साहित्यरसिकांनी केले संमेलन यशस्वी

 विवेक मराठी  21-Jan-2019

लेखक वाचकांसाठी लिहितात आणि वाचकांना संमेलन हवे आहे. वाचकांनीच ते इतकी वर्षे टिकवून ठेवले आहे, हे सत्य आहे. पण ज्यांना वाचकांशी काहीच देणे-घेणे नाही, त्यांनी बहिष्काराचे अस्त्र बाहेर काढले. त्यांनी टाकलेला बहिष्कार हा संमेलनावर नव्हता, तर वाचकांवर होता, हे त्यांनी दाखवून दिले. अशा सर्व लोकांना योग्य समज देण्याचे काम वाचकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन आपोआपच केले आहे.

अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ येथे 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. नयतनतारा सेहगल यांना आयोजकांनी उद्घाटनाचे निमंत्रण दिले होते. नंतर ते रद्द केले, ही गोष्ट निषेधार्ह होतीच. त्याची प्रतिक्रिया संमेलनापूर्वी उमटली. ती उमटणे स्वाभाविकही होते. खरे तर, या वर्षीच्या संमेलनाचे वैशिष्टय म्हणजे संमेलनाध्यक्षांची झालेली सन्माननीय निवड. डॉ. अरुणा ढेरे यांच्या रूपाने वाचकांच्या मनातील अध्यक्ष साहित्य संमेलनाला मिळाले. त्यामुळे रसिकांमध्ये खूपच उत्साह होता. पण संमेलन पाच दिवसांवर येऊन ठेपलेले असताना वादाचे मळभ दाटून आले. संयोजकांकडून आणि महामंडळाकडून घडलेली चूक क्षमा करण्याजोगी नव्हती आणि नाही, मात्र बहिष्कार टाकून संमेलनच उधळून लावण्याचा प्रयत्न काही लोकांकडून झाला. जे घडले, त्यात संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे आणि महाराष्ट्रातील तमाम साहित्यरसिक यांचा कसलाही दोष नव्हता, तरीही त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला. संमेलनापूर्वीच अध्यक्षांनी बोलावे म्हणून जंगजंग पछाडले. पण डॉ. अरुणा ढेरे या संयत, विवेकी आणि आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या लेखिका म्हणून सर्वांना परिचित आहेत, त्याचा प्रत्यय त्यांनी या िनमित्ताने दाखवून दिला. माध्यमांच्या कोणत्याही दडपणाला त्या बळी पडल्या नाहीत. अग्रलेखातून चुचकारण्याने त्या थोडयाही विचलित झाल्या नाहीत. 'संमेलन' हेच संमेलनाध्यक्ष म्हणून भूमिका मांडण्याचे योग्य व्यासपीठ आहे, हे त्यांनी कृतीतून ठामपणे दाखवून दिले आणि त्यांच्या अध्यक्षीय भाषणातूनही लोकांना त्याचा प्रत्यय आला आणि नाकदुऱ्या काढणाऱ्यांची चांगलीच गोची झाली.

1878 साली न्या. महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी यांनी गं्रथकारांची संमेलने सुरू केली, तेव्हापासून संमेलनांवर टीका होतेच आहे आणि गेली 140 वर्षे ती अव्याहतपणे होतेच आहे. पण संमेलनावर टीका करणाऱ्यांना पर्यायी संमेलन उभे करता आले नाही, ही त्यांची खंत आहे. तसेच संमेलनावर टीका केली की चांगली प्रसिध्दी मिळते, हे माहीत असल्यामुळे टीका करणाऱ्यांचा वर्गही खूप मोठा आहे. खरे तर नयनतारा सेहगल यांच्या बाबतीत जे घडले, ते निषेधार्हच होते, त्याचा निषेध करण्यासाठी संमेलनाचे 'व्यासपीठ' हेच योग्य व्यासपीठ होते. पण बहिष्कार घालणाऱ्यांना ते समजले नाही. लेखक वाचकांसाठी लिहितात आणि वाचकांना संमेलन हवे आहे. वाचकांनीच ते इतकी वर्षे टिकवून ठेवले आहे, हे सत्य आहे. पण ज्यांना वाचकांशी काहीच देणे-घेणे नाही, त्यांनी बहिष्काराचे अस्त्र बाहेर काढले. त्यांनी टाकलेला बहिष्कार हा संमेलनावर नव्हता, तर वाचकांवर होता, हे त्यांनी दाखवून दिले. अशा सर्व लोकांना योग्य समज देण्याचे काम वाचकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन आपोआपच केले आहे.

संमेलन आणि वाद हे गेल्या काही वर्षांत दृढ झालेले समीकरणच आहे. पण सामान्य साहित्यरसिकांना त्या वादांशी देणे-घेणे नसते. त्यांना साहित्यानंद आणि ज्ञानानंद मिळवायचा असतो. ग्रंथप्रदर्शनाच्या बाबतीतही दुष्काळी भागात काय प्रतिसाद मिळणार? अशी शंका उपस्थित केली जात होती; पण शाळेतली मुलांनी, महाविद्यालयीन तरुणांनी आणि सर्व वयोगटातील वाचकांनी ग्रंथप्रदर्शनाला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला, तो डोळयांचे पारणे फेडणारा होता. मात्र त्या गर्दीची छायाचित्रे प्रसिध्द करावीत आणि वाचकांचा प्रतिसाद महाराष्ट्रभर पोहोचवावा, इतका मनाचा मोठेपणा फार थोडया प्रसिध्दीमाध्यमांनी दाखवला. अर्थात हा ज्याच्या-त्याच्या भूमिकेचा आणि दृष्टीकोनाचा प्रश्न असतो. पण जे डोळयांना दिसते, ते नाकारणे ही आत्मवंचनाच म्हणावी लागेल.

जागतिकीकरणानंतरच्या मानसिकतेने आपले साहित्यिक, सांस्कृतिक संचित उद्ध्वस्त करण्याची एक लाटच निर्माण केली आहे. परंपरा मोडायला कुणाचीही ना नाही, पण ती मोडण्यापूर्वी किमान समजून घेणे गरजेचे आहे. जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारूनच समाजजीवनाचा प्रवाह पुढे जात असतो. बहिष्काराची पळवाट काढणाऱ्यांनी आपण आपल्या संमेलनासारख्या सांस्कृतिक ठेव्याचे नुकसान तर करत नाही ना? याचे चिंतन केले पाहिजे. साहित्यरसिकांनी संमेलनाला अभूतपूर्व प्रतिसाद देऊन, तसा प्रयत्न करणाऱ्या सर्वांना सणसणीत चपराक दिलेली आहे.

प्रा. मिलिंद जोशी

9850270823