गोलमाल है भाई... सब गोलमाल है

 विवेक मराठी  12-Feb-2019

 

***यशराज आचरेकर****

दरवर्षीप्रमाणे याही वर्षीची पूजेची मीटिंग ठरली. नेहमीप्रमाणे सर्व सभासदांनी हजेरी लावली होती.

पूजेचा दिवस, जेवण, भटजी यासारख्या बाबींची चर्चा सुरू होऊन संपलीही.
तेवढ्यात सेक्रेटरी साहेब बोलले की एक मुद्दा राहिलाय. यावर्षी आपण कोणत्यातरी सेलिब्रिटीला बोलवूया.
अध्यक्ष महाशयांनी त्यांच्या ओळखीच्या एका नगरसेवक आणि एका माजी आमदाराचं नाव सुचवलं.
त्यावर दोघे - तिघे सभासद पटकन म्हणाले अहो ही राजकारणी मंडळी त्याच त्याच नेहमीच्या राजकीय मुद्द्यांवर बोलणार... त्यापेक्षा आपण एखाद्या साहित्यिक किंवा विचारवंताला बोलावलं तर...? थोडं मानधन द्यावं लागेल, पण काहीतरी चांगलं तरी ऐकायला मिळेल.
या मुद्द्यावर सगळ्यांचं एकमत झालं. सांस्कृतिक शहर अशी आमच्या शहराची ओळख असल्यामुळे आम्हाला दोनच दिवसांत हवी असलेली व्यक्ती मिळाली. जांबुवंत झोळकर - थोडक्यात सांगतो यांच्याबद्दल.
तरुण वयात यांनी प्रादेशिक सिनेमे, नाटक यामध्ये मुख्य भूमिका केल्या. काही नाटके दिग्दर्शित पण केली. पण आता वय झाल्यामुळे घरी असतात आणि फारस कुठे येणं जाणं नसतं.
फारसे आढेवेढे न घेता जांबुवंत तयार झाले. फक्त पाचच मिनिटं बोलेन पण त्यासाठी हजार रुपये मानधन तयार ठेवा एवढी एकच काय ती त्यांची अट.
पूजेचा दिवस उजाडला. सर्व काही व्यवस्थित आणि साग्रसंगीत पार पडलं. कॉलनीमधील बरीच मंडळी आली होती. जेवणापूर्वी झोळकर साहेबांनी भाषण करावं अशी विनंती अध्यक्ष साहेबांनी केली आणि सगळे खुर्चीवर जाऊन बसले.
झोळकर साहेब समोर उभारलेल्या छोटेखानी स्टेजवर जाऊन उभे राहिले आणि भाषणाला सुरुवात केली.
"एक साहित्यिक आणि विचारवंत म्हणून तुम्ही मला बोलावलंत म्हणून मला खूप अभिमान वाटत आहे. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो. कारण मला पोहोचायला थोडा उशीरच झाला. तुम्हाला परिचयाचे असतीलच तुमच्या शहरामधील खड्डे.( हे ऐकताच उपस्थितांमध्ये हशा उसळला).
तुम्हाला माहितेय का मी आज इथे यायचं म्हणून चक्क आंघोळ करून आलोय. कारण आमच्याकडे पाणी दोन दिवसाआड येतं. (परत हशा).
अहो तिकडे विदर्भामध्ये लोकांना पाणी प्यायलाही मिळत नाही."
आता मात्र अध्यक्ष महाशयांना राहवलं नाही. त्यांनी थोडं अगतिकपणे झोळकर साहेबांना खुणावलं आणि म्हणाले "दादा विषयांतर होतंय, थोडं साहित्यविषयक बोला ना."
हे ऐकून आपले साहित्यिक महाराज खवळले. त्यांचा पारा चढला. आवाज वाढला.
"आता तुम्ही मला शिकवणार का काय बोलायचं ते?
मला तोंड बंद ठेवायला सांगता? हुकुमशाही आहे का ही? कलेची कदर आहे की नाही तुम्हाला." हे सगळं पाहून अध्यक्षांना कळलंच नाही ते अस काय चुकीचं बोलले.
तिकडे झोळकर तरातरा निघून गेले. जाताना सांगायला विसरले नाही की मानधनाचा चेक घरी पाठवा... ते पण लवकरच.
दुसऱ्या दिवशी प्रमुख पेपर ठोकसत्ता आणि संपादकमत
यामध्ये बातमी छापून आली -
एका सांस्कृतिक शहरामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची झाली गळचेपी..

( ह्या कथेचा वास्तवाशी संबंध नाही, असल्यास तो योगायोग मानावा.)

- यशराज आचरेकर

9029719883

अभिव्यक्तीच्या नावाने चांगभलं

राखीव जागा... विवेकी वाचकांसाठी

वाचकांनाही व्यक्त व्हायचं असतं...

स्वत:च्या वॉलवरून व्यक्त व्हायचं असतं... तसंच विवेकच्या वॉलवरूनही व्यक्त होऊ इच्छिणारे असतात.

खास वाचकांचं हे सदर... अनियमितपणे नियमित किंवा नियमितपणे अनियमित..

सर्वस्वी अवलंबून वाचकांवर.

नंबर लावा... मेरिटवर जागा मिळेल.

रोजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपल्या शैलीत व्यक्त व्हा.

कमाल शब्दमर्यादा 200 ते 250.

[email protected]