'शिक्षण माझा वसा' हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा

 विवेक मराठी  12-Feb-2019

''पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्या भाषेकडे प्रेमाने पाहण्याची गरज आहे'' - डॉ. अरुणाताई ढेरे


 

पुणे : 'विवेक समूह', 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी', 'टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन', 'महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश' आणि 'शिक्षणविवेक' यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिक्षण माझा वसा' हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा आणि अ.भा. मराठी साहित्य संमेलाध्यक्ष मा. डॉ. अरुणाताई ढेरे यांचा सत्कार समारंभ रविवार दि. 27 जानेवारी 2019 रोजी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केला होता. तसेच ग.दि.मा. आणि बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'ज्योतीने तेजाची आरती' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

अ.भा. मराठी साहित्य संमेलाध्यक्ष मा. डॉ. अरुणाताई ढेरे यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, एअर मार्शल भूषण गोखले यांच्या हस्ते मानपत्र आणि मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, ''भाषा आणि साहित्य हे जिव्हाळयाचे विषय आहेत. आपल्या मराठी भाषेचे आपण सर्वांनी जतन केले पाहिजे. मराठी शाळा वाचल्या पाहिजेत म्हणून आपण शासनाला वेठीस धरतो, पण आपण स्वत: किती प्रयत्न करतो? मुलांना भाषेची आणि साहित्याची गोडी लागावी यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी काम करणे खूप गरजेचे आहे. मुलांनी वाचावे यासाठी आधी पालकांनी पुस्तके वाचायला पाहिजे. जर मुले पालकांच्या हातात पुस्तके बघतील, तर ते स्वत:होऊनच हातात पुस्तके घेतील.''

 महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उपक्रमशील युवा शिक्षकांचे काम प्रकाशझोतात यावे आणि त्यांच्या कार्याला अधिक गती मिळावी, म्हणून 2016पासून 'शिक्षण माझा वसा' या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराची सुरुवात झाली. या वेळी पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये, सचिन बेंडभर (भाषा विषय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वढू खुर्द), सतीश चिंधालोरे (जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल, खराशी, जि. भंडारा), अमर खेडेकर (जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, नाथाची वाडी, तालुका दौंड, जि.पुणे), संतोष बाबासो पाटील (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गांधीनगर, केंद्र खंडेराजुरी, ता. मिरज, जि. सांगली), अमोल हंकारे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोतवस्ती, थबडेवाडी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली), महेश शिंदे (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, कंडारी, ता. परंडा, जि. उस्मानाबाद), संतोष दातीर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दहीगाव, ता. कर्जत, जि.रायगड), लीना जगदीश सुमंत (डे.ए.सो. पूर्वप्राथमिक विभाग), प्राजक्ता रवींद्र पारेकर (नू.म.वि. मराठी शाळा, प्राथमिक विभाग), ज्योती मुकुंद पोकळे (शिशुविहार एरंडवणे), बबन गायकवाड (केशवराज माध्यमिक विद्यालय, लातूर), कल्पना वाघ (मुख्याध्यापिका, नवीन मराठी शाळा) या शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

'ज्योतीने तेजाची आरती' या सांस्कृतिक कार्यक्रमात 33 शाळांमधील 200 विद्यार्थ्यांनी गदिमांनी लिहिलेल्या आणि बाबूजींनी संगीतबध्द केलेल्या गाण्यांचे सादरीकरण केले.

या वेळी टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचे चेअरमन ऍॅड. किशोर लुल्ला, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुध्दे, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मा. दिलीप करंबेळकर, साप्ताहिक विवेकच्या संपादक मा. अश्विनी मयेकर, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर आदी मान्यवर उपस्थित होते.