संशोधनपर लेखनाची वेगळी वाट

 विवेक मराठी  11-Jan-2019

 

 आधुनिक महाराष्ट्राच्या भल्या-बुऱ्या स्वरूपाची घडण ज्या एकोणिसाव्या शतकाच्या हातांनी झाली, ते शतक आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा अरुणा ढेरे यांच्या संशोधनपर लेखनाचा कालपट. हा काळ आणि तत्कालीन परिस्थिती यांच्या अक्षांवर त्यांनी आपले विवेचन ठेवले आहे. मुळात संशोधन ही वस्तुनिष्ठ, कार्यकारणसंवादी आणि पुराव्यांनी सिध्द होणारी घटना आहे. पण जेव्हा कविता लिहिणारा हात संशोधकीय अभ्यासाची शिस्त आणि चौकट स्वीकारतो, तेव्हा कवित्व आणि विद्वत्व यांची मिसळण गृहीत धरता येते.

ख्यातकीर्त संशोधक आणि लेखक रा.चिं. ढेरे यांच्याकडून प्रतिभा-प्रज्ञावंत संशोधनाचा वारसा घेऊन अरुणा ढेरे यांनी संशोधनपर लेखनक्षेत्रातही लक्षणीय कामगिरी केली आहे. कवयित्री म्हणून मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान असलेल्या या लेखिकेच्या संशोधनपर लेखनावरही त्यांच्या सर्जनशीलतेचा आणि काव्यात्म शैलीचा ठसा आहे.

अरुणा ढेरे यांच्या संशोधनपर लेखनाची सुरुवात 'विस्मृतिचित्रे' (1998) या ग्रंथापासून झाली. त्यानंतर त्यांचे 'प्रकाशाचे गाणे' (1999), 'डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार' (2002), 'विवेक आणि विद्रोह' (2004)', 'त्यांची झेप त्यांचे अवकाश' (2011) आणि 'प्रेमातून प्रेमाकडे' (2014) हे ग्रंथ प्रकाशित झाले.

विदग्ध व साक्षेपी

आधुनिक महाराष्ट्राच्या भल्या-बुऱ्या स्वरूपाची घडण ज्या एकोणिसाव्या शतकाच्या हातांनी झाली, ते शतक आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा अरुणा ढेरे यांच्या संशोधनपर लेखनाचा कालपट. हा काळ आणि तत्कालीन परिस्थिती यांच्या अक्षांवर त्यांनी आपले विवेचन ठेवले आहे. मुळात संशोधन ही वस्तुनिष्ठ, कार्यकारणसंवादी आणि पुराव्यांनी सिध्द होणारी घटना आहे. पण जेव्हा कविता लिहिणारा हात संशोधकीय अभ्यासाची शिस्त आणि चौकट स्वीकारतो, तेव्हा कवित्व आणि विद्वत्व यांची मिसळण गृहीत धरता येते. अरुणा ढेरे यांच्या प्रस्तुत लेखात उल्लेख केलेल्या संशोधनपर लेखनाची मांडणी व शैली ललित आहे, तर 'उर्वशी', 'मैत्रेयी', 'कृष्णकिनारा', 'महाद्वार' इत्यादी त्यांच्या ललित लेखनांत संशोधकीय दृष्टीचा आढळ होतो. अखंड जिज्ञासा आणि जिज्ञासापूर्तीसाठी केलेले प्रयत्न हा कोणत्याही संशोधनकार्याचा पाया असतो. मिळवलेल्या सामग्रीचा अर्थ लावणे, जिथे पुरावे उपलब्ध नाहीत तिथे अंदाज लावणे, विविध शक्यता तपासणे, चुकीच्या दिशेने नेणारे तर्क निग्रहाने बाजूला सारणे, प्रस्थापित संशोधन सप्रमाण खोडून काढणे, घटनांमागील संभाव्य कारणांचा शोध घेणे व तो ठामपणे मांडणे आणि मुख्य म्हणजे अनाग्रही वृत्ती राखणे संशोधनात महत्त्वाचे ठरते. ज्ञानोपासकाच्या निर्मळ कुतूहलाला अभ्यास, व्यासंग, संशोधकीय दृष्टी, चिंतन यांची जोड देत सर्जनशीलता, मानवी जीवनाविषयीचे सौहार्द आणि समन्वय साधणारी दृष्टी यांच्या बैसकेवर ढेरे यांचे हे लेखन झाले आहे.

वस्तुनिष्ठा आणि आत्मनिष्ठा यांचा मेळ घालत विदग्ध, साक्षेपी व समतोल विवेचनाचा मार्ग त्यांनी आपलासा केला आहे. आपल्या विवेचक दृष्टीला तत्कालीन राजकीय व सामाजिक मत-मतांतरांचे, भौगोलिकतेचे वा पूर्वग्रहांचे अडसर पडू न देता, अभिनिवेशविरहित लेखन करण्याची अवघड कसरत त्यांना साधली आहे. एकीकडे हाताशी असलेल्या कवितेसारख्या तरल माध्यमाची सर्जनशील शक्ती आणि दुसरीकडे संशोधकीय लेखनाची शिस्त व वस्तुनिष्ठा यांचा मेळ घातल्यामुळे हे लेखन विद्वत्तापूर्ण असूनही जड झालेले नाही. सहृदयता, समजूत आणि घटनांचा मागे-पुढे-खोल वेध घेण्याची थक्क करणारी क्षमता यांमुळे हे लेखन सर्वसामान्यांनाही वाचनीय वाटणारे आहे. रूढ संशोधनपर लेखनातली रूक्षता आणि शुष्कता मांडणीमुळे व शैलीतील लालित्यामुळे टाळली गेली आहे. गृहीतक, उद्दिष्ट, व्याप्ती, पूर्वाभ्यास, संशोधन सामग्रीची जुळवाजुळव व तिचा अन्वय लावत पायऱ्या-पायऱ्यांनी केलेली विषयाची मांडणी ही संशोधनपर लेखनाची शिस्त अंगीकारून तिला प्रातिभ आकलनाची जोड देत अशा प्रकारच्या लेखनाची वेगळी पठडी ढेरे यांनी रुळवली आहे आणि यशस्वीही केली आहे.

'विस्मृतिचित्रे'

'विस्मृतिचित्रे' (1998) या ग्रंथात विस्मृतिवश झालेल्या, प्रसिध्दीच्या झोतात फारशा न आलेल्या, पण आपले कार्यक्षेत्र आपल्या कर्तृत्वाने उजळून टाकलेल्या वा तशी क्षमता अंगी असलेल्या वीस स्त्रियांची चित्रणे आहेत. स्त्रीशिक्षणाच्या दृष्टीकोनातून केलेला हा त्या कालखंडाचा अभ्यास आहे. त्यामध्ये मेरी कार्पेंटर आणि मिस मॅनिंग यासारख्या परदेशी, पण इथल्या समाजजीवनाशी एकरूप झालेली, इथल्या स्त्रियांसाठी तळमळीने काम केलेली रेबेका सिमियनसारखी बेने इस्रायली समाजातली स्त्री आहे, तशा अकाली मृत्यू पावलेल्या, पण अल्पशा जीवितकालातही वेगळेपणाची ठिणगी चमकावून गेलेल्या आवडाबाई भिडे, काशीबाई फडके, कृष्णाबाई गरुड याही आहेत. रखमाबाई केळवकर, कृष्णाबाई केळवकर, सरलादेवी राय, काशीबाई हेरलेकर, वेणूताई नामजोशी, मनुताई बापट, गंगूबाई खेडकर इत्यादी वीस स्त्रियांची चित्रे या ग्रंथात आहेत.

कमालीच्या संघर्षातून वाट काढत, बळ मिळवत, कधी वडील व भाऊ, कधी पती, कधी सासरा अशा पुरोगामी विचारांच्या पुरुषांचा सक्रिय पाठिंबा मिळवत, तर कधी त्यांचा विरोध सोसत आपल्या कर्तृत्वाने काळाचा तुकडा उजळून टाकणाऱ्या या स्त्रियांची ही चित्रणे आहेत.

'प्रकाशाचे गाणे'

एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध या काळात प्रकाशित झालेली स्त्रियांची चरित्रे आणि आत्मचरित्रे आधारभूत मानून त्यावरून तिची-तिची कहाणी सांगणारे पंचवीस लेख 'प्रकाशाचे गाणे' (1999) या पुस्तकात समाविष्ट आहेत. जरी चरित्रे किंवा आत्मचरित्रे या लेखांचा आधार असली, तरी लेखिकेने त्या त्या स्त्रीचा आवाज, तिचे मन वाचकांपर्यंत पोहोचवायचा यत्न केला आहे.

यशोदाबाई भट, सुंदराबाई पवार, सत्यभामाबाई सुखात्मे, अहल्याबाई भांडारकर, सीताबाई अण्णिगेरी, लक्ष्मीबाई सावरकर, दुर्गाबाई देशमुख इत्यादी पंचवीस स्त्रियांवर लेखिकेने लिहिले आहे. यातील दुर्गाबाई देशमुखांचा अपवाद वगळता या पुस्तकात समाविष्ट झालेल्या स्त्रिया रूढार्थाने थोर वा असामान्य नाहीत, पण आपल्या सामान्य आयुष्याला अर्थ देताना त्यांनी शिक्षणासाठी केलेली धडपड, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरचा त्यांचा संघर्ष, त्यांचा निरपेक्ष त्याग, त्यांची अथक जिद्द, सामाजिक कामात अर्थ शोधण्याची त्यांची वृत्ती या सर्वांमधून स्त्रियांच्या जगण्यातले जे स्थित्यंतर दिसते, त्याचाही वेध लेखिकेने घेतला आहे.

'डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार'

'डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार' (2002) या पुस्तकाची बांधणी ज्या क्रमाने झाली आहे, ती पाहता संशोधकीय प्रकल्पाची उभारणी कशी होते, याची कल्पना येते. 'विस्मृतिचित्रे' या 'महाराष्ट्र टाइम्स'मधील सदरासाठी गंगूबाई खेडकर यांच्यावरील लेख लिहिताना त्यांचे वडील डॉ. घोले आणि त्यांचे पती डॉ. खेडकर या दोघांविषयीचे लेखिकेचे कुतूहल जागे झाले. सुरुवातीला डॉ. घोले यांच्यावर एक लहान लेख, मग दिवाळी अंकात थोडा विस्तृत लेख असे करत जाणते कुतूहल, आव्हान देणारे क्षेत्रीय संशोधन, माहितीचे संकलन, पूरक संदर्भांची जुळवाजुळव आणि त्यांचा अन्वय लावत हा ग्रंथ सिध्द झाला. एक प्रकारे ही त्या काळाची पुनर्निर्मितीच!

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विविधांगांनी झालेल्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रयत्नाला डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांच्या सुविद्य परिवाराने मोठाच हातभार लावला. पुण्यात स्थायिक झाल्यावर ते इथे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच सामाजिक उत्थानाच्या वेगवेगळया प्रयत्नांत सहभागी झाले. मोठया धैर्याने त्यांनी सुधारणांची आणि सुधारणावादी संस्थांची पाठराखण केली.

या पुस्तकात डॉ. घोले आणि त्यांची कन्या गंगूबाई खेडकर व जावई डॉ. रघुनाथराव खेडकर या दोघांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेतलेला आहे. विश्राम रामजींच्या डॉक्टरी कर्तृत्वाचे आणि शेतकऱ्यांचा कैवारी, रचनात्मक कार्याचा पाठीराखा, सार्वजनिक सत्यधर्माचा उपासक, सहृदय मानवतावादी असे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत.


 

'विवेक आणि विद्रोह'

'विवेक आणि विद्रोह' (2004) या संग्रहातील लेखांचे स्वरूप समान नसले, तरी या लेखांमागे एक सूत्र आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या संधिकालातील विविध व्यक्ती, घटना आणि अर्थातच तो काळ यांना बांधणारे ते सूत्र आहे - विद्रोही आणि बंडखोर विचारांमागे, कृतींमागे असणारे तत्संबंधितांचे विवेकशील व्यक्तिमत्त्व. या अर्थाने 'विवेक आणि विद्रोह' हे पुस्तकाचे शीर्षक उचित आहे.

न्या. रानडे यांच्यावरील 'युगंधर द्रष्टा', सयाजीराव गायकवाड यांच्यावरील 'सुधारक वृत्तीचा जाणता राजा', 'देशभक्त केशवराव जेधे' हे लेख त्या त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा वेध घेतात. वासुकाका जोशी आणि चित्रशाळा प्रेस यांच्यातील अभिन्न नात्याचा परिचय 'विस्मृतीच्या पडद्याआड गेलेला चित्रशाळा प्रेस' या लेखातून होतो. 'दलित पतितांचे दोन कैवारी' या लेखातून महर्षी वि.रा. शिंदे आणि काका कारखानीस यांच्या देवदासींविषयक कामाचे महत्त्व अधोरेखित होते.

गोपाळ गणेश आगरकर यांचे बंधू गोविंदबुवा, कविवर्य भा.रा. तांबे यांचे बंधू गणपतबुवा या बंधुद्वयांतील वृत्तिभिन्नत्वाचे स्वरूप रेखाटणारे 'गोविंद-गोपाळ हे दोघे बंधू' व 'गृहस्थ आणि साधू' हे लेख आणि 'सगुणा' या इंग्लिश कादंबरीची लेखिका कृपाबाई सत्यनाथन हिची चटका लावणारी 'विलक्षण जीवनकथा', 'स्त्रीशिक्षणातील सनातनी अडसर' हे लेख व त्यातील तथ्ये प्रथमच वाचकांपुढे आली आहेत. 'सुधारक संन्यासी' हा प्रज्ञानेश्वर यती यांच्यावरील लेखही याच जातकुळीचा. त्यामधून लेखिकेची संशोधकीय नजर आणि सर्जनशीलता यांचा सुमेळ दृष्टीस पडतो.

अडाणी आणि दरिद्री, शिवाय पारतंत्र्यात खितपत पडलेल्या गतानुगतिक समाजाला जागे करणारे, त्याच्या विचारशक्तीला चालना देणारे, त्याच्यातील अस्मिता जागवणारे काम करणाऱ्या विविध व्यक्ती, घटना, चळवळी यांच्या एकत्रित घुसळणीतून जी समाजपरिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली, तिचे धागे सुटे करून न्याहाळत, संदर्भ तपासत, अन्वयार्थ लावत हे लेखन आकारले आहे. या परिवर्तनासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र होते विद्रोहाचे. आणि त्यामागे उभी होती विवेकवंत व्यक्तिमत्त्वे. हे संशोधनपर लेखन केवळ पुराव्यांवर आणि तथ्यांवर अवलंबून नाही. तत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देणारा मानवी स्वभाव, त्याचे विचार-वर्तन यांचीही गुंफण त्यामध्ये आहे. लेखिकेने ही 'विवेक आणि विद्रोह' यांची विलक्षण वीण फार साक्षेपाने उलगडून पाहिली आहे.

'त्यांची झेप त्यांचे अवकाश'

एका अर्थाने 'विस्मृतिचित्रे' आणि 'प्रकाशाचे गाणे' या संशोधनाचे सूत्र पकडून गेल्या दीडशे वर्षांच्या काळात राष्ट्रीय पातळीवर विशेष कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रियांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या लेखांचा संग्रह म्हणजे 'त्यांची झेप त्यांचे अवकाश' (2011). 1866 साली जन्माला आलेल्या हेमवती सेन किंवा कार्नेलिया सोराबजीपासून 1927 साली जन्माला आलेल्या अन्नपूर्णादेवींपर्यंत आणि 1932मध्ये मृत्यू पावलेल्या रूक्कैय्या हुसेनपासून 2004मध्ये मरण पावलेल्या एम.एस. सुब्बलक्ष्मीपर्यंतचा दीर्घ कालपट डोळयांसमोर ठेवून लेखिकेने या प्रकल्पाची आखणी केली आहे. 'सांस्कृतिक भारताच्या उभारणीसाठी' या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे लेखिकेने खरोखरच सांस्कृतिक क्षेत्रातले या स्त्रियांचे योगदान दाखवून दिले आहे. संगीत, नृत्य, चित्रकला, वैद्यक, शिक्षण, वकिली, कुटिरोद्योग, हेरगिरी इ. क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी केलेल्या बारा स्त्रियांच्या जीवनाचा आणि कार्याचा वेध 'त्यांची झेप...'मध्ये घेतला आहे.

या लेखांमधून त्यांच्या संशोधनपूर्ण आणि अभ्यासपूर्ण अशा केवळ चरित्रकथाच समजतात असे नव्हे, तर त्या त्या स्त्रीचे स्वत्वाचे भान आणि तिची आंतरिक शक्ती यांचेही दर्शन घडते. त्यांच्या भोवतीच्या तत्कालीन समाजाच्या प्रतिक्रिया, 'सोयीस्कर उदार आणि सूक्ष्मपणे प्रतिगामी' असणारे समाजाचे धोरण, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर त्यांनी कधी मूकपणे तर कधी उघडपणे दिलेला लढा - हा सगळा पटही उभा राहतो.

भारतातल्या वेगवेगळया भूप्रदेशांतील, अगदी विभिन्न कार्यक्षेत्रातल्या आणि आयुष्यात सतत नानाविध पातळयांवर संघर्ष करत चिवटपणे पुढे जाणाऱ्या या स्त्रियांच्या रूपात तत्कालीन विकासोन्मुख भारतीय स्त्रीचा चेहरा दिसतो. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने किती म्हणून अडथळे स्त्रियांसमोर उभे केले, त्याचेही चित्र बरोबरीने उमटते. स्वत:ची क्षमता ओळखणारी स्त्री वैयक्तिक आयुष्यात किती मोठी 'झेप' घेऊ शकते आणि त्यामुळे किती मोठा सामाजिक-सांस्कृतिक अवकाश इतर स्त्रियांसाठीही खुला होऊ शकतो, याचे दिलासादायक चित्र या संग्रहातून समोर येते. 'त्यांच्या' कर्तृत्वाने उजळलेला अवकाश आजच्या एकविसाव्या शतकातील स्त्रीला सहजपणे उपलब्ध झाला याविषयी कृतज्ञता वाटावी, असाच हा संशोधनपर लेखनाचा प्रपंच आहे. सामाजिक परिवर्तनाचे स्वरूप आणि परिणाम आजमावून पाहण्याचा आणि सांस्कृतिक भारताच्या उभारणीतील स्त्रियांचे योगदान स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न म्हणूनच मोलाचा आहे.

 'प्रेमातून प्रेमाकडे'

एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या समाजपुरुषांच्या खडतर ध्येयमार्गावर त्यांना लाभलेल्या मैत्रीचे/प्रेमाचे नाजूक नाते पुराव्यांसह आणि तपशिलांसह उलगडून दाखवणारा 'प्रेमातून प्रेमाकडे' (2014) हा लेखसंग्रह म्हणजे अरुणा ढेरे यांच्या संशोधनपर लेखनाचा पुढचा टप्पा आहे. पुढचा - दोन अर्थांनी. इतिहासप्रसिध्द थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख साधारणपणे समाजाला असते - नसते ती त्यांच्या भावविश्वाची ओळख! लेखिकेने इथे त्यांच्या या अनोळखी भावविश्वातील नाजूक नात्यांचा शोध आत्मविश्वासाने घेतला आहे, म्हणून आणि अन्य संशोधनपर लेखनापेक्षा या लेखनात त्या त्या व्यक्तीच्या अंतरंगाचा ठाव घेण्याची वाट शोधली आहे म्हणूनही.

या लेखसंग्रहात गोपाळ कृष्ण गोखले, स्वामी विवेकानंद, म. गांधी, रवींद्रनाथ टागोर, बाबासाहेब आंबेडकर, श्रीधर व्यंकटेश केतकर, सुभाषचंद्र बोस, सेनापती बापट आणि बाबूराव गोखले या थोर माणसांच्या आयुष्यात त्यांना लाभलेले मैत्र वा प्रेम यांच्याविषयी लेखिकेने अत्यंत जबाबदारीने आणि अभ्यासाच्या व चिंतनाच्या पायावर लेखन केले आहे. त्यामुळे हे लेखन म्हणजे चविष्ट प्रेमकहाण्या राहत नाहीत किंवा केवळ स्त्री-पुरुष मैत्रीचा शोध राहत नाही. मैत्रभावाकडे सकस व निरभ्र दृष्टीने पाहून लेखिकेने ते मैत्र थोरांच्या कामाला पोषक कसे ठरले, याकडे लक्ष वेधले आहे.

ढेरे यांची संशोधकीय दृष्टी

प्रत्येक कालखंडाचे स्वत:चे असे प्राणतत्त्व असते. ते केवळ वाङ्मयीन नसते. त्याला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भाषिक अशी अनेक अंगे असतात. महाराष्ट्राच्या संदर्भात एकोणिसाव्या शतकाचेही स्वत:चे असे 'कालतत्त्व' आहे. अनेक पातळयांवर आणि अनेक अर्थांनी जिवंत आणि क्रिया-प्रतिक्रियांनी, मत-मतांतरांनी गजबजलेला तो काळ. त्याच्या अधिष्ठानावर थोर व्यक्तिमत्त्वे उभी आहेत आणि दुसऱ्या बाजूने पाहता त्यांच्या असाधारण कर्तृत्वाने ते 'कालतत्त्व' अस्तित्वात आले आहे. तरीही लेखिकेने केवळ राजकीय, केवळ सामाजिक अशा स्थूल घडामोडींवर विसंबून न राहता मानवी घटकांचा अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

आपल्या समाजात दस्तऐवजीकरणाविषयी कमालीची अनास्था असल्यामुळे संशोधकाला संदर्भसाधने जमवण्यासाठी चिकाटी आणि परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी लागते. ढेरे यांनी परिश्रमपूर्वक संदर्भसाधने जमवून, त्यांची सत्यासत्यता पारखून हे लेखन केले आहे. अनेक ग्रंथ व नियतकालिके यांचा सातत्याने आधार घेतला आहे. 'विवेक आणि विद्रोह' या लेखसंग्रहाचा अपवाद वगळता उर्वरित सर्व पुस्तकांना संदर्भसूची जोडली आहे. त्या सूचींवर नजर टाकली, तर या अभ्यासाचे समग्र-लक्ष्यित्व ध्यानात येईल. आवश्यक तिथे उद्धृते दिली आहेत, पण म्हणून हे लेखन उद्धृतांनी गजबजलेले नाही. अनेक ठिकाणी तपशिलात्मक माहिती मुरवून घेऊन, तिचा अन्वय लावून मांडणी करण्याची पध्दत स्वीकारली आहे, त्यामुळे विवेचनात सलगता राहिली आहे.

अस्सल संशोधनसाधनांच्या साहाय्याने प्रस्थापित माहितीमधल्या काही त्रुटीही ढेरे यांनी विनम्रपणे पण ठामपणे निदर्शनास आणल्या आहेत. तपशिलांमधील विसंगतीमुळे मतभेदाची ठिकाणे जिथे निर्माण झाली आहेत, तिथे लेखिकेने तारतम्याने आणि विवेकबुध्दीने ग्राह्याग्राह्यतेचा निर्णय केला आहे. थोरांच्या तत्कालीन वर्तनाचा, कृतींचा... एकूणच जीवनाचा अन्वयार्थ लावताना ढेरे यांनी आपले तर्कसामर्थ्य आणि संयम पणाला लावला आहे.

अरुणा ढेरे या प्रकृतीने मूलत: कवी असल्यामुळे त्यांच्या संशोधनपर लेखनाला अनायासेच लालित्य लाभले आहे. ललित शैलीची उदाहरणे अक्षरश: पानोपानी आढळतात. हा केवळ शैलीचा वेल्हाळपणा नाही, तर त्या काव्यमय ओळींच्या मधला जो सूचित आशय आहे, तो समर्थपणे पोहोचविण्याची धडपड आहे. त्यामागचे लेखिकेचे त्या प्रसंगांचे आणि प्रसंगातील व्यक्तींचे आकलन महत्त्वाचे आहे.

केवळ अपरिचिताला प्रकाशात आणणारे हे लेखन नाही. एकोणिसाव्या शतकातील सुधारणेचे लहान-मोठे प्रयत्न, विविध संस्था-संघटना-चळवळी-लेखन-वक्तव्ये यांमागची प्रयोजने समजून घेत हा लेखनप्रपंच त्यांनी मांडला आहे. निवडलेल्या कालखंडात मतभेद आहेत, संघर्ष आहेत, पण त्यापलीकडे जाणारे जे मानवी सौहार्द आहे, औदार्य आहे, ते सातत्याने समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 'संशोधन आणि सर्जनशीलता यांचा मेळ नेहमीच मतभिन्नता ओढवून घेणारा असतो' याचे भान ठेवत, तपशिलांची अचूकता सांभाळत, पुराव्यांनिशी केलेले हे लेखन म्हणूनच महत्त्वाचे ठरते.

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

9822033562