त्वं मे सहव्रता भव

 विवेक मराठी  10-Jan-2019

   

'त्वं मे सहव्रता भव' ही परस्परांविषयीची सार्थ अपेक्षा सुमेध-दीपाली या दोघांनी विवाह संस्कारापासूनच आचरणात आणायला सुरुवात केली आहे. स्वयंपौरोहित्याचा निर्णय एकमताने घेतल्यावर, विवाहविधींची कालसुसंगत निवड करणे, विवाहविधीची कसून पूर्वतयारी करणे आणि प्रत्यक्ष विधीच्या वेळी अतिशय एकाग्रतेने मंत्रपठण करणे यात त्यांनी एकमेकांना मन:पूर्वक साथ दिली. हा सोहळा त्यांच्या सहव्रताची मंगलमय नांदी होती, असे म्हणता येईल. सर्व उपस्थितांनी घेतलेला सहभाग आणि त्या वेळी असलेली अर्थगर्भ शांतता हे या आगळया सोहळयाचे साक्षी आहेत.

सप्तपदी हातात हात घालून चालताना मनातली प्रेमाची भावना प्रदीर्घ काळासाठी पक्की होत जाणे प्रत्यक्ष म्हणजे अगदी खरोखरीच अनुभवता येणे किती आनंददायक आहे. नुकताच डोंबिवली येथे झालेला सुमेध आणि दीपाली यांचा विवाह संस्कार त्या दोघांना 'अनुभवता' आला; त्यांचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि स्नेही-परिचित सगळयांनीच एका आगळयावेगळया लग्नाचा संस्कारविधी अनुभवला.

प्री वेडिंग शूट, मग डेस्टिनेशन वेडिंग, मग 'निवडक / मोजक्या' मंडळींसाठी 'रिसेप्शन', मग सोशल मीडियावर या सगळया प्रवासाचे 'अपडेट्स'... लाइक, कमेंट, शेअर! अशी 'मळलेली' वाट सोडून सुमेध आणि दीपाली दोघांनी ठरविले की बघू तरी आपली संस्कृती, संस्कार वगैरे खरेच कालसुसंगत (अप टु डेट) आहे की नाही ते! जे कालसुसंगत नाही ते नको करायला, पण काही शतके हा जो विवाहविधी होतो आहे, त्याचा आजच्या काळातला अर्थ समजून घेऊ.

पुरोगामी विचार करणारी आम्ही तरुण मंडळी स्वतंत्र विचारांची, प्रत्यक्ष कृती करण्याची धमक असलेली अशी आहोत, हे या दोघांनी सिध्द केले. आपल्याकडचा (हिंदुस्थानातला) सनातनी म्हणजे नित्य नूतन असलेला विचार समजून घेतला पाहिजे, हे या दोघांनी पक्के ठरविले. सुमेध माझा जवळचा मित्र! दीपाली आणि सुमेधचे 'जमल्याचे' सुमेधने काही महिन्यांपूर्वी मला गप्पा मारताना सांगितले. बोलता बोलता म्हणाला की ''मी तुला विचारत नाहीये, तर सांगतोय की आमचे लग्न तू लावायचे!'' आंतरजातीय विवाह लावायला भटजी मिळाला नाही, तर 'अडल्यानडल्यांचा गुरुजी' अशी माझी ख्याती होती. पण सुमेधच्या बाबतीत तो प्रश्नच नव्हता! ज्ञान प्रबोधिनीने ज्या प्रकारे संस्कार विधींची रचना केली आहे, ती आजवर अनेकांना उपयुक्त आणि अर्थपूर्ण वाटलेली आहे. सुमेधच्या मनात अशीच पध्दत वापरावी, असे मला वाटले.

 पुन्हा काही महिन्यांनी आपण 'स्वयंपौरोहित्य' करतोय असे सुमेधने मला कळविले. तिथून पुढे आम्ही तिघेही - म्हणजे ज्या दोघांचे लग्न होते ते सुमेध-दीपाली आणि लग्न लावणारा मी कामाला लागलो. असा लग्नात स्वयंपौरोहित्य केलेला कोणी आहे का हे अनेकांना विचारले, पण हा 'प्रयोग' केल्याचे फारसे आढळले नाही. मग आम्ही ज्ञान प्रबोधिनीच्या संस्कार विभागाचे प्रमुख मा. विसुभाऊ गुर्जर यांच्याकडे गेलो. एकुणातच संस्कार विधींचे अंतरंग, आजच्या काळातला या विधींचा संदर्भ या विषयांवरच्या चर्चा झाल्या. आमच्या अभ्यासासाठी काही पुस्तके, काही लेख असे साहित्य प्रबोधिनीत उपलब्ध झाले. ज्ञान प्रबोधिनीच्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी या प्रयोगाला पाठिंबा दिला, शुभेच्छा दिल्या! आम्हा तरुण मुलांना धार्मिक विधींबाबत मुक्त चिंतन करण्यासाठीची दिशा प्रबोधिनीतल्या मंडळींनी दिली.


दीपाली-सुमेधचा संगीत विषयाचाही अभ्यास, आवाजही गोड, त्यामुळे दोघांनी मिळून विवाह संस्काराच्या मंत्रांना 'अर्थपूर्ण' चाली लावायचे ठरविले. एकेका मंत्राचा अर्थ लक्षात घेत कोणत्या रागात कोणता मंत्र म्हणायचा यावर चर्चा-गप्पा, मग प्रत्यक्ष सराव असे सगळे सुरू झाले. हे दोघे स्वयंपौरोहित्य करणार म्हटल्यावर माझे काय काम, असे मला वाटून गेले. पण या प्रयोगामागची भूमिका उपस्थितांना सांगणे, मंत्रांचा अर्थ मांडणे, विधींचे उपचार का आहेत हे उपस्थितांना सांगणे यासाठी मी 'सूत्रधार' म्हणून काम करायचे, असे ठरले.

जे उपचार कालसुसंगत नाहीत, ते काढून काही नवी भर घालता येईल का? हा या दोघांनी केलेला विचार मला विशेष वाटला. गृहस्थाश्रमात प्रवेश करताना ब्रह्मचर्याश्रमात केलेल्या संकल्पांची उजळणी यानिमित्ताने करावी, असे या दोघांनी ठरविले. त्यामुळे विवाहविधीत 'संकल्प स्मरण' असा एक विधी नव्याने घेतला. प्रबोधिनीच्या विद्याव्रत संस्कार पोथीमधील काही श्लोक त्यासाठी निवडले. आयुष्याचा पाया पक्का व्हावा म्हणून केलेल्या सहा संकल्पांना यानिमित्ताने उजाळा देण्यात आला. युक्त आहार-विहार, इंद्रियसंयमन, दैनंदिन उपासना, स्वाध्याय प्रवचन, सद्गुरुसेवा, राष्ट्र अर्चना अशा सहा संकल्पांचे स्मरण या दोघांनी केले.

ज्ञान प्रबोधिनीच्या पोथीमध्ये काही बदल करावेत असे वाटले आणि प्रबोधिनीतून असा 'नित्य नूतन' - म्हणजे सनातन विचार करू शकणाऱ्या मंडळींना नेहमी पाठिंबा दिला जातो, त्यामुळे आशयाला धक्का न लागता करावे लागणारे बदल आम्ही सहज करू शकलो. प्रेमविवाह असल्याने कन्यादान विधीऐवजी पोथीमधील स्वयंवर विधी घेतला. दोघांच्याही कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा हा या सगळया प्रवासातील महत्त्वाचा मुद्दा होता.  ग्रामगीतेत म्हटल्याप्रमाणे

विचारे 'जीवनाच्या संग्रामी। हाचि विवाह करू आम्ही'।

म्हणती दोन्ही विवेकी प्रेमी। आड कोणी का यावे। (अ.21.34)

'दोघांच्याही या विचारपूर्वक केलेल्या निर्णयाला आपण आड यायचेच झाले, तर सावलीसारखे आडवे येऊ. बाकी हे दोघेही गुणसंपन्न आहेतच. त्यांच्या या गुणांमुळे गृहस्थाश्रम सार्थकी लागेल यात शंकाच नाही.' ही दोघांच्या आई-बाबांची भूमिका होती.

जुळता दोघांचेही विचार। विकास पावेल कारभार।

दोघांची उत्साहशक्ती अपार। कार्य करील सेवेचे॥ (अ.21.14)

उत्तम राहणे, उत्तम बोलणे। उत्तम सौंदर्य, सात्त्वि लेणे।

घरामाजी शोभून उठती तेणे। देवता जणु समविचारे ॥ (अ.21.15, ग्रामगीता)

त्या दिवशी विवाह सोहळा अनुभवणारा प्रत्येक जण सुमेध-दीपाली दोघांबाबत हाच विचार करीत असेल. दोघांनीही अर्थ लक्षात घेऊन म्हटलेले मंत्र त्या दिवशी मी अर्थ सांगायच्या आधीच अर्थ सांगून जात होते.

गृहस्थाश्रमाचे उद्दिष्ट 'ऐश्वर्य मिळविणे' म्हणजे ईश्वरी गुणसंपदा मिळविणे. हे उद्दिष्ट स्पष्ट करणारे विधी या विवाह संस्कारात योजले होते. या उद्दिष्टप्राप्तीसाठी कसे वागायचे आणि काय नियम पाळायचे हे सांगणारे विधी या वेळी योजले होते. एकमेकांना 'बरोबरीचे स्थान' देण्याचा प्रॅक्टिकल ऍप्रोच मांडणारे विधी यामध्ये होते. शेवटपर्यंत सोबत राहण्याचे, आश्वासक वातावरणनिर्मिती करणारे विधी यामध्ये होते. गृहस्थाश्रमाच्या या प्रवासात आवश्यक दैवी गुण कोणते आणि ते कसे मिळविता येतील, हे सांगणारे
मंत्र होते.

 


 

आदित्य शिंदे

9970633000