अध्यक्षपदाच्या मानकरी

 विवेक मराठी  07-Jan-2019

 

ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ येथे 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. आजवर झालेल्या 91 साहित्य संमेलनात केवळ चारच महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चौघींनाच हा अध्यक्षपदाचा मान मिळाला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केले. 1878मध्ये न्या. रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत पहिले ग्रंथकार संमेलन भरले. दुसरे 1885मध्ये बुधवार पेठेतील सार्वजनिक सभेच्या जोशी सभागृहामध्ये कृष्णाशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. तिसरे संमेलन 1905मध्ये सातारा येथे रघुनाथ पांडुरंग करेरीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. हे संमेलन अनेकदा काही कारणांमुळे खंडित होत होते. एखाद्या संस्थेची स्थापना करून त्या संस्थेमार्फत या संमेलनाचे आयोजन केले, तर संमेलनांमध्ये खंड पडणार नाही आणि मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतनाचे आणि संवर्धनाचेही काम अशा प्रकारची संस्था करेल, असा विचार पुण्यात भरलेल्या चौथ्या गं्रथकार संमेलनात झाला. 26 आणि 27 मे 1906 रोजी प्रसिध्द कवी गो.वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात नागनाथ पाराजवळच्या मळेकर वाडयात चौथे ग्रंथकार संमेलन भरले होते. लोकमान्य टिळक, न.चिं. केळकर, चिंतामणराव वैद्य, विसुभाऊ राजवाडे, रेव्हरंड टिळक या संमेलनात सहभागी झाले होते. 27 मे रोजी समारोपाच्या वेळी न.चिं. केळकर यांनी, ''महाराष्ट्र साहित्य परिषद' आज रोजी स्थापन झाली आहे'' अशी घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी उठून या घोषणेला पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेमागचा हा इतिहास आहे.

1961मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. त्या वेळी ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. महामंडळाच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ, नागपूर अशा चार घटक संस्थांचा संघ असे त्याचे स्वरूप होते. मराठी भाषेसंबंधी असलेल्या आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या समान प्रश्नांवर विचार करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, एकाच व्यासपीठावरून त्या प्रश्नांची सोडवणूक करणे, त्यासाठी समाजाच्या आणि शासनाच्या पातळीवर प्रयत्न करणे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेमागचे उद्दिष्ट होते. त्यातही भाषेच्या प्रश्नाला अग्रक्रम देण्यात आला होता. दत्तो वामन पोतदारांबरोबरच विदर्भ साहित्य संघाचे ग.त्र्यं. माडखोलकर, मराठवाडा साहित्य परिषदेचे अनंत भालेराव, भगवंतराव देशमुख, नरहर कुरुंदकर आणि मुंबई मराठी साहित्य संघाचे वा.रा. ढवळे आणि श्री.शं. नवरे हे साहित्य महामंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते.


महामंडळाच्या स्थापनेच्या वेळी महामंडळाने अखिल भारतीय मराठी भाषकांची साहित्य संमेलने भरविण्याचे काम हाती घ्यावे असे आपल्या घटनेत नमूद केले. त्यानुसार 1965च्या सुरुवातीला संमेलनाची योजना पूर्ण करून ते काम महामंडळाने आपल्या हाती घेतले. या योजनेनुसार डिसेंबर 1965मध्ये प्रा. वा.ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबादला जे संमेलन भरले होते, ते साहित्य महामंडळाचे पहिले संमेलन. त्यापूर्वी 1964पर्यंतची साहित्य संमेलने भरविण्याचे महत्त्वाचे काम महाराष्ट्र साहित्य परिषदेने केले.

1964 साली कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगाव (गोवा) येथे भरलेले संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेले शेवटचे संमेलन. आपली साहित्य संमेलने उदारपणे गणनेसाठी साहित्य महामंडळाला देऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेने मोठाच त्याग केलेला आहे. त्यामुळे संमेलनांची गणना होती तशीच कायम राहिली. म्हणूनच हैदराबादचे संमेलन हे महामंडळाचे पहिले संमेलन असूनही ते सेहेचाळिसावे संमेलन ठरले.

ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ येथे 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. आजवर झालेल्या 91 साहित्य संमेलनात केवळ चारच महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला. कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चौघींनाच हा अध्यक्षपदाचा मान मिळाला.

कुसुमावती देशपांडे

1961 साली कुसुमावती देशपांडे ग्वाल्हेर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. कथाकार, ललित निबंधकार, समीक्षक आणि कवयित्री म्हणून कुसुमावतींनी साहित्यविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा जन्म कोल्हापूर संस्थानातील जलालपूरचा. नागपूर विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने बी.ए. उत्तीर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेश व विदर्भ सरकारची खास शिष्यवृत्ती मिळवून लंडन येथील वेस्टाफिल्ड कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी त्या गेल्या. तिथे इंग्लिश साहित्य हा विषय घेऊन त्यांनी बी.ए. (ऑनर्स) पदवी प्राप्त केली. नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयामध्ये इंग्लिशच्या प्राध्यापिका म्हणून त्यांची नेमणूक झाली. विदर्भातील प्रख्यात वकील रा.ब. रामकृष्ण रावजी जयवंत यांच्या कन्या असलेल्या कुसुमावती मुळातच बुध्दिमान होत्या.

फर्ग्युसन महाविद्यालयात असताना कवी अनिल यांच्याशी त्यांचा परिचय झाला. या परिचयाचे स्नेहात आणि नंतर प्रेमात रूपांतर झाले. आंतरजातीय विवाहाला घरातून खूप विरोध झाला. त्या लंडनहून परतल्यानंतर त्यांचा विवाह झाला. 1931 सालच्या सप्टेबरच्या किर्लोस्करमध्ये 'मृगाचा पाऊस' ही त्यांची कथा प्रसिध्द झाली. ती त्यांची पहिली कथा. त्यांनी 48 कथा लिहिल्या. चिंतनशीलता, काव्यात्मता आणि अर्थपूर्णता हे त्यांच्या कथांचे विशेष होते. 1958 साली रा.ज. देशमुख प्रकाशनाने त्यांच्या निवडक 31 कथांचा 'दीपमाळ' हा संग्रह प्रसिध्द केला. त्याला वि.स. खांडेकरांची विस्तृत प्रस्तावना लाभली. ना.सी. फडके, वि.स. खांडेकर, अनंत काणेकर ज्या काळात लघुनिबंध लिहीत होते त्याच काळात 'माध्यान्ह', 'मध्यरात्र', 'मोळी', 'चंद्रास्त', 'एक संध्याकाळ - चिंतनिका' असे पाच ललित निबंध कुसुमावतींनी लिहिले. वाङ्मयाचा आस्वाद, वाङ्मयीन समीक्षेचे निकष, वाङ्मयीन समीक्षा, सौंदर्याची नवप्रचिती, नवसाहित्याचे काही प्रश्न हे त्यांचे महत्त्वाचे समीक्षा लेख. 'पासंग' हा त्यांच्या समीक्षा लेखांचा समीक्षाग्रंथ प्रकाशित झाला. कुसुमावतींनी मुंबई मराठी साहित्य संघात वा.म. जोशी स्मृती व्याख्यानमालेत दिलेल्या व्याख्यानांवरून 'मराठी कादंबरी - पहिले शतक' हा ग्रंथ दोन भागांत प्रकाशित झाला. रमाबाई रानडे यांच्या 'आमच्या आयुष्यातील आठवणी' या आत्मचरित्राचा त्यांनी इंग्लिशमध्ये अनुवाद केला. साहित्य अकादमीने 'Marathi Sahitya' या शीर्षकाने मराठी साहित्याचा आढावा घेणारे त्यांचे इंग्लिशमधील पुस्तक प्रकाशित केले. साहित्य अकादमीच्या सल्लागार मंडळातल्या त्या निमंत्रक सदस्य होत्या. बडोदा साहित्य संमेलन (1948), मुंबई उपनगर साहित्य संमेलन (1958) या संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. 1922 ते 1927 या काळात त्यांचा आणि अनिलांचा झालेला पत्रव्यवहार 'कुसुमानिल' या शीर्षकाने ह.वि. मोटे प्रकाशनाने प्रकाशित केला.

1961 साली ग्वाल्हेरला साहित्य संमेलन घ्यायचे निश्चित झाले, तेव्हा अध्यक्ष निवडणाऱ्यांसाठी झालेल्या बैठकीत कुसुमावतींच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यापूर्वी 1958 साली मालवणला झालेल्या 40व्या संमेलनाचे अध्यक्ष होते कवी अनिल. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेले एकमेव पतिपत्नी म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली.

26 ऑक्टोबर 1961 रोजी कुसुमावतींच्या अध्यक्षतेखाली 43वे साहित्य संमेलन सुरू झाले ते ग्वाल्हेरच्या सयाजी बोर्डिंग हाउसच्या पटांगणात. मध्य प्रदेशचे राज्यपाल हरिभाऊ पाटसकर संमेलनाचे उद्घाटक होते. कुसुमावतींच्या अध्यक्षीय भाषणातील विचार रसिकांच्या आणि जाणकारांच्या चिंतनाचे विषय बनले. आपल्या भाषणात त्यांनी कलावंतांची बाजू समजावून दिली. ''प्रत्यक्ष निर्मितीच्या क्षणी काही कलाविचार किंवा समीक्षातत्त्वे कलावंतांच्या मनात जागत असतातच असे नाही. कवी हा थोडाच वेळ काव्यव्यापारात गुंतलेला असतो. बाकीचा त्याचा काळ सर्वसाधारण माणूस या नात्याने जगण्यातच जातो. त्या त्याच्या जीवनात जी मूल्ये मान्य झाली असतील, ज्या विचारांनी त्याचे अंतर्मन संस्कारित झाले असेल, ज्या भावभावनांनी तो जीवनाशी निगडित झाला असेल, त्या सर्वांचा परिणाम त्याच्या कला विचारांवर होतो. त्यांनी त्याच्या कलेचे स्वरूप व प्रयोजन निश्चित होते'' असे त्यांनी प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे समीक्षकांचे या साऱ्यांकडे बघणे कसे असते याविषयी त्या सांगतात - ''कलेच्या समीक्षेसाठी केवळ एका व्यवच्छेदक लक्षणाला मान्यता देऊन चालत नाही. तिच्या सौंदर्याची जाणीव ठेवावी लागते, तशीच तिच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या मनोविश्वाची उकलही करावी लागते. ज्या भूमीतून, ज्या परिस्थितीतून ती उदयाला आली असेल, तिची ओळख करून घ्यावी लागते आणि अखेर जीवनमूल्यांच्या निकषावर तिची पारख करणे गरजेचे ठरते. या सर्व समीक्षातत्त्वांचा आश्रय केल्याखेरीज तिचा सर्वांगीण आस्वाद घेणे शक्य होत नाही!

अभिजात साहित्यकृतींमध्ये निर्मात्याचे मन केवळ व्यक्तिमत्त्वाच्या क्षणिक छटांच्या चित्रणाच्या पलीकडे जाऊन काही श्रध्दांचा शोध घेत असते. ते रेषांचा घाट आणि लयबध्द आकृती यात निमग्न राहत नसून जीवनातील सुसंगतींचा व विसंगतींचा मागोवा घेत असते. त्याला जीवनातील सौंदर्याचे दर्शन घडते, म्हणून त्याची निर्मिती सुंदर बनते. त्याची दृष्टी जितकी बहिर्मुख असते, तितकीच तीव्रपणे अंतर्मुख असते. जणू आपल्याच अंतर्यामीच्या चांदण्याच्या तलावात ती न्हाऊन निघालेली असते आणि त्या चांदण्यातले तेज त्या दृष्टीवाटे परिसरावर पसरते. आपल्या डोळयांनी ते इतरांना विश्वाचे दर्शन घडविते आणि त्यांना विश्वोत्तीर्णही करते'' अशा शब्दांत त्यांनी निर्मिती प्रक्रिया उलगडून दाखविली. संमेलनापूर्वी पुण्यात पानशेतच्या पुराने हाहाकार उडविला होता. त्यात लेखक-प्रकाशकांनाही चांगलीच झळ सोसावी लागली होती. त्याचेही पडसाद कुसुमावतींच्या भाषणात उमटले.

दुर्गा भागवत

1975 साली कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत यांनी भूषविले. संशोधक, ललित गद्यकार, अनुवादक, संपादक आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून दुर्गा भागवत यांनी केलेले काम अतुलनीय आहे. व्रतस्थ ज्ञानोपासकांच्या परंपरेतील दुर्गाबाईंचे स्थान खूप वरचे आहे. ज्ञानलालसा, सनातन विषयांचा शोध घेण्याची वृत्ती, वैचारिक स्वातंत्र्यप्रियतेला मिळालेली चिंतनाची जोड, अफाट व्यासंग, लेखनातील आशयसंपन्नता यामुळे दुर्गाबाईंचे वाङ्मयीन व लौकिक व्यक्तिमत्त्व समाजमनावर ठसा उमटवून गेले.

संस्कृत व इंग्लिश विषय घेऊन बी.ए.ची पदवी वर्गात संपादन करणाऱ्या या दुर्गाबाईंनी बौध्द भिक्षूंच्या मठजीवनाशी संबंधित विषय एम.ए.साठी घेतला होता. त्या वेळी त्यांनी पाली व अर्धमागधी भाषांचा अभ्यास केला होता. 'आदिवासी व हिंदू धर्म यांचे नाते' या विषयावर संशोधन करताना त्यांनी मध्य भारतातील आदिवासी भाग अभ्यासदौरे करून पिंजून काढला. गोंड व इतर आदिवासींच्या भाषा शिकून घेतल्या. 1950 साली साने गुरुजींच्या आग्रहावरून त्यांनी साधना साप्ताहिकात लिहायला सुरुवात केली. पहिला लेख होता 'वाळूतील पावले'. त्यातूनच पुढे बारा महिन्यांचे, सहा ऋतूंचे बदलते रूप दाखविणारे 'ऋतुचक्र' शब्दबध्द झाले. 'भावमुद्रा', 'न्यायपर्व', 'रूपरंग', 'पैस', 'डूब', 'प्रासंगिका', 'लहानी' या त्यांच्या ललित लेखसंग्रहांनी मराठी साहित्याचे दालन समृध्द केले. 'लोकसाहित्याची रूपरेखा' या ग्रंथातून त्यांनी लोकसाहित्याच्या व्यापकतेची जाणीव करून दिली. 'धर्म आणि लोकसाहित्य' हे त्यांचे पुस्तक मोलाचे आहे. 'महानदीच्या तिरावर', 'तुळशीचे लग्न', 'बालजातक', 'पाली प्रेमकथा' हे दुर्गाबाईंचे कथासंग्रह चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारे आहेत. भारतातल्या विविध भाषांमध्ये प्रचलित असणाऱ्या लोककथा त्यांनी मराठीत आणल्या. त्याचे चाळीस भाग प्रसिध्द झाले.

अशा दुर्गाबाईंची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संमेलनाच्या आठवडाभर आधी 'मुंबई मराठी साहित्य संघा'ने त्यांचा सत्कार केला. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर दुर्गाबाईंनी सडेतोड विचार मांडले. त्या म्हणाल्या, ''मुक्त विचार ही श्रेष्ठ आणि पवित्र शक्ती आहे. कोणत्याही बंधनांनी बांधलं जाणं हे सर्वस्वी त्याज्यच समजलं पाहिजे. सत्ताधीशांनी निर्माण केलेल्या शृंखला या अखेर सर्वंकष ठरतात. त्या प्रथम प्रेमसंबंध म्हणून स्वीकारल्या तरी जाचक ठरतात. कालांतराने हे बंधन विनाश बंधन ठरतं. म्हणून बुध्दिमंतांनी, पंडितांनी प्रेमबंध म्हणूनसुध्दा या शृंखला स्वीकारू नयेत. लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात. विचार मेले की संस्कृती धोक्यात येते नि विकृतीला प्रारंभ होतो. म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यासाठी विचार, मुक्त विचार हे अपरिहार्य मानले पाहिजेत.''

कराडच्या संमेलनात दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीविरोधात तीव्र लढा उभा करणाऱ्या जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्वांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले. आणीबाणीच्या निर्णयावर टीका करणाऱ्या आणि लेखकाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या वृत्तीचा ठामपणे विरोध करणाऱ्या दुर्गाबाईंनी अध्यक्षीय भाषणात परखड भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ''डोळयासमोर घडणाऱ्या घटनांना आम्ही साहित्यबध्द करू शकत नाही ही साहित्याची अपरिमित हानी आहे. आधीच विसावं शतक मागल्या सर्व शतकांपेक्षा मानवाला अधिक उत्तेजित करणारं, क्षोभांनी भरलेलं शतक आहे. ज्ञानाची क्षितिजं हरघडी रुंदावत आहेत. हिंसाही वाढली आहे. जग एकत्रित होऊ पाहतं आहे आणि देशाची शकलंही पडताहेत. त्याचे परिपाक डोळयांसमोर आहेत. पण त्यांचं वर्णन सत्ताधीशांच्या केवळ गुणगौरवांखेरीज आपल्याला करता येत नाही, ही अपरिमित हानी आहे. आताच कुठं आमचा लेखक विविध क्षेत्रातल्या लहान-मोठया घटना व व्यक्ती यांना अपुऱ्या ज्ञानाने का होईना, चाचपून पाहायला लागला आहे. राजकारणाला हात घालावा असंच क्वचित कुणाच्या मनात येत होतं. गंभीर वृत्तीने राजकारण्यांकडे बघावं हे कुतूहल निर्भर होतं. त्याच सुमारास बंधनं आलं की, विचारांचा ओघ खंडित होतो.'' आजही ज्या ज्या वेळी स्वातंत्र्याची गळचेपी, अभिव्यक्तीचा संकोच हे विषय येतात, तेव्हा दुर्गाबाईंच्या त्या अध्यक्षीय भाषणाचे आवर्जून स्मरण होते.

शांता शेळके

कवयित्री, कथाकार, कादंबरीकार, गीतकार म्हणून आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या शांता शेळके यांनी 1996 साली आळंदी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. शांताबाईंनी साहित्याच्या विविध प्रांतांत लीलया चौफेर मुशाफिरी केली. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकत असताना श्री.म. माटे, के.ना. वाटवे, रा.श्री. जोग यांच्यासारखे गुरू त्यांना लाभले. शांताबाईंची जवळीक राहिली ती कवितेशीच! हळुवार भावकवितेपासून नाटयगीते, भक्तिगीते, कोळीगीते, चित्रपट गीते, बालगीते अशा विविध रूपांतून त्यांची कविता वाचकांना भेटत राहिली. 'वर्षा', 'रूपसी', 'गोंदण', 'अनोळख', 'कळयांचे दिवस', 'फुलांच्या जाती', 'जन्मजान्हवी', 'पूर्वसंध्या', 'किनारे मनाचे' असे कवितासंग्रह, 'मुक्ता', 'गुलमोहर', 'प्रेमिक', 'काचकमळ', 'अनुबंध' यासारखे कथासंग्रह, 'पुनर्जन्म', 'ओढा', 'माझा खेळ मांडू दे' यासारख्या कादंबऱ्या, 'पावसाआधीचा पाऊस', 'संस्मरणे' यासारखे वाङ्मयीन लेखसंग्रह, 'धूळपाटी'सारखे आत्मपर लेखन, 'एक पानी'सारखे सदर लेखनाचे पुस्तक, 'वडीलधारी माणसे', 'अलौकिक' यासारखे व्यक्तिचित्रणात्मक लेखन, अनुवाद अशी विपुल साहित्यनिर्मिती शांताबाईंनी केली. अशा या वाचकप्रिय लेखिकेची संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड रसिकांना आनंद देणारी होती. त्यांचे अध्यक्षीय भाषण रसिकांना उद्देशूनच होते. त्या म्हणाल्या, ''आज समोर मान्यवर साहित्यिक आहेत तसेच रसिकही आहेत. आपल्या साऱ्यांच्या साहित्यप्रेमाचा, साहित्यविषयक कुतूहलाचा उगम हा सारख्याच प्रकारे झालेला दिसतो. आजचे साहित्यिक हे कालचे रसिक आहेत. आजचे रसिक हे उद्याचे नामवंत साहित्यिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रसिकतेची साधना, जोपासना हा एक आनंदमय प्रवास असतो आणि हा आनंद आपण इतरांबरोबर वाटून घेत असतो. आपल्या रसिकतेच्या जोपासनेत श्रवणाचा भाग किती मोठा आहे, हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते. लहानपणापासून आपण जे ऐकलेले असते त्यात शब्द असतात. वाक्यप्रचार असतात, भिक्षेकऱ्यांची गाणी असतात. आरत्या-भूपाळया असतात. हे सगळे कानावर पडते. मनात मुरते आणि हळूहळू आपल्याला भाषेची जाण येते. वाङ्मयीन अभिरुची संपन्न होते.
शब्दांच्या उच्चारातून नादांची वळणे, लयीचा गोडवा, स्वरांचा उंचसखलपणा कळतो. त्यातून येणारी अर्थपूर्णता उमगते. अशिक्षित बायकांची ठसकेदार भाषा, वृध्दांची थकलेली भाषा, संस्कृत शालजोडी पांघरलेली पंडिती भाषा आणि मळकट मुंडासे घातलेली रांगडी भाषा... नुसत्या भाषेच्या श्रवणातून आपली रसिकता चारी अंगांनी भरत जाते.'' भाषा, साहित्य त्यावर होणारे रसिकांचे भरणपोषण आणि त्यातून माणसांच्या वाटयाला येणारी वैचारिक श्रीमंती हाच शांता शेळके यांच्या अध्यक्षीय भाषणाच्या केंद्रबिंदू होता.

विजया राजाध्यक्ष

मराठी नवकथेने निर्माण केलेल्या नव्या वाङ्मयीन वातावरणात लिहू लागलेल्या साहित्यिकांपैकी एक प्रमुख साहित्यिक म्हणून विजया राजाध्यक्ष यांचा उल्लेख केला जातो. 1950मध्ये 'कशाला आलास तू माझ्या जीवनात!' ही त्यांची पहिली कथा स्त्री मासिकात प्रसिध्द झाली. 'अधांतर', 'विदेही', 'अनोळखी', 'अकल्पित', 'कमान', 'हुंकार', 'अनामिक', 'समांतर', 'जास्वंद' असे त्यांचे वीस कथासंग्रह प्रसिध्द झाले. जाणिवांची व्यामिश्रता आणि अभिव्यक्तीतील प्रयोगशीलता यामुळे त्यांची कथा सकस होत गेली. समीक्षक आणि संशोधक या नात्यांनीही विजयाबाईंचे काम महत्त्वाचे आहे. 'मर्ढेकरांच्या कविता : स्वरूप आणि संदर्भ', 'पुन्हा मर्ढेकर', 'शोध मर्ढेकरांचा' ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. 'आदिमाया', 'करंदीकरांचे समग्र लघुनिबंध', 'बहुपेडी विंदा' हे त्यांचे ग्रंथ लक्षणीय आहेत. लेखिका, समीक्षक आणि अध्यापक अशी तीन रूपे विजयाबाईंच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वात समाविष्ट आहेत. त्यांच्यासारखे बहुविध कर्तृत्व असणाऱ्या लेखिका 2001 साली इंदूर येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मौलिक विचार मांडले. त्या म्हणाल्या, ''माझे भाषण हा आपल्याशी केलेला संवाद नव्हे, हृदयसंवाद असणार आहे. एका सर्जनशील लेखकाचा हृदयसंवाद. तो लेखक म्हणजे व्यक्तिश: मी नव्हे. फक्त मी तर नव्हेच नव्हे. तो लेखक हे नामाभिधान असलेला एक मूलादर्श, लेखक नावाची एक उत्कट मनोवृत्ती, लेखक नावाची एक अविचल निष्ठा, लेखक नावाची एक मूल्यसंहिता या सर्वांचे प्रतीक असलेला लेखक हा सर्जनाच्या वाटेवरचा एक मुक्त प्रवासी. तो सार्वकालीन असतो आणि समकालीनही असतो. त्याचा हा प्रवास कसा असतो? या प्रवासात काय घडते? काय घडत नाही? या पूर्णापूर्णतेच्या ताळेबंदाचे त्यांच्या मनात जुळत जाणारे स्वरूप कसे असते? लेखकाचा हा आंतरिक व बाह्य अंगाने होणारा प्रवास, कधी सहप्रवासी म्हणून तर कधी वाचक म्हणून न्याहाळताना मला स्वत:ला असे अनेक प्रश्न पडत राहतात. भाषा ही मूलत: संवादासाठीच असते. पण लेखकाच्या वैयक्तिक आणि वाङ्मयीन जीवनात काही क्षण असे येतात की, शब्द हा आपल्या लेखनसरणीचा एक अतूट भाग असला, तरी तो आपल्यापासून दूर गेला आहे, जणू आपली त्याच्यावर काहीच सत्ताच नाही असे वाटू लागते. पण एक अनाम, अदृश्य शक्ती बळ देते. लौकिकाचा प्रकाशझोत अंगावर पडलेला असला आणि त्यामुळे मन:स्थिती काहीशी संकोचलेली, अवघडलेली असली, एकांत हाच आपल्या प्रकृतिधर्माशी अधिक जुळणारा असे मनापासून वाटत असते. मी लेखकात समीक्षकाचा अंतर्भाव करते. तोही वेगळया प्रकारचा सर्जकच असतो.''

संमेलनाध्यक्षपद भूषविलेल्या त्या चौघींचीही अध्यक्षीय मनोगते साहित्यविश्वात नव्या विचारांची पेरणी करणारी ठरली. आता 92वे साहित्य संमेलन यवतमाळला डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यांच्या विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक भाषणाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

प्रा. मिलिंद जोशी

9850270823