रमाकांत आचरेकर क्रिकेटचं विद्यापीठ

 विवेक मराठी  05-Jan-2019

 

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घडवणारे प्रशिक्षक ही रमाकांत आचरेकर यांची सर्वांना ओळख आहे. त्यांनी आजवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक क्रिकेटपटू तयार केले. त्यामुळेच त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार आणि पद्मश्री यांसारख्या सन्मानाने गौरवलं गेलं. 2 जानेवारी रोजी आचरेकर सरांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने एक द्रष्टे, शिस्तप्रिय क्रिकेट प्रशिक्षक हरपल्याची हळहळ क्रीडा विश्वात व्यक्त होऊ लागली. आचरेकर सरांच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख.

 माकांत विठ्ठल आचरेकर हे असं नाव आहे, ज्यांनी क्रिकेटवर जिवापाड प्रेम केलं. स्वत: व्यावसायिक क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही, तेव्हा त्यांनी क्रिकेट प्रशिक्षणात जीव रमवला आणि आपल्याकडे तयार होणाऱ्या खेळाडूंना जीव लावला. अर्थातच सुरुवातीला क्रिकेटशी परिचित लोक सोडले, तर कुणालाही ते ठाऊक नव्हते.

त्यांचा एक शिष्य सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा 1989मध्ये भारतीय संघात आला, तेव्हा मात्र मीडियाने त्यांची दखल घेतली. नाही म्हणायला सचिन आणि विनोद कांबळी या त्यांच्या शिष्य जोडगोळीने शालेय क्रिकेटमध्ये 664 धावांची भागीदारी केली, तेव्हा क्रीडा पानावर त्यांच्याविषयी काही ना काही लिहून आलं होतं. पण पुढे सचिन रमेश तेंडुलकर स्टार झाला आणि तेव्हापासून रमाकांत आचरेकर सरही त्याचे स्टार कोच झाले. राष्ट्रीय मीडियाने तेव्हापासून त्यांची निरंतर दखल घेतली.

पण मुंबईमध्ये तुम्ही थोडंफार जरी क्रिकेट खेळलं असेल किंवा निदान तिथलं क्रिकेट तुम्ही पाहिलं असेल, तर सचिन प्रकाशझोतात येण्यापूर्वी पंधरा-वीस वर्षं आधीच रमाकांत आचरेकर या करडया नजरेच्या प्रशिक्षकाशी तुमची ओळख झालेली असेल. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर जिथे बॅटिंगची सगळयात जास्त नेट्स लागलेली असतील, ती म्हणजे कामथ मेमोरियल क्रिकेट क्लब असं समजायचं.

या क्लबमध्ये वक्तशीरपणाला प्रचंड महत्त्व आहे, क्रिकेटच्या तंत्रावर इथल्या लोकांची भक्ती आहे, तुमच्या सरावात काटेकोरपणा अपेक्षित आहे आणि आचरेकर सरांचा शब्द इथे शेवटचा आणि नियम असल्यासारखा आहे. (अर्थात ही आचरेकर सर असतानाची आणि ते मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत असतानाची गोष्ट आहे.) आचरेकर सरांची क्रिकेटची नजर एकदम तीक्ष्ण होती. त्यामुळे खेळाडूमधले गुण त्यांना लगेच दिसत आणि अशा खेळाडूवर मग ते मेहनत घेत. मेहनत म्हणजे निम्मा तंत्राचा सराव (नेटसमध्ये बॅटिंग) आणि निम्मा सामन्यांचा सराव. नेटसमध्ये तंत्र चुकायचं नाही आणि सामन्यात धावांना मुकायचं नाही, हा त्यांचा मंत्र. या व्यतिरिक्त खेळाडूला कुठलीही मदत करायला ते तयार असायचे. वेळ पडली तर शाळेचा अभ्यास, शाळेत प्रवेश, जेवण-खाण आणि कधीकधी आर्थिक मदतही.

बरं, बॅटिंग करताना धावण्याचा सराव, चपळता आणि झेल पकडण्याचा सराव हे अनिवार्य होतं. त्यामुळे सरांकडे तयार झालेला खेळाडू क्षेत्ररक्षणातही उजवा असे. सरांचं असं शास्त्रशुध्द क्रिकेट मॅन्युअल क्रिकेटवेडया मुंबईत अपील झालं नसतं तरच नवल. त्यामुळे कामथ क्लब सुरू झाल्यानंतर तिथे खेळाडूंचा आकडा दिवसागणिक वाढतच गेला आणि मुळातच क्रिकेटपटूंची खाण असलेल्या मुंबईत कसदार क्रिकेटपटू घडत गेले. उदाहरणं सांगायची झाली, तर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, लालचंद रजपूत, अजित आगरकर, रमेश पोवार, बलविंदर सिंग संधू, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली मंडळी. यातले तिघे जण एकाच वेळी भारतीय संघात होते. पुढे सचिन आणि अजित आगरकरही एकत्र खेळले.

मुंबईच्या क्रिकेटचा विचार केला, तर अमोल मुझुमदार, सुलक्षण कुलकर्णी, अजित रानडे, विनायक सामंत अशी अक्षरश: शेकडो नावं घेता येतील. या आणि अशा हजारो मुलांचं क्रिकेटचं तंत्र सरांनी घोटवलं, त्यांना जीवही लावला आणि वेळ पडली तेव्हा या मुलांच्या गालावर रागाने पाच बोटंही उमटवली. ही सरांची आणखी एक खासियत. कारण इथे चुकीला दयामाया नव्हती. अगदी सचिन तेंडुलकरलाही हा प्रसाद चुकलेला नाही. स्पर्धेचा अनुभव खेळाडूंना मिळण्याबद्दल ते काटेकोर होते. त्यामुळे नेट्सनंतर ते खेळाडूंना सामने खेळायला लावायचे.

सर स्वत: शारदाश्रम शाळेचे प्रशिक्षक होते. सचिन लहान असताना त्यांनी शाळेच्या ब संघातून एक सामना खेळण्यासाठी सचिनला बजावले. ब दर्जाच्या संघातून खेळण्यापेक्षा अ दर्जाच्या संघाच्या विजयी जल्लोशात सहभागी होणं सचिनला तेव्हा महत्त्वाचं वाटलं. संध्याकाळी सरांनी विचारल्यावर सीनिअर खेळाडूंची बॅटिंग बघितली, आपल्या सामन्याला गेलो नाही, असं सचिनने प्रांजळपणे सरांना सांगितलंही. सचिनचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सचिनच्या गालावर पाच बोटं उमटली. त्याच्या हातातला आईने पाठवलेला डबाही मैदानात सांडला. सचिनने अलीकडेच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. सचिनचं भलं सरांना कळत होतं. त्यामुळे खेळाडूंनी त्यांचं ऐकण्याबद्दलही ते काटेकोर होते.

विनोद कांबळी या खोडकर खेळाडूने सरांचा सगळयात जास्त मार खाल्ला असेल. एक प्रकरण तर सर्वश्रुतच आहे. मुंबईच्या एका मैदानावर सामना सुरू होता. मध्येच मैदानावर एक पतंग उडत आला. विनोदला मोह आवरला नाही आणि त्याने बॅटिंग सोडून पतंग उडवायला सुरुवात केली. संध्याकाळी सरांचा दरबार भरला, तेव्हा विनोदलाही सरांचा प्रसाद मिळाला. हा दरबार हे सरांचं आणखी एक वैशिष्टय.

सगळया खेळाडूंचा सराव किंवा सामने सुरू असताना प्रत्येकावर लक्ष द्यायला सरांना कुठे वेळ? शिवाय सीनिअर खेळाडूंना स्कूटरवर बसवून त्यांना मुंबईच्या काना-कोपऱ्यात होणाऱ्या सामन्यांना घेऊन जाणं आणि तिथे स्पर्धेचा अनुभव देणं यावरही सरांचं खास लक्ष. म्हणूनही सरावावर लक्ष द्यायला त्यांना वेळ नसे. पण म्हणून सरांचं लक्ष नाही असं एखाद्या खेळाडूला वाटलं, तर तो त्याचा गैरसमज असे. मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यातून खेळाडूंवर आणि त्यांच्या खेळण्याच्या तंत्रावर सरांची नजर असे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीच्या जीवनात त्या दिवसभरात काय घडलं ते सरांना माहीत असे. इतकंच नाही, तर कागदावर त्यांनी सूक्ष्मपणे टिपणही काढलेलं असे. त्यासाठी संध्याकाळी भरणारा हा दरबार... प्रत्येक खेळाडूच्या कुठल्या चुका झाल्या (सर चांगल्या कामगिरीचा उल्लेख क्वचितच करत. त्यामुळेच सरांनी सचिनलाही तो खेळत असताना कधी 'वेल प्लेड' म्हटलं नाही) याची सरांनी घेतलेली नोंद एखादा खेळाडू दरबारात वाचून दाखवत असे. आणि मग त्या त्या खेळाडूची कानउघडणी केली जाई... सरांच्या पध्दतीने. सर जर खेळाडूंच्या कामगिरीवर खूश असले की मात्र सामन्यानंतर किंवा दिवसभराच्या अंगमेहनतीनंतर ते त्यांना वडापाव, पाणीपुरी किंवा भेळपुरी स्वत:हून देत.

अशा प्रकारे रमाकांत आचरेकर सरांनी मागची जवळजवळ 45 वर्षं आपला क्रिकेट क्लब चालवला आणि यात मुंबई क्रिकेटच्या तीन पिढया घडवल्या. स्वत: सर तरुण असताना स्टेट बँकेच्या संघाकडून हैदराबादविरुध्द एकमेव व्यावसायिक सामना खेळले. पण सरांच्या शिष्यांनी मुंबईतलं आणि देशातलं क्रिकेट व्यापून टाकलं आहे. स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी काय लागतं, हे सरांनी ओळखलं आणि आपल्या शिष्यांमध्ये ते भिनवलं.

म्हणूनच त्यांचे कितीतरी शिष्य आज पुढे जाऊन प्रशिक्षकाची भूमिका बजावतानाही दिसत आहेत. लालचंद रजपूत काही काळ भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. शिवाय सध्या झिंबाब्वेच्या राष्ट्रीय संघाची धुरा त्यांच्याकडे आहे. रमेश पोवार मध्यंतरी राष्ट्रीय महिला संघाचे प्रशिक्षक होते, तर चंदू पंडित, प्रवीण आमरे यांनीही प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलं आहे. प्रवीण आमरे आणि अमोल मुझुमदार आयपीएल संघाचे प्रशिक्षक आहेत आणि या सगळयांकडे आलेली क्रिकेटची मूलभूत शिस्त सरांकडूनच आलेली आहे.

खेळाडूला घडवण्यामागे कुटुंबाबरोबरच प्रशिक्षकाचा मोठा वाटा असतो. पण खेळाडू प्रसिध्द झाल्यावरच प्रशिक्षकाला प्रसिध्दी मिळते. ओळख मिळते. आचरेकर सरांचे शिष्यगण यशाची पायरी चढू लागले, तेव्हाच त्यांनाही मान-सन्मान मिळाले. 1990मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार, 2010मध्ये पद्मश्री, त्याच वर्षी बीसीसीआयकडून मिळालेला जीवनगौरव किंवा ते गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर त्यांना आदरांजली वाहून त्यांची घेतलेली दखल, भारतीय संघाने त्यांच्या स्मरणार्थ काळया फिती लावून ऑॅस्ट्रेलियात मैदानात उतरण्याचा घेतलेला निर्णय हेसुध्दा त्यांच्या कर्तृत्वाची आणि योगदानाची साक्ष पटवून देतात. त्यांच्या प्रत्येक शिष्याकडे सरांच्या खास आठवणी आहेत. त्यांनी वेळोवेळी त्या मीडियाशी बोलताना त्या सांगितल्या आहेत. पण आज सरांच्या जाण्यानंतर शिष्योत्तम सचिन तेंडुलकरने त्यांना वाहिलेली श्रध्दांजली एका अर्थाने महत्त्वाची आहे. सचिन म्हणाला, ''आज दैवलोकातलं क्रिकेट समृध्द झालं.'' सर आता स्वर्गात असणार म्हणून ही ओळ. याचाच दुसरा अर्थ सचिनला ही खात्री आहे की सरांचं क्रिकेटवर इतकं प्रेम आहे की स्वर्गातही ते क्रिकेटच खेळणार.

[email protected]