मराठी कवितेतील 'अरुणा प्रहर'

 विवेक मराठी  08-Jan-2019

अरुणा ढेरे व्रतस्थपणे जुन्या कवींनी देऊ केलेला, भारतीय म्हणावा असा आश्वासक कवितेचा वसा सांभाळत आपली कवितिक कक्षा वाढवीत होत्या. नव्या दुभंगलेल्या काव्यविश्वाला समांतर अशी एक, ऊबदार, होकाराची आणि मळभातून प्रकाशाचे तिरीप शोधू पाहणारी अशी कविता अरुणा ढेरे किमान गेली 25-30 वर्षे लिहीत आहेत आणि दृढ जाणिवांचा एक 'अरुणा प्रहर' त्यांनी मराठी कवितेत अधोरेखित करून ठेवला आहे.

 

रुणा ढेरे यांची साहित्यिक कारकिर्द ही कवितेपासूच सुरू होत असली, तरी त्यांच्या लेखनिक आयुष्याचा तेवढाच भाग वाचकांना परिचित आहे असे नाही. कथालेखन, कांदबरीलेखन, समीक्षा, सामाजिक इतिहास, लोकसाहित्यविषयक लेखन, संपादन आणि ललित लेखन अशा विविध पातळयांवर त्यांचे लेखन सर्वपरिचित आहे. मात्र 'कविता' ही त्यांची 'जीविका' राहिली आहे. एक प्रकारचे कवितिक व्यक्तिमत्त्व असलेल्या अरुणा ढेरेंचा 'प्रारंभ' (1986) या काव्यसंग्रहापासून सुरू झालेला प्रवास, 'यक्षरात्र' (1987), 'मंत्राक्षर' (1990), 'निरंजन' (1994), 'जावे जन्माकडे' (1998) आणि 'निळया पारदर्शक अंधारात' (2004)पर्यंत एका ठरावीक पण ठाम लयीने चालला आहे. एक भावनिक प्रगल्भता आणि गाढ विचारातून आलेला अभिव्यक्तीतील काटेकोरपणा, त्यांच्या कवितिक प्रवासाला त्यांच्या एकूण लेखनाच्या अग्रभागी ठेवते. कवितेत राहिलेले अनुत्तरित प्रश्न जणू ललित वा वैचारिक लेखनात उच्चारावे आणि त्यासाठीच ते गद्यलेखन करावे असे वाटावे असे, ललित लेखनात त्यांच्या काव्यविषयक असोशीचे धागे आपल्याला त्यांच्या गद्यलेखनातही दिसतात. (उदा., 'कृष्णकिनारा' आणि 'अज्ञात झऱ्यावर रात्री'.)

साठोत्तरी कवितेने अचानक स्वीकारलेले पाश्चात्त्य, अस्तित्ववादी विचारांचे ओझे वागवीत एकीकडे अवजड, अवघड अशा शब्दबंबाळ कवितेचे वादळ मराठीत घोंगावत असताना अरुणा ढेरे व्रतस्थपणे जुन्या कवींनी देऊ केलेला, भारतीय म्हणावा असा आश्वासक कवितेचा वसा सांभाळत आपली कवितिक कक्षा वाढवीत होत्या. नव्या दुभंगलेल्या काव्यविश्वाला समांतर अशी एक, ऊबदार, होकाराची आणि मळभातून प्रकाशाचे तिरीप शोधू पाहणारी अशी कविता अरुणा ढेरे किमान गेली 25-30 वर्षे लिहीत आहेत आणि दृढ जाणिवांचा एक 'अरुणा प्रहर' त्यांनी मराठी कवितेत अधोरेखित करून ठेवला आहे.

कवितेखेरीज अनेक साहित्यप्रकारांची सर्जनशक्ती असलेल्या अरुणा ढेरे यांचे लेखनकेंद्र आणि अभिव्यक्तीचे आनंद केंद्र 'कविता'च राहिले आहे, हे त्यांच्या काव्यनिर्मितीच्या सातत्याने लक्षात येते आणि मराठी कवितेत एक स्वतःचे वेगळे स्थान अधोरेखित करणारी त्यांची कविता, त्यांना एकूण साहित्यात 'कवयित्री अरुणा ढेरे' असे एक आदर्शवत असे प्रतिभेचे वलय-स्थान देऊ करते.

याचे कारण, समजूत आल्यापासून त्यांचे स्वतःला नि जगाला 'समजावणे' हे कवितेच्या माध्यमातूनच चालले आहे. आणि मराठी कवितेवर एक काहीशी पारंपरिक आणि तरीही काहीशी आधुनिक अशी आपली लेखमुद्रा उमटवण्याचे काम त्यांच्या कवितेने केले आहे. पारंपरिक यासाठी की, कवितेत स्त्री-देहाच्या अवयवांचे उघडे-बोडके उल्लेख आणून, आपली काव्यजाणीव 'बोल्ड आणि उग्र' आहे असे दाखवायचे 'नव्वदोत्तरी' प्रयोग त्यांने केले नाहीत आणि आधुनिक यासाठी की, तरीही नवेपणाचा आणि मुक्तपणाचा ताजा वारा त्यांच्या कवितेत सतत वाहता राहिला आहे. नव्या युगाचे सर्व नवे पलटे, नव्या जाणिवेने घेण्याचे आधुनिक मन अरुणा ढेरे यांच्या कवितेत दिसते आहे. आशयाच्या अंगाने अरुणा ढेरे यांची कविता अर्थाचे जे नवे विभ्रम व्यक्त करीत राहिलीय, त्यामुळे ती तिच्याबरोबरीने लिहिल्या गेलेल्या इतर कवयित्रींच्या कवितेच्या तुलनेत सतत अग्रेसरच राहिली आहे. इंदिरा संत, शांता शेळके, कवयित्री पद्मा, अनुराधा पोतदार यांच्या सहवासात आणि त्यांच्या कवितेच्या प्रभावात निर्माण झालेली कविता, मराठी कवयित्रींच्या प्रगल्भ वाटचालीत सहजच जुळली गेली आणि त्यांनी त्यांचे एक स्थान या मान्यवर कवयित्रींच्या माळेत निर्माण केले. अनुराधा पाटील, प्रभा गणोरकर, मल्लिका अमरशेख या समकालीन महत्त्वाच्या कवयित्रींच्या बरोबरीने कविता लिहिणाऱ्या अरुणा ढेरे यांनी स्वतःची नाममुद्रा मराठी कवितेत निर्माण केली, ती आपल्या अत्यंत संयत शैलीने.

अरुणाच्या या संयतपणाबद्दल आणि कवितेतील देशी प्रतिमांबद्दल तिच्या कवितांना पारंपरिक कप्प्यात टाकणाऱ्या समीक्षकांना अरुणाने आपल्या अर्थान्यासाच्या विचक्षण आणि प्रगल्भ काव्यजाणिवेने दिपवून टाकले.

मावळत्या दिशेपाशी पाणी निळे होई

चंद्रभागेपरी सांज वाहते गं बाई

अशा प्रस्तावनेने सुरुवात केलेल्या अरुणाच्या कवितेचा काव्यप्रवास

उन्हे वेचलेला तिचा परकर-ओचा

अजूनही तिथे जरा हलते गं काय?

रंग थोडे झिळमिळ, एक फूलपान

त्यांच्यासाठी अंधाराला थांबवते बाय

असा पुढेपुढेच होता. त्यासाठी तिला मुक्तीचा आधुनिक उघडाबागडा अनुनय करावा लागला नाही. ती संतांच्या मुक्तजाणिवांचा पट वापरीत राहिली.

तिला आता काळोखाची बाधा नाही काही

चंद्रभागेमध्ये चंद्र उतरून येई

अशी काव्यात्मक सांगता करीत अरुणा आपल्या मनातील 'निरंजन' भावना रुजवत राहिली. अगदी साधेपणाने तिचा चंद्र मिळवीत राहिली.

एका अर्थाने एका पारंपरिक वर्तुळात अरुणाची कविता वाढत राहिली, ते बरेच झाले. तिने इंदिरा संतांपासून मराठी कवितेत दृढ झालेली एका मॅच्युअर्ड एकटेपणाची जाणीव अधिक व्यापक करीत, तिला एकटेपणाचे नवनवे सुंदर आयाम दिले.

आता नेते सावरून शब्द कल्लोळाचा

पदराने अडो वारा, दिवा टिको माझा

म्हणत ती तिचा कवितेचा दिवा अत्यंत शालीनतेने सांभाळीत राहिली. आजूबाजूच्या उद्ध्वस्त, दुभंगलेल्या आणि एकारलेल्या कवितांच्या पार्श्वभूमीवर अरुणा ढेरे यांनी त्याच एकटेपणाची आश्वासक कविता लिहिली. उगाच दुःखाचे कढ काढीत आणि काळाचे असौहार्द गिरवीत ती तक्रार करीत राहिली नाही. उद्वेगाच्या जागी समंजसपणा, विद्रोहाच्या जागी समन्वयाचा विचार आणि शब्दबंबाळ अभिव्यक्तीच्या जागी बोलके मौन उपयोजत अरुणाने बाह्य प्रभावांवर कडी तर केलीच, पण ही जी अंतस्थ प्रेमाची, जिव्हाळयाची, अनुनयाची भावना आणि भाषा लोकप्रिय केली, ती प्राचीन अक्षर रचनांसारखी काव्यरसिकांना परिचित केली. काव्यसंग्रह घेऊन वाचावेत, त्याची पारायणे करावीत अशी भावपूर्ण संवेदनाची सुलभता अरुणा ढेरे यांच्या सर्व संग्रहांना लाभली हे एक आगळे वैशिष्टय त्यांच्या कवितेने जपले, जे मराठी कवितेत दुर्मीळ आहे.

एका अर्थाने त्या कुठल्या गटात राहिल्या नाहीत. (तशा त्या कुठल्या गटात मावणाऱ्या नव्हत्याच.) त्यांच्या कवितेने कुठला इझम स्वीकारला नाही वा ती कुठल्या एका भूमिकेचा पाठपुरावा करीत प्रचारकी कवितेच्या जाळयात अडकली नाही. त्यांची भावनिक एकतानता हाच त्यांचा इझम होता आणि स्वतःला बदलत, स्वतःचे बदलते स्वरूप स्वीकारत त्याला गाढ समंजसपणाने सामोरे जाणे, व्यक्त झालेल्या मतांशी एकनिष्ठ राहणे हीच त्यांची भूमिका राहिली.

दुःखाशिवाय पर्याय नाही सृजनाला

हे उमगेल, ढग काळेभोर होतील

जन्मतहानेचा पिसारा उघडून

पुन्हा मनाशी मोर येतील

असे स्वतःला आणि त्यांच्या असंख्य वाचकांना समजावीत त्या समजण्याचे गाणे त्या विणीत राहिल्या.

समंजसपणा हा अरुणा ढेरे यांच्या भावनिक आंदोलनाचा आत्मा राहिलेला आहे. आणि ही आयुष्याची समजावणी, त्यांच्या कवितेची सारणी बनली आहे. खूपदा हे समजून घेणे विद्रोहाच्या पुढची विदग्धता व्यक्त करणारे असते. पण सारे जगच आपल्याला कवितेतून समजून घ्यायचे आहे, ह्या भावनेत हा विद्रोह, ती निराशा, ते विदग्धपण एका भावनिक अधिकाराने रिचवल{ जाते. समकालीन कवयित्रींच्या ऊरस्फोटाला अरुणाची कविता हे समंजस उत्तर राहिले आहे.

अरुणाच्या कवितांचा एक ऊबदार प्रवाह सतत मराठी कवितेत आपली वेगळी नाममुद्रा उमटवीत वाहत राहिला आहे. अरुणा ढेरेंच्या अनेक कविता साक्षेपी वाचक आणि साक्षेपी समीक्षक यांना नव्या भावविश्वात घेऊन जाणाऱ्या ठरल्या आहेत.

पुराबरोबर वाहून जाते नांदती वस्ती

किंवा वीज पडून उभे माणूस जळून जाते

हे विनाश असतात किती थेट आणि स्पष्ट

.................

मी मुकाट सोसत राहते असे अटळ विनाश

संपत जाणाऱ्या या अदृश्य संचितासाठी

मुका शोक करते


असा वेदनेचा डंख सोसत असताना मात्र अंतिमतः त्या एका होकारात्मक वळणाची ग्वाही देत, आपल्यालाही आश्वस्त करतात.

असेलही या विनाशातून वाचलेला

वाढण्याचा एखादा तान्हा संदर्भ

त्याला शोधून स्वीकारण्याचे बळ

आता स्वतःकडेच मागावेसे वाटते

(संपत जाणारे संचित - निरंजन)

हा एक दिलासा ढेरे यांच्या कवितेतून सतत मिळत राहतो. आणि हा दिलासा भाबडेपणातून नव्हे, तर एका गाढ समंजसपणातून मनाची अस्वस्थता पिळून मिळवलेला आहे, हे कळते.

तुला स्पर्श करू शकतील

असे शब्द कुठून आणू?

कुठून आणू तुझ्यापर्यंत पोचणारी कविता?

कितीही प्राणांतिक बळ आणून

उभे केले स्वतःला, तरी

शाश्वती नाही की, ओलांडता येईल तुझी

उदासीनता

अन् इथे किती भरून आलंय् मन तुझ्याकरता!

(कबुली - निरंजन)

आणि कवयित्रीचे हे मन भरून येणे हे साधे समर्पण नसते, हे कळते!

अरुणा ढेरे यांचे प्रश्नांकित जग हे त्यांचे एकटीचे वा एका मर्यादित समाजाचे नाही. सर्व युगालाच कवेत घेणारी ढेरे यांची व्यापक दृष्टी आपल्या वेदनांना स्वेतर विश्वाच्या वैश्विक दुःखाचे कोंदण देते.

युगाच्या आपद्ग्रस्त जर्जर हृदयात

हुंदके देते मी

की चामडीखालच्या कोणत्याही रक्ताला

परिवर्धक गतीच्या आवेगाने

वाहता येत नाही आता लाल निरोगी उष्णतेत

बुडणाऱ्याच्या हाकेला येत नाही प्रतिसाद

अन् अर्थच नाही उरलेला संघर्षात,

मृत्यूत. शांततेत.

(युगाच्या आपद्ग्रस्त जर्जर हृदयात - जावे जन्माकडे)

 

किंवा हे पाहा -

पाऊस पडत राहतो

अथक दुःखासारख्या विस्तीर्ण पृथ्वीवर

परक्या दिशाही ओलावतात

आभाळ दाटून येत येत होतं

काळोखाचं बाळंतघर

(पाऊस पडत राहतो - जावे जन्माकडे)

 

किंवा हे...

एखाद्या पुरातन संस्कृतीचा आत्मा

वाहतो कधी सनातन नदी होऊन

होऊन तिचे अनपेक्षित वाक, कठोर उतार

................

तेव्हा पडझड झालेल्या एकाकी शिवमंदिरात

निराश्रिताच्या प्रार्थनेसारखा अश्रू आवरतो अंधार

(एखाद्या संस्कृतीचा आत्मा - जावे जन्माकडे)

अरुणा ढेरे यांच्या कवितेचा आणखी एक विशेष म्हणजे मराठी कवितेच्या एकूण प्रवाहात सर्वकालीन अशा कालातीत अनुबंधाचे एक लोभस चित्र त्यांच्या कवितेत सारखे लकाकत राहते, हे होय. राधा, कृष्ण, अनय, उर्मिला, जानकी, जनाबाई-विठू आणि यक्ष या पुराणकालीन/ऐतिहासिक पात्रांचे त्यांच्या कवितेतले दर्शन एखाद्या जिवंत माहीतगार व्यक्तीसारखे आपल्याला भेटत राहते. या पात्रांचे नवे रूप किंवा त्यांचा नवा अन्वयार्थ ढेरे लावतात, त्या वेळी ती त्यांची व्यासंगनिश्चिती नसते, तर त्यांच्या कवितेच्या जिव्हाळयाने या पात्रांना त्यांनी मानवी मनाच्या नव्या प्रारूपाचा चेहरा बनवलेले असते.

पाऊस तिच्या मांडीवर तान्हा होतो

खोवून पीस मोराचे कान्हा होतो

हिमशुभ्र कळयांवर, तमात झुकतो जेव्हा

पाऊस रसिक, राधेचा राणा होतो

(पाऊस - यक्षरात्र)

 

अजिंठयाच्या शिल्पासारखं जुनं

आणि म्हणून नवीनही

जसं दोहोचं सहज एक असणं

तसं हे आदिम....

...............

...............

पुराकथा बहरून यावी युगायुगातून

तसं हे हृदयातून.

(हे रूपधर प्रेम - यक्षरात्र)

 

सुखाचेही तळ। जाताना घासून

अस्तित्वाची खूण। कळे मला॥

.....

तमाने टाकली। प्रकाशाची कात।

झाली काळजात। यक्षरात्र॥

(यक्षरात्र - यक्षरात्र)

असे निराशेचे कढ ढेरे यांच्या कवितेत आहेत. मात्र त्याबरोबरच

परतले सांजऊन धूळवाटेने जपून

मनापाशी राहिलेली एक केशराची खूण

अशा केशरखुणांचे शांत बनही त्यांच्या कवितेत आहे.

कसे आले, कसे गेले, काय लावियेले भाळी

मनकेशराची खूण कशी झळाळून आली

असे लाघवी झळाळही त्यांच्या कवितेत आहेत. या एका कारणाने अरुणा ढेरे या समकालीनांपेक्षा वेगळया आणि धीराच्या ठरतात.

की ऐकेलच त्याचा शब्द कुणी तरी एखादी पोर

मग माझे खूळ तिला लागो। तिला लागो जन्मभर।

अशी एक अम्लान, अनाघ्रात वेडाची भावना कवितेत होकार भरते.

विझलीच आहे बघ खरे तर शेकोटी

अशात, या वैराण संध्याकाळी

तुला कसे सांगू जुने दिवस आणि त्यांचे मोहरत जाणे?

तुझ्यासाठी किती भरून आले आहे माझे हृदय

आणि उरले आहे जुन्या घरगुती वासाचे

माझे एकुलते एक गाणे

(घरगुती वासाचे गाणे - मंत्राक्षर)

साठोत्तरी मराठी नवकवितेने मर्र्ढेकरांचे, अनिलांचे, नारायण सुर्वे यांचे मुक्तछंदही बाजूला सारल्यावर मराठीच्या पारंपरिक छंदबध्द रचनेचा देखावा पुरता लुप्त झाला. ग्रेस, महानोर, दि.पु. चित्रे आणि कोलटकर यांनी तो धरून ठेवला होता. पुढे मात्र छंददुष्ट वातावरणाचे वादळ इतके घोंगावले की, एक सघन, सदृढ छंदोवध्द रचना मराठीत सापडणे दुर्मीळच झाले. अरुणा ढेरे यांनी त्यांच्या कवितेची मागणी म्हणून अशा रचनेचे सौष्ठव आपल्या कवितेत कायम ठेवले.

 

फक्त जायचे आपण

असे मनाच्या तळाशी

कृष्णेसारखे सोडून

केस मोकळे पाठीशी

 

कसे शब्दांचे प्राक्तन

थेट श्रीरंगासारखे

जन्म कौतुकाचा धनी

आणि मरण पोरके

(कैफ - यक्षरात्र)

मर्ढेकरोत्तर आधुनिक कवितेत, विशेषत: नव्वदीनंतर अस्तित्ववाद्यांच्या वैचारिक प्रभावाखाली आलेली मराठी कविता इंग्लिश कवितेच्या प्रभावाखाली गेली आणि इथले नेटिव्ह संदर्भ विसरून गेली. पाश्चात्त्य मिथकांत रमू लागली नि स्वत:ला धन्य मानू लागली. त्यालाच नवकविता मानू लागली. अरुणा ढेरे यांनी मात्र जाणीवपूर्वक (किंवा कदाचित प्राचीनतेच्या प्रभावातून) भारतीय मिथकांत नि पुराणकथांतील पात्रांत आपल्याही आयुष्याची वंचना शोधली आणि नीटसपणे मांडली. स्वत:च्याच दु:खाचा/वेदनेचा लगदा आपल्या कवितेत आणून स्वत:च्या चिंध्या करून घेण्याच्या वृत्तीपेक्षा ही वृत्ती वेगळी होती. भारतीय तर होती, पण होकाराकडे नेणारी होती. अरुणा ढेरे समकालीन कवयित्रींपेक्षा सतत वेगळया राहिल्या आणि नवकाव्यातील दुभंगलेपण, एकाकीपण, तटस्थपण बाजूला ठेवत, एकटेपणाचे ऊबदार, आश्वासक नि मनाला धीर देणारे आभाळ विणीत राहिल्या. जगण्यातून नव्या विचक्षण जगण्याकडे असा त्यांच्या कवितेचा प्रवाह राहिला.

हळूहळू धुपून जाते उमेदीचे सकस आयुष्य,

माती निकामी होत जाते.

....

वांझ आयुष्यात पाऊल ठेवताना

सगळे भविष्यच किती दिनवाणे होत जाते...

(माती निकामी होते - मंत्राक्षर)

 

उतरून हळु येते संधिकालीन माया

स्वजनजनधनाचे दु:ख लागे मिटाया

झरझर स्मरणाची रेघ जाई धुक्यात

मनभर कवितेचा मांडिला मी आकांत

(करुणाष्टक - मंत्राक्षर)

किंवा

सांध्यवेळ ओली

तिमिरातुन आली

दूर कुठे विजनातच दीप लागले

प्राणांच्या ऐलपैल काय जागले?

(प्राणांच्या ऐलपैल - मंत्राक्षर)

अर्थात ही छंदोमयता त्यांच्या केवळ छंदबध्द रचनांतच आहे, असे नाही. ती त्यांच्या छंदमुक्त कवितेतही सापडते. कारण, त्यांच्या समकालीन कवींप्रमाणे त्यांनी आपल्या पूर्वसुरींचे कवितेचे घर मोडून तोडून टाकले नाही. ह्या रचनांतच त्या रचनांविषयीचे, त्यातील छंदोमयतेचेही एक प्रेम, एक आदर त्यांच्या रचनांत दिसतो.

 

2004 साली आलेल्या 'निळया पारदर्शक अंधारात' अरुणा ढेरे यांच्या मनातील असोशीचे, एकटेपणाचे आणि दु:खाच्या मुळाचा शोध घेण्याच्या शोधक वृत्तीचे चयन काहीसे शांत झाल्याचे जाणवत असले, तरी त्यांच्या कवितिक शोधपर्वाला एक ठाम दिशा मिळाल्यागत दिसत राहते. कविता ह्या वळणावर अधिक चिंतनशील तर होते, ती अल्पाक्षरी अभिव्यक्तीच्या सारणीतून मौनाच्या दिशेने प्रवास करती होते.

पहिल्यानं गळून गेली सगळी पानं

एकेकाळची हिरवी

आणि नंतर जर्द पिवळे बहरही गळाले

आता या सोनसावरीजवळ

काही म्हणता काहीही नाही

(आता - नि.पा.अं.)

एकूण 35 वर्षांहून अधिक काळ कवितेतील ही तरलता, हे उत्कटपण आणि ही असोशी टिकवून धरणे हाही एक वाङ्मयीन रसरसलेपण टिकवण्याचा भाग आहे. आणि हे सातत्य केवळ लेखनकर्तृत्वाचे नाही, तर ते प्रतिभेचेही आहे.

सातशे वर्षाचा ढिगारा खणता खणता

उघडा झाला अस्सल बावनकशी शिवीचा

तेजस्वी, कणखर, एकाग्र असा सूर्यदंड

'विठया, अरे विठया, मूळ मायेच्या कारटया'

जने, तो तुझा सूळ

आता त्याचे स्मारक होईल

अशा उच्चरवाच्या हाका, ढेरे जनीला, विठूला घालतात, तेव्हा त्यांचे भावनिक नाते इतक्या वर्षांत किती कळसाला पोहोचले आहे, याचा प्रत्यय येतो. जनीविषयी बोलताना, लिहिताना अरुणा ढेरे ह्या अधिक आत्मीय होतात, असे जाणवते. अरुणा ढेरे यांच्या कवितेतील भारलेले एकटेपण पाहताना, 'भरल्या बाजारी, जाईन मी' असे ठणकावून सांगणाऱ्या जनीचेच आधुनिक रूप आपण अनुभवतो आहेत, हे कैकदा जाणवते.

जनाईच्या निरंजन मनामधे विठू

दिवा तसा तुळशीशी लावलेला आहे

(निरंजन - निरंजन)

हे प्रारंभीचे स्वगत शेवटपर्यंत श्रध्देने म्हणणाऱ्या अरुणा ढेरे ह्यांनी संतकुळाचा घेतलेला आधार नि मिळवलेले सहसंवेदन कौतुकास्पद तर वाटतेच, पण त्यांच्या कवितेलाही संतकवितेतील उदात्ततेचा टिळा लागला असल्याचे वाचकांना पटवते.

प्रेमाइतकं तोंड मिटून काही दिलं नाही

दु:खाइतकं तोंड मिटून काही घेतलं नाही

............

कवितेइतकं तोंड मिटून काही गायलं नाही

जगण्याइतकं ओठ मिटून काही साहिलं नाही

अरुणा ढेरे ह्यांचा सारा प्रवासच असा त्यांच्या कवितेसारखा नितळ आहे. कविता समजणे नि तिला मान्यता मिळणे ह्या गोष्टींना मराठी रसिकांत फार महत्त्व आहे. जसे अमूर्त चित्रांना चित्ररसिकांची मान्यता मिळाल्यागत हे कवीचे यश मानले जाते. अरुणा ढेरे ह्या काव्यरसिकांत लोकप्रिय तर आहेतच, पण त्यांच्या बुध्दिमान कवितेबद्दलही काव्यरसिकांत आणि समीक्षकांत एक कौतुक, कुतूहल आणि औत्सुक्य आहे.

त्यांच्या कवितेची मानसशास्त्रीय वा चरित्रातून समीक्षा करणे अप्रस्तुत आहे, इतकी ती अनेकदा बुध्दिगम्यही असते. मात्र रूपवाद, शैलीशास्त्रीय वा सामाजिकतेच्या अंगाने पाहण्यापेक्षा तिला संज्ञाप्रवाही अंगाने पाहणे उपयोगाचे ठरेल. कारण काही ठोस, आशयानुवर्ती धागे हाताशी लागतील... लागू शकतील. अरुणा ढेरे यांच्या कवितेत चकवा नसला, तरी ह्या लोभस संज्ञाप्रवाही वळणाचे सातत्य हा समीक्षकांनाही चकवा वाटावा!

अरुणा ढेरेंविषयी बोलायचे, तर त्यांच्याच शब्दात असे मांडता येईल की,

काही इवलाले शब्द तिच्या मुठीत असायचे

त्या वेळची गोष्ट

कवितेचे अविनाशी प्रहर

तिला बिलगत राहायचे

आणि

अर्थातून फिरत राहणारे तिचे मन

भाषेच्या सारवल्या भुईवर

तृप्तीचे क्षण मोजत

सरसरत राहायचे...

पण त्या तिथेच थांबल्या नाहीत.

ज्यावरती ठेवून हृदय निघाला वारा

ते सळसळ हिरवे पान मला दे बाई

म्हणत त्या कवितेकडे हिरवी तृष्णा मागत राहिल्या.

मग कितीतरी रंग त्यांनी त्यात मिसळले -

ते रंग त्या ल्यायल्या - ते रंग त्यांनी जणू प्राशन केले

आणि मग त्यांचे स्वेतरविश्वही रंगाचे झाले.

एकटेपणा हा निळा असतो

वाऱ्याची लकेर पिवळी असते

रानाचा अंधार हिरवा असतो

आणि जिगिषेचा रंग ठिणगीसारखा लाल असतो

हे त्यांनी जसे साऱ्यांना शिकवले.

शब्द हा प्राणापलीकडचा ऐवज आहे

आणि जपताना एखाद्या माणकासारखा जपायला हवा

हे त्यांनी आपल्या लेखणीतून सिध्द केले.

एका कवितेत अरुणा म्हणतात,

एक शब्द दिला तुला

विश्व 'संबंध' हालले

पुऱ्या गाण्यासाठी आता

जन्म येतील मागले...

आपल्या आणि संपूर्ण माणूसपणाच्या हाकांचा शोध घेत त्यांनी कवितेचा प्रत्येक प्रहर जिवंत केला...

जागवला.. आणि हळूहळू त्याच कवितेचा 'प्रहर' झाल्या!

अरुणा ढेरे यांच्या शैलीतच त्यांच्या ह्या सहा संग्रहांच्या काव्यप्रवासाबद्दल सांगायचे झाले, तर असे म्हणता येईल -

'प्रारंभा'तच 'यक्षरात्र' तिज भिडली, झाली निळी वेदना

'मंत्राक्षर' नित लेखणीत तिज उमगे, लाभे नवी सांत्वना

सांगे शब्द 'निरंजन' शुभ्र तिजला, 'जावेच जन्माकडे'

'अंधारात निळया पारदर्शकात' गाई अरुणा जणु प्रार्थना

 

अरुण म्हात्रे

9702638337

[email protected]