मैत्रीचा धागा गुंफणारी... मैत्रेयी

 विवेक मराठी  04-Jan-2019

 

 कविता, कथा, कादंबरी, समीक्षात्मक लेखन, वैचारिक लेखन या सर्व लेखन प्रकारांत मुक्तपणे विहार करणाऱ्या अरुणा ढेरे या 92व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद भूषवीत आहेत. अरुणा ढेरे यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून रेखाटलेल्या स्त्री-पात्रांची वैशिष्ट्ये म्हणजे त्या कधीच परिस्थितीपुढे हतबल झालेल्या नाहीत, तर त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, प्रसंगी संघर्ष करून परिस्थितीवर मात केलेली आहे. यातीलच एक स्त्री-पात्र म्हणजे 'मैत्रेयी.' पौराणिक ग्रंथात ज्या विदुषी स्त्रियांचा उल्लेख आढळतो, त्यात 'मैत्रेयी'चे नाव अग्रक्रमाने आणि कौतुकाने घेतले जाते.

वैदिक काळातील एक विदुषी आणि ब्रह्मवादिनी स्त्री म्हणून मैत्रेयी सर्वांना परिचित आहे. मैत्रेयी ही मित्र ऋषींची कन्या आणि महर्षी याज्ञवल्क्य यांची दुसरी पत्नी. अतिशय शांत स्वभावाच्या मैत्रेयीला अध्ययन, चिंतन आणि शास्त्र यात विशेष रुची होती. धन-संपत्तीने आत्मज्ञान विकत घेता येत नाही, हे माहीत असल्याने ज्ञानप्राप्तीसाठी तिने सर्व सांसारिक सुखांचा त्याग करून पतीसह वनात जाणे पसंत केले आणि पतीच्या विचारसंपदेची ती धनी झाली.

मैत्रेयीविषयी या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी पोचल्या आहेत. पण अरुणा ढेरे यांच्या 'मैत्रेयी' या कादंबरीतून या लौकीक ओळखीपलिकडची मैत्रेयी, तिचे व्यक्तित्व उलगडत जाते.

प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, पुराणातील मैत्रेयीविषयीच्या गोष्टी ऐकत, वाचत असताना अरुणा ढेरे यांच्या मनातील एक कप्पा मैत्रेयीने नकळत व्यापला आणि हळूहळू ती त्यांच्या जाणिवेचा एक भाग बनत गेली. त्यांच्याशी बोलू लागली. मैत्रेयीचे हे बोलणे आवाजाखालच्या आवाजातले, मनातल्या मनातले होते. ते अरुणाताईंनी ऐकले आणि त्या लिहीत गेल्या. मैत्रेयीविषयी लिहिता लिहिता त्यांच्या लक्षात आले की, मैत्रेयी ही ज्या दृष्टीने भोवताली पाहते, ती पुरातन आर्यांची रसरशीत प्रतिभावंत दृष्टी आहे. मुळात तिचा पती याज्ञवल्क्य हा स्वतंत्र व्यक्तित्वाने उपनिषदात वावरणारा पुरुष. त्यामुळे त्या दोघांचे परस्परसंबंध, त्यांचे बाह्य जगाशी असलेले संबंध, त्यांचे सृष्टीशी असलेले संबंध आणि त्यांचे त्यांच्या युगमनाशी असलेले संबंध या सगळ्याबद्दल मैत्रेयी बोलत राहिली.

कात्यायनी म्हणजेच याज्ञवल्क्यांची पहिली पत्न तिचे आणि मैत्रेयीचे संवाद पाहता त्या एकमेकींच्या मैत्रिणीच अधिक वाटतात. त्यांच्या नात्यातला समंजसपणा मनाला स्पर्श करतो.  

कात्यायनीच्या मनात मैत्रेयीबद्दल असूया असली तरी, पण मैत्रेयीच्या येण्याने तिच्या पतीमध्ये झालेला बदलही तिला जाणवतो. म्हणूनच ती म्हणते, ''मैत्रेयी आल्यावर त्याच्या सगळ्या कृतींना एक प्रसन्न झाक आली होती. त्याचं जपजाप्य, चिंतन-मनन, वादविवाद, प्रवचन-अध्यापन आणि हास्यविनोद सगळंच फार समाधानाचं वाटू लागलं होतं. जणू आतून एखादं तृप्तीचं तळं झिरपावं आणि सगळ्या देहभर ती ओल पसरावी, शब्दात, दृष्टीत, कृतीत साचावी, तसं काही तरी...''

 मैत्रेयी ही मुळातच शांत, समंजस होती. त्यामुळे हळूहळू त्या दोघींमधील मत्सर कमी होत जाऊन त्याची जागा मैत्रभावाने व्यापली. त्यांचा हा मैत्रीचा प्रवास अरुणाताईंनी खूप सुंदररीत्या शब्दबद्ध केला आहे. 

वानगीदाखल हा एक संवाद पाहता येईल.

''मैत्रेयी, तुला काय वाटतं गं आपल्या संसाराबद्दल? गृहस्थधर्म म्हणून सांगू नकोस. तुझं म्हणून उत्तर दे.'' 

''आपलं ऐहिक ऐश्वर्य मागे ठेवून तू इथे आलीस, तुला या रानात करमतं का?'' त्यावर, ''ऐश्वर्याची ही दुसरी बाजू मला जास्त भावली'' हे मैत्रेयीचे उत्तर, त्यांच्यातील हा मनमोकळा संवाद मनात घर करतो.

कात्यायनी एका ठिकाणी तिला विचारते, ''पण बाई, एखाद्या वेळी तरी सामान्य बाईसारखा संसाराचा विचार केलाच असशील ना? का संसारही तुला तुझ्यातच केलेला दिसतो?'' तिचे हे वाक्य ऐकून मैत्रेयीदेखील खळखळून हसते. 

असे संवाद वाचताना त्या दोघींमधल्या सवतीच्या नात्याची आठवणही मनात जागी होत नाही. उलट आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्या एकमेकींना साथ देणाऱ्या जिवाभावाच्या मैत्रिणीच असल्याची भावना होते.

अरुणाताईंनी रंगविलेली ही मैत्रेयी एक असामान्य स्त्री होती. तिला शक्यतो कधीच कोणाचा राग येत नसे आणि आलाच तर ती स्वत:ला त्या जागी ठेवत असे. का? तर ''आपले आपल्याशी भांडणे हे फार काळ टिकत नसते. कारण शेवटी आपण आपल्याला प्रिय असतोच ना!'' हे तिचे वाक्य. तिच्या विचार करण्याच्या पद्धतीचं दर्शन अनेक प्रसंगातून होतं, ते तिचं वेगळेपण अधोरेखित करतं.

 मैत्रेयी स्पष्टवक्ती होती, म्हणूनच ती आपल्या पतीला - याज्ञवल्क्यला म्हणू शकते, ''तुमच्या आणि माझ्या अनुभवाकडे पाहण्याच्या दृष्टीतच एक फरक आहे. तुम्हाला कोणतीही गोष्ट संपूर्णपणे फार चटकन समजते असं वाटतं, पण ते खरं नसतं. त्यातला बराचसा भाग तुम्हाला हुलकावणी देऊन जातो आणि तुम्हाला जे कळतं ना, त्यातही तुमच्या कल्पनांचे, भासांचे रंग गडद मिसळत असतात.'' स्त्री-स्वातंत्र्य, नवरा-बायकोतील समंजसपणा आणि त्यांच्यातील निखळ प्रेम येथे स्पष्ट दिसून येते. पुरातन काळातल्या व्यक्तिरेखांकडे पहायची नवी दृष्टी अरुणाताई देतात.

 मैत्रेयी स्पष्टवक्ती असली, तरी अबोल होती. ती सदैव चिंतनातच गुंतलेली असायची. याउलट कात्यायनी भराभर बोलून मन मोकळे करणारी होती. त्यामुळे तिच्या डोळ्यांतून, हसण्यातून, एखाद्या कृतीतून तिच्या भावनांचे बोट धरून याज्ञवल्क्यांना तिच्यात उतरावे लागायचे. सुरुवातीला त्यांना हे कठीण जात होते, मात्र हळूहळू ते त्यात पारंगत झाले होते. 'आपला सर्व देहसुद्धा भाषा होतो... जर त्याची शक्ती जाणून घेतली तर... आपण फार अर्थशून्य करून टाकतो आपल्याजवळची प्रत्येक गोष्ट...' 'आपल्यादेखत एखादं सौंदर्य खुलत जावं आणि ते खुलवायला आपण साधन व्हावं, याचं सुख केवढं असतं!' 

'जर प्रकाश म्हणजे काही तरी घडणं असेल, तर अंधार म्हणजे त्या घडणीला स्थिरता देणारी एक अवस्था आहे.' 

अशी या पुस्तकात पानोपानी भेटणारी  आशयसमृद्ध वाक्ये आपल्याला थांबून विचार करायला लावतात. त्यामागचा अर्थ समजून घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही.

मैत्रेयीच्या तल्लख आणि चमकदार बुद्धीचं यथार्थ दर्शन घडविणारी ही छोटेखानी कादंबरी तिच्याबद्दलची आदरभावना कैकपटीने वाढवते.

 हे पुस्तक वाचताना आपणही त्या विश्वाचा एक भाग होऊन जातो, इतके हे लेखन प्रभावी आहे. कात्यायनी, मैत्रेयी, याज्ञवल्क्य आपल्या आजूबाजूलाच वावरत असल्याचा भास होतो. 

या पुस्तकाविषयी थोडक्यात सांगताना अरुणाताईंच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, मैत्रेयीचा वेदांपासून उपनिषदांपर्यंतचा विचारप्रवास जसा अनुभवला, तिच्या जगण्यातून तो जसा अंकुरला आणि तिने याज्ञवल्क्यांसह जाणिवांचे रंग समजुतीच्या एका नितांत आश्वासक पातळीवर जसे निरखले, त्याचे हे सुंदर शब्दांकन आहे.

शीतल खोत