मानवी नात्यांच्या सूक्ष्म पदराची कथा

 विवेक मराठी  09-Jan-2019

 

 

अरुणा ढेरे यांच्या विपुल लेखनसंपदेत त्यांचे कथासंग्रह फार महत्त्वाचे ठरतात. याला कारण असे की लेखक म्हणून एखाद्या विचाराची लांब सावली किंवा प्रभाव मनावर रेंगाळत राहताना त्या विचाराची व्यक्तता त्या क्षणाच्या ऊर्मीतून कवितेत किंवा कथेत होत असली, तरी बरीच व्यापून उरत असावी. अरुणाताई लिहिताना विशिष्ट भूमिका घेऊन लिहिताना नाही जाणवत. म्हणून सहज विणकाम केल्यासारखा त्यांचा हात लेखनावर जाणवत राहतो.

नात साचलेल्या, निर्माण झालेल्या, निरीक्षणातून, अनुभवातून आकलन झालेल्या बोधाला किंवा आयुष्य म्हणून या सर्वांकडे अगदी तटस्थपणे बघताना मनात आलेल्या सर्वच विचारांना व्यक्त करण्याचा प्रत्येकाचा एकेक फॉर्म असतो. पध्दत असते. एखादी सुरावट संगीतकाराकडे असते, चित्रकाराकडे कुंचला आणि रंग असतात, कुणाकडे नृत्य, तर कुणाकडे गाणे असते, तसेच लेखकाकडे शब्द असतात. शिवाय यातही अनेकविध प्रकार असतातच. म्हणजे कविता, कथा, नाटक किंवा कादंबरीदेखील. अभिव्यक्तीचे माध्यम शब्द असले, तरी तिचा प्रकार वेगवेगळा असूच शकतो. आवडत्या लेखकाने हाताळलेले सर्वच प्रकार वाचताना त्याच्या सर्व कृतीत एक सहसंबंध जाणवतो का? असा प्रश्न जर विचारला, तर 'हो' असे उत्तर देता येईल.

 मी प्रसिध्द लेखिका, कवयित्री, संशोधक आणि अभ्यासक, तसेच 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्याबद्दल बोलते आहे. अरुणा ढेरे कवयित्री म्हणून सर्वपरिचित आहेतच. मात्र त्यांनी इतर साहित्यप्रकारदेखील अतिशय समर्थपणे हाताळले आहेत. कवयित्री म्हणून त्यांचे सहा कवितासंग्रह तर आहेतच, शिवाय 'उर्वशी', 'मैत्रेयी', 'महाद्वार' या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र इथे त्यांच्या कथालेखनाकडे कुतूहलाने पाहायचा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

'अज्ञात झऱ्यावर रात्री' (1995), 'उंच वाढलेल्या गवताखाली' (2000), 'पावसानंतरचं ऊन' (2006), 'मन केले ग्वाही' (2001), 'कृष्णकिनारा' (1992) असे एकूण पाच कथासंग्रह आणि 'प्रतिष्ठेचा प्रश्न' (2006) हा अनुवादित कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. यापैकी 'कृष्णकिनारा' या संग्रहाला वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आणि त्याचे गुजराती, हिंदी या भाषांतही अनुवाद झाले.

अरुणा ढेरे यांच्या विपुल लेखनसंपदेत त्यांचे कथासंग्रह फार महत्त्वाचे ठरतात. याला कारण असे की लेखक म्हणून एखाद्या विचाराची लांब सावली किंवा प्रभाव मनावर रेंगाळत राहताना त्या विचाराची व्यक्तता त्या क्षणाच्या ऊर्मीतून कवितेत किंवा कथेत होत असली, तरी बरीच व्यापून उरत असावी.

अरुणाताई लिहिताना विशिष्ट भूमिका घेऊन लिहिताना नाही जाणवत. म्हणून सहज विणकाम केल्यासारखा त्यांचा हात लेखनावर जाणवत राहतो. ना खूप सैल, ना खूप घट्ट... अगदी मध्यम लय, एकेक टाका सहज विणावा, उचलावा, तोडावा आणि वीण आकाराला यावी तसा लेखनाचा घाट दिसतो.

सांगायचं हे की लिहितानाच ती कल्पना आपला घाट सोबत घेऊन येत असावी. लेखकाला कोणत्या घाटात लिहायचे आहे हे त्या वेळी फार महत्त्वाचे राहत नसावे. प्रतिभेच्या या ऊर्मीच्या क्षणाला मनातला विचार व्यक्त झाल्यावरही त्याच्या मांडवझळात लेखक हुरहुरत राहत असेल का?

हे प्रश्न मी विचारत आहे, कारण हा सहसंबंध मला अरुणा ढेरे यांच्या लेखनात जाणवू लागतो. कथेतल्या एखाद्या प्रसंगाशेजारी त्यांची कविता नेऊन ठेवावीशी वाटते किंवा कवितेपाशी एखादी कथा. आणि जाणवत राहतं की कविता लिहूनही आणखी झिरपत राहिलं खोल... ते सारं कथेला देऊन टाकलं आहे. आता काहीही उरलं नाही. हे, मनातलं सगळं देऊन द्यायची त्यांची पध्दत रम्य आहे. इथे त्यांच्या सर्वच कथांवर ऊहापोह शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या निवडक कथांबद्दल बोलू या!

आत्ता माझ्यासमोर अरुणा ढेरे यांचा 'उंच वाढलेल्या गवताखाली' हा कथासंग्रह आहे. त्यातली पहिलीच, याच शीर्षकाची कथा मी वाचते आहे. कथेतली नायिका अर्चना, शिक्षणासाठी घरापासून लांब परदेशात आहे. तिथेही तिला राजीव आठवतो आहेच. आणि इथे तिच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत अब्दुल आदिन आला आहे. 'कुरळया केसांचा, सुभग आणि शाळीग्राम असावा पूजेतला तसा काळा' (हे वर्णनही लेखिकेनेच केले आहे.)  कथा वाचताना मनात सतत येत राहतं कथेत एक परिक्रमा आहे. राजीवपासून लांब आणि अब्दुल आदिनच्या वर्तमानात राहताना अर्चनाचं भावविश्व, मध्ये मध्ये बहिणीला लिहिलेली पत्रं आणि आदिनच्या डोळयातली तिच्याबद्दलची कोवळी उत्सुक मागणी! हा तिढा अरुणा ढेरे यांनी इतका सुरेख आणि नजाकतीने विणला आहे की ते वाचताना आपल्यालाही ती वीण तशीच जपावीशी वाटू लागते. अब्दुल आदिन जेव्हा अर्चूला 'डेट'बद्दल विचारतो, तेव्हा ती त्याला जे उत्तर देते, ते इतके खरे आणि नेमके आहे - अर्चू म्हणते, ''आमच्या देशात असलं काही करत नाहीत मुली. त्या वाट बघतात चुटपुटत्या स्पर्शाची आणि स्वत:चं उधाण सांभाळत राहतात. सापडतात नात्यातल्या पुरुषांच्या हिंस्र स्पर्शांच्या तावडीत, स्वत:शीच अपराधी होत राहतात. खेळवल्या जातात, चाळवल्या जातात कुणाकुणाकडून. कधी खजील होतात, कधी उनाड. करतात कधी भलतं साहस, अकाली पिकलेलं फळ होतात..'' अब्दुल आदिनला हे सर्व सांगताना, त्याने दिलेल्या चिनी कवितांचा इंग्लिश अनुवाद आणि हातावर अलगद टेकवलेले केशरी फूलपाखरू.. या कोवळिकीवर जीव ओवाळून टाकणारी अर्चू पाहिली की मला त्या प्रसंगाशेजारी अरुणा ढेरे यांच्या 'जावे जन्माकडे' या कवितासंग्रहातली 'संपृक्त' कविता नेऊन ठेवावीशी वाटते. मनात येतं, अर्चूच्या या अनुभवाला जर तिने कधी शब्दरूप दिलं, तर ती कविता नक्कीच 'संपृक्त' असेल यात शंका नाही.

अगदी याच धाग्याला पुढे नेत मला दर वेळी कृष्णकिनारामधली राधेविषयी बोलणारी रुक्मिणीदेखील आठवते. अरुणा ढेरे यांनी रुक्मिणीच्या काही कविता रचल्या आहेत. त्यातली ही कविता..

'ती भेटलेली असते आपल्याला पूर्वीच...' ही राधेची ओळख अगदी तशीच रुक्मिणी कृष्णकिनारा पुस्तकातही सांगते.

कवीच्या मनातले हे कवडसे त्याच्या कथेतही झळाळत राहतात आणि वाचक म्हणून या गोष्टीचा शोध लागणे अतिशय आनंदाचे वाटते. वाचनानंद दुणावणारे ठरते.

'कृष्णकिनारा' हे त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय पुस्तक आहे. त्यावर कायम खूप बोलले गेले आहे. त्यामुळे त्यांच्या इतर कथांकडे दृष्टिक्षेप टाकणं आवश्यक वाटत आहे.

'उंच वाढलेल्या गवताखाली' या संग्रहाची अर्पणपत्रिका 'समजुतीपलीकडे राहिलेल्या पुष्कळ सुखदु:खांना' अशी आहे. त्या संग्रहातल्या कथादेखील याच अर्पणपत्रिकेभोवती फिरत्या दिसतात. 'वळवाचा पाऊस' या कथेतला राजीव आणि त्याचे सुहितेच्या घराशी दुरावलेले संबंध आणि अखेरच्या घटका मोजणारा राजीव!

सुहिता आणि राजीव यांच्या नात्याला कुठलेही नाव देण्याची गरज नाही. ते जे आहे तसेच आणि सुरेख आहे. खळखळून हसणारा राजीव, सुहितेला 'पंडिते..' अशी हाक मारणारा राजीव...!

'वळवाचा पाऊस' ही कथा तिचा नितांतसुंदर प्रभाव आपल्यावर सोडण्यात यशस्वी होते.

अरुणा ढेरे यांच्या कथा, सुरुवातीलाच सांगितलं त्याप्रमाणे कुठलीही एक भूमिका घेऊन लिहिल्या नाहीत. त्या कथेतला प्रसंग तसा खूप छोटा आहे. अगदी चटकन एका ओळीत सांगता यावा असा. मात्र तरीही त्या कथेभोवतीची वीण खोल आहे. मानवी मनाच्या अतिसूक्ष्म संवेदनांचे चित्रण त्यांच्या कथेत दिसतं. ते समकालीन कथेच्या पटावर जोखताना त्यांच्याशी अजिबात जुळत नाही. आणि तरीही ती आपल्याला हवीशी वाटते, कारण तीत आपल्याला आपल्याच मनाचे तरंग उमटलेले दिसतात.

'मन केले ग्वाही' हा 2001 साली प्रकाशित झालेला त्यांचा संग्रह. 'वाङ्मय व्यवहारातील सगळया भल्या-बुऱ्या अनुभवांना..' अशी अर्पणपत्रिका असलेल्या या संग्रहात एकूण 26 कथा आहेत. या कथेतली 'रहस्यकथेची सुरुवात' ही कथा वेगळी आहे. मित्राच्या प्रभावातून त्याच्याच वाणीतून व्यक्त झालेल्या अनुभवांना शब्दबध्द करत लेखक झालेल्या आणि नंतर केवळ सवयीने आपला फॉर्म टिकवून ठेवण्यासाठी चमकदार शब्दांत लिहीत राहणाऱ्या लेखकाची कथा दिसते. त्याला एक दिवस दिसलेले भयाण स्वप्न आणि त्याचा अर्थ शोधत घेतलेला स्वप्नाचा माग आणि समोर आलेले सत्य... त्यात लेखक आणि त्याचं शब्दांशी असलेले नातं यावर भाष्य करताना अरुणा ढेरे लिहितात, 'त्याला आतल्या आत जाणवले की ती माणसे नव्हती. भुतेही नव्हती. ते चक्क शब्द होते. त्याने वापरलेले शब्द. कोणी त्याला थपडा मारत होते, कोणी नखे खुपसत होते आणि कोणी नुसतेच गुरगुरत होते.'

इथे पुन्हा एकदा अरुणा ढेरे यांच्या 'मंत्राक्षर' या काव्यसंग्रहाकडे आपण नकळत वळतो. 'मंत्राक्षर' हा संग्रह 1990ला प्रकाशित झाला. 'प्रारंभ' या पहिल्या संग्रहाच्या मनोगतातदेखील अरुणा ढेरे यांनी शब्दांविषयी स्वत:च आपले भाव व्यक्त केले आहेत. मात्र 'मंत्राक्षर' हा संग्रह महत्त्वाचा आहे तो यासाठी की त्यात त्यांनी लेखकाला शब्द कसा दिसतो हे सांगण्यासाठी एक स्वतंत्र विभागच शब्दांच्या कवितेचा केला आहे. कलावंताला अनेक तऱ्हांनी भेटलेला शब्द सांगताना त्या अनेक रंगांच्या, पोताच्या कविता मानवी अनुभवाच्या पातळीवर आपल्यासमोर आणून ठेवतात, तेव्हा ते सारे अनुभव अद्भुताचे होतात. अमूर्ततेला या पध्दतीने शब्दरूप देणाऱ्या त्या वैशिष्टयपूर्ण कवयित्री ठरतात. 'गारुडी' या शीर्षकाची कविता त्या विभागात आहे. 'रहस्यकथेची सुरुवात' या कथेला त्याच कवितेचे अस्तर आहे.

याच कथेत प्रदीपला बापू स्पष्ट म्हणतात, ''भुतासारखा त्या शब्दांच्या छाताडावर नाचला आहेस नुसता. लेखक आहेस की गांजेकस पहिलवान?''

अनुभवाचे अजस्रपण अंगावर घेऊन त्यांना शब्दातून वाट मोकळी करून देणं हे अवघड आहे.

मात्र या अजस्रपणाला त्याच तीव्र संवेदनशीलपणे भिडलं की त्या मंथनातून प्राप्त होणारं नक्कीच बावन्नकशी ठरतं. अरुणा ढेरे यांच्या लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे मिथकांचा वापर.  त्यांची सीतेची गोष्ट आजवर अनेकदा अभिवाचनात अनेकांनी ऐकली आहे, मात्र 'उंच वाढलेल्या गवताखाली' या संग्रहातल्या 'मायलेकी' आणि 'अशोकवनात' या दोन कथा एरवी फार चर्चेत येत नाहीत. दोन्ही कथांत एक सुरेख साम्य म्हणजे त्यातल्या स्त्रियांचे संवाद!

'मायलेकी' या कथेत दुष्यंताच्या दरबारातून स्वत:ची ओळख पटवून देण्यात अयशस्वी ठरलेल्या आणि मानहानी पदरात पाडून घेत कोसळलेल्या शकुंतलेला, पुष्पावतीकरवी आपल्याकडे घेऊन आलेली मेनका आहे. त्यात मेनका आणि शकुंतला यांचा संवाद आहे. मायलेकीत इतका कोवळा, गुलाबी गाभ्यासारखा संवाद होऊ शकतो हे सांगणारा संवाद! शकुंतला मेनकेला सांगते, ''तुला माहीत आहे आई? प्रेमाचा चेहरा आपल्याला वाटतो तितका गोड आणि विश्वासू नसतोच मुळी. खूप फसवा असतो तो. जवळ गेल्यावर कळतं की ते प्रेम नाहीच मुळी. तिथे आहे एक सुळे दाखवणारं झडप घालणारं एकटेपण आणि भय.. तुला कधी दिसलंय ते?'' अतिशय निरागस अशा प्रेमाचं आमिष दाखवून नियतीच्या एका फटक्याने आपल्या मुलीला किती मोठं केलं, याचा विचार करतानाच मुलीला सावरत मेनका तिला जे उत्तर देते, ते जरी मिथकातल्या पात्रांच्या तोंडी असलं तरी वर्तमानाला साजेसं आहे. मिथकांचा वापर करतानाच त्यांना वर्तमान परिस्थितीशी आणून जोडणं हे मोठे श्रेय अरुणा ढेरे यांना द्यावे लागेल, हे खरे. मेनका शकुंतलेला म्हणते, ''माझे बाई, आईपणासाठी पुरुषाचा लग्नाचा आधार हवा हे तुला कुणी सांगितलं? तो मिळाला तर आयुष्याला सुंदर घडवता येतं हे खरं; पण तसं झालं नाही, तरी तुझी फळती ओटी काय असुंदर आहे की काय? दु:ख कसलं करतेस आणि लाज कसली बाळगतेस? चल, आपण दोघी मिळून तुझं बाळ वाढवू. मोठा करू त्याला.'' याच संग्रहातली 'अशोकवनात' ही कथा, रावणाने अशोकवनात नजरकैदेत ठेवलेली सीता आणि तिच्यावर पहारा ठेवून असलेली आणि मैत्रीणच झालेली 'त्रिजटा' यांच्यात घडलेला संवादही असाच अतिशय टोकदार आणि समर्पक आहे. मुख्य म्हणजे कवितेहूनही कथेत अरुणा ढेरे यांना हे धारदार पातं लखलखत ठेवणं उत्तम जमलं आहे. त्रिजटा रावणाची दासी आहे, मात्र तिच्यातलं आदिम, प्राकृतपण तिला वेगळं ठरवतं! संस्कृतीच्या प्रभावात मानवी व्यवहारांना जोखणाऱ्या सीतेच्या अगदी विरुध्द त्रिजटा आहे. ती सीतेचा अगदी मायेने सांभाळ करते आहे. आणि म्हणूनच रामाबद्दल सीतेचं प्रेम पाहून ती सीतेला म्हणते, ''सांभाळ सीते, असलं प्रेम म्हणजे गरुडापुढे काळीज ठेवण्यासारखं आहे. गरुड असल्यामुळे काय झालं? लचका तोडणारच तो! आणि एक सांगू? असलं प्रेम इतकं उंच नेतं तुम्हाला आणि सुळक्याच्या टोकावर असं उभं करतं की तसूभराचा तोल गेला तरी कपाळमोक्ष. आणि पुन्हा इतर जग दिसतच नाही तुम्हाला जसं असतं तसं. तुटता तुम्ही जगाच्या जाणिवेपासून. एकेरी होता.''

या मायाळूपणे सीतेची समजूत घालणारी प्रेमळ त्रिजटा शूर्पणखेबद्दल बोलताना मात्र सीतेच्या संस्कारी मनावर सरळ सरळ भडिमार करते. लक्ष्मणाशी विवाहाला तयार झालेल्या शूर्पणखेवर टीका करणाऱ्या सीतेला ती म्हणते, ''हाच तुमच्या-आमच्यातला फरक. स्त्री-पुरुषामधलं प्रेम आणि शरीराची भेट किती सुंदर असते. ती सोडून लग्नाचं महत्त्व वाढवणं हा तुमचा मूर्खपणा! प्रेमाची ताकद खूप मोठी असते. मला विचारशील तर पुन्हा पुन्हा प्रेम करू शकतो माणूस. एकाच व्यक्तीपुरतं ते बांधलेलं असतं, हे मला नाही पटत. तुमच्या लग्नाच्या आणि पातिव्रत्याच्या कल्पनांचे साखळदंडच होणार अशानं तुमच्या पायात.''

हे संवाद वाचताना सीतेप्रमाणेच आपणही संस्कारांच्या चश्म्यातून ते वाचत जातो आणि वर्तमानाचा संदर्भ जोडू पाहिला तर पुन्हा त्रिजटा बोलतेय त्या मुद्दयापाशी काळ येऊन थांबतोय का? या प्रश्नावर विचार करू लागतो.

अरुणा ढेरे यांच्या मिथक कथांचं हे विशेष आहे.

'प्रतिष्ठेचा प्रश्न' हा त्यांचा अनुवादित कथांचा संग्रह आहे. भारतातल्या विविध भाषांतल्या लेखिकांच्या कथांचं मराठीत केलेलं हे भाषांतर आहे. त्या कथांची निवडच सर्वस्पर्शीपण आणि अनुवादातून अरुणा ढेरे यांचं भाषेवर असलेलं प्रभुत्व पुन्हा एकदा स्पष्ट होतं.

कथालेखिका म्हणून अरुणा ढेरे यांच्या कथांबद्दल बोलताना पुन्हा एकदा त्यांच्या 'मन केले ग्वाही' या संग्रहातल्या याच शीर्षकाच्या कथेवर यावंसं वाटतं. प्रसिध्द लेखक, दादा, त्यांच्यावरच्या टीकात्मक लेखनावर म्हणतात, ''जीवनाच्या एकाच नसेवर बोट ठेवूनही त्याच्या हृदयाचे ठोके मोजता येतातच. एकाच जागेवर खणत खणत भूमीचा अंतर्भाग तपासता येतोच गाभ्यापर्यंत. मी किती विस्तारलो हे सांगण्याच्या भरात मी किती बुडालो हे नाहीच आलं लक्षात तुमच्या!' 

याच कथेत त्यांनी एक वाक्य दादांच्या तोंडी दिलं आहे, ते फार महत्त्वाचं आहे, ''चाहते डोळस असत नाहीत आणि टीकाकार प्रगल्भ असत नाहीत, हाच सर्वसाधारण अनुभव आपणही गाठीला बांधायचा का?''

सध्याचा साहित्य व्यवहार पाहिला, तर हे वाक्य फार बोलके ठरावे!

'एकला चलो रे..' या कथेत मीरेला देवाशीष मुखर्जी - म्हणजे देवाबाबू सांगतात ती अवघ्या लेखनाची किंवा एकूणच कलानिर्मितीची प्रेरणा ठरावी.

'एक म्हणजे माणसावर आणि जगण्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे. दुसरं म्हणजे संहाराला सर्जनाचं उत्तर देता आलं पाहिजे आणि तिसरं म्हणजे स्वत:साठी सगळं सोडता आलं पाहिजे.'

देवबाबू मीरेला जे सांगतात, ते सगळे अरुणा ढेरे यांच्या आजवरच्या सर्वच लेखनातून सातत्याने दिसत आले आहेच.

92व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त होताना, आजच्या सर्वच प्रकारच्या अस्वस्थ भोवतालात 'संहाराला सर्जनाचं उत्तर देता आलं पाहिजे' या विचारावर विश्वास ठेवणारी लेखिका-कवयित्री म्हणून त्यांच्या नियुक्तीचा मनभर आनंद होतो आहे, तो यासाठीच!

 

माधवी भट

9822324151