देवघरातील नंदादीप

 विवेक मराठी  11-Feb-2019

कल्याणच्या साठे वाडयावर 25 जानेवारी 2019ला संध्याकाळी शोककळा पसरली होती. वयाची 105 वर्षे पूर्ण केलेल्या शांताबाई साठे यांनी अतिशय समाधानाने या साठे वाडयाचा निरोप घेतला होता. शांताबाई साठे म्हणजे माझी आजी, सुशीला महाजन यांची आई. स्वातंत्र्यपूर्व काळातील तिचा जन्म लक्षात घेतला तर तिचे विचार आणि आचार क्रांतिकारकच म्हटले पाहिजेत. 

 

 24 मे 1974 या दिवशी साठे वाडयाची शताब्दी होती. जुन्या पिढीतील एकटी आजीच हा सोहळा पाहण्यास उपस्थित होती. दोन दिवस कल्याणचा साठे वाडा माणसांनी फुलून गेला होता. उत्साहाला उधाण आले होते. प्रसिध्द लेखक श्री.ना. पेंडसे यांनी भाषणात सांगितले की ''या वाडयात वावरायचे भाग्य लागते, आणि ते मला मिळाले आहे.'' रात्री प्रभुदेव सरदार यांच्या गायनाने सारे रसिक मंत्रमुग्ध झाले होते. पुढे वाडयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवही थाटात साजरा झाला आणि 2012मध्ये आजीच्या शताब्दी संवत्सर सोहळयाचा भव्य प्रारंभही याच वाडयात झाला, तेव्हा तिची नातवंडे, पंतवंडे व माझा नातू म्हणजे तिचा खापरपणतूही होता. सकाळचा यज्ञ, नंतर तुला, सर्व संस्थांना दान, सुनामुलींच्या नातेवाइकांच्या भेटी असा भरगच्च कार्यक्रम होता. आजी हिंडती फिरती असल्यामुळे छान वाटत होते. आजीने मुलांच्या हौसेला नेहमी प्रतिसाद दिला. साठे मंडळी सगळी रसिक आणि कलावंत आणि तेवढीच सामाजिक भान असणारी आहेत. आजी कधी स्वत: घराबाहेर जाऊन सामाजिक काम करू शकली नाही, पण समाजकार्य ही आपली जबाबदारी आहे असे ती मानते. आज आजीचे सहा मुलगे आणि माझी मावशी व आई, प्रत्येक जण कोणत्यातरी सार्वजनिक संस्थेत महत्त्वाचे काम करीत आहेत. शिवाय तिच्या सुनांना व आम्हा काही नातवंडांनाही सामाजिक कामाची आवड आहे, यामागे असलेले आजीचे कष्ट व मार्गदर्शन याची नोंद घ्यावी लागेल. तसेच आजीचे वाचन आणि बौध्दिक प्रगल्भता हेही एक महत्त्वाचे कारण आहे, असे मला वाटते.

  

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/


वाचन आणि प्रगल्भता


रायगड जिल्ह्यातील वावोशीच्या, आजीच्या माहेरच्या टिळकांच्या घरातील 'केसरी'चे वाचन आणि आजन्म खादीधारी राहिलेले तिचे भाऊ यांच्या संस्कारातून आजीचे देशप्रेम जोपासले गेले. 25 जानेवारीला तिने जगाचा निरोप घेतला, त्या दिवशीही सकाळी तिने वर्तमानपत्र वाचले होते. अखिल भारतीय साहित्य संमेलन समारंभ टी.व्ही.वर पाहून, संबंधित बातम्या पेपरमध्येही वाचल्या होत्या. शताब्दीपर्यंत तर ती रोज सगळा पेपर वाचत असे. राजकीय घडामोडींचे योग्य विश्लेषणही करत असे. 2014 साली तिने मतदान तर केलेच, तसेच आताही मतदारयादीत नाव असल्याची खात्री करून घेतली होती. भावनाप्रधानता आणि विचारशक्ती यातून समतोल साधणारी आजी वाचनातून घडत गेली. दररोज दुपारी वाचनासाठी नियमित वेळ देऊन तिने सर्व धार्मिक ग्रंथ, पोथ्या, उत्तम चरित्रे, अन्य पुस्तके व माझे सगळे लेखही वाचले आहेत. मी कल्याणला गेले की ती नवीन पुस्तकांची चौकशी करीत असे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तिला भागवत सप्ताहासाठी देवळात जाणे कधी जमले नाही, तर शताब्दी सोहळयापूर्वी आठ दिवसात तिने मी संपादित केलेला 'श्रीमद भागवत - कथा, काव्य, तत्त्वज्ञान' हा 400 पानांचा ग्रंथ वाचून संपवला होता. ही वाचनाची आवड आणि जिद्द वाखाणण्यासारखी आहे. माझ्या वडिलांनी - मधुकर महाजन यांनी पीएच.डी.साठी काढलेल्या टिपणावरून हा ग्रंथ तयार केला होता, हे लक्षात घेऊन तिने मला 500 रुपये बक्षीस दिले व सांगितले, ''हे मधुकररावांचे पीएच.डी.चे बक्षीस आहे, ते नाहीत म्हणून तुला देते.'' गुणग्राहकता हा तिचा महत्त्वाचा गुण होता. त्यामुळेच तिने माणसे जमवली आणि नाती टिकवली.

लेखन व सभाधीटपणा

आजीला कधी सभासंमेलनांना, भगिनी मंडळात किंवा समितीच्या शाखेत जाण्याची संधी मिळाली नाही, पण तिला त्याची आवड होती आणि गतीही होती. प्रसंगपरत्वे चार-पाच वेळा तिने सभांमधून उत्स्फूर्त व मुद्देसूद भाषणे केली आहेत. लग्न, मुंजी, नातवंडे, पंतवंडे यांचे बारसे किंवा अन्य प्रसंगी तिने ओव्या व चालीवर गाता येतील अशी कवने केली आहेत व तिच्या सुना-नातसुनांनी ती गायली आहेत. वयाची एेंशी वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिने आठवणी संगतवार लिहून काढल्या. 'स्मरणी' या नावाचे तिचे हे आत्मचरित्र म्हणजे विसाव्या शतकातील सामाजिक व कौटुंबिक जीवन दाखवणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ओव्या हा तिच्या आवडीचा काव्यप्रकार. आपल्याकडे विविध समारंभात म्हटल्या जाणाऱ्या, तसेच मुलगी, आई आणि अन्य नात्याचे पदर उलगडून दाखवणाऱ्या, स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्तीच्या अशा अनेक ओव्या तिने लिहून दिल्या व माझ्या आईने - सुशीला महाजनांनी त्या संपादित करून पुस्तक प्रकाशित केले. तिची सगळी मुले उत्तम लेखक आणि वाचकही आहेत.

अरे संसार! संसार!!

कामावे ते सामावे हे आजीचे बोधवाक्य माझ्या मनावर बिंबले आहे. सुमारे 85 वर्षे आमची आजी साठेवाडयात कार्यमग्न राहिली. लग्नानंतर 2-4 वर्षांनीच आजोबांना कापडाच्या व्यापारात मोठा फटका बसला. ऐश्वर्य ओसरले, तरी स्वत:चा मान राखून आजी व तिच्या जाऊबाई एकदिलाने राहिल्या. प्रत्येकातील चांगला गुण हेरून ती त्याचे कौतुक करीत असे. ती कोणाबद्दल कधीही वाईट बोललेले, दुसऱ्याला तिने नावे ठेवलेली मी कधीही ऐकले नाही. तसेच कोणाची चूक झाली तर ती लगेच दाखवून देऊ नये, असे आजी म्हणायची. चुकलेल्या व्यक्तीला आपली चूक समजतेच, त्याला थोडा अवधी द्यावा. त्याला चूक दाखवून अपमानित कशाला करायचे? दुसऱ्याचा सन्मान ठेवूनच आपला मान वाढतो, असे तिला वाटत होते. सर्वसमभाव हा तिचा आणखी एक गुण. मुले, पुतणे यात तर तिने भेद केले नाहीच, तर स्वत:च्या अडचणी असून भाच्यांनाही शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले. आजी विशाल मनाची होती. आजीच्या माहेरची व पुढे सुना-मुलांची संबंधित मंडळी नेहमी म्हणत की 'डोक्याला शांतता हवी असेल, दु:ख विसरायचे असेल तर दोन-चार दिवस साठे वाडयात जाऊन राहावे.' घरातील प्रसन्न आणि खेळकर वातावरण आर्थिक सुबत्तेवर नव्हे, तर माणसाच्या आपलेपणावर अवलंबून असते याचा प्रत्यय आजीकडे येत असे. अर्थात तिच्या सर्व मुलांनी व सुनांनी, नातसुनांनी तोच आदर्श जपला, हे फार महत्त्वाचे. तरुणपणातील कठीण व कष्टाच्या दिवसांचे मळभ दूर होऊन हौसमौज करायचे दिवस आले आणि आजोबा कॅन्सरने गेले. आजीचे संस्कार व शिस्त आणि तिच्या मुलांची संवेदनशीलता यामुळे सर्व मुले या काळात स्वावलंबी होतानाही एकमेकांना धरून राहिली. मुली लग्नानंतर पदवीधर व द्विपदवीधर झाल्या, याचे तिला कौतुक होते. सुनांना ती नेहमी सांगत राहिली की घरकाम महत्त्वाचे आहे, बाईला ते करावेच लागते. पण त्यातच अडकून पडू नका. वाचन वाढवा, नवीन काही शिका, सभांना जा, समाजकार्यही करा. आज तिच्या सुना व नातसुना विविध क्षेत्रांत चमकल्या आहेत.


 

अतिथी देवो भवो

आमची आजी गृहिणी, पण मुलांच्या समाजकार्याला आपल्या घरातून आधार देण्यास ती सदैव तत्पर होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्यासह अनेक मान्यवरांचे आजीने आनंदाने स्वागत केले होते. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे अशा अनेक नेत्यांच्या राजकीय बैठकी साठे वाडयात झाल्या, तसेच कलापथकांचा सरावही तेथे होत असे. राष्ट्र सेविका समितीच्या द्वितीय संचालिका वंदनीय ताई आपटे या तर आजीला आपली बहीण मानीत. रा.से. समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी यांची कल्याणला रामायणावर प्रवचने होती, तेव्हा त्या 8-10 दिवस आजीकडे राहत होत्या. वं. मावशींची आणि त्यांना दिवसभर भेटायला येणाऱ्या सेविकांची व्यवस्था करताना आजीला अतिशय आनंद होत असे. एक दिवस दुपारी वं. मावशी आजीला म्हणाल्या, ''मावशी, दिवसभर किती व्यग्र असता तुम्ही, आता बसा थोडा वेळ. आज मी तुमच्याबरोबर चहा घेणार आहे.'' आमची आजी तर संकोचून गेली. ती म्हणाली, ''सतत काम करीत राहणं मला आवडतं. मी एक सामान्य बाई, तुम्ही आमच्याकडे आपुलकीने राहिलात याचा मला खूप आनंद झाला आहे.'' त्यावर मावशी आजीला म्हणाल्या, ''अहो, तुमची मुले आणि मुली याना तुम्ही संघात व समितीत पाठवलीत, तिथे ती कामे करीत आहेत हेच खूप मोठे कार्य तुम्ही केले आहे. शिवाय दिवसभर तुम्ही एका पाठोपाठ किती पध्दतशीरपणे कामे करीत असता, याचे मला कौतुक वाटते.'' आजीने ही आठवण लिहून ठेवली आहे. ती पुढे लिहिते, 'एवढया मोठया बाईंच्या मनाचा केवढा हा मोठेपणा.' प्रत्येक गोष्टीचे श्रेय आजी सदैव दुसऱ्याला देत असे. उदारता हा आजीचा आणखी एक महत्त्वाचा गुण होता. आजीला तिच्या बहिणीच्या, भावाच्या आणि तिच्या मुलांच्या व सुनेच्या समाजसेवेचे कौतुक होते, कारण ती समाजॠण मानत होती. धार्मिक, सामाजिक किंवा साहित्यिक कोणताही प्रकल्प असो, कुणी मागितले नाही तरी ती आपणहून देणगी देत होती. समितीची गुरुदक्षिणा कधी चुकली नाही. मुलींना, नातींना माघारपण व सुनांना दिवाळी भेट ठरलेली.     

समंजस पाठबळ

आजीच्या कपाळावर मी कधी आठया पहिल्या नाहीत. लहानपणी मी प्रत्येक छोटया-मोठया सुट्टीत कल्याणला जात असे. मे महिन्याची दुपार म्हणजे पत्ते. भर दुपारी बर्फाचा गोळा खायची सर्वांना हौस. आजी कामे संपवून जरा दुपारची लवंडली असेल, तोच मोठी मुले मला आजीकडे पाठवीत. आजोबांना कळू न देता आजीला हळूच उठवायचे, गाडीवरचा बर्फाचा गोळा चाटल्याची खूण करायची आणि तिच्याकडून त्यासाठी पैसे घ्यायचे. झोपमोड केली म्हणून आजी मला कधीच रागावली नाही. मला मधल्या वेळी भाजी-पोळी आवडत नसे, तर आजी रोज मला घावन, उकड, थालीपीठ करून देत असे. ते काम तिने कधी सुनांवर टाकले नाही की मलाही कधी मदतीला हाताशी घेतले नाही. अजूनपर्यंतही तिला भेटायला गेले की ती माझ्या जेवणाची चौकशी करीत असे. मामाकडे जेवून जा अशी काळजी करीत असे. तिला सर्व नीटनेटके हवे असे. करपलेले थालीपीठ किंवा मोडलेले घावन पाहून ती थोडी अस्वस्थ होत असे. वयाच्या अवघ्या चाळिशीत असताना ती काशीला गेली, तेव्हा तिने कांदा-लसूण सोडले अणि हा तरुणपणातील नियम तिने आयुष्यभर पाळला. एवढे निग्रही राहणे सोपे नाही. आजीची राहणी अतिशय व्यवस्थित होती. शेवटपर्यंत ती समारंभासाठी इस्त्रीचे लुगडे व पोलके वापरात असे. 102 वर्षे वयापर्यंत नऊवारी नेसत असे. एवढेच नाही, तर बाहेर पडताना कानात अत्तराचा फायाही असायचा. कारण त्यामुळे प्रवासात बाहेरचे वास येत नाहीत असे म्हणणारी माझी आजी काळाबरोबर अनेक नवीन बदल स्वीकारत गेली. नव्या गोष्टीचे कौतुक करताना आपल्या इच्छेचे दडपणही येऊ न देणारी माझी आजी होती. त्यामुळे तिच्या एेंशीच्या घरातील सुना रोज ड्रेस, तर नातसून जीन्स व स्कर्ट घालतात, आणि सणावारी हौसेने नऊवारी व धोतर उपरणेही वापरतात. असा नव्या-जुन्याचा संगम आजीकडे झाला होता तो तिच्या उदार दृष्टीकोनामुळे. मुलगा व मुलगी असा भेद तिने स्वत:च्या मुलांमध्ये केला नाही आणि नातवंडांतही केला नाही. संसारात पती व पत्नी, दोघांनीही एकमेकांचे कौतुक करावे आणि जमवून घ्यावे, असे ती सांगत होती. लहान मुलांना न मारता, न रागवता कसे समजून घ्यायचे ते सांगताना मात्र ती पालकांच्या चुका हळूच दाखवून देत असे. त्यामुळे घरातील प्रत्येकाला वाटे की आपण आजीच्या फार जवळचे आहोत. मुलांचे व नातवंडांचे कपडे तर तिने शिवलेच, तशीच पंतवंडासाठीही झबली-टोपडी शिवली होती. ती अजूनपर्यंत सगळयांबरोबर पत्ते खेळत असे, हरायला लागली की चिडतही असे. नातवंडांबरोबर, पंतवंडांबरोबर समरस होऊन बालपण अनुभवत असे.

भाव तोचि देव

आजीला जीवनाचा कंटाळा नव्हता, उलट सर्व गोष्टींत रस होता. ऐकायला कमी येत असूनही तिने एकटीने हैदराबाद, दिल्ली, एवढेच काय, लंडनचाही प्रवास केला होता. तिचा देवावर विश्वास होता. देवपूजा, पोथीवाचन नियमित चालू होते. शंभरीपर्यंत रोज तुळशीला पाणी घालून 11 प्रदक्षिणा घालत असे. चतुर्मासात 'बाळभूक' , 'दाणापाणी' असे नेम धरून, गरीब बाळंतिणीला रोज दूध किंवा गरजू घरी रोज टिपरीभर तांदूळ देण्यासारखे उपक्रम तिने सहज अनेक वेळा केले होते. रोज स्नानाच्या वेळी 'गंगेश्चैव यमुनैश्चैव' म्हणत सर्व नद्यांची नावे श्लोकातून घेत ती सिंधू नदीची आठवण काढत असे. यामुळे काश्मीर प्रश्न व खंडित स्वातंत्र्याची बोच मनात जागी राहते, असे ती म्हणत असे. उपवासाचे पदार्थ पित्तकर असतात, हे लक्षात घेऊन मुलांच्या आग्रहावरून तिने अनेक उपास कमी केले, पण आरोग्याला हितकर असे आळणी आदितवार ती वर्षातून एकदा करीत होती. देवधर्म, सण-उत्सव करणे तिला आवडत होते, पण सुनांवर भार नको, म्हणून व्यावहारिक दृष्टीकोन ठेवून, अनेक कुलाचार ती स्वत:च बंद करीत गेली.

सद्गुणी सदाचारी माणसांच्या पाठीशी देव असतो अशी तिची श्रध्दा होती. अनेक संकटे आली, तरी तिने देवाला कधी नवस केला नाही. 'मला मिळाले तर मी देवाला दिल्यावाचून राहणार नाही, पण नवस बोलून देवावर कधी भारही टाकणार नाही' असे तिचे मत नक्कीच विचार करायला लावणारे आहे. ज्याच्या नशिबात जेवढे असते तेवढेच त्याला मिळते, पण प्रयत्न मात्र केले पाहिजेत, असे ती सांगत असे. एवढा मोठा पन्नास माणसांचा तिचा संसार, त्यातील आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्नांपासून सर्वांनाच तिने खुल्या दिलाने स्वीकारले होते. याचा अनुभव मीही घेतला आहे. शंभर वर्षांपूर्वी ती ज्या वातावरणात वाढली होती, जो सोवळयाओवळयात गुरफटलेला आणि जातीपातीत वेढलेला समाज तिच्या भोवती होता, तो लक्षात घेतला तर तिचे विचार आणि आचार क्रांतिकारकच म्हटले पाहिजेत.            

आजीच्या मूळ वाडयातच तिची मुले व नातवंडे आज वेगवेगळी पण मिळून मिसळून राहतात. ऐकायला कमी येत असले, तरी ती सर्वांमध्ये गप्पा चालू असताना बसत असे. सर्वांना ती आपल्याबरोबर हवी असे. आजीने लिहून ठेवले आहे की 'मुलामाणसांच्या या भरलेल्या गोकुळातून देवाने अलगद मला न्यावे. मी गेल्यावर मंत्राग्नी न देता विद्युतदाहिनीही चालेल. बाकी क्रियाकर्म करून भटभिक्षुकांची धन करण्यापेक्षा, सत्पात्री दान करावे. अनाथ, पंगू अशा गरजूंना मदत करावी. तसे मी माझ्या हयातीतच सगळया संस्थांना व देवस्थानांना यथाशक्ती देणग्या दिल्या आहेत. चौदाव्या दिवशी उदकशांत करून आपल्या कुटुंबातील मंडळींनी मन मोकळे करावे.' डोळस श्रध्दा ती हीच नव्हे का? आणि म्हणूनच आजी माझा आदर्श आहे. तिने आयुष्यभर सर्वांना भरभरून दिले. काही हाताने उचलून दिले, काही तिच्या वागण्यातून आम्ही घेतले. आजीच्या व आईच्या पिढीची निःस्पृहता आम्हाला हवी आहे. समाधान हे जीवन समजून घेण्यावर आहे. आजीला ते समजले होते आणि म्हणून मला आजीचे मोठेपण सांगावेसे वाटले.

आजी तुझे घर, जसे नांदते गोकुळ। तूच त्याचे मूळ, आहेस गं॥

चंदन चंदन, झिजून दे सुवास। तुझा सहवास, हेच बोलेेंं॥

सतित्व सतित्व, आजवरी ऐकिवात। तुझ्या रूपे मूर्तिमंत उभे राही॥

समईची वात, स्वये अखंड जळते। नित सर्वांनाही देते प्रकाश तो॥

 

डॉ. विद्या देवधर

[email protected]