वर्तुळ

 विवेक मराठी  25-Jan-2019

 

हातावर ठेवल्या जाणाऱ्या त्या खाऊपेक्षाही त्यामागचा विचार मनावर कायमचा कोरला गेला. या वत्सलतेने डोळे भरून आले. हे 'देणं' कधीही विसरू शकले नाही. दातृत्वाला वत्सलभावाचा रेशीमस्पर्श असेल, तर घेणाऱ्याची झोळी ओसंडून वाहते हे अनुभवलं.

ब्रिज उतरता उतरता गाडी स्टेशनात शिरताना दिसली आणि कसंही करून ती पकडायचीच, या निधार्राने मी धावायला सुरुवात केली. धापा टाकत कशीबशी डब्यापर्यंत पोहोचले, पूर्वीप्रमाणे जंप मारून चढलेही. 'सवय सुटली नाही तर अजून' या साक्षात्कारानेही छान वाटलं.

जवळजवळ दोन वर्षांनी मी ती गाडी पकडली होती. साहजिकच सीट मिळण्याच्या आशेने ओळखीचं कोणी दिसतंय का, हे पाहायला सभोवार नजर फिरवली. एवढया तुडुंब गर्दीत सीटवर बसलेल्या बायकांचे चेहरे दिसणं कठीण काम होतं. तसंच झालं. दोन बाकांच्या मध्ये उभ्या असलेल्या बायकांच्या गर्दीच्या फटीतून बसलेल्या बायकांचे चेहरे दिसणं आणि त्यांची ओळख पटणं हे अंमळ कठीणच होतं. तेव्हा आता जागा मिळेल त्या स्टेशनपर्यंत उभ्याने प्रवास करायचा आहे, असं स्वत:ला समजावत मी शांतपणे उभी राहिले. तितक्यात, कोणीतरी माझ्या पाठीवर थाप मारली. मी झर्रकन वळून मागे पाहीपर्यंत प्रश्न आला -

''आज भोत दिन बाद आया दीदी इस ट्रेन में?'' स्वरांतला आनंद लपत नव्हता. पाहिलं, तर माला समोर उभी होती.

माला - त्या गाडीत कानातले, गळयातले विकणारी दाक्षिणात्य तरुणी. वर्ण तिच्या मूळ प्रदेशाशी नातं सांगणारा, छान तुकतुकीत काळा. केसांना भरपूर तेल लावून घातलेली नीटस वेणी. अतिशय नीटनेटका पेहराव आणि या सगळयाहूनही मोहक असा तिचा प्रसन्न हसरा चेहरा. तिच्या या अनपेक्षित भेटीने आणि तिने आवर्जून हाक मारण्याने मीही खूप खूश झाले.

''अरे माला तू... कैसी है रे? अभी भी इस ट्रेन मे आती है?'' मी विचारलं. माझ्या स्वरातली तिच्याविषयीची आपुलकी लपत नव्हती. आजूबाजूच्या बायका आम्हा दोघींकडे पाहायला लागल्याचं माझ्या लक्षात आलं. तिकडे कानाडोळा करत आमचं एकमेकींची ख्यालीखुशाली विचारणं चालूच राहिलं.

माझी खुशाली सांगितल्यावर तिच्या लहानग्या मुलाची चौकशी केली. तो आता तीन वर्षांचा झाल्याचं तिने सांगितलं. सडपातळ अंगकाठीच्या, नाजूक चणीच्या जेमतेम तिशीच्या मालाकडे पाहून, 'ती तीन मुलांची आई आहे, यावर कोण विश्वास ठेवेल?' माझ्या मनात आलं. या धाकटयाच्या आधीची तिला दोन मुलं... त्या दोघांच्या पाठीवर जेव्हा तिसऱ्यांदा दिवस गेल्याचं कळलं, तेव्हा मालाला धक्का बसला. कसाबसा चाललेला प्रपंच, त्यात आणखी एका खात्या तोंडाची भर... त्याचा सांभाळ करायचा तर घरी बसावं लागणार, म्हणजे धंद्यावर पाणी पडणार, हे सगळं तिच्यासाठी दुष्काळात तेरावा महिनाच होता. पण दिवस गेलेत हे कळेपर्यंत उशीर झाल्याने घरच्यांनी गर्भपाताला नकार दिला. मुलाला जन्म द्यायचा हे ठरल्यानंतर पुढचे काही दिवस तिच्या तोंडचं पाणी पळालं. हातापायातलं त्राण गेलं आणि आठवडाभर घरात बसली. नवराही तिच्यासारखाच रेल्वेतला विक्रेता. त्याच्या एकटयाच्या जिवावर प्रपंच चालायचा नाही, हे शहाण्या मालाला समजत होतं. त्यामुळेच उसनं बळ गोळा करून आठवडयाभरानंतर  तिने कामाला सुरुवात केली.

सरत्या महिन्यागणिक पोट दिसायला लागलं, तेव्हा त्या गाडीला नेहमीच असणाऱ्या बायकांनी तिला छेडलं. ''अरे क्या माला, पहले दो बच्चे है ना?'' सगळयांची लाडकी असल्यामुळे, प्रश्नातही टीकेपेक्षा तिच्याबद्दलची काळजीच डोकावत होती.

कसनुसा चेहरा करत ती म्हणाली, ''हां दीदी... गल्ती तो हो गयी... लेकिन अभी दुसरा रास्ता नही है...'' बायका काय ते समजून गेल्या.

त्या दिवसापासून सगळयाच जणी मालाचं काळजीवाहू सरकार झाल्या. तिच्या तब्येतीची चौकशी करणं, तिच्याकडे लक्ष ठेवणं सुरू झालं. अगदी दिवस भरेपर्यंत जडावल्या देहाने माला गाडीला येत राहिली. तिला कोण झालं असेल याची आम्हां सगळयांनाच उत्सुकता होती. एका मावशींनी तिचा नंबर घेऊन ठेवला होता. त्यामुळे तिला मुलगा झाल्याची खबर आणि ती हातीपायी धड सुटल्याची बातमी कळल्यावर सगळयाच सुखावल्या.

त्यानंतर महिना पूर्ण होण्याआधीच, धाकटयाची झोळी खाकोटीला मारून मालाची रेलयात्रा सुरू झाली.

ती पहिल्या दिवशी जेव्हा बाळाला घेऊन आली, तेव्हा आमच्यापैकी अनेकींनी तिला त्या वेळी छेडलं, ''इतने छोटे बच्चे को क्यूँ लाती है भीड में... घर मे क्यूँ नही रखती?''

दु:खी चेहऱ्याने ती म्हणाली, ''क्या करेगी दीदी... दूद पीता है ना, और मै काम पे आती हूँ तब बडोंको मेरी माँ के पास छोडके आती हूँ... इसे तो मेरे साथ लानाही पडेगा।''

तिची अडचण समजल्यावर, पटल्यावर कोणी पुढे बोललं नाही. सर्वांनी बाळाच्या हातात शकुनाचे पैसे ठेवले. काहींनी आपल्या मांडीवर घेतलं. या अनपेक्षित जिव्हाळयाने माला गहिवरली.

''इस की क्या जरूरत है दीदी... पैसा मत दो'' बाळमुठीतले पैसे परत करत ती म्हणाली.

''अरे, तुम्हारा बच्चा हमारा कोई नही लगता क्या? पहिली बार देख रहे है ना इसे... रख लेना... शरमाना मत...'' हा प्रेमळ हुकूम तिने मोडला नाही.

मग दुसऱ्या दिवसापासून त्या बाळाची आईबरोबर रेलयात्रा सुरू झाली. माला दागिने विकत असताना, गाडीतल्या बायका हौसेने बाळाला मांडीवर घेऊन बसू लागल्या. माला निश्चिंतपणे धंदा करू लागली. तो वर्षाचा होईपर्यंत त्याचा रोजचा प्रवास सुरू होता. शेवटी त्याच्या वाढत्या चळवळीला आणि आकाराला झोळी पुरेना. बाहेरचं खाणंही सुरू झाल्याने आईवरचं अवलंबित्व संपलं. मग मालाने बाळाला घरी ठेवून यायला सुरुवात केली.

तिच्या अनपेक्षित भेटीने मीही उभ्याउभ्या त्या दिवसांमधून एक फेरी मारून आले. तोवर बसायला जागा मिळाली आणि काहीतरी तोंडात टाकावं म्हणून मी शंकरपाळयांचा डबा उघडला. माझ्या समोरून मालाची ये-जा सुरूच होती.

''अच्चा हुआ आपको जगा मिला... आजकल इस गाडी मे बैटने को नई मिलता...'' माझ्याजवळून जाता जाता ती बोलली. तिच्या त्या आपुलकीच्या बोलण्याने माझ्या हातातला घास हातातच राहिला.


'तीन तीन मुलांचं आवरून घराबाहेर पडताना स्वत:च्या पोटात काही घातलं असेल का, कोण जाणे?' मनात आलं आणि मी चार शंकरपाळे बाजूला काढून ती समोर येण्याची वाट पाहू लागले. लांब दिसल्यावर खूण करून बोलावलं. हातात डबा ठेवत म्हटलं, ''किसी थैली मे निकालके ले ले।''

विलक्षण संकोचत ती उद्गारली, ''नई दीदी... मै खा के आई हूँ घर से... सच्ची में... आप खा लो''

''बहोत दिनो के बाद मिली ना, इसलिए दे रही हूँ प्यार से... जब भूक लगेगी तब खाना... रख दे।'' तिला माझा आग्रह मोडवेना. डबा घेऊन गेली आणि थोडयाच वेळात रिकामा डबा  हातात ठेवत पुटपुटली, ''थ्यांकू दीदी...''

यात काही फार मोठा दानशूरपणा केला नाही मी, तरीही मला आनंद झाला. या घटनेचं पूर्वीच्या एका वत्सल आठवणीशी नातं आहे, हे माझ्या लक्षात आलं आणि छान वाटलं.

माझी मुलं लहान असताना मी आठवडयातले तीन दिवस विवेकमध्ये येत असे. पार्टटाइम नोकरीच होती ती. त्या वेळी संपादकीय विभागातले बहुतेक सहकारी तरुण आणि अविवाहित. दुपारी लंच टाइम झाला की आमचे वरिष्ठ आवर्जून मला हाक मारत, त्यांच्या डब्यात असलेला विशेष पदार्थ हातावर ठेवत. एका सहकाऱ्याच्या हे लक्षात आल्यावर त्याने गंमतीत त्यांना टोकलं. म्हणाला, ''हे बरंय... आम्ही रोज इथेच असतो, तर आम्हांला कधी नाही देत ते तुम्ही...''

त्याच्या या मिश्कील बोलण्यावर वरिष्ठ म्हणाले, ''अरे, तुम्ही तरुण मुलं... झोपून उठल्यावर फक्त स्वत:चं आवरून घरून निघता आणि इथे येता. आईला घरातल्या कामात काही मदत करत असाल का.., मला शंकाच आहे. ही घरातली कामं आणि दोन मुलांचं आवरून इतक्या लांब येते, कामाच्या गडबडीत निवांतपणे खाताही येत नाही बायकांना. म्हणून त्यांच्या हातावर खाऊ ठेवतो....''

हातावर ठेवल्या जाणाऱ्या त्या खाऊपेक्षाही त्यामागचा विचार मनावर कायमचा कोरला गेला. या वत्सलतेने डोळे भरून आले.  हे 'देणं' कधीही विसरू शकले नाही. दातृत्वाला वत्सलभावाचा रेशीमस्पर्श असेल, तर घेणाऱ्याची झोळी ओसंडून वाहते हे अनुभवलं.

त्या वत्सलतेची परतफेड बरीच वर्षं राहून गेली होती बहुधा. परवा मालाला भेटल्यावर थोडंसं का होईना, चांगुलपणाचं ऋण फेडता आलं. एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं समाधान मिळालं.