कर्ता सात्त्वि उच्यते

 विवेक मराठी  12-Feb-2019

 

 

राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे माजी विदर्भ प्रांत कार्यवाह प्रा. भास्कर विश्वनाथ उपाख्य तात्या कुंटे यांचे यवतमाळ येथे नुकतेच निधन झाले. पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रवासी कार्यकर्ता म्हणून ते संघमय जीवन जगले. नातेवाईक आणि स्वयंसेवक या दोघांशीही एकाच सहजभावाने बोलू शकणााऱ्या तात्यांविषयी....

 क्तसंगोनहंवादी धृत्युत्साह समन्वित:

सिध्दसिध्दो निर्विकार: कर्ता सात्त्वि उच्यते॥

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नागपूर कार्यालयात मा. दत्ताजी डिडोळकरांच्या छायाचित्रासोबत लिहिलेल्या या ओळी मला नेहमीच आकर्षित करायच्या. दत्ताजींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी कधी मिळाली नाही. परंतु 'सात्त्वि कर्ता' हे शब्द तंतोतंत आचरणात आणणाऱ्या तात्यांबरोबर मला भरपूर वेळ घालवता आला. तात्या आता गेलेत. निष्ठावान स्वयंसेवक, कर्तव्यदक्ष प्राध्यापक, कुशल व्यवस्थापक, कुटुंबवत्सल पालक, आश्वासक श्रोता... अशा कितीतरी भूमिका तात्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या.

यवतमाळात संघविचारांची शिक्षण संस्था उभी करण्यासाठी तात्यांनी सरकारी नोकरी सोडली. ज्या संस्थेच्या पहिल्या शाळेसाठी स्वत:च्या हाताने विटा रचल्या, त्याच संस्थेविरुध्द आणि सहकाऱ्यांविरुध्द त्यांना न्यायालयात लढाही द्यावा लागला. परंतु विरुध्द पक्षातील कोणाहीबाबत बोलताना तात्यांच्या मनात कधीच द्वेषाची भावना दिसली नाही. संघाबरोबरच विशुध्द विद्यालय, यवतमाळ अर्बन बँक, संस्कृती संवर्धक मंडळ, विद्याभारती अशा अनेक संस्थांच्या जबाबदाऱ्या तात्यांनी सांभाळल्या. मात्र या जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाल्यानंतर सामान्य माणूस म्हणून त्या संस्थेमध्ये वावरताना त्यांना कधीच कमीपणा वाटत नसे. सर्वत्र सहज संचार हे तात्यांचे आणखी एक वैशिष्टय. या सहजपणामुळेच संघस्वयंसेवक आणि नातेवाईक या दोघांशीही ते एकाच मानसिकतेने बोलू शकायचे, दोघांशी बोलण्याचे विषय वेगळे असतानासुध्दा! सामान्यपणे संघकामात किंवा इतर सामाजिक कामात गुंतलेल्या अनेक कार्यकर्त्यांची नातेवाइकांना आणि कुटुंबातील कार्यक्रमांना कमी महत्त्व देण्याची मानसिकता असते. तात्यांनी मात्र हा दुजाभाव कधीच राखला नाही. त्यामुळे घर, संघकार्य आणि नातेवाइकांकडचे कार्यक्रम या सर्व ठिकाणी तात्यांची उपस्थिती नियमित असायची. एखाद्याकडे कार्यक्रमाला जाणे जमले नाही, तर वेळ मिळेल तेव्हा 'मागे येणं झालं नाही, म्हणून आता आलो. कसं चाललंय?' असं सांगत तात्या त्या व्यक्तीशी संवाद साधायला सुरुवात करायचे आणि ख्यालीखुशाली विचारून परत यायचे.

खरे तर तात्यांना प्रचारक व्हायचे होते. पण गोळवलकर गुरुजींनी नकार दिल्यामुळे त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. मूळ स्वभाव आणि मानसिकता मात्र प्रचारकाचीच होती. म्हणूनच प्रचंड प्रवास, संपर्क आणि प्रत्येकाशी जुळवून घेण्याची सवय हीच त्यांची जीवनशैली बनली. विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून माझी घोषणा झाली, त्या वेळी त्यांना प्रचंड आनंद झाला. थोडाही वेळ न दवडता त्यांनी त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या सत्काराचा कार्यक्रमही आयोजित केला. अशा प्रकारच्या कौतुकाची मी कधीच अपेक्षा केली नव्हती. परंतु तात्यांनी आग्रहाने तो कार्यक्रम करवून घेतला. संपूर्ण कार्यक्रमात ते एक शब्दही बोलले नाहीत. पण त्यांच्या डोळयात त्या वेळी दिसलेले समाधानाचे भाव माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा ठरले आहेत.

तात्या विदर्भ प्रांतांचे कार्यवाह होते, त्या वेळी त्यांच्या एकूणच दिनचर्येबद्दल आम्हाला प्रचंड कुतूहल असायचे. आम्ही झोपायचो, त्या वेळी ते घरी नसायचे. सकाळी उठायचो, त्या वेळी त्यांची पूजा सुरू असायची. त्यानंतर कॉलेज. कॉलेज संपले की साडेबाराच्या सुमारास भोजन आणि लगेच प्रवास... हा दिनक्रम अव्याहतपणे अनेक वर्षे सुरू होता. घरून बस स्टँडवर सोडून द्यायला कोणी नसले की पायीच किंवा कधीकधी सायकलसुध्दा ते वापरायचे. आम्हाला सायकल चालवता यायला लागल्यानंतर ''बस स्टँडपर्यंत मी सायकल चालवतो. तिथून तू परत घेऊन ये'' असे म्हणत पायात चपला घालून तयारही झालेले असायचे. थोडे मोठे झाल्यानंतर यवतमाळमध्ये आणि नागपुरात तात्यांना गाडीवर घेऊन फिरणे हा माझा आवडता कार्यक्रम असायचा. त्यांच्याबरोबर फिरताना, त्यांच्या परिचितांना भेटताना विदर्भातील संघाचा इतिहास, संघर्ष आणि वर्तमानातील बदलते स्वरूप याबाबत माहिती मिळायची. यातील बराचसा भाग प्रत्येक वेळी माझ्यासाठी नवा असायचा. सहज संपर्क आणि सहज संवाद हाच तात्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच ''तात्या आमच्या घरी येऊन गेले'' हे सांगणारे अनेक लोक मला विदर्भात भेटतात.         

गेल्या काही वर्षांत तात्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. म्हातारपणाचे हे बदलही त्यांनी सहज स्वीकारले. शारीरिक व्याधींच्या तक्रारी न करता टीव्ही, पुस्तकवाचन आणि इतर गोष्टींमध्ये त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. 'बाकी सगळं ठीक आहे. फक्त शाखेत जाता येत नाही' एवढी एकच छोटीशी 'खंत' त्यांना होती. गेल्या अनेक वर्षांत तात्या महाल आणि रेशीमबागेतील संघकार्यालयात गेले नव्हते. 'नागपुरात आलात की आपण बरोबर जाऊ,' असे ऑॅक्टोबरमध्ये भेटलो, तेव्हा मी त्यांना सांगितले होते. संघकार्यालयात झालेले बदल त्यांना दाखवायचे होते. ते आता कधीच शक्य होणार नाही. यवतमाळला गेल्यानंतर 'नागपूर काय म्हणतंय?' हा प्रश्नसुध्दा ऐकू येणार नाही. तात्यांसारखे निःस्पृह, निरपेक्ष जगता यावे असे अनेकदा वाटायचे. ते होऊ  शकले नाही. आता त्यांच्याबरोबर जगलेल्या क्षणांच्या आठवणीच
मागे उरल्या आहेत.    

   - सारंग कुंटे

9881728586