समज

 विवेक मराठी  11-Feb-2019

समज आणि शहाणपण हे काही वयावर अवलंबून नसतं, याची जाणीव या शिबिराने आम्हांला अगदी ठळकपणे करून दिली. आणि मुलांना जोखायच्या मोजपट्टया यापुढे बदलायला हव्यात, हा इशाराही!

 

 या गटातल्या सगळयांनी इकडे लक्ष द्या जरा... मी एक महत्त्वाची जबाबदारी तुमच्या गटावर देणार आहे.'' दुसरं वाक्य कानावर पडलं आणि लगेच शांत होत त्या गटातली मुलं शिबिरातल्या मावशीभोवती गोळा झाली. मे महिन्याच्या सुट्टीतल्या त्या शिबिरात एक मुलगी अशी होती, जी वयाने इतर सर्वांएवढीच असली, तरी तिची बौध्दिक वाढ आणि समज तुलनेनं खूप कमी होती. त्यामुळेही असेल कदाचित, ती अतिशय बुजरी होती. मान वर करून, डोळयाला डोळा भिडवून समोरच्याशी बोलणं तिला जमत नव्हतं. तिचं हे बुजरेपण कमी व्हावं, म्हणून तिच्या आईने तिला शिबिराला पाठवलं होतं. तिच्याविषयी सारं काही विश्वासाने सांगून शिबिरातल्या मावश्यांवर तिची जबाबदारी सोपवली होती.

''आपल्यात काही कमतरता आहे हे तिलाही आतून जाणवत असावं. म्हणूनच तिची मान सदोदित खाली असते. ते समजून घेऊन तिला प्रोत्साहन द्यायला हवं, हे तिच्या बाबांच्या लक्षात येत नाही. ते आमच्या धाकटया, नॉर्मल असलेल्या मुलीशी हिची तुलना करतात. हिच्यात वैगुण्य आहे हे विसरून तिचं हिच्यासमोर सतत कौतुक करत राहतात. त्यामुळे ही आणखीनच मिटून गेली आहे. तिचा आत्मविश्वास थोडा तरी वाढावा यासाठी तिला शिबिराला पाठवायची माझी इच्छा आहे. बाकी काही अपेक्षा नाही. या निमित्ताने तिच्या वयाच्या मुलांमध्ये तिला मिसळायला तरी मिळेल. घ्याल ना तिला?'' तिच्या बोलण्यातलं आर्जव आणि मुलीसाठी मनात असलेली कळकळ आमच्यामधल्या आईला भिडली.

''येऊ दे तिला शिबिरात. आम्ही तिची काळजी घेऊ आणि ती सगळयांमध्ये मिसळावी यासाठी प्रयत्नही करू.'' असं त्या मुलीच्या आईला आश्वासन दिलं, तेव्हाच आमच्यातल्या कार्यकर्त्याची परीक्षा सुरू झाली. आपण स्वत:बरोबरच, मुलांच्याही वतीने आश्वासन देऊन मोकळे झालो आहोत हेही लक्षात आलं होतं. साधारण तिच्याच वयाची, मजा करण्यासाठी आणि वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी शिबिरात सामील झालेली मुलं दाखवतील का तिला सांभाळून घेण्याचा समंजसपणा? हा प्रश्न मनात होताच. काही अंदाज बांधत राहण्यापेक्षा, मुलांना विश्वासात घेऊन थेट मुलांशीच बोलायचं ठरवलं आणि एका गटातल्या मुलांमध्ये जाऊन उभ्या राहिलो. मावशी काहीतरी महत्त्वाची जबाबदारी देणार हे ऐकल्यावर सर्वांचेच कान टवकारले गेले. त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ घेत माझ्या मैत्रिणीने सांगितलं, ''हे बघा, हीदेखील तुमच्यात गटात असणार आहे. ती वयाने तुमच्याएवढीच असली, तरी भयंकर लाजाळू आहे आणि थोssडी हळूबाई आहे. तुम्ही सगळयांनी मिळून तिला सांभाळून घ्यायचं आहे. गटांमध्ये ज्या स्पर्धा होतील त्या सगळया स्पर्धांमध्ये ती तुमच्याबरोबर असायला हवी. तिला बाजूला ठेवायचं नाही. दिलेलं टास्क पूर्ण करण्यासाठी तिला चिअर अप करायचं. जमेल ना तुम्हांला हे?'' एकाग्रचित्ताने ऐकत असलेल्या त्या सगळयांनी क्षणाचाही विचार न करता किंवा या गोष्टीचा जारही बाऊ न करता, एकसाथ होकार भरला आणि आम्ही निश्चिंत झालो.

जसं बोलली तशी मुलं वागतीलही, हे आम्हांला अगदी पहिल्या सत्रापासूनच कळत गेलं. सुरुवातीला कळत-नकळत ती गटापासून दूर गेली आहे, हे लक्षात आलं की गटातलं कोणी ना कोणी तिच्याशी प्रेमाने बोलून तिला हाताला धरून गटात परत आणत होतं. आवर्जून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होतं. तिच्या खांद्यावर हात ठेवत मित्रत्वाच्या नात्याने तिला बोलण्यात सहभागी करून घेत होतं.

दुसऱ्याच दिवशी सकाळी तिला शिबिरस्थानी सोडताना तिच्या आईने म्हटलं, ''काहीतरी जादू झालीय हिच्यावर. खूप खूश होती काल. आज सकाळीही शिबिराचं नाव घेतल्यावर एका हाकेत उठली.'' त्या निरागस लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आम्हांलाही वाचता येत होता. याचं श्रेय अर्थातच तिच्या गटातल्या सर्व समंजस मुलांचं होतं. पुढच्या आठवडयाभरात त्या सगळयांचं इतकं गूळपीठ जमलं की, गटचर्चेतही तिने एक वाक्य तरी बोललंच पाहिजे असा प्रेमळ लकडा तिच्यामागे लावून तिला बोलायला भाग पाडलं जाऊ लागलं.

सूर्यनमस्काराच्या स्पर्धेतही तिचा उत्साह टिकावा, म्हणून तिला सगळयांनी चिअर अप केलं आणि काय आश्चर्य...! तिनेही तिच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत, त्यांच्या प्रोत्साहनाला प्रतिसाद देत स्वत:च्या क्षमता ताणल्या आणि आमचा अंदाज खोटा ठरवत व्यवस्थित सूर्यनमस्कार घालून दाखवले. जिच्याकडून फारशी अपेक्षा नव्हती, तिचा शिबिरातला उत्साही सहभाग आमचा हुरूप वाढवणारा होता. समारोपाच्या दिवशी तिच्या आईच्या डोळयात पाणी आलं. ''या शिबिराने माझ्या लेकीला जो आनंद आणि आत्मविश्वास दिलाय, त्याबद्दल आभार व्यक्त करायला माझ्याजवळ शब्दच नाहीत.'' ती म्हणाली. खरं तर हे आव्हान आमच्यापेक्षाही पेललं होतं ते शिबिरातल्या तिच्या वयाच्या मुलांनीच. पहिल्या दिवशी त्यांना विश्वासात घेऊन सांगितल्यानंतर त्यांनी ज्या सहजतेने तिच्याशी समंजस व्यवहार केला, तो मोठयांना थक्क करणारा होता. त्यांनी तिचा मन:पूर्वक स्वीकार केला होता आणि त्यांच्या प्रत्येक सहजकृतीतून तो भाव आमच्यापर्यंत पोहोचत होता. एखाद्या अनोळखी जिवाला मायेने आपलंसं करणं म्हणजे काय, याचा वस्तुपाठ होता तो. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी योजलेलं ते शिबिर, खरं तर आमच्याच व्यक्तिमत्त्वाचा विकास करत होतं. आम्हांला शहाणं करत होतं.

केवळ तो गटच नाही, तर शिबिरात दाखल झालेली सगळीच मुलं म्हणजे गुणिराम होती. त्याच शिबिरात एक दिवस आम्ही सर्वांना घेऊन मतिमंद मुलांच्या शाळेला भेट दिली. आपण कुठे चाललो आहोत हे त्यांना माहीत असावं, तिकडे गेल्यावर एकदम गांगरून जाऊ नये वा विचित्र प्रतिक्रिया देऊ नये, म्हणून जाण्याआधी त्यांना त्या शाळेविषयी माहिती देण्याचं ठरलं. एका मावशीने सांगितलं, ''आता आपण ज्या शाळेत जातो आहोत ना, त्या शाळेतली मुलं तुमच्यापेक्षा खूप मोठी आहेत. काही तुमच्या मोठया दादाएवढे असतील, तर काही जण कदाचित तुमच्या बाबांच्या वयाचेही असतील. पण वयाने मोठी जरी असली तरी ती सगळी जणं लहान मुलांसारखी आहेत. त्यांच्या बुध्दीची वाढ पुरेशी झालेली नाही. त्यामुळे त्यांचं वागणं अगदी लहान मुलासारखं असेल. त्यांना हसू नका. त्यांच्याशी मैत्री करा. त्यांच्याशी गप्पा मारा.'' सर्वांनी समजल्यासारख्या माना हलवल्या. तरीही आम्हां मोठयांच्या मनात थोडीफार धाकधूक होतीच. त्याचा ताण आमच्या चेहऱ्यावरही दिसत होता. तोच ताण वागवत आम्ही त्या शाळेत प्रवेश केला. आम्हांला आणि आमच्या सोबत इतक्या मुलांना पाहून तिथल्या मुलांचे चेहरे आनंदाने इतके फुलले की सांगता सोय नाही. अगदी जवळ येऊन शेकहँड करत, आपल्या नवीन दोस्तांचा हात धरून त्यांना शाळा फिरवायला घेऊन गेली. आमच्या मुलांनीही जराही बावचळून न जाता त्यांच्या निरागस प्रेमाचा स्वीकार केला आणि जणू काही रोज एकमेकांना भेटताहेत अशा प्रकारे त्यांच्याशी गप्पाही मारायला सुरुवात केली. ''अरे ए... ही होडी किती मस्त केलीयस रे तू... मलापण शिकवतोस का करायला...?'' असं विनंतीवजा आर्जव करत काहींनी या नव्या दोस्तमंडळींकडून कागदाच्या वस्तू शिकायलाही सुरुवात केली. या अनपेक्षित समंजसपणाने आम्ही सर्व जण चकित झालो. आनंदाने डोळयाच्या कडा ओलावल्या. मात्र, खरं कौतुक तर त्याही पुढेच होतं.

शाळेत बॅट बॉल आहे हे पाहिल्यावर समोरच्या मोकळया मैदानात क्रिकेट खेळायची टूम निघाली. त्या शाळेतल्या मुलांना फक्त बॅटिंग करायला देऊन या सर्वांनी ठरवून सरपटी बॉल टाकले. टोलवल्या गेलेल्या प्रत्येक बॉलला टाळया वाजवून त्यांना 'दिलसे' प्रोत्साहन दिलं. तो रंगलेला खेळ थांबवायचा आमच्याही जिवावर आलं होतं. पण कुठेतरी पूर्णविराम देणं भागच होतं. न मावणारा आनंद बरोबर घेऊन आणि देऊनही मुलं शिबिरस्थानी निघाली. तिथून परतताना कुठेही आपण वेगळं, विशेष कौतुकास्पद केल्याचा जराही भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता की आमच्याकडून शाबासकीची अपेक्षाही. त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता तो निर्मळ, सात्त्वि आनंद. त्यांच्या निर्मळ मनाचं प्र्रतिबिंब असलेली, अगदी सहजपणे घडलेली कृती होती ती.

त्या शाळेच्या बाहेर पडत असताना, तिथे येण्याआधीचं आमचं धास्तावलेपण आठवून आम्हीच मनातल्या मनात खजील झालो. अतिशय मायेने मुलांना शाबासकी दिली. समाजातल्या या गटाशी कसं वागायचं असतं याचं प्रात्यक्षिकच त्यांनी आम्हांला दाखवलं होतं. समज आणि शहाणपण हे काही वयावर अवलंबून नसतं, याची जाणीव या शिबिराने आम्हांला अगदी ठळकपणे करून दिली. आणि मुलांना जोखायच्या मोजपट्टया यापुढे बदलायला हव्यात, हा इशाराही!

9594961865