यवतमाळचे साहित्यप्रवाह

 विवेक मराठी  07-Jan-2019

 

भाषिक आणि व्यवहारदृष्टया वऱ्हाडी बोलीसह संमिश्र असलेली जीवनपध्दती हे यवतमाळ जिल्ह्याचे वैशिष्टय आहे. त्यामुळेच इथल्या मातीचा गंध साहित्यात प्रतिबिंबित झाला आहे. यंदाच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील साहित्यविश्वाचे काही ठळक नोंदी आणि परिचयात्मक असे या लेखाचे स्वरूप आहे. प्रस्तुत लेखाची मांडणी करताना पूर्वार्धातील साहित्यनिर्मिती आणि आधुनिक काळातील साहित्यप्रवाह अशी विभागणी केलेली आहे.

आदिम लोकसमूहाचे वसतिस्थान' अशी ओळख असलेला यवतमाळ जिल्हा साहित्यनिर्मितीतही अग्रेसर आहे. जगण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पडेल ती कामे करणारी इथली माणसे साधी भोळी आहेत. भाषिक आणि व्यवहारदृष्टया वऱ्हाडी बोलीसह संमिश्र असलेली जीवनपध्दती हे या जिल्ह्याचे वैशिष्टय आहे. त्यामुळेच इथल्या मातीचा गंध साहित्यात प्रतिबिंबित झाला आहे. या जिल्ह्याला संशोधनाची समृध्द परंपरा आहे आणि परिवर्तनाच्या चळवळीचे भान आहे. त्यामुळे साहित्यातील जीवनजाणिवांचे विविध प्रवाह इथे प्रवाहित राहिलेले आहेत. वास्तविकत: साहित्याचे मूल्यमापन हे प्रादेशिक सीमांवर आधारित करू नये, मात्र त्यात भौगोलिक कक्षेत काय चालले आहे या दृष्टीने अशी प्रादेशिक मांडणी करावी लागते. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने काही ठळक नोंदी आणि परिचयात्मक असे या लेखाचे स्वरूप आहे. प्रस्तुत लेखाची मांडणी करताना पूर्वार्धातील साहित्यनिर्मिती आणि आधुनिक काळातील साहित्यप्रवाह अशी विभागणी केलेली आहे. अशा रितीने पूर्वार्ध ते वर्तमान असा एक ढोबळ आढावा या लेखात घेतलेला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील साहित्याचे परिशीलन करताना प्र.रा. देशमुख यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. मुळात त्यांनी इतिहासाचे लेखन केले. मात्र इतिहास आणि भाषा यांचा अन्योन्य संबंध लक्षात घेता आणि प्र.रा. देशमुख यांच्या संशोधनाचा आवाका पाहता यवतमाळचा वाङ्मयीन इतिहास त्यांच्यापासून सुरू होतो. 'इंडस सिव्हिलायझेशन इन द ऋग्वेदाज' या ग्रंथात त्यांनी सिंधू संस्कृती सिध्दान्त मांडला. त्याचबरोबर भाषिकदृष्टयाही त्यांचे कार्य महत्त्वाचे होते. त्यांनी सिंधू संस्कृती काळातील सात मुळाक्षरांचे वाचन आणि भाषेचे शास्त्रीय विवेचन केले. कोणत्याही काळातील भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास तपासावयाचा असेल, तत्कालीन पुराव्याची सत्यता पडताळणी करायची असेल तर संशोधन केंद्राची गरज असते. यवतमाळ येथे डॉ. य.खु. देशपांडे यांनी हे महत्त्वाचे काम केले. त्यांनी शारदाश्रम संशोधन केंद्राची स्थापना केली. याद्वारे त्यांनी महानुभाव साहित्याचा मूलगामी अभ्यास केला. महानुभाव पंथातील सांकेतिक लिपीसाठी पंजाब ते पेशावर असा प्रवास करून पोथ्यांचे संशोधन व संकलन केले. यातूनच 'परिसिध्दांत सूत्रपाठ' हा ग्रंथ आकारास आला. तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंतच्या महानुभाव ग्रंथकारांची माहिती असलेला 'महानुभावीय मराठी वाङ्मय' हा ग्रंथ महानुभव संशोधनकर्त्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. वा.ना. देशपांडे यांनीही संशोधनाची हीच दृष्टी अनुसरली. त्यांनी 'आद्य मराठी कवयित्री' आणि 'स्मृतिस्थळ' या ग्रंथांचे संशोधन-संपादन केले. याशिवाय 'पिकासोच्या कबुतराने', 'आराधना', 'कोरकू', 'उत्तरायण', 'लघुरामायण', 'अनामिका' हे त्यांचे कवितासंग्रह आहेत. याच काळातील कवी गु.ह. देशपांडे हे नाव महत्त्वाचे आहे. 'निवेदन' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'कोणता मानू मी चंद्रमा भूवरीचा की नभीचा' ही कविता महाराष्ट्रभर गाजली होती.

 


कृषिजाणिवांचा वऱ्हाडी बोलीतील एक सशक्त आविष्कार म्हणून पांडुरंग श्रावण गोरे यांचा उल्लेख करावा लागतो. 'कात टाकलेली नागीण' ही कादंबरी वऱ्हाडी माणसाचे जीवन आणि भाषा समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. ग्रामीण परिसराचे, तेथील सांस्कृतिक घटकांचे, शेतकऱ्यांचे भावजीवन, त्यातील ताणतणाव त्यांनी 'बोबडे बोल', 'वाणीचा हुरडा', 'बोरकूट', 'सरवा' या काव्यसंग्रहांतून उलगडून दाखविले. 'मेल्यावरी मला का लाजवता' ही त्यांची कविता मुखवटयांच्या आत असलेल्या ढोंगाची चिरफाड करते. कादंबरीकार आणि नाटयलेखक म्हणून प्रा. शरच्चंद्र टोंगो परिचित आहेत. 'चौथे पत्र', 'आतडयाची जखम', 'अखेरची इच्छा', 'रविवार ते रविवार', 'अशोक हॉटेलातली दुसरी खोली' या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. त्यांनी 'नव्या डहाळया, नवे खोपे' हे नाटकही लिहिले. रंजनपर आणि पारंपरिक असे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. कळंब येथील भाऊ मांडवकर यांच्या 'माझी चाळीस भावंडं', 'वंचना', 'काय गुन्हा केला' या कादंबऱ्या आहेत. रंजन आणि भाबडा आशावाद असे याही कादंबऱ्यांचे सरळधोट स्वरूप आहे. त्यांनी काव्यलेखन, कथालेखनही केले; परंतु लोकगीतांचे संकलन हे त्यांचे फार मोठे काम आहे. कोलाम ही यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात आहे. या जमातीच्या भाषिक-सांस्कृतिक योगदानावर त्यांनी मूलगामी संशोधन केले. डॉ. सिंधू मांडवकर यांच्या 'सल', 'वेदना', 'चिंतन' या कथासंग्रहांत मानवी जगण्याचे ताणतणाव आहेत. 'वक्ता दशसहस्रेशु' अशी ओळख लाभलेले रामभाऊ शेवाळकर यांनी आपल्या वाणी आणि शब्दांद्वारे वाङ्मयातील आशय-अभिव्यक्तीची सौंदर्यस्थळे उलगडून दाखविली. रसपूर्ण आणि तात्त्वि असा संयोग त्यांच्या व्याख्यानात असायचा. 'त्रिदळ', 'अग्निमित्र', 'रुचिभेद' या त्यांच्या समीक्षाग्रंथांत त्याचा प्रत्यय येतो. संयत भावशैलीत लेखन करणाऱ्या कादंबरीकार म्हणून डॉ. संजीवनी देशमुख परिचित आहेत. 'स्वप्नात नाही आले', 'ही तर मीरा गाते', 'विफला', 'अग्निफुले', 'अपरिमिता' या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. डॉ. गोविंद देशपांडे यांनी वा.ना. देशपांडे यांच्या साहित्यावर संशोधन केले. डॉ. शरदचंद्र कळणावत यांचे संशोधनपर आणि ललित लेखन महत्त्वाचे आहे. उत्तम वक्ते आणि ठाम भूमिका हे त्यांचे वैशिष्टय होय. डॉ. वि.भि. कोलते संशोधन केंद्राद्वारे अनेकांना लिहिते करणारे अनेकांच्या आयुष्याचा आधार झालेले डॉ. रमाकांत कोलते हे अजातशत्रू म्हणून परिचित आहेत. त्यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथांच्या प्रस्तावनांतून, अध्यापनातून आणि विदर्भ साहित्य संमेलनाच्या, तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनातून त्यांनी चैतन्याचा स्नेहदीप सतत ठेवला आहे.

स्वातंत्र्योत्तर कालखंडात डॉ. दत्तात्रेय हरी उपाख्य बापूसाहेब अगि्होत्री यांचे मराठी भाषिकांच्या उच्चारण संशोधनात मौलिक योगदान आहे. व्युक्तीशास्त्राची ओढ असलेल्या डॉ. अगि्होत्री यांनी 'मराठी वर्णोच्चार विकास' यावर संशोधन केले. प्रस्तुत पीएच.डी. प्रबंध ग्रंथरूपाने प्रसिध्द झाला. 'महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्वि अधिष्ठान' या ग्रंथातही त्यांनी मराठी समाजजीवनाची प्रारंभापासून सांस्कृतिक जडणघडण विशद केली. याशिवाय मराठी शब्दकोशाचे पाच खंड त्यांनी प्रकाशित केले. डॉ. अगि्होत्री यांचे हे संशोधन भाषा अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेरपरसोपंत, वणी या ग्रामीण परिसरात सुरुवातीच्या काळात प्राचार्यपद भूषविलेले व संशोधनात मौलिक योगदान असलेले डॉ. अगि्होत्री साहित्यक्षेत्रात उपेक्षित राहिले, असे म्हणावे लागते.

साहित्य संशोधनात डॉ. मा.गो. देशमुख यांचे योगदान आहे. विशेषतः साहित्यशास्त्रावरील 'मराठी साहित्यशास्त्र' हा प्रबंध महत्त्वाचा आहे. त्यांनी 'भावगंध', 'संत नामदेव', 'एकावळी' आदी ग्रंथ लिहिले.

प्रत्येक काळातली बदललेले सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण साहित्यातून आविष्कृत व्हायला हवे, या गृहीतकावर यवतमाळ जिल्ह्याच्या साहित्यविश्वाचे अवलोकन करताना 'माइल स्टोन' निर्मिती झाली नाही, ही नम्र नोंद करणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर, साठोत्तर, नव्वदोत्तर या काळात मानवी जीवनात प्रचंड उलथापालथ झाली. स्वातंत्र्यानंतर आकांक्षांचा भ्रमनिरास झाला, सर्व काळात जातींच्या तटबंदी अधिक मजबूत झाल्या आणि माणसामाणसातील दरी रुंदावली. जातीय विद्वेष वाढला. जागतिकीकरणाने सामान्य माणूस होरपळून निघाला. या सगळया पार्श्वभूमीवर, यवतमाळ जिल्ह्यातील साहित्यनिर्मिती अनुकरणात्मक राहिलेली आहे. एक विशिष्ट 'पोझ' घेऊन साहित्यिक लिहीत राहिले. अवहेलनेच्या कर्जापायी केलेल्या आत्महत्यांचे वास्तव समोर उभे असताना जिल्ह्यातील निर्मिती 'साचेबध्द' राहिली. या मातीचे समूहभानाचे 'स्वतंत्र रूप' दिसत नाही. तरीही काही निर्मितीने वेगळेपण जपले. त्या त्या काळात आपली नाममुद्रा उमटविली. शंकर बढे यांचे व्यक्तिचित्रण आणि कविता वऱ्हाड मानस चित्रित करणारे होते. त्यांची कविता हसविता हसविता अंतर्मुख करणारी होती. कवी विठ्ठल वाघांबरोबर शंकर बढेंनी वऱ्हाडी बोलीला महाराष्ट्रभर पोहोचविले. 'इरवा', 'मुगुट', 'सगुन' आदी कवितासंग्रहांतून वऱ्हाडी सांस्कृतिक जनमानस चित्रित केले. शिवा राऊत यांचा 'अक्षरउत्सव' आणि 'सांजदिव्यांचे हंबर' या कवितासंग्रहांतील कवितांत वेगळी झळाळी आहे. त्यांनी अनोख्या प्रतिमांतून सभोवतीचे भावविश्व साकारले आहे. गजेश तोंडरे यांच्या 'तिच्या आणि माझ्या कविता' याच धाटणीच्या आहेत.

 


छंदबध्द, सौंदर्यलक्षी अशी काव्यनिर्मितीही विपुल आहे. या दृष्टीने शरद पिदडी यांचा 'अलबेली', 'नाद अंतरातला' हे काव्यसंग्रह, 'अंधाराला अंत आहे', 'सृजन' हे वसंत गिरटकरांचे काव्यसंग्रह, विनोदासाठी किश्श्यांची पेरणी करीत महाराष्ट्रभर विनोदी कार्यक्रम करणारे डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे 'ऊठ आता गणपत', 'धुयमाती' हे काव्यसंग्रह, विनय मरासे यांचे 'प्राणधून', 'अग्निकुंभ', 'दहेफूल', 'छिन्न जिवांचा हाका', 'इतके जगून कळले' आदी काव्यसंग्रह नोंद घेण्यासारखे आहेत. आशा दिवाण, शुभदा मुंजे, विजया एंबडवार या कवयित्रींनी आपल्या संवेदना कवितेतून व्यक्त केल्या आहेत.

मराठी शायरी कशी असावी, याचा वस्तुपाठ भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीने दिला. 'जिंदादिल शायर' म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. 'मराठी शायरी', 'मराठी मुशायरा', 'मैफील', 'जिंदादिल' आणि 'दोस्तहो' हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. शायरीच्या या बादशहामध्ये 'सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे। तो कवींचा मान इतुकी पायरी माझी नव्हे।' ही नम्रताही आहे.

वऱ्हाडी बोलीतून माणसाचे सांस्कृतिक-सामाजिक जगणे सजीव करणारे श्याम पेठकर हे मातीशी इमान राखणारे लेखक आहेत. त्यांच्या साहित्यकृतीतील व्यक्तिमत्त्वे या परिसराचा जीवनरस घेऊन साकारलेली असतात, म्हणून ती 'आपली' वाटतात. त्यांचे 'रगतपिती' हे नाटक हृदयाचा ठाव घेणारे होते. त्यांनी 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाचे पटकथालेखन केले. 'तेरवं' हे आत्महत्याग्रस्त कुटुंबाची व्यथा व्यक्त करणारे त्यांचे नाटक अलीकडेच रंगभूमीवर आले आहे.

साठोत्तरी दलित जाणिवेच्या साहित्याने समग्र जगाला हादरवून टाकणारे अनुभव शब्दबध्द केले. कथात्म वाङ्मयातील आणि काव्यनिर्मितीतील दाहकता मराठीला अनोखी होती. प्रस्थापित मूल्यांना धडाका देत हे साहित्य पुढे आले. यवतमाळ जिल्ह्यात आंबेडकरवादी कविता प्रसंगोपात कविसंमेलनातून सादर होत होती. काव्यसंग्रहाच्या रूपाने ती नव्वदनंतरच आली. कृतिशील आंबेडकरी चळवळीतील प्रज्ञावंत प्राध्यापक म्हणून डॉ. सागर जाधव परिचित आहेत. 'उजेड' हा त्यांचा कवितासंग्रह आहे. आत्यंतिक करुणेने भारलेली त्यांची कविता आहे. वामनदादा कर्डक यांचे काव्यमय जीवनचरित्र आणि त्यांच्या गझल, गाणी यांचे मौलिक संपादन त्यांनी केले आहे. त्यांच्या माध्यमाने एक ऐतिहासिक कार्य होत आहे. विद्रोहाचा वणवा ज्यांच्या आशय अभिव्यक्तीत पेटलेला असतो, अशा एका सच्च्या कार्यकर्त्याची कविता म्हणजे आनंद गायकवाड यांची कविता होय. 'आखरीचं तुव्हंचं सडान चिबवीन', 'इस्तो', 'हिंदाण' हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. वंचितांच्या बोलीला आणि दाहक अनुभवाला आनंद गायकवाड यांनी विद्रोही काव्यरूप दिले. दु:खाची भीषणता वाटयाला येऊनही नव्या दिशेचा वेध घेणारा विनोद बुरबुरे हा कवी होय. 'उत्क्रांतलेणी', 'मी पुन्हा उगवतो' हे त्यांचे कवितासंग्रह आहेत. भाषिक विविधता आणि सांविधानिक आशय ही त्यांच्या कवितेची वैशिष्टये आहेत. याशिवाय सुप्रसिध्द चित्रकार बळी खैरे यांच्या 'युध्दपोत' या आणि प्रशांत वंजारे यांच्या 'शरसंधान' या काव्यसंग्रहांत सामाजिक डोळस भान व्यक्त झाले आहे.

प्रा. माधव सरकुंडे हे इंग्लिशचे प्राध्यापक आहेत. त्यांनी आपल्या कथा-कविता-कादंबरीतून आदिवासी जनजीवन रेखाटले. आदिवासींना त्यांच्या मरणप्राय यातनांतून आंबेडकरवादी विचारच सोडवू शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे. बाबाराव मडावी यांची 'टाहो' ही कादंबरीसुध्दा असाच परिवर्तनाचा विचार अधोरेखित करते. बदलत्या गावाचे रूप, शेती आणि शेतकऱ्यांचे जगणे भेदक रितीने मांडणारे डॉ. देवेंद्र पुनसे हे महत्त्वाचे कथाकार आहेत. 'पांढरं सोनं', 'पोळा आणि बाहुली', 'चंद्र आहे साक्षीला' हे त्यांचे कथासंग्रह आहेत. सभोवतीचे वास्तव अतिशय सूक्ष्मपणे चित्रित करण्याचे सामर्थ्य त्यांना लाभलेले आहे. लक्ष्मीकांत घुमे, कलिम खान, आत्माराम कनिराम राठोड यांनी लक्षणीय कविता लिहिली. आत्माराम कनिराम राठोड यांचे 'तांडा' हे आत्मकथन सामाजिक दस्तऐवज म्हणून महत्त्वाचे आहे.

आनंदकुमार आडे याने 'गझलचे छंदशास्त्र' लिहिले. परंतु त्यांच्या काळात गझल बहरली नाही. अलीकडे मात्र सिध्दार्थ भगत, आबेद शेख, किरणकुमार मडावी, विनोद बुरबुरे, प्रा. रविप्रकाश चापके, अनिल कोसे, गजानन वाघमारे, जयकुमार वानखडे आशयसंपन्न तंत्रशुध्द गझल लिहीत आहेत. सामाजिक समतेचे सूचन हे यांच्या गझलेचे सूत्र आहे. आंबेडकरवादी गझल अशी ओळख निर्माण करणारे सिध्दार्थ भगत यांचे 'युध्दयात्रा', 'यापुढे माझी लढाई', 'अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी', 'आणि पुन्हा एकदा बुध्द हसावा म्हणून' आदी गझलसंग्रह प्रसिध्द आहेत.

विविध वर्तमानपत्रांत, वाङ्मयीन मासिकांत नव्याने स्वागत आणि आशयनिष्ठ समीक्षा लिहिणारे डॉ. अजय देशपांडे हे आजचे समीक्षक आहेत. 'युगवाणी'चे त्यांनी पाच वर्षे संपादन केले. या काळात त्यांनी वाङ्मयीनदृष्टया संपन्न संपादन केले. साहित्यातील 'सामर्थ्याचा स्वर', 'समीक्षेचा अंत:स्वर', 'समीक्षेची अपरूपे, उलगडून दाखविणारे देवानंद सोनटक्के हे या काळाचे तरुण समीक्षक आहेत. डॉ. अशोक राणा यांनी संतसाहित्याचा आणि प्राक्कथांचा नवा अन्वयार्थ सांगितला आहे.

याशिवाय यवतमाळच्या भूमीत निर्माण झालेले पण आशयाचा मोठा अवकाश असलेले लक्ष्मीकांत घुमे, मन्सुर एजाज जोश, दिनकर वानखेडे, सुभाष परोपरे, दशरथ मडावी, डॉ. अजितसिंह चाहल, नीलकृष्ण देशपांडे इत्यादींची निर्मिती महत्त्वपूर्ण आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील साहित्यनिर्मितीच्या ठळक नोंदी या लेखात घेतलेल्या आहेत. त्यात सर्वंकष नोंदी आहेत, असा माझा दावा नाही. प्रस्तुत लेख म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचा अंतिम वाङ्मयीन इतिहास नव्हे, हा केवळ आढावा आहे. त्यामुळे काही नावे सुटली असतील, तर मोठया मनाने समजून घ्याल ही अपेक्षा दिलदार यवतमाळकरांकडून करायला हरकत नाही.

डॉ. शांतरक्षित गावंडे

9404851818