सामंजस्याचा सूर

 विवेक मराठी  17-Jan-2019

 

 साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्रुटी नव्हत्याच, असं नाही. एखाद्या घरगुती लग्नसमारंभाच्या व्यवस्थेतदेखील उणिवा राहून जातात. हे तर 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं. थोडेफार हौशे-गवशे गृहीत धरले, तरी आसन व्यवस्था कोलमडावी एवढी श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती बहुसंख्य कार्यक्रमांना लाभली. या संमेलनाने अनेक चांगले पायंडे पाडले.

 यवतमाळला बसने जात असताना दारव्हा गाव आलं. साधारण पस्तिशीचा, नीटनेटका, शिडशिडीत माणूस शेजारी येऊन बसला. पाच-दहा मिनिटांनी त्याला कुणाचा तरी फोन आला.

''आज म्हटलं दुकानाले सुटी आहे, तं पाहून येतो संमेलन काय अस्ते. तुझ्यासाठी आनू का कादंबऱ्या?''

मग मीसुध्दा साहित्य संमेलनासाठी जाते आहे, हे कळल्यावर मला म्हणाला, ''आमच्या गावात पुस्तकं भेटत नाई की काई मोठा कारेक्रम होत नाई. मी आज पुस्तकं आनाले पाच हजार रुपये घेऊन चाललो. वाचायचा खूप नादंय ताई मला. काल टीवीवर त्या मॅडमचं भाषण ऐकलं, फार मस्त वाटलं. म्हटलं, आज जाच लागते.''

गूगल बोटावर खेळवत असूनही यवतमाळ कुठे आहे हे माहीत करून घेण्याची तसदी न घेणारी किंवा पुस्तकं-माध्यमं यांची सहज उपलब्धता आणि विविध वैचारिक गटात ऊठबस असणारी माणसं 'साहित्य संमेलनं हवीतच कशाला?' असं म्हणतात... अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले चीड आणणारे प्रकार, जेवणावळी, डामडौल, राजकारण्यांची लुडबुड, मानपान यांचा वीट आलेली सामान्य माणसंदेखील वैतागून हा प्रश्न विचारतात...

याचं उत्तर मला बसमध्ये भेटलेल्या या गावाकडच्या 'सखाराम गटणे'मध्ये सापडलं. संमेलनाला कुतूहलाने भेट देणाऱ्या, शब्दांच्या राज्यात उत्सुक नजरेने विहार करणाऱ्या तरुणाईमध्ये सापडलं. तिथल्या तब्बल दीड कोटीहून जास्त रुपयांच्या पुस्तकविक्रीत सापडलं. कविकट्टयामुळे अ.भा. संमेलनाचं व्यासपीठ मिळालेल्या नवोदितांच्या चेहऱ्यावरच्या समाधानात सापडलं. शेतकऱ्याच्या वेदना मांडणाऱ्या वऱ्हाडी काव्यसंमेलनाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादात सापडलं. सवंग मनोरंजन नसतानाही काहीतरी वेगळं, चांगलं ऐकायला, पाहायला लोटलेल्या हजारोंच्या गर्दीत सापडलं.

या संमेलनाच्या उद्घाटकांचं निमंत्रण ऐन वेळी रद्द करण्यात आलं. या निषेधार्ह कृतीनंतर बरंच नाटय घडलं. विधवा शेतकरी स्त्रीला तो सन्मान देण्यात आला. दरम्यान अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी झाल्याचा आरोप करत, 'संमेलनच रद्द करा' असा सल्लाही काही जणांनी घरबसल्या दिला. कुणाच्या तरी घोडचुकीपायी इतक्या दिवसांच्या अथक मेहनतीवर बोळा फिरतो की काय, या शंकेने संमेलनाचा गोवर्धन आपापल्या काठीने तोलून धरणारे असंख्य कार्यकर्ते व्यथित झाले. तत्त्वासाठी बहिष्कार घालणारी मोजकी मंडळी वगळता निवडणुका नजरेसमोर ठेवून काहींनी आपापल्या राजकीय पोळया भाजायला या 'संधी'चा वापर केला. संमेलनात अपेक्षित अग्रक्रम, निमंत्रण न मिळालेले काही दु:खी जीव त्यांच्या जोडीला आले. अंकुश ठेवणं हे माध्यमांचं कर्तव्यच आहे, परंतु नकारात्मक बातम्यांच्या मालिका शहानिशा न करता छापल्या गेल्या. हेतुपुरस्सर शेअर केल्या गेल्या. एकांगी आरोपांच्या आधारे आमंत्रितांचं चक्क रेट कार्ड छापलं गेलं. ज्यांनी संमेलनाला साथ द्यायचं ठरवलं, त्यांची 'रोम जळत असताना फिडल वाजवणारे नीरो' म्हणून, तर कुठे त्याहून हीन शब्दात संभावना करण्यात आली. या नीरोंनी मात्र साहित्याचं रोम जळू न देता जिद्दीने जतन केलं.

 


 एकोणिसाव्या शतकात महात्मा फुले यांनी ग्रंथकार सभेला पत्र पाठवून 'तुमच्या साहित्यात एकतेची बीजे नाहीत' हे ठामपणे कळवलं होतं. या संमेलनाची सर्वसमावेशक कार्यक्रम पत्रिका बघितली असती, तर अनेक विरोधकांना त्यात एकतेची बीजं नक्कीच सापडली असती. परंतु त्यातले काही स्वत:च 'घालमोडे दादा' झाले. संमेलनाध्यक्षांनी आता काय करावं, काय बोलावं याबाबत त्यांचं प्रबोधन करणाऱ्या मंडळींना अरुणाताईंच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मात्र सोयीस्कर विसर पडला. इतकं करूनही 'आलात तर तुमच्यासह, न आलात तर तुमच्याविना' संमेलन होणारच, असा निर्धार करून आयोजकांनी, कार्यकर्त्यांनी कंबर कसली. 'स्व'पलीकडे जाऊन साहित्याचा उत्सव साजरा करायला उत्सुक असणारे लेखक, वाचक, संतुलित माध्यमं, साहित्य महामंडळ यंानी 'आपण सारे मिळून संमेलन यशस्वी करू या' असं सौहार्दपूर्ण आवाहन केलं. 'आपल्या गावात 45 वर्षांनी साहित्य संमेलन होतंय, ते चांगलं झालंच पाहिजे' अशा भावनेने, एकदिलाने उभ्या राहिलेल्या आजी-माजी यवतमाळकरांसह, खास संमेलनासाठी कुठून कुठून स्वखर्चाने उपस्थित राहिलेल्या साहित्यरसिकांनी ते करून दाखवलं. अनेक जण अरुणाताईंच्या प्रेमाखातर, त्यांना ऐकण्यासाठी आले होते हेही खरं. त्यांचं उद्घाटन सत्रातलं सहिष्णुतेच्या दिशेला नेणारं, संयत, सकारात्मक, ओजस्वी भाषण म्हणजे 'आपली रेघ मोठी कशी करावी' याचा वस्तुपाठच होता.

या संमेलनाच्या आयोजनात त्रुटी नव्हत्याच, असं नाही. एखाद्या घरगुती लग्नसमारंभाच्या व्यवस्थेतदेखील उणिवा राहून जातात. हे तर 92वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं. थोडेफार हौशे-गवशे गृहीत धरले, तरी आसन व्यवस्था कोलमडावी एवढी श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती बहुसंख्य कार्यक्रमांना लाभली. या संमेलनाने अनेक चांगले पायंडे पाडले. निवडणुकीचं उबग आणणारं राजकारण टाळून योग्य अध्यक्षांच्या निवडीने सुरुवात झाली. ॠजू व्यक्तिमत्त्वाच्या, व्यासंगी अध्यक्ष लाभल्या, तिथेच संमेलन अर्धं यशस्वी झालं होतं. तरुणांना मार्गदर्शक ठरतील अशा कार्यशाळांचं आयोजन हेसुध्दा या संमेलनाचं वैशिष्टय ठरलं.

राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या जिल्ह्यातल्या या संमेलनाच्या व्यासपीठावर या प्रश्नांशी संबंधित कार्यक्रमांसह तांडयाच्या व्यथांना, तसंच राणी बंग यांच्या माध्यमातून आरोग्य तसंच सामाजिक विषयावरील चर्चेलाही आवर्जून स्थान देण्यात आलं होतं. एखादा अपवाद वगळता कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द झाला नाही, उलट मोजक्या वक्त्यांना विषय मांडायला पुरेसा वेळ मिळाला. समकालीन, आधुनिक विषयांवरील परिसंवादांना दर्दींची गर्दी लाभली.

नामवंत प्रकाशनांचे 214 गाळे होते. सवलतीच्या दरात उत्तमोत्तम पुस्तकं उपलब्ध होती. कविकट्टा तर रात्री बारापर्यंत गजबजलेला होता. बऱ्याच आमंत्रितांनी आपलं मानधन, तसंच प्रवासखर्च नाकारला. पूर्वाध्यक्षांच्या खर्चकपातीच्या सूचनेनुसार संमेलन भव्य असलं, तरी भपकेबाज नव्हतं. ज्या अप्रिय घटनेच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन पार पडलं, त्या घटनेबाबतची खंत अवश्य होती, परंतु तिथे निनादणारा सूर सामंजस्याचा आणि स्नेहाचा होता. गडकरींनी समारोपीय सत्रात 'विचारभिन्नता चालेल, विचारशून्यता नको' हा चिंतनीय मुद्दा मांडला. संमेलनाचं सूप वाजलं. झालं गेलं गंगेला मिळालं, मात्र सामान्यजनांचं बावनकशी साहित्यप्रेम तळाशी तसंच लकाकत राहिलं. संमेलनाचं हे यश म्हणजे जीत वगैरे नाही. या संमेलनाने नेमकं काय केलं, हे अरुणाताईंच्या शब्दात सांगायचं तर...

'समजूत भरुनिया भाळी..

रक्तात स्नेह अंथरले

काळीज करुन कोनाडा..

मी दिवे हळू लावियले..'

 

मोहिनी महेश मोडक

(लेखिका आयटी व्यावसायिक असून संमेलनातील 'नवतंत्रज्ञानाधारित साहित्याच्या नव्या वाटा' या परिसंवादात सहभागी होत्या.)