल्पना असून यासाठी आदिवासी युवकांचे प्रशिक्षण-प्रबोधन याचा प्रभावी वापर करण्यात येतो. नेतृत्व विकास हा वयम्च्या कामाचा गाभा आहे. गावाच्या विकासात पुढाकार घेणारे  तरुण-तरुणी त्यात स्वखर्चाने सहभागी होत असतात, हे विशेष नमूद करण्यासारखे आहे. यात पेसा कायदा प्रशिक्षण, रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीच्या उपाययोजना व ग्रामसभा सक्षमीकरण आदी विषय हाताळले जातात. नाशिक येथे राहून आजही आठवडयातील ठरावीक दिवस त्या या कामासाठी जव्हार येथे नियमित जात असतात.

विवेक गिरीधारी

9422231967