व्यासंगी संपादक डॉ. अरुणा ढेरे

 विवेक मराठी  08-Jan-2019

  

 

संपादक सर्जनशील आणि द्रष्टा, संवेदनशील आणि निर्भीड असतो. असा संपादक असला तरच तो त्या पदावर शोभतो आणि त्याच्या हातून ऐतिहासिक कार्यही घडते. डॉ. अरुणा ढेरे यांचे संपादन कार्य वरील वर्णनाला साजेसे-शोभणारे आणि ऐतिहासिकदृष्टया महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. संपादनाचे हे काम त्यांच्या वाङ्मयीन निष्ठेचा, प्रचंड व्यासंग, व  अभ्यासाचा, सुजाण आणि निखळ वाङ्मय दृष्टीचा, नि:पक्ष, नि:स्पृह, निर्भीड लेखणीचा, जबाबदारीचा, कौशल्याचा, गुणवत्तेचा, सकारात्मकतेचा सजग, सविनय, निकोप, गुणग्राहक मूल्यदृष्टीचा व माणुसकीच्या मानवतावादी विचारांचा प्रत्यय देणारे आहे. म्हणून त्याचे मोल फार मोठे आहे.

कविता, ललितगद्य, कथा, कादंबरी या विविध ललित वाङ्मय प्रकारातील लेखनासह संशोधन, समीक्षा लेखन करणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे यांनी उत्तम साहित्यकृतींचे अनुवाद आणि महत्त्वपूर्ण अशी संपादने केली आहेत. डॉ. अरुणा ढेरे यांचे बहुतांश लेखन वेगवेगळया ज्ञानशाखांशी अनुबंध ठेवणारे आहे. भाषा व साहित्यविषयक साक्षेपी दृष्टी जोपासतानाच लोकसाहित्य, लोकपरंपरा, प्राचीन, अर्वाचीन व साहित्य इतिहास, धर्म, संस्कृती, समाजशास्त्र, कला, विज्ञान अशा विविध ज्ञानशाखांतील विविधांगी संदर्भबहुलतेतून मानवी जीवनाचा व्यापक आणि व्यामिश्र असा पैस अरुणा ढेरे यांच्या लेखनातून प्रकट होतो. कोणत्याही राजकीय आणि वाङ्मयीन गटातटाचा स्वीकार न करता तटस्थता, संयतता, सजगता, समंजसपणा, सखोलता, सुबोधता, सुस्पष्टता, सर्जनशीलता आणि निर्भयता ही अरुणा ढेरे यांच्या एकूणच लेखनाची वैशिष्टये आणि सामर्थ्ये आहेत.

अरुणा ढेरे यांनी केलेल्या संपादनकार्याचे पुढील तीन प्रकारात वर्गीकरण करता येते.

अ) संपादने

l विवेकामृत (विवेकानंदांची पत्रे)

l नागमंडल (मराठी नागकथा)

l उमदा लेखक, उमदा माणूस

(वि.स. वाळिंबे : व्यक्ती आणि वाङ्मय)

l सुगंध उरले, सुगंध उरले

(ना.घ. देशपांडे यांची निवडक कविता)

l दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य

l फुलांची ओंजळ

(मालतीबाई किर्लोस्कर यांचे निवडक ललित लेख)

l स्त्री-लिखित मराठी कादंबरी (1950 ते 2010)

l स्त्री-लिखित मराठी कथा (1950 ते 2010)

l स्त्री-लिखित मराठी कविता (1950 ते 2010)

ब) नियतकालिकाचे व दिवाळी अंकांचे संपादन

l 'पसाय' या मासिकाचे संपादन (1989 ते 1991)

l अक्षर दिवाळी (1981 ते 1984) (सहयोगाने)

l बहिणाई दिवाळी वार्षिकांक

कविता विशेषांक (1993), कथा विशेषांक (1994)

l सेतुबंध दिवाळी वार्षिकांक (2001 ते 2003)

क) सहयोगाचे संपादन

l मराठी प्रेमकविता (शांता शेळके यांच्या सहयोगाने)

l स्त्रीसाहित्याचा मागोवा (खंड एक व दोन)

l लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन

(डॉ. रा.चिं. ढेरे : व्यक्ती आणि वाङ्मय)

(डॉ. वर्षा गजेंद्रगडकर यांच्या सहयोगाने)

संपादने

'जगाच्याभविष्यातील संस्कृतीचे अधिष्ठान आणि अंतरंग हे प्राचीन भारतीय अध्यात्म आणि पाश्चात्त्य विज्ञान यांचा संयोग असेल' असा आशावाद व्यक्त करणाऱ्या आणि भारतीय संस्कृती व वैदिक धर्म यांची पुनर्मांडणी करीत साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे वेधणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या पत्रांचा मौल्यवान ठेवा विविध ज्ञानशाखांतील अभ्यासकांना सतत साद घालत असतो. अरुणा ढेरे यांनी संपादित केलेला विवेकानंदांच्या पत्रांचा संग्रह 'विवेकामृत' हा अभ्यासकांना आणि वाचकांना उपयुक्त ठरणारा आहे.

समाजमानसशास्त्र, मिथकशास्त्र, मानववंशशास्त्र आणि लोकसाहित्य यांचे परस्पर नाते ललित साहित्यकृतींमधून उलगडत असते. लोकपरंपरेत, लोकजीवनात अगदी आदिम काळापासून 'नाग' हा कुतूहलाचा, श्रध्देचा, पूजनाचा विषय आहे. मराठी भाषेतील लोकसाहित्यातील विविध प्रकारांसह आधुनिक काळातील कविता, ललित गद्य, कथा, कादंबरी, नाटक यातून 'नाग' या प्राण्याविषयीच्या श्रध्दा, समजुती, मिथके, लोकाचार आदीविषयीची बरीच माहिती मिळते. अरुणा ढेरे यांनी मराठीतल्या नागविषयक कथांचे संपादन केले आहे. 'नागमंडल' हे संपादन अत्यंत वैशिष्टयपूर्ण आहे. नव्या अभ्यासकांना नव्या वाटा, नव्या दिशा देणारे आहे.

वि.स. वाळिंबे हे महाराष्ट्रातील एक नामवंत लेखक आणि पत्रकार होते. पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटविला आहे. वि.स. वाळिंबे यांच्या पत्रकारितेच्या कार्याची, वाङ्मयीन कार्याची चिकित्सा करीत त्यांच्या व्यक्तित्वाचा, जीवनकार्याचा व विचारांचा वेध घेणारे 'उमदा लेखक उमदा माणूस' हे पुस्तक अरुणा ढेरे यांनी संपादित केले आहे. या पुस्तकात दहा विभाग असून वाळिंबे यांच्या एकूणच जीवनकार्याचा स्मरणपट उलगडला गेला आहे. 'पत्रकार वाळिंबे' या भागात भा.द. खेर, वसंत काणे, जयंतराव टिळक, अशोक जैन, अरविंद गोखले, विजय कुवळेकर, सुभाष नाईक यांचे लेख आहेत. 'लेखक वाळिंबे' या विभागात आनंद यादव, विजया देव, आशा कर्दळे, अनिल मेहता, दिलीप माजगावकर, अशोक कोठावळे, अरुणा ढेरे, रविमुकुल यांचे लेख आहेत. वि.स. वाळिंबे यांच्या 'हिटलर', 'सावरकर', 'सत्तावन्न ते सत्तेचाळीस' या तीन पुस्तकांविषयी अनुक्रमे जयवंत दळवी, प्र.ल. गावडे, गजानन क्षीरसागर यांचे लेख आहेत. वि.स. वाळिंबे यांच्या निधनानंतर 'सकाळ', 'लोकसत्ता' आणि 'सामना' या तीन वृत्तपत्रांत आलेले अग्रलेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. वि.स. वाळिंबे यांच्या रामभाऊ जोशी, मधुकर कुलकर्णी, द.मा. मिरासदार, हे.वि. इनामदार, शां.ब. मुजुमदार, बाळ गाडगीळ या मित्रांनी लिहिलेले लेख या पुस्तकात आहेत. 'कृतार्थ सहजीवन' हा विनिता वाळिंबे यांचा लेख त्यांच्या गृहस्थ जीवनाचा वेध घेणारा आहे. याशिवाय 'गृहस्थ वाळिंबे' या भागात विदुला वागळे आणि विनय देशपांडे यांचेही लेख आहेत. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शांता शेळके आणि द.मा. मिरासदार यांनी घेतलेली वि.स. वाळिंबे यांची मुलाखत आणि दुसरे म्हणजे प्र.के. अत्रे, पु.ल. देशपांडे, शं.ना. नवरे, डॉ. श्रीराम लागू, गो.नी. दांडेकर, जयवंत दळवी, प्रभाकर पाध्ये, दि.वि. गोखले, अशोक जैन यांच्यासह आणखी काही मान्यवरांनी वि.स. वाळिंबे यांना वेळोवेळी पाठविलेली पत्रे या पुस्तकात आहेत. शेवटी वि.स. वाळिंबे यांचा जीवनपट आणि ग्रंथसूची आहे. अरुणा ढेरे यांनी संपादित केलेल्या 'उमदा लेखक उमदा माणूस' या पुस्तकातून लेखक आणि पत्रकार असणाऱ्या वि.स. वाळिंबे यांच्या व्यक्तित्वाचा, विचारांचा, जीवनाचा विविधांगी स्मरणपट उलगडला गेला आहे.

ना.घ. देशपांडे हे आधुनिक मराठी काव्यप्रवाहातील एक महत्त्वाचे कवी. नवकवितेच्या पूर्वकालातली ना.घ. देशपांडे यांनी विशुध्द प्रेमकविता लिहिली. कवी ना.घ. देशपांडे यांच्या निवडक कवितांचे संपादन अरुणा ढेरे यांनी केले आहे. मराठी कवितेच्या प्रवाहात अनन्यसाधारण असतानाही ना.घ. देशपांडे यांच्या कवितेविषयी फार लिहिले गेले नाही. खरे तर या कवितेविषयी आज नव्याने भरपूर लिहिण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर 'सुगंध उरले, सुगंध उरले' हे ना.घ. देशपांडे यांच्या निवडक कवितांचे अरुणा ढेरे यांनी केलेले संपादन महत्त्वपूर्ण आणि वैशिष्टयपूर्ण ठरते.

'दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य' हे अरुणा ढेरे यांनी संपादित केलेले आणखी एक महत्त्वाचे पुस्तक. दुर्गा भागवत यांच्या वाङ्मयीन व सामाजिक कार्यासह एकूण त्यांच्या व्यक्तित्वाची व विचारांची साक्षेपी चिकित्सा या पुस्तकात केली आहे. सर्वश्री रा.ग. जाधव, द.दि. पुंडे, प्रतिभा रानडे, मीना वैशंपायन, मंगला आठलेकर, तारा भवाळकर, सरोजा भाटे, लीला अर्जुनवाडकर, अरुण खोरे, शोभा नाईक या अभ्यासकांचे लेख या पुस्तकात आहेत. या लेखसंग्रहाच्या सिध्दतेविषयी प्रास्ताविकात अरुणा ढेरे लिहितात, 'मराठीत काय आणि खरं म्हणजे एकूण भारतीय साहित्यात काय, अंतर्दृष्टी असलेली एक विद्रोहाची परंपरा आहे. दुर्गाबाई त्या परंपरेच्या पाईक होत्या. त्यांच्या बाबतीत योजलेलं प्रत्येक विशेषण त्यांना शोभणारं ठरतं. रसिका, पंडिता, मनस्विनी, तेजस्विनी - प्रत्येक विशेषणावर त्यांचा हक्क होता. त्यांच्या ज्ञानसंपादनाला सतत एक करुणेची किनारही होती. त्यातूनच मानवी सहृदयतेचं अतिशय हृदयंगम दर्शन त्यांनी घडवलं आहे. नव्याचा हात त्यांनी जुन्याइतक्याच आत्मीयतेने धरला होता. म्हणून तर आदिवासींच्या आयुष्यात त्या सहज मिसळल्या, तमासगीर परिषदेच्या अध्यक्ष झाल्या आणि पोखरणला झालेल्या अणुचाचणीचा उल्हसित आनंद व्यक्त करताना अभिमानाने भरून आल्या. हे सगळं मिळून त्या होत्या. अशी मिळणी त्यांनी आपल्या विचाराने आणि अभ्यासात विविध ज्ञानशाखांचीही केली होती. त्यातून समग्र लोकजीवन, समग्र मानवी संस्कृती यांचाच एक मोठा पैस त्यांनी दाखवला. त्यांचा प्रतिवाद करताना त्यांच्या कार्यातल्या त्रुटींचा आणि उणिवांचा विचार करताना त्यांच्यापेक्षा वेगळी मतं मांडताना आणि वेगळया दृष्टीचा आग्रह धरतानाही त्यांच्या मोठेपणाची जाणीव विसरता येत नाही, यात सर्व आलं. हा लेखसंग्रह या जाणिवेतूनच सिध्द झाला आहे.'' (पृष्ठ 26). हा लेखसंग्रह वाचताना वरील वाक्यांचा प्रत्यय येतो. या लेखसंग्रहात दुर्गाबाईंचे ललित गद्य, त्यांचे कथात्म साहित्य, त्यांचा महाभारतविचार, आदिवासी साहित्य, लोकसाहित्य आणि दुर्गाबाई, बौध्द धर्म, बौध्द साहित्य आणि दुर्गाबाई आदी महत्त्वाच्या विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखन आहे. अरुणा ढेरे यांनी संपादित केलेले हे पुस्तक संशोधकांसाठी, अभ्यासकांसाठी उपयुक्त असे आहे. अशा प्रकारच्या संपादनांची वाङ्मयव्यवहाराला नित्य गरज असते.

लेखिका, संपादक प्रा. मालतीबाई किर्लोस्कर यांच्या निवडक लेखांचे 'फुलांची ओंजळ' हे संपादन अरुणा ढेरे यांनी केले आहे.


स्त्री-लिखित

साहित्यप्रकारांविषयीची संपादने

1950 ते 2010 या साठ वर्षांच्या काळातल्या स्त्री-लिखित मराठी कविता, कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारांचा साक्षेपी आढावा घेणारी तीन महत्त्वाची संपादने अरुणा ढेरे यांनी केली आहेत. 'स्त्री-लिखित मराठी कादंबरी : 1950 ते 2010' हा ग्रंथ 2013मध्ये प्रकाशित झाला. कमल देसाई, ज्योत्स्ना देवधर, आशा बगे, निर्मला देशपांडे, गौरी देशपांडे, तारा वनारसे, रोहिणी कुलकर्णी, अंबिका सरकार, शांता गोखले, सानिया, कविता महाजन या कादंबरीकारांच्या लेखनाचा साक्षेपी वेध विद्युत भागवत, स्वाती कर्वे, प्रभा गणोरकर, अश्विनी धोंगडे, मंगला आठलेकर, अरुणा दुभाषी, पुष्पलता राजापुरे-तापस, सिसिलिया कार्व्हालो, शोभा नाईक, विनया खडपेकर, नीलिमा गुंडी यांनी घेतला आहे. रेखा इनामदार साने यांनी 'आत्मशोधाच्या स्वयंप्रकाशी वाटा' ही प्रस्तावना लिहिली आहे.

या प्रकल्पाचा दुसरा खंड म्हणजे 'स्त्री-लिखित मराठी कथा : 1950 ते 2010' हा ग्रंथ 2016मध्ये प्रकाशित झाला. 'सहा दशकांच्या समृध्दीची गोष्ट' ही संजय आर्वीकर यांची प्रस्तावना या ग्रंथास असून कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, रोहिणी कुलकर्णी, आशा बगे, गौरी देशपांडे, उर्मिला पवार, सानिया, मेघना पेठे, प्रतिमा जोशी, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर या कथाकारांशी अनुक्रमे प्रिया जामकर, मीना वैशंपायन आणि नीलिमा बोरवणकर, वंदना बोकील-कुलकर्णी, मंगला आठलेकर, नीरजा, आणि अरुणा दुभाषी यांनी साधलेला संवाद आणि वरील सर्व कथाकारांची महत्त्वाची एकेक कथा या ग्रंथात समाविष्ट आहे.

या प्रकल्पाचा तिसरा खंड म्हणजे 'स्त्री-लिखित मराठी कविता : 1950 ते 2010' हा ग्रंथ 2016मध्ये प्रकाशित झाला. कवयित्री हिरा बनसोडे, प्रभा गणोरकर, रजनी परुळेकर, आसावरी काकडे, अनुराधा पाटील, मल्लिका अमरशेख, सिसिलिया कार्व्हालो, अंजली कुलकर्णी, नीरजा, प्रज्ञा दया पवार, कविता महाजन, संजीवनी तडेगावकर, कल्पना दुधाळ या कवयित्रींनी स्वत:च्या कवितेविषयी केलेले लेखन आणि त्यांच्या निवडक अकरा कविता या खंडात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याशिवाय 1950पूर्वी जन्मलेल्या, पण 1950नंतरच्या काळात विपुल लेखन करणाऱ्या पद्मा, इंदिरा, संजीवनी, शांता शेळके, अनुराधा पोतदार, ज्योती लांजेवार या कवयित्रींचे त्यांच्या कवितेविषयीचे लेखन व निवडक कविता डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांच्या सहकार्याने समाविष्ट केल्या आहेत.

वरील तिन्ही ग्रंथ मराठी वाङ्मयेतिहासाच्या अभ्यासकांसह एकूणच संशोधकांना, अभ्यासकांना उपयुक्त ठरणारे आहेत.

सहयोगाने केलेली संपादने

अरुणा ढेरे यांनी सहयोगाने केलेली तीन संपादने आहेत. शांताबाई शेळके यांच्या सहयोगाने केलेले 'मराठी प्रेमकविता' हे संपादन कवितेच्या आस्वादकांसह अभ्यासकांना महत्त्वाचे संदर्भ पुरविणारे आहे. 'स्त्री साहित्याचा मागोवा' (खंड एक व दोन) हा बृहद् प्रकल्प समाजेतिहासाच्या आणि वाङ्मयेतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे. तिसरे आणि महत्त्वाचे संपादन म्हणजे 'लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन (डॉ. रा.चिं. ढेरे : व्यक्ती आणि वाङ्मय) हा ग्रंथ होय. हा ग्रंथ अरुणा ढेरे आणि डॉ. वर्षा गजेंद्रगडकर यांनी संपादित केला आहे. या ग्रंथात तीन विभाग आहेत. पहिल्या व्यक्तीविषयक लेखांच्या विभागात सर्वश्री गो.म. कुलकर्णी, प्रभाकर मांडे, तारा भवाळकर, म.के. ढवळीकर, नरहर कुरुंदकर, लीला अर्जुनवाडकर, यू.म. पठाण, गुंथर सोन्थायमर, र.बा. मंचरकर, नरेंद्र कुंटे, आनंद कुंभार, अ.ह. लिमये, श्रीकृष्ण पोंक्षे, अशोक कामत, वा.ल. मंजूळ, ब.का. विप्रदास, प्रमिला रामचंद्र ढेरे यांचे रा.चिं. ढेरे यांच्या व्यक्तित्वाचा, जीवनाचा वेध घेणारे लेख आहेत. दुसऱ्या विभागात डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या वाङ्मयाची चिकित्सा करणारे लेख आहेत. त्यात सर्वश्री नरहर कुरुंदकर, ग.त्र्यं. माडखोलकर, लक्ष्मणशास्त्री जोशी, स.रा. गाडगीळ, म.के ढवळीकर, अशोक केळकर, तारा भवाळकर, गो.म. कुलकर्णी, गं.ब. ग्रामोपाध्ये, पंडित आवळीकर, अरविंद मंगरुळकर, पु.ल. देशपांडे, शं.गो. तुळपुळे, शां.भा. देव, श्री.के. गोळेकर, महादेवशास्त्री जोशी, शांताराम आठवले, प्र.के. अत्रे, दीपक घारे, कमलेश, कृ.पं. देशपांडे, अरुण आठल्ये, उषा तांबे या मान्यवर संशोधक, समीक्षक, अभ्यासकांचे मराठी व इंग्लिशमधील लेख आहेत. डॉ. ढेरे यांच्या एकूणच साहित्याची चिकित्सा करणारे हे लेखन म्हणजे बहुविध संदर्भांचा अमूल्य ठेवा होय. या ग्रंथाच्या तिसऱ्या विभागात डॉ. रा.चिं. ढेरे वाङ्मयसूची, काही पत्रे, डॉ. ढेरे यांच्याविषयीच्या लेखनाची सूची व त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची सूची यांचा समावेश आहे. काही प्रकल्पांकडे, ग्रंथाकडे समाजाच्या आणि वाङ्मयाच्या इतिहासात मैलाचा दगड म्हणून पाहिले जाते. 'लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन' हे संपादन म्हणजे तसा प्रकल्प अथवा ग्रंथ होय. उत्तम संपादन नव्या संपादनांसाठी बीजारोपण करणारे असते. हे संपादन तसे आहे आणि म्हणून वाङ्मयेतिहासात ते फार मोलाचे आहे.

संपादकीय गुणवैशिष्टये

याशिवाय अरुणा ढेरे यांनी 'पसाय' या मासिकाच्या संपादनासह वेळोवेळी काही दिवाळी वार्षिकांकांचेही संपादन केले आहे. हे संपादन कार्य डॉ. अरुणा ढेरे यांच्या साक्षेपी, व्यासंगी, अभ्यासू वाङ्मयीन आणि सामाजिक कार्याचा प्रत्यय देणारे आहे.

कोणत्याही भाषेतील वाङ्मयीन परंपरेत साहित्यनिर्मिती एवढेच महत्त्व साहित्य संपादन व समीक्षा संशोधन कार्यालाही असते. संपादन हे जसे कौशल्य आहे, तसेच ते आव्हानही असते. संपादन हे अत्यंत जिकिरीचे, जबाबदारीचे कार्य असते, तसेच ते अत्यंत तटस्थपणे, निष्ठेने, सजगपणे, गंभीरपणे, निकोप मूल्यदृष्टीने आणि पराकोटीच्या सकारात्मक दृष्टीने करावयाचे कार्य असते. संपादक हा लेखक, समीक्षक, संशोधक, आस्वादक, वाचक अशा साऱ्या गुणांनी परिपूर्ण असावा लागतो. संपादक सर्जनशील आणि द्रष्टा, संवेदनशील आणि निर्भीड असतो. असा संपादक असला तरच तो त्या पदावर शोभतो आणि त्याच्या हातून ऐतिहासिक कार्यही घडते. डॉ. अरुणा ढेरे यांचे एकूणच संपादन कार्य वरील वर्णनाला साजेसे-शोभणारे आणि ऐतिहासिकदृष्टया महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. हे कार्य त्यांच्या वाङ्मयीन निष्ठेचा, प्रचंड व्यासंग, व  अभ्यासाचा, सुजाण आणि निखळ वाङ्मय दृष्टीचा, नि:पक्ष, नि:स्पृह, निर्भीड लेखणीचा, जबाबदारीचा, कौशल्याचा, गुणवत्तेचा, सकारात्मकतेचा सजग, सविनय, निकोप, गुणग्राहक मूल्यदृष्टीचा व माणुसकीच्या मानवतावादी विचारांचा प्रत्यय देणारे आहे. म्हणून त्याचे मोल फार मोठे आहे. नव्या संशोधकांना ऊर्जा व दिशा देणारे हे संपादन कार्य समाजेतिहासात व वाङ्मयेतिहासात फार महत्त्वाचे ठरले आहे.

डॉ. अजय देशपांडे

9850593030

मराठी भाषा व साहित्य विभाग

लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी

[email protected]