अण्णा आणि अरुणा व्रतस्थ ज्ञानोपासक

 विवेक मराठी  08-Jan-2019

 

 

अण्णांचं मराठी साहित्यावर फार मोठं ऋण आहे. विसोबा खेचरापासून नृसिंहापर्यंतची अनेक अज्ञात स्थळं आपल्यासमोर त्यांनी खुली केली. मुस्लीम मराठी संत...महिपतीचा अमेरिकन अवतार आपल्यासाठी प्रकट केले... कितीतरी दैवतं सगुणसाकार करताना त्यांनी धर्मपंथभेद मानला नाही. धर्मपरंपरेची चिकित्सा करताना विवेकनिष्ठेचं भान त्यांनी सततच जोपासलेलं आहे. जपलेलं आहे. अरुणानेही आपल्या विविध वाङ्मयप्रकारात हे भान ठेवलेलं आहे. अरुणा ही अण्णांची सुकन्या! त्यामुळे दोघांच्याही प्रकृतिधर्मात आणि प्रतिभा धर्मात विनम्रता, शालीनता, लौकिक गोष्टीपेक्षा अलौकिकतेकडे असलेला त्यांचा ओढा, सकारात्मकता अशा अनेक प्रकारांनी साम्य दाखवता येईल...

   लोकसाहित्यविषयक संमेलनात अरुणाचं भाषण सुरू होतं. लोकरामायण, लोकमहाभारत यामधील स्त्रियांचे संदर्भ देत देत तिने आणखी एक लोककथा सांगितली... एका शेतकऱ्याला पाच मुली होत्या. त्याने एकेका मुलीला विचारलं, ''तू कोणाच्या नशिबाची?'' आणि चौघींनी उत्तरं दिली, ''मी आईच्या बाबांच्या नशिबाची.'' शेतकरी खूश झाला आणि आपली सारी शेतीवाडी मुलींच्या नावे केली. पाचव्या मुलीने मात्र म्हटलं की, ''मी माझ्याच नशिबाची.'' शेतकऱ्याने तिला घराबाहेर घालवलं आणि म्हटलं, ''तुझं नशीब तूच घडव.'' ती घराबाहेर पडली आणि ती स्वत:च्या कर्तृत्वाने मोठी झाली.

डॉ. रा.चिं. ढेरे तथा अण्णा यांच्या कुटुंबाकडे बघितलं - किंबहुना काही वर्षांपासून त्यांच्या कुटुंबात वावरत असल्याने एक दिसून आलं की, अण्णा आणि त्यांची बहीण, प्रमिला-आत्या... आईवडिलांच्या निधनानंतर या दोघांनी केवळ अभ्यासाच्या बळावर आपलं नशीब आपणच घडवलं आणि त्यांचा येथवरचा कष्टप्रद प्रवास किती यशस्वी ठरलेला आहे, हे अरुणाच्या आजच्या एकूणच कर्तृत्वावरून आपल्या लक्षात येईल. त्यांच्या घराच्या भिंती पुस्तकांच्या होत्या आणि आजही आहेत. अरुणा म्हणते की ''घरातील पुस्तकांचे गठ्ठे अंगावर पडून घरातील माणसं जखमीही झालेली आहेत...'' असं वाटतं की, संवेदनशीलतेची... मनाच्या कोवळीकतेची जखम घेऊनच या घरातली माणसं वावरत आहेत आणि या कुटुंबातील प्रत्येकानेच अण्णांच्या सहवासात राहून आपापलं नशीब घडवलेलं आहे. अरुणाकडे बघितलं की मला त्या शेतकऱ्याची पाचवी मुलगी - ''मी माझ्या नशिबाची'' असं म्हणणारी मुलगी आठवते. इतिहासातील, साहित्यातील, सामाजिक क्षेत्रातील आणि आजच्या वास्तवातील ज्या ज्या स्त्रियांनी स्वत:च्या कर्तृत्वाने इतिहास घडवला, त्या त्या स्त्रियांची उदाहरणे देत अरुणा आपल्या लेखणीतून आणि वाणीतून समाजाला हाच संदेश देत आलेली आहे की 'अभ्यासोनि प्रकटावे' आणि आपले कर्तृत्व सिध्द करावे आणि अण्णांनीदेखील तिला तिचं नशीब घडवण्यासाठी अवकाश दिला.

अरुणाची प्रतिभा आणि स्मरणशक्ती अण्णांच्या प्रतिभाशक्तीसारखीच अत्यंत तल्लख आहे. अनावश्यक गोष्टी ती स्मरणात ठेवत नाही. किंबहुना काही गोष्टी ती चक्क विसरून जाते. आपलं लेखन प्रसिध्द झाल्यावर ते नीट जपून ठेवायचं असतं, हे ती विसरते. पण अण्णांचं तसं नाही. ते आपल्या प्रकाशित-अप्रकाशित लेखनाला जिवापाड जपत असतात, तसंच अरुणाचं लेखनही जपून ठेवत असत. त्यातूनच तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. आपल्या लेखनाच्या निर्मितीबाबत अरुणा, अण्णांविषयीची कृतज्ञता नेहमीच व्यक्त करीत आलेली आहे. अण्णांनी धर्मेतिहासाच्या संदर्भात प्राक्कथांच्या, आदिप्रतीकांच्या अभ्यासाची जी दृष्टी वापरली आहे, ती आदिबंधविषयक लेखनातही जिज्ञासा वाढवायला कारण झाली, अशी स्पष्ट कबुली ती देते. त्या संदर्भात अण्णांशी झालेल्या चर्चा म्हणजे एक निर्माणक्षम अनुभव होता. यातूनच आदिबंधात्मक साहित्याचा अभ्यास अरुणाने केला... आणि तिने मराठी साहित्याला त्या संकल्पनेचा परिचय करून दिला. परंपरा आणि नवता यांच्यातील संघर्ष-संवादाची लक्षणीय चित्रे अण्णांनी जशी आपल्या संशोधनात, लेखनात रेखाटलेली आहेत, अगदी तशी चित्रं अरुणाने आपल्या विविध वाङ्मय प्रकारांतून सिध्द झालेल्या लेखनात शब्दांकित केलेली आहेत.अण्णांचं कुटुंब म्हणजे लोकसंस्कृतीच्या उपासकांचं कुटुंब आहे. या कुटुंबातील सारे जण लोकमंगलाची कामना बाळगणारी दैवतं आहेत, असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. त्यांचं घर म्हणजे देवालय आहे आणि अण्णांची लेखनाची खोली म्हणजे देव्हारा... गाभारा आहे. या गाभाऱ्याच्या भिंती पुस्तकांच्या आहेत. विविध विषयांवरील जुनी-नवी पुस्तकं येथे हारीने मांडलेली आहेत. जे ग्रंथांचा आणि ज्ञानाचा सन्मान करतात, त्यांचा या गाभाऱ्यात सहज प्रवेश होतो. मला आठवतं... अरुणाची मैत्रीण म्हणून मी प्रथमच जेव्हा अरुणाच्या घरी गेले, तेव्हा सारं कुटुंब तळमजल्यावर राहत होतं. 'अभिराम' इमारतीतील 'विदिशा'च्या पहिल्या मजल्यावर अण्णांची अभ्यासखोली होती. याची माहिती नसल्यामुळे मी गेटमधून प्रवेश करताना बाहेरून दिसणारा लोखंडी जिना चढू लागले. अरुणा आत माजघरात होती. अरुणाची संवेदना किती तरल आहे, याचा प्रत्यय त्या वेळी आला. तिला जाणवलं की, कोणीतरी जिना चढतंय आणि वर अण्णा त्यांच्या अभ्यासखोलीत आहेत. त्यांना व्यत्यय नको यायला. अरुणाने मला तळमजल्यावरील बैठकीच्या खोलीत नेलं होतं. काही वर्षांनी अण्णांची पुस्तकांची खोली दुसऱ्या मजल्यावर गेली आणि तळमजल्यावरील त्यांचा निवासही पहिल्या मजल्यावर.

अण्णा आपल्या लेखन-वाचनासाठी, अभ्यासासाठी आपल्या गाभाऱ्यात जातात; परंतु इतर वेळी त्यांचं घर म्हणजे विविध क्षेत्रांतील, विविध थरांतील, विविध जातिधर्माच्या लोकांचा राबता असलेलं घर असतं. लोकसंस्कृती जपणारे, जाणणारे, पोटापाण्याचा व्यवसाय करणारे वासुदेव, गोंधळी, पोतराज यांच्याशी ते चर्चा करीत असत. त्याचबरोबर लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर मांडे, नरहर कुरंदकर, तारा भवाळकर तर अलीकडचे प्रकाश खांडगे यांच्याशीही त्यांच्या चर्चा चालत. माझं 'हिंदोळा' नामक ख्रिस्ती समाजदर्शन घडवणाऱ्या लोकगीतांचं पुस्तक प्रसिध्द झालं, तर त्यांना किती आनंद झाला! त्यांच्या घरी स्नेहसदनमधील फादर लेद तशाच ऍना फेल्डहाऊस, गुन्थर सोन्थायमर हे तर अमेरिकेतून आणि जर्मनीतून येत. अण्णा कोणाही सामान्य माणसाबरोबर बोलत असत आणि त्यांच्याकडून नवीन काही शिकायला मिळाल्याचा त्यांना आनंद होत असे. ऋग्वेदात म्हटल्यानुसार 'विश्वाच्या सर्व दिशांनी चांगले विचार येत राहोत...' तशी ही अवस्था! किंवा वेदांतील 'वसुधैव कुटुंबकम्'सारखी ही अवस्था! येथे कोणालाही मज्जाव नव्हता. आणि इतर वेळी अण्णा खांद्यावर झोळी टाकून रद्दीच्या दुकानात जात. काही दुर्मीळ पुस्तकं मिळाली तर विकत घेत. अण्णांचा हा गुण अरुणात किती तंतोतंत उतरला आहे!!! अण्णांसारखंच निरभ्र, कोवळं मन अरुणाला लाभलेलं आहे. विविध वयोगटांतील, समाजाच्या विविध थरांतील लोकांशी तिचे अत्यंत निर्मळ असे मैत्रीचे संबंध आहेत. एखादी किशोरवयीन मुलगी तिच्या ओळखीची, माहितीतली वा मैत्रीण असेल, तर ती तिच्या हातात हात गुंफून एखाद्या बालकासारखी रस्त्याने गप्पा करीत निघेल, किंबहुना तिच्या समकालीनांपैकी कोणी कवयित्री भेटली तर तिच्याशीही अरुणा अशी आत्मीय ओलाव्याने बोलते. पण तिच्या अभ्यासाच्या वेळी ती कोवळया उत्सुक अंधारभरल्या गुहेत शिरते. त्यात प्रकाशाचे कवडसे शोधीत राहते.

आरंभीच्या काळात अण्णांनी छोटया-मोठया नोकऱ्या केल्या, परंतु त्यांचं मन त्यात रमलं नाही. त्यांच्या मामांनी त्यांना रस्त्यावर सोडून दिल्यानंतर अण्णा आणि प्रमिला आत्या हेच एकमेकांसाठी उरले. आत्या शिक्षिका झाली. तिने आपल्या थोरल्या भावाला - अण्णांना सांभाळलं, त्यांची वाचनाची आवड, पुस्तकं विकत घेण्याची आवड पुरवली. आत्या अविवाहित राहिली. अण्णांचा इंदुबालाशी प्रेमविवाह. इंदुबाला - अरुणाची आई आणि प्रमिला आत्या सख्ख्या बहिणीसारख्या, मैत्रिणीसारख्या एकत्र राहिल्या आणि त्यांनी अण्णांचे अभ्यासासाठी लागणाऱ्या ग्रंथांचे, त्यासाठीच्या पोषक वातावरणाचे कोड पुरवले. चणे-कुरमुरे खात दिवस काढले. मोठया मुश्किलीने संग्रह केलेली दुर्मीळ पस्तकं आणि कागदपत्रं कामशेतचं धरण फुटल्याने आलेल्या पुरात वाहून गेली, तेव्हा अण्णांचे प्राण कंठाशी आले होते. परंतु प्राण पणास लावून त्यांनी पुनश्च सारा ग्रंथसंभार उभा केला. हाच गं्रथसंग्रह नीट मार्गी लागावा व त्याचा समाजाला उपयोग व्हावा व अण्णांच्या मेहनतीचं चीज व्हावं, म्हणून अरुणा प्रयत्नशील आहे. 'डॉ. रा.चिं. ढेंरे संस्कृती संशोधन केंद्र' या नावाने तिने न्यास स्थापन केलेला आहे.

अरुणानेही कधी नोकरी केली नाही. एक-दोन ठिकाणी काही अध्यापनाचं काम केलं. पण तिचं मन त्यात रमलं नाही. भारती विद्यापीठातील 'शाश्वती' अभ्यासकेंद्राचं संचालकपद तिने काही काळ सांभाळलं होतं. त्यातून तिने काही अभ्यासप्रकल्प पूर्ण केले. शासनाच्या काही समित्यांवर तिने कार्य केलेलं आहे. परंतु एखादं मानाचं पद तिने कटाक्षाने टाळलेलं आहे. मान-सन्मानाची अनेक पदं अण्णांसारखीच तिनेही टाळलेली आहेत.. किंबहुना आताचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचं कळवल्यावरदेखील ती हे पद स्वीकारण्यास नाखूश होती. तिचं म्हणणं एवढंच असावं असं वाटतं की, अण्णांनी सभा-संमेलनांची पदं कधी भूषवलेली नाहीत... पद-प्रसिध्दी, पैसा यांच्या झगमगाटात आपल्या प्रतिभेला कोणतीही झळ लागू नये वा ती झाकोळून जाऊ नये, याची ते सतत काळजी घेत आलेले होते आणि अण्णांचाच वारसा अरुणा चालवत असल्याने तीही या साऱ्या चकचकाटापासून दूर राहिलेली आहे. जर संमेलनासाठी मतदान पध्दती असती, तर तिने निवडणूक कधीच लढवली नसती. परंतु विनामतदान आणि सर्वानुमते ही निवड म्हणजे एक ऐतिहासिक घटना असल्याने सर्वांच्या आग्रहाखातर तिने संमेलनाध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली आहे, असं मला वाटतं. अण्णांनी गरिबीत दिवस काढतानाही आपल्या प्रतिभेचा तजेला कायम ठेवला, याची अरुणाला आजही जाणीव आहे. अण्णांशी तिचं ज्ञानात्मक नातं इतकं घट्ट होतं की, अण्णा आपल्यातून निघून गेल्याला अडीच वर्षं झाली, तरी अरुणा अण्णांच्या तसबिरीसमोर जाऊन त्यांना सांगते - ''अण्णा, मी जाऊन येते...'' आणि कोठे जाऊन आल्यावर म्हणते, '''अण्णा, मी आलेय...'' अण्णा आणि आई गेल्यानंतर मी दोन-तीन वेळा अरुणाकडे जाऊन आले. त्या प्रत्येक वेळी तिने त्यांच्या छायाचित्रासमोर जाऊन आई-अण्णांना सांगितलं, ''सिसिलिया आलीय'' आणि निघताना ती मला म्हणाली, ''तू सांग गं अण्णांना मी निघालेय म्हणून...'' तिचं हे बालसहज निरलस वागणं बघून माझ्याच डोळयात पाणी आलं टचकन. अरुणा म्हणाली, ''अगं, ते जिवंत असताना आपण म्हणायचो नाही का? मग आत्ताही आपण असंच म्हणू या... ते आहेतच ना आपल्यात अजून...''


एकदा दूरदर्शनने डॉ. जस्टिन ऍबट यांच्यावर माहितीपट करण्यासाठी माझ्याकडून माहिती मागवली होती. त्यासाठी मला संशोधन करायला हवं होतं. मुंबईतील ग्रंथसंग्रहालयातून मला थोडीफार माहिती मिळाली. त्यानंतर मी अरुणाशी संपर्क साधला. अरुणाने अण्णांना भेटण्यास सांगितलं. ही 1999 डिसेंबरची गोष्ट. तोपर्यंत मी अण्णांना भेटले नव्हते- म्हणजे तशी एकदा ओझरती भेट झाली. फारसं बोलणं झालं नव्हतं आणि अरुणाने तर त्यांच्याशी चर्चा करायला बोलावलं होतं. माझ्याकडे तर जुजबी माहिती होती, पण अण्णांसमोर उभी राहिल्यावर माझी भीतीच पळाली. मी त्यांना नमस्कार केला. मला ते एखाद्या संतासारखेच वाटले. आपण संत साहित्याचे वा लोकसाहित्याचे संशोधक आहोत असा कोणताच आव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. मला त्यांनी काही प्रश्नही विचारले नाहीत वा मला मिशनऱ्यांच्या मराठीच्या सेवेची किती माहिती आहे, हेही तपासून पाहिलं नाही. डॉ. जस्टिन ऍबट यांना अण्णांनी 'महिपतीचा अमेरिकन अवतार' असं संबोधलं होतं. डॉ. ऍबट यांच्यावर अण्णांनी लिहिलेलं आणि अन्य काही संदर्भ अण्णांनी मला दिले. भांडारकर इतिहास संशोधन केंद्रात जाण्यास सांगितलं. माझी ज्ञानलालसा पाहून एके दिवशी ते मला म्हणाले, ''तू तर माझी कन्याच आहेस. जशी अरुणा, तशी तू.'' हे ऐकून तर मला आकाश ठेंगणं झालं. त्यानंतर मी त्यांच्या घरातलीच एक होऊन गेले.

जाती-धर्म फिजूल असतात, प्रतिभाधर्मच सर्वात श्रेष्ठ असं मी मानत आलेले आहे. या प्रतिभाधर्मामुळेच माझा अण्णांच्या कुटुंबात प्रवेश होऊ शकला आणि प्रतिभेच्या प्रांतातले, अण्णांच्या, अरुणाच्या सहवासातले सारे सगेसोयरे माझेही सोयरे झाले. एकदा असं झालं की, त्यांच्या जन्मदिवशी मी त्यांना फोन केला. अरुणा फोन उचलेल अशा अपेक्षेत मी होते, तर तो उचलला अण्णांनीच. अण्णा बराच वेळ बोलत होते. मग त्यांनी फोन अरुणाला दिला. तेव्हा अरुणा म्हणाली, ''अगं, अण्णा कधी कोणाशी फोनवर बोलत नाहीत आणि इतका वेळ कोणाशी बोलतात म्हणून आम्हालाच आश्चर्य वाटत होतं. तर ते तुझ्याशी बोलत होते. बघ! अण्णांचं किती प्रेम आहे...'' हे म्हणजे माझं अहोभाग्यच!

अण्णांचं संपूर्ण कुटुंबच सर्जनशील कलेला, साहित्याला आपलं समग्र जीवन वाहिलेलं असं आहे आणि अण्णा केवळ या कुटुंबाचं नाही, तर साऱ्या विश्वाचंच लोकदैवत आहेत. अरुणाच्या आईला लोकगीतांच्या कित्येक ओव्या मुखोद्गत होत्या. प्रमिला आत्याही साहित्याच्या सहृदय रसिक वाचक आहेत. अरुणा तर प्रतिभेचं जन्मजात लेणं लेऊन आलेली आहे. वर्षाने काही काळ नोकरी केली आणि पूर्णवेळ लेखन, वाचन करता यावं म्हणून नोकरी सोडली. अनुवाद, लोककथा, संस्कृती आणि पर्यावरणविषयक अशी तिची वीस पुस्तकं प्रसिध्द झालेली आहेत. तिच्याही लेखनात सातत्य आहे. मिलिंद छायाचित्रकलेतून सर्जनशीलतेचं दर्शन घडवीत असतो. Light & Landscapes, Bonding यासारखी त्याची छायाचित्र-प्रदर्शनं आपल्याला त्या आदिम उजेड आणि काळोखाचं स्मरण करून देतात. वर्षाचा मुलगा ऋत्विक याचा जर्मन भाषेचा आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास आहे. विविध भाषांचा, साहित्याचा अभ्यास करताना मुळाकडे जाण्याची त्याची वृत्ती त्याला अण्णांच्या मूलधर्माकडे घेऊन जाते आणि त्याचं शास्त्रीय संगीत, त्याचे आजोबा शास्त्रीय संगीतकार आणि संगीतविषयक लेखन करणारे प्रख्यात बासरीवादक अरविंद गजेंद्रगडकर यांच्या स्वभावधर्माकडे घेऊन जाते. मिलिंदची कन्या मुक्ता फ्रेंच भाषेची अभ्यासक आहे. ती सातवीत असताना तिने मला तिची कविता वाचून दाखवली होती. तिची मराठी कविता आणि इंग्लिश ब्लॉगलेखन अरुणाच्या जातकुळीचं आहे. प्राजक्ता-मिलिंदची बायकोदेखील कविता करते. म्हणजे हे घराणंच साहित्य-संस्कृती-कलेची आराधना करणारं आहे. या साऱ्यांच्या ललितरम्यतेची डूब आपल्याला त्या कोवळया उत्सुक सर्जनशील काळोखातील उजेडाचे कवडसे दाखवते. संत ज्ञानेश्वरादी सारी भावंडं, संत चोखा महार आणि संत नामदेव यांची कुटुंबेच्या कुटुंबे विठ्ठलाचं गुणगान करण्यात रमली होती आणि त्यांच्या सहवासात येणाऱ्या साऱ्यांसाठी लेकुरवाळया विठ्ठलाप्रमाणे अण्णांनी  आपल्या संततुल्य व्यक्तिमत्त्वाने साधलेला महासमन्वय आहे, ज्यामध्ये सत्यसंशोधन आहेच, तसंच प्रतिभादर्शनही आहे.

अण्णांच्या या संततुल्य व्यक्तिमत्त्वामुळेच अण्णा जेथे जेथे गेले, तेथे तेथे त्यांना चांगली माणसं भेटत गेली. एकदा अरुणाकडून कळलं की लोकसाहित्यासंदर्भात संशोधनासाठी अण्णा, अरुणा आणि मिलिंद दक्षिणेकडे गेले होते. संध्याकाळची वेळ, खूप पाऊस. हे सारे जण गाडीतच बसून होते. गाडीचालकाला रस्ता कळेनासा झाला होता. डोंगरावरील एक झोपडीजवळ ते जेमतेम आले. एक गरीब आणि भला गृहस्थ त्यात राहत होता. त्याने तिघांना आपल्या छोटयाशा झोपडीत आश्रय दिला. त्यांना जेवूखाऊ घातलं. विशेष म्हणजे या तिघांना त्याची भाषा समजत नव्हती आणि त्याला या तिघांची! परंतु हावभावांनी वेळ निभावली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे अण्णांसह अरुणा-मिलिंद इच्छित स्थळी गेले. परक्या प्रांतात अनेक देवमाणसं अण्णांना, अरुणाला भेटलेली आहेत, भेटत आहेत. ही कोणती पुण्याई आहे? प्रतिभाधर्म जपल्यामुळे आणि साहित्याची साधना केल्याचाच हा परिपाक नव्हे का?

अण्णांचं मराठी साहित्यावर फार मोठं ऋण आहे. विसोबा खेचरापासून नृसिंहापर्यंतची अनेक अज्ञात स्थळं आपल्यासमोर त्यांनी खुली केली. मुस्लीम मराठी संत, महिपतीचा अमेरिकन अवतार आपल्यासाठी प्रकट केले. कितीतरी दैवतं सगुण-साकार करताना त्यांनी धर्मपंथभेद मानला नाही. त्यांना कसलं वावडं नव्हतं. धर्मपरंपरेची चिकित्सा करताना विवेकनिष्ठेचं भान त्यांनी सततच जोपासलेलं आहे. जपलेलं आहे. अरुणानेही आपल्या विविध वाङ्मयप्रकारात हे भान ठेवलेलं आहे. अरुणा ही अण्णांची सुकन्या! त्यामुळे दोघांच्याही प्रकृतिधर्मात आणि प्रतिभाधर्मात अनेक प्रकारांनी साम्य दाखवता येईल. त्यांची विनम्रता, शालीनता, लौकिक गोष्टीपेक्षा अलौकिकतेकडे असलेला त्यांचा ओढा, सकारात्मकता इत्यादी. अनेक संपर्क माध्यमांपासून आणि विशेष म्हणजे नवीन तंत्रज्ञानापासून दूर राहूनही साऱ्या जगाशी संपर्क साधणं त्यांनी सुलभ करून घेतलं, ते केवळ त्यांनी स्वीकारलेल्या ज्ञानोपासनेच्या व्रतामुळेच! अरुणाने आताआताशा संगणकाचं आणि भ्रमणध्वनीचं बऱ्यापैकी ज्ञान मिळवलेलं आहे; परंतु यंत्रापेक्षा ग्रंथांशी असलेलं मैत्र आणि माणसामाणसांतलं माणुसकीचं गोत्र सांभाळणं अरुणाला अधिक जमतं. म्हणूनच गर्भगूढातल्या त्या आदिम काळोखातल्या चिरंतन उजेडाची ओळख आजही आपल्याला अरुणा करून देत आहे. तिच्या प्रतिभेला झळाळी लाभलीय ती त्यामुळेच!

डॉ. सिसिलिया कार्व्हालो

9422385050