नैसर्गिक अधिवासातून अनैसर्गिक अधिवासाकडे ....

 विवेक मराठी  12-Feb-2019

 

वन्यजीव आणि मानव यांच्यातील सहसंबंधांचे रूपांतर हळूहळू संघर्षात होऊ लागले. आज वन्यजीवांची -आणि मानवाचीसुध्दा - सगळयात मोठी गरज आहे योग्य नैसर्गिक अधिवासाची. मानव-वन्यजीव संघर्ष हा एकाच्या नैसर्गिक अधिवासात सुरू होऊन दुसऱ्याच्या अनैसर्गिक अधिवासात संपुष्टात येतो. यातला कुठला अधिवास नैसर्गिक आणि कुठला अनैसर्गिक, हे मात्र सर्व प्राण्यांत सर्वश्रेष्ठ असलेला मानव ठरवीत आला आहे आणि पुढेही तोच ठरविणार आहे.

त्रज्ञानाने जग जवळ आले आहे हे जरी सत्य असले, तरी सर्व अंगांनी वाढते शहरीकरण, लोकसंख्येतील वृध्दी आणि कमी होत चाललेला नैसर्गिक अधिवास यामुळे प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्यातले अंतर एका सीमारेषेपार गेले आहे. यातील नक्की नैसर्गिक अधिवास कुणाचा? प्राण्यांचा की मनुष्यप्राण्याचा? हे विचार करण्याचेसुध्दा अंतर शिल्लक राहिले नाही. हा विषय भौगोलिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही, तर प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्या वृत्तीतसुध्दा फारसे अंतर शिल्लक नाही. कधीकाळी एखाद्या प्रसंगाला 'पशुवृत्ती' असे संबोधले जायचे, ती पशुवृत्ती मनुष्यप्राण्यातसुध्दा प्रकर्षाने आढळून येऊ लागली आहे. अर्थात प्राण्यांतल्या वृत्तीला पशुवृत्ती संबोधनसुध्दा मनुष्यप्राण्यानेच बहाल केलेले विशेषण आहे. मनुष्यप्राण्याकडून जे अभिप्रेत नाही ती वृत्ती म्हणजे पशुवृत्ती, असा एक समज प्रचलित आहे.

वास्तविक प्राण्यांतील ही वृत्ती त्यांना निसर्गाने दिलेली आहे. प्राण्यांतील शारीरिक आणि मानसिक गुणधर्मांचे निसर्ग पर्यावरणात नेहमीच योगदान होत आले आहे आणि पुढेही होत राहील. मनुष्यप्राणी हा सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असूनही निसर्ग पर्यावरणात योगदान कमी आणि उपभोगच अधिक घेताना दिसतो, हा प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्या वृत्तीतील मोठा विरोधाभास आहे.

निसर्गचक्रातील असमतोल हा आजच्या मानव-वन्यजीव संघर्षाचे एक मुख्य कारण ठरला आहे. प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात मानव किंवा मानवाच्या अधिवासात प्राणी. काहीही म्हटले, तरी दोन्हींच्या नैसर्गिक अधिवासात अनैसर्गिकता प्रकर्षाने आढळून येते. दोघांची वाढती संख्या आणि तुलनेने कमी होत चाललेला नैसर्गिक अधिवास हे यामागचे सर्वात मोठे कारण सर्वश्रुत आहे. शासकीय, वन्यजीव संस्था, नागरिक या स्तरांवर अनेक उपक्रम सुरू आहेत. पण सामाजिक आणि राजकीय कारणास्तव यात फारसे यश येत नाही.

वाघ - वन्यजीव साखळीतील केंद्रबिंदू

न स्याद्वनमृते व्याघ्रान्व्याघ्रा न स्युरते वनम् ।

वनं हि रक्ष्यते व्याघर््रैव्याघ्रानक्षति काननम्॥

महाभारतातील विदुरनीतीमधील ह्या श्लोकाचा अर्थ धृतराष्ट्राला संबोधित करतो, वन वाघाचे रक्षण करतात आणि वाघ वनांचे रक्षण करणारे आहेत.

वाघ हे वन्यजीवांच्या जीवसाखळीतील केंद्रबिंदू आणि जंगलाचा राजा असूनही आज वाघांची परिस्थिती चिंताजनक आहे. वाघांच्या वाढत्या संख्येवर समाधान मानून आपण मागील अनेक वर्षांत वाघांचा 93% अधिवास संपुष्टात आल्याचे सोईस्करपणे विसरतो. आज केवळ 7% नैसर्गिक अधिवासात वाघांना राजाश्रय आहे. त्यामुळे वाघांच्या नागरी वस्त्यांत शिरकावातून मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी पडल्याचे अनेक घटनांवरून सिध्द होते. वाघांची संख्या कमी होण्यामागे निश्चितपणे 1972अगोदर झालेला शिकारीचा खेळ हे एक प्रमुख कारण आहेच, पण त्याचबरोबर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अमलात आल्यावर अवैध शिकारीने व्याघ्रसंवर्धनाच्या कार्याला मोठया प्रमाणात खीळ बसली. त्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आणि आजवर कोटयवधी रुपये त्यावर खर्च होताहेत. शिकार केलेल्या एका वाघाचे अवैध बाजारातले मूल्य लाखांच्या घरात आहे, पण निसर्गातले त्याचे नुकसान कधी न भरून येणारे असल्याने व्याघ्रसंवर्धनावर कोटयवधीचा खर्च करावा लागतो. व्याघ्रप्रकल्पांच्या माध्यमातून इतर वन्यजीवांचेसुध्दा संवर्धन होते. वनविभागाच्या माहितीप्रमाणे वाघांच्या अवैध शिकारीला आज 70% आळा बसवता आला आहे. पण वाघांच्या संवर्धनात समस्या आहे ती मानव-वन्यजीव संघर्षातून वनक्षेत्र कमी होऊन शहरीकरणामुळे वाघ आणि मानव यांच्या जीविताला धोका उत्पन्न होतो, हीच सध्याची मोठी समस्या आहे. अधिवास हरवलेला वाघ नागरी वस्त्यांतील पशुधनातून आपले अस्तित्व टिकवून ठेवतो, तोच दुसरीकडे पशुधनाला आपल्या जिवाप्रमाणे जपणारे नागरिक त्यांच्या पशुधनावर आपला उदरर्निवाह चालवतात. वाघ आणि मानव - दोघांचा उदरनिर्वाह पशुधनावर अवलंबून असल्याने एकमेकांच्या जिवावर बेतल्याने या घटनांना हिंसक स्वरूप प्राप्त होते. त्यातून वाघ नरभक्षक होण्याचे प्रकार गेल्या काही दशकांत वाढले आहेत. वास्तविक वन्यजीव अभ्यासकांच्या मते वाघ, सिंह इत्यादी मार्जारकुळातील प्राणी नरभक्षक होण्यामागे इंग्रजांचा सिंहाचा वाटा आहे. इंग्रजांनी मोठया प्रमाणात शिकारी करताना बंदुकीचा वापर केला. बंदुकीतून सुटलेल्या गोळीने वाघाची शिकार झाली, पण त्यामुळे वाघांच्या समुदायात नरभक्षक वृत्तीचा जन्म झाला. आजपासून शंभर-एक वर्षांपूर्वीच्या सरकारी नोंदी तपासल्या, तर वाघ नरभक्षक असल्याचे प्रमाण शोधून सापडणार नाही. उलट वनक्षेत्रातील जनजाती बांधव वाघाची मोठया प्रमाणात उपासना करत होते. वाघांची अनेक मंदिरे आजही देशभरात आढळून येतात.

वाघाच्या बाबतीत प्राचीन काळापासून श्रध्दा आहेत. एकेकाळी भरपूर प्रमाणात वनसंपदा अस्तित्वात असताना वाघांची संख्यासुध्दा भरपूर होती, तेव्हा जनजाती लोकांचे हे दैवत म्हणून मान्यता होती. मध्य भारतात वाघाच्या हल्ल्यात अपवादाने कुणी मारले गेल्यास तेव्हा फारसे मनावर घेतले जात नसे. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून जिथे वाघाने शिकार केली आहे तिथली माती उचलून मूठ-मूठ रस्त्याने गावाच्या वेशीपर्यंत ती माती टाकली जायची, जेणेकरून वाघ त्यापुढे शिरकाव करणार नाही. अनेक ठिकाणी घरी बाळ जन्माला आल्यावर जनजाती लोक विविध धातूंचे वाघ बनवून देवळात द्यायचे. 'वाघाई' या नावाने ताडोबा येथील जंगलात अशीच एक जागा आहे. नवजात अर्भक वाघासारखा शूर आणि पराक्रमी व्हावा ही त्यामागची श्रध्दा होती. कोरकू समाजात आपण ज्याप्रमाणे चंद्राला 'मामा' असे संबोधतो, तसे ते वाघाला 'कुला मामा' असे संबोधतात. कोरकू भाषेत वाघाला कुला म्हणतात. आजही कोरकू भाषेत वाघाला 'कुला मामा'च संबोधले जाते. वाघ हा वन्यजीव असला, तरी तो कोरकूंचा मामाही आहे.

वाघाचा हाका हा इंग्रजांच्या काळात लपलेल्या वाघांना बाहेर काढण्याचा एक प्रकार प्रचलित होता. वन्यजीवांचे आवाज काढून वाघाला शिकारीच्या टप्प्यात आणून इंग्रज त्यांची शिकार करायचे, त्यालाच हाका करणे म्हटले जायचे. जनजाती लोकांत वाघांबद्दल  श्रध्दा आणि दरारा होता, म्हणून यात सहभागी होण्यास ते फारसे उत्सुक नसायचे. पण इंग्रजांच्या दहशतीमुळे त्यांना सामील व्हावे लागायचे. शिकारीतील अप्रत्यक्ष सहभागामुळे पापभीरू जनजाती लोकांत कायमच भीती असायची. त्यामुळे आपल्यावर काही संकट येऊ नये, यासाठी प्रायश्चित्त म्हणून ते नित्यनियमाने अनेक धार्मिक विधी करायचे. अनेक ठिकाणी वाघाची मंदिरे, उपासना ही त्याचीच प्रचिती देणारी आहेत. थोडक्यात काय, तर वाघ हा जनजाती लोकांना श्रध्देयच होता, म्हणून त्यांच्या संस्कृतीत त्याचा दराराही तितकाच ठळकपणे आढळतो. कोकणातील वाघाच्या नावाने अनेक झरे अथवा गावांची नावे यावर शिक्कामोर्तब करणारी आहेत. इंग्रजकाळात भारतात जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व होते, विशेषतः मध्य भारतात.

 विदर्भातील नागझिरा व्याघ्रप्रकल्पात लाखापाटील नावाचे गृहस्थ होऊन गेले. ते 'वाघांचा मित्र' होते अशी तिथल्या लोकांची श्रध्दा आहे. त्यांचे देऊळ आजही जंगलात आहे. लाखापाटील आपल्या बैलगाडीला वाघ जुंपून भ्रमंती करत, असे गोंड समाजात समजले जाते. 2014 साली मानसिंगदेव यांच्या नावाने अभयारण्य स्थापन झाले आहे. मानसिंग गोंड राजाचे वैदी असल्याची स्थानिकांची समजूत, शिवाय ते तांत्रिक विद्येतसुध्दा निपुण होते. त्यांची दोन देवळे आजही आहेत. एक - जिथून त्यांची वाघावर स्वारी व्हायची तेथे, तर दुसरे जिथे त्यांना वाघाने ठार केले तेथे. तंत्रविद्येची काही पथ्ये न पाळल्याने त्यांना वाघाने शिक्षा केल्याची स्थानिकांची पारंपरिक समजूत आहे. गोंदिया जिल्ह्यात असलेल्या ससापूर्ण येथील पहाडावर पांढऱ्या वाघांचे मंदिर आहे. दोन पांढरे वाघ तेथे विशिष्ट कालावधीत यायचे, तो स्थानिक जमीनदाराच्या मृत्यूचा संकेत मानून नवीन जमीनदाराची नियुक्ती व्हायची. ते वाघ जेथे यायचे, त्या ठिकाणी त्यांचे मंदिर उभारले गेले आहे.


वाघाला देवत्व बहाल करणाऱ्यांना त्या काळी वाघाचे निसर्ग पर्यावरणातील महत्त्व ठाऊक नव्हते. पण त्यांचे रक्षण करणारा म्हणून वाघ हवे होते. आज पुन्हा वाघांचे शास्त्रीय महत्त्व सिध्द झाल्यानंतर, तत्कालीन जनजातींचे कुठलेही शास्त्रीय शिक्षण नसूनसुध्दा त्यांची निसर्ग पर्यावरणातील जागरूकता कशी आदर्श होती हे समजते.

आज वाघांच्या हल्ल्यात गरीब जनजातीच्या पशुधनाची होणारी जीवितहानी ही दुर्दैवीच आहे, पण वाघाचा तो नैसर्गिक स्वभाव आहे. त्याला इलाज नाही. त्यासाठी प्राण्यातील सर्वश्रेष्ठ असलेल्या मानवालाच वनक्षेत्राजवळील परिसरात समतोल साधत बदल घडवून आणावे लागतील. नरभक्षक होणे ही वाघाची अपरिहार्यता आहे. एखाद्या बलशाली वाघाने इतर वाघांस हुसकावून लावल्याने वाघ विस्थापित होतो आणि नवीन संरक्षित क्षेत्राच्या शोधात भरकटतो. कधी भरकटलेल्या वाघिणीच्या पिल्लांची भूक भागविण्यासाठी, तर कधी वृध्दापकाळाने ग्रस्त होऊन शारीरिक क्षमता क्षीण झाल्याने नरभक्षक होण्यावाचून वाघाला पर्याय नसतो. नरभक्षक होणे हा अपरिहार्यतेतून निसर्गाने वाघाला दिलेला शापच म्हणावा लागेल, कारण मानव हे वाघाचे नैसर्गिक भक्ष्य नाही.

सुंदरबन या पश्चिम बंगालच्या जंगलात नरभक्षक वाघांचे मोठया प्रमाणात अस्तित्व आढळते. त्यावर अनेक संशोधने झाली आहेत. मोठया प्रमाणात असलेल्या जलप्रदेशामुळे भक्ष्य न मिळणे, तर अर्धवट जळलेले मृतदेह गंगेत सोडल्याने किंवा खाऱ्या पाण्याच्या सेवनाने मूत्रपिंडावर दुष्परिणाम होणे ही वाघ नरभक्षक होण्याची कारणे असल्याचा संशोधकांचा निष्कर्ष आहे. तुलनेने देशाच्या इतर भागात नरभक्षक वाघांची संख्या ही परिस्थितीजन्य आहे असे नक्कीच म्हणता येऊ शकेल. म्हणून वाघाची दहशत अपवादात्मक परिस्थितीत होते, मात्र त्याचा दरारा नैसर्गिक आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

आक्रमक अस्वल

रामायणात जांबुवंताने प्रभू श्रीरामांना केलेले साहाय्य सर्वश्रुत आहेच. अस्वलाच्या बाबतीत अनेक समुदायांत श्रध्दा-अंधश्रध्दा आहेत. त्यामुळे अस्वल हे प्राचीन काळापासून धर्मग्रंथात आणि इतर देशातील संस्कृतीत आढळते. 'अस्वल' या दुर्गा भागवतांच्या पुस्तकात याबाबत सविस्तर वर्णन आहे.

मानव-वन्यजीव संघर्षात वन्यजीवांतील आकराळविकराळ दिसणारा प्राणी म्हणजे अस्वल. अस्वलाच्या हल्ल्यात जितके मानवाचे नुकसान झाले आहे, तितके इतर कुठल्याही प्राण्यामुळे झाले नसावे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ज्या जंगलात वाघांची संख्या कमी आहे, तिथे ह्या प्राण्यावर कमी वचक असल्याने याची भ्रमंती आणि वर्दळ अधिक आढळून येते. निसर्गत:च अस्वलाला दृष्टिदोषाने ग्रासले आहे. ह्याची कमजोर असलेली दृष्टी मात्र जंगलाभोवताल वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जिवावर उठणारी अथवा अपंगत्व करणारी आहे. दृष्टिदोषामुळे हा अधिक आक्रमक होऊन हल्ला करतो. दोन पायांवर उभा होऊन याची तीक्ष्ण नखे समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर वार करतात आणि डोळयांचा वेध घेतात. त्यामुळे मानवाची दृष्टी जाण्याची शक्यता असते, शिवाय चेहरा विद्रूप होणे ही याच्या हल्ल्याची सहज प्रचिती देणारी आहे, कारण चेहऱ्यावर कायमच्या उमटलेल्या खुणा याच्या हल्ल्याची साक्ष देतात. आज देशभरात अस्वलांची संख्या 20-25 हजाराच्या घरात आहे. साधारणपणे देशभरात याच्या हल्ल्यांची संख्यासुध्दा त्याच्या संख्येच्या आसपास असते. त्यातून जे वाचतात, त्यांच्या शरीरावरील जखमा हल्ल्यातून बचावल्याचे समाधान देतात, तर काहींना आलेली विकलांगता ही हल्ल्यातील भयावह परिस्थितीचा केलेल्या सामन्याची कल्पना देणारी असते, तर काहींच्या नशिबी दुर्दैवी मृत्यू ओढवतो.

अस्वलाचे अनेक प्रकार आहेत. भारतात काळे अस्वल - ज्याला इंग्लिशमध्ये स्लॉथ बेअर हे नाव आहे, ह्याचे अस्तित्व आहे, 150 किलोपर्यंत वजनाचे शरीर असलेला हा प्राणी दृष्टिदोषामुळे आपल्या घ्राणेंद्रियावर आणि आवाजाच्या दिशेने होणाऱ्या हालचालीवर अवलंबून असतो. निसर्गत:च लाभलेल्या शारीरिक अंधत्वामुळे अस्वल कायम असुरक्षिततेच्या छायेत वावरते. ॠतूप्रमाणे येणारी फळे - बोर, उंबर, करवंद, मध, मोहाची फुले हे याचे आवडते खाद्य. आपल्या तीक्ष्ण नखाग्रांनी जमिनीखालची वाळवी शोधून काढण्याचे कौशल्य याला प्राप्त आहे. आपल्या घ्राणेंद्रियाच्या जोरावर अस्वल वाळवीचा शोध लावते. जमिनीत तीन फूट खोल खोदून वाळवी फस्त करण्यात याचा कुणी हात धरू शकत नाही. म्हणूनच हे बहुतांशी मान खाली घालून चालते. अस्वलाच्या अंगावर असलेल्या दाट केसांचे चिलखत असल्याने मधमाश्यांच्या पोळयाला चापट मारून दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेते आणि मधमाशा निघून गेल्यावर पोळयातून मधाचा आस्वाद घेण्याचे कौशल्य या प्राण्यात आहे. मधमाश्यांना सामोरे जाण्याचे हे धाडस वाघ-सिंहांना शक्य नाही. निसर्गाने प्रत्येक प्राण्यास असे वैशिष्टय बहाल केले आहे, त्याचा त्यांच्याकडून पुरेपूर उपयोग होतो, पण तो केवळ स्वत:च्या अस्तित्वासाठी. प्राण्यांतला सर्वात मोठा गुण हाच की आवश्यकतेहून अधिक आणि गरज असल्याशिवाय त्यांच्याकडून आपल्या विशिष्ट शक्तींचा वापर होत नाही. याच्या नेमके विरुध्द वर्तन मानवात आढळते. दिवसा अस्वलाची दृष्टी अधिकच कमकुवत असल्याने याचे भ्रमण रात्रीच अधिक असते अथवा पहाटे किंवा सूर्यास्ताच्या वेळी हा बाहेर पडतो. जनजाती लोकांची सकाळी जंगलात जायची वेळ आणि याची परतीची वेळ त्याचा नेमका विरुध्द प्रकार सूर्यास्ताच्या वेळी असतो. त्यामुळे अस्वल आणि जनजाती लोकांचा अनेकदा सामना होत असतो. त्यातून अस्वलाचे हल्ले होऊन शारीरिक हानी होण्याची दाट शक्यता वाढते. याच सुमारास हल्ल्यांची शक्यता अधिक बळावते. या व्यतिरिक्त अस्वलाची पिल्ले सोबत असल्यास मानवाच्या गंधाने असुरक्षितपणाच्या भावनेतून हल्ला होतो. अस्वलाच्या हल्ल्यांचा आढावा घेतल्यास त्यामागे हीच प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास येईल.

अस्वलांच्या हल्ल्यांपासून बचाव व्हावा या दृष्टीने  वनक्षेत्राजवळील नागरिकांत वनविभागाच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. त्यात जंगलात जाताना काठीला घुंगरू बांधून घेऊन जाणे, जेणेकरून त्याच्या आवाजाने अस्वलाला येणाऱ्याची चाहूल लागून ते दूर जाईल, जंगलात जाण्याच्या वेळा बदलणे, अस्वलाशी दुर्दैवाने अचानक सामना झाल्यास पोटावर झोपणे, यामुळे चेहरा आणि डोळयांना होणारी इजा टाळता येईल... यासारखे अनेक उपाय प्रात्यक्षिकांच्या, पुस्तिकांच्या माध्यमातून नागरिकांना सुचवले जातात. त्यामुळे नक्कीच हल्ल्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. देशभरात सर्वत्र अस्वलांचे वास्तव्य असल्याने अस्वलाच्या हल्ल्यांच्या घटना घडतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अस्वलांचे हल्ले अधिक असतात, कारण ह्या काळात अस्वलांची पिल्ले आईच्या पाठीवर बसून प्रवास करतात आणि लहान असल्याने आईच्या छत्रछायेखाली असल्याने आईची त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी दुपटीने वाढलेली असते. याच दरम्यान अस्वलाच्या एकूण हल्ल्यांपैकी 80% हल्ले झाल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. अस्वलांची वाढती संख्या आणि मर्यादित अधिवास हेसुध्दा एक मुख्य कारण या हल्ल्यामागे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे त्याचे ताजे उदाहरण आहे. या व्यतिरिक्त उन्हाळयात देशभरात पाण्याच्या आणि नैसर्गिक खाद्यांच्या अभावातून नागरिक वस्त्यांत वन्यप्राण्यांचा शिरकाव ही सामान्य बाब झाली आहे.

हत्ती - मनुष्याशी जिव्हाळयाचे नाते

रामायणात सुंदरकांड, श्लोक 28मध्ये चार दातांच्या हत्तीचा उल्लेख आहे. रावणाच्या कक्षात प्रवेश करताना हनुमंताच्या दृष्टीस पडलेल्या श्वेत ढगांसमान दिसणाऱ्या हत्तींचे वर्णन आहे. हत्तीच्या एकंदर सामर्थ्यामुळे मानवाने हत्तीला प्राचीन काळापासूनच पाळीव करून ठेवण्यात यश प्राप्त केले. हत्तीनेसुध्दा मानवाशी जुळवून घेतले आहे. थोडक्यात हत्तीचे गुणधर्म बघता हत्ती हा इतर वन्यजीवांच्या तुलनेत मानवासमवेत लवकर समरस होणारा प्राणी आहे. याला वेदनेपेक्षा संवेदना अधिक आहेत. आपले कुटुंब-आप्त यांच्याप्रती असलेला जिव्हाळा हे समूहात वावरणाऱ्या हत्तींचे वैशिष्टय आहे. इतके प्रचंड शारीरिक सामर्थ्य असलेला हत्ती तितकाच हळवा आणि भिडस्त आहे. गणरायांशी हत्तीच्या संबंधामुळे हत्तीला पुराणकाळापासूनच देवत्व बहाल झाले आहे. अनेक प्राचीन मंदिरांत, संस्थानांत, मठात हत्ती असणे हे आजही शुभ समजले जाते. रामायणातल्या चार दंत असलेल्या हत्तींचे त्या काळात असलेले अस्तित्व हत्तींच्या प्राचीन आणि दुर्मीळ प्रजाती नामशेष झाल्याचे सूतोवाच करणारे आहे. युध्दात, बांधकामात, प्रवासासाठी हत्तींचा मोठया प्रमाणात उपयोग होत होता. वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात येईपर्यंत हत्तींचा व्यापारात उपयोग व्हायचा. कालांतराने केवळ वनविभाग वनक्षेत्रातील अडथळयांतून मार्ग काढण्याच्या दृष्टीने हत्तींची आजही मदत घेतात.

ईशान्य भागातील अनेक ठिकाणी जाण्यासाठी योग्य मार्ग नाहीत. वृक्षतोड झाल्यावर हत्तींच्या मदतीने मोठया वृक्षांना हलविण्यात येते. आज देशभरात हत्तींची संख्या वीस हजारांच्या घरात आहे, तरीसुध्दा हत्तींची संख्या चिंताजनक असल्याचे मनेका गांधींचे ठाम मत आहे. त्याचे कारण विशद करताना त्या म्हणतात की ''भारतात अस्तित्वात असलेल्या आशियाई हत्तीत केवळ नर हत्तीला सुळे आढळतात. आफ्रिकेतील हत्तींच्या प्रजातीत ती नर आणि मादी दोघांमध्ये आढळतात, हा भारतातील आणि आफ्रिकेतील हत्तींत असलेला मुख्य फरक आहे. शिवाय भारतात पाच वर्षांपूर्वी सुळे असलेले पाच हजार हत्ती आज केवळ 800च्या आसपास आहेत. सुळयांसाठी मोठया प्रमाणात झालेली अवैध शिकार हे सुळे असलेल्या हत्तींची संख्या कमी होण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. मनेका गांधींच्या मते केरळात सर्वाधिक हत्तींची कत्तल होते. तिथल्या हत्तींच्या कत्तलीचे प्रमाण दिवसाला एक आहे. शिवाय पर्यटन, मालवाहतुकीसाठी हत्तींना देण्यात येणारे प्रशिक्षण हे त्यांची संख्या कमी होण्यामागचे आणखी एक कारण आहे. यावर त्वरित बंदी घालणे गरजेचे आहे. सुळे असलेल्या हत्तींची संख्या प्रतिवर्षाला 10%ने कमी होणे ही हत्तींच्या भविष्यातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट आहे.

वाघ, अस्वल यांच्याप्रमाणे हत्ती हासुध्दा त्याच्या नैसर्गिक अधिवासालगत असलेल्या नागरी वस्त्यांमुळे मानव-वन्यजीव संघर्षात ओढला गेला आहे. पश्चिम घाट, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात हत्तींच्या धुमाकुळाने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यात मानवाप्रमाणे हत्तींनासुध्दा आपला जीव गमवावा लागल्याने अधिकच भर पडली आहे. हत्तींचा शेतात शिरकाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे.

कोकणातील टिल्लारी धरणाभोवती असलेल्या काजूच्या, केळीच्या आणि नारळाच्या झाडांमुळे आणि टिल्लारी धरणातील पाणीसाठयामुळे कर्नाटकातून मोठया प्रमाणात हत्तींचा शिरकाव होतो. वास्तविक विकासकामांनी प्राणी विस्थापित होतात, पण हत्तींच्या बाबतीत टिल्लारी धरणामुळे तिथे हत्ती प्रस्थापित झाले आहेत. कारण हत्तींना मुबलक पाणी अतिशय आवश्यक असल्याने हत्तींनी टिल्लारी धरणाशेजारी आपला मुक्काम हलविला आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाला कोकणात आणि आसपासच्या प्रदेशात निमित्त मिळाले.

हत्ती हा शक्तिशाली आहेच, तसाच बुध्दिमानही आहे. आचार्य चाणक्यांनी कुणापासून अंतर ठेवावे याचे वर्णन करताना 'हस्तिनं शतहस्तेन' - म्हणजे हत्तीपासून शंभर हात अंतर ठेवावे, असे सांगितले आहे. प्राणी जितका शक्तिशाली आणि बुध्दिमान, तितकीच त्याच्याकडून होणाऱ्या नुकसानाची तीव्रता अधिक असते. हत्तीची उपयुक्तता बघायची असल्यास संस्कृत सुभाषितात केलेले वर्णन समर्पक आहे -

'बन्धनस्योडपि  मातङ्ग: सहस्रभरणक्षम:'

म्हणजेच एक बांधलेला पाळीव हत्तीसुध्दा सहस्र लोकांचे भरणपोषण करण्यास सक्षम आहे.

हत्तीचा मेंदू मानवाच्या मेंदूपेक्षा चार ते पाचपटीने मोठा असतो. सरासरी उंची 10 फुटापर्यंत, तर वजन 4000 किलोपर्यंत असणारा हा प्राणी आशियातील प्राण्यात सर्वात मोठा आहे. हत्ती मातृसत्ताक पध्दतीने जगतात. 7-8 हत्तींचा समूह त्यांच्यातील सर्वात वयस्कर हत्तीणीच्या नेतृत्वात वावरतो. सुखदुःखाची जाणीव असलेला हत्तींचा समूह आपल्या संवेदना प्रत्येक प्रसंगात प्रकट करतो. अभ्यासकांच्या मते नवजाताचा आनंद आणि मृत्यूच्या शोकसंवेदना हत्तीत प्रकर्षाने आढळतात. एकत्र येऊन त्यांच्या पध्दतीने आवाज काढून हत्तींचा समूह नवजाताचे आगमन साजरे करतो, तर आपल्या पध्दतीने मृत हत्तीचा देह झाडांच्या पानांनी झाकून ठेवण्याच्या कृतीतून अंत्यविधीसुध्दा करणे हे त्यांचे शोकाकुल होण्याचे प्रमाण देणारे आहेत. जंगली हत्ती जितका आपल्या समूहातील सहकाऱ्यांविषयी संवेदनशील असतो, तितकाच पाळीव हत्ती आपल्या मालकाच्याबद्दल संवेदनशील असल्याचा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.

हत्तीसारखा शांत वाटणारा प्राणी हिंसक होऊ शकतो, त्याला अनेक कारणे आहेत. भारतात हत्तींच्या हल्ल्यात आजवरची सरासरी बघता दर वर्षी 300 नागरिकांचा मृत्यू होतो, तर मानव-वन्यजीव संघर्षात जवळपास 200-250 हत्तींचा मृत्यू होतो. हत्तींच्या मेंदूत भूतकाळातील घटना आठवणींच्या रूपात साठवण्याची क्षमता आहे. त्यामुळे पूर्वार्धातील आठवणींतून आणि अनुभवातून हत्ती स्वरक्षणार्थ हल्ला करू शकतात. मुळात हत्ती हा मोठा प्राणी आहे, त्यात तो समूहात वावरणारा असल्याने त्याला अधिक अधिवासाची गरज आहे. त्यासाठी त्याच प्रमाणात अन्नाची आणि पाण्याची गरज असते. अन्नपाण्याच्या शोधात जाताना कधी हत्तींच्या मार्गात महामार्ग, कधी रेल्वेमार्ग, तर कधी मानवी वस्त्या येतात. जंगलात अडथळयातून मार्ग काढून देणारा हत्ती नागरी वस्तीत आला की मात्र त्याच्या मार्गात अनेक अडथळे उभे राहतात. मानवी वस्तीतून जाताना शेतांचे, पिकांचे नुकसान झाल्याने स्वाभाविकच मानवाचा त्याला रोखण्याचा प्रयत्न असतो. त्यातून उद्भवणाऱ्या संघर्षातून कुणाच्यातरी जिवाची हानी दुर्दैवाने होत असते. अनेकदा आपल्या समूहातून दूर झाल्याने अथवा हरवल्यामुळे हत्तीवर मानसिक आघात होऊ शकतो. समूहाच्या शोधात जाताना अनेकदा मानवी वस्तीतून गेल्याने त्याच्यावर होणाऱ्या हल्ल्यातून बचावासाठी हत्तीला प्रतिहल्ला करण्याशिवाय पर्याय शिल्लक नसतो. हत्तींना मालवाहतूक करण्यासाठी अतिशय खडतर प्रशिक्षणातून जावे लागते. त्यासाठी अनेक दिवस पाणी अथवा अन्न न मिळाल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडते आणि संयमाचा बांध तुटून समोर जे असेल त्यावर हत्ती तुटून पडतो. मानव-हत्तींच्या संघर्षाच्या परिस्थितीला मानवाने निर्माण केलेली परिस्थिती बहुतांशी कारणीभूत ठरते. हत्तीची बुध्दिमत्ता ही केवळ त्याच्या जगण्यापुरती आणि निसर्गात योगदान देण्याइतकी मर्यादित आहे, हे सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असलेल्या मानवाला मात्र अनेकदा उमगत नाही.

 बिबटयांचे वाढते हल्ले

मानव-वन्यजीव संघर्षात बिबट हा प्राणीसुध्दा वगळता येणार नाही. वास्तविक बिबटयाची शारीरिक क्षमता मार्जारकुळातील वाघ-सिंहांच्या तुलनेत फारच कमी आहे. बिबट हा वनक्षेत्राभोवती असलेल्या गावांतील पशुधनावर हल्ला करून जगणारा. पण गेल्या काही वर्षांत बिबटयाच्या हल्ल्यामुळे अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. अधिवासाच्या तुलनेत यांची वाढलेली संख्या यांना अन्न-पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे आकर्षित करते. तेथे कुत्रे, बकरी, वासरू मारून ह्याचे पोट भरते. पण आपल्या शारीरिक क्षमतेची जाणीव ठेवून बिबट हा वृध्द, बालक अशा शरीराने कमकुवत असलेल्यांवरसुध्दा हल्ला करू लागला आहे. परंतु नरभक्षक होण्याचे प्रमाण त्यात नसून स्वसंरक्षण हेच हल्ल्याचे कारण अधिक आहे. त्यातही वाघाच्या हल्ल्याची जी कारणे आहेत, तीच कारणे बिबटयालाही लागू होणारी आहेत. बिबट हा तसा जंगलातसुध्दा फार काळ दिसत नाही. त्याचा मूळ स्वभाव लाजाळू. सहसा वन्यजीवांव्यतिरिक्त कुणाला सामोरा न जाणारा हा प्राणी. मात्र माणसांची प्रचंड वर्दळ असलेल्या ठाणे-मुंबई परिसरात याचा मुक्त संचार झाल्याने, आपल्या वेळीअवेळी संचाराने बिबटयानेच आपल्याबद्दल असलेला गैरसमज खोटा ठरविला आहे. जेथे माणसांना फिरायला अडचण आहे, तेथे बिबटयाचा मुक्त संचार हा अभ्यासकांसाठी नवीन अभ्यासक्रम ठरला. यातून एक निष्कर्ष निश्चितच निघतो की प्राण्यांतसुध्दा परिस्थिती बघून आपले स्वभाववैशिष्टय बदलण्याची क्षमता निसर्गाने दिलेली आहे

सारासार विचार ही मनुष्याची जबाबदारी

चार मुख्य चतुष्पाद प्राण्यांच्या मानव-वन्यजीव संघर्षात दोघांचीही जीवितहानी होते. पण जंगलालगत असलेल्या शेतात हरीण, चितळ, रानडुक्कर, नीलगाय या साऱ्या वन्यजीवांची मोठया प्रमाणात वर्दळ आढळते, त्यात केवळ वन्यजीवांची एकतर्फी जीवितहानी होते. हे प्राणी हल्ली जंगलात कमी आणि लगतच्या शेतात अधिक दिसू लागले आहेत. अनेकदा रेल्वेतून अथवा बस गाडीने प्रवास करताना रस्त्यालगतच्या शेतात यांचे कळप मुक्त विहार करताना अनेकांनी बघितले असेल. अनेकदा शासनाला परिपत्रक काढून शेतकऱ्यांना रानडुकरे ठार मारण्याची परवानगी द्यावी लागते, इतक्या मोठया प्रमाणात यांचा संचार वाढला आहे, त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसानही.

कष्टाने पिकविलेल्या पिकांचे संरक्षण करताना पोटासाठी मानव-वन्यजीव संघर्ष ओढवून घेणाऱ्यांची परिस्थिती नक्कीच समजून घेता येणारी आहे. पण जेव्हा जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वन्यजीवांचा जीव घेतला जातो, त्यांना कठोर शिक्षा हाच एकमेव उपाय आहे. अनैसर्गिक भूक भागविण्यासाठी अनेकदा रानडुक्कर, चितळ, नीलगाय, ससे इत्यादी प्राण्यांची शिकार केली जाते; इतकेच नाही, तर आर्थिक कारणामुळे तर कधी अवैध तस्करीसाठी घुबड, काही प्रजातीतील सर्प, खवल्यामांजर यांची शिकार होते. घुबड, साप पकडून त्यांचा छळ करून अंधश्रध्देच्या आहारी गेलेले गुप्तधनासाठी त्यांचा वापर करतात, तेव्हा मानवाच्या अमानवी कृत्यांचा अंदाज येतो आणि 'पशुवृत्ती' उगाच बदनाम होते, कारण पशूंनी अंगीकारलेली वृत्ती ही निसर्गाने दिलेली आहे, त्यामुळे ती नैसर्गिकच आहे; पण अमानवी कृत्य हे बेकायदेशीर तर आहेच, तसेच अनैसर्गिकसुध्दा आहे.

आज वन्यजीवांची -आणि मानवाचीसुध्दा - सगळयात मोठी गरज आहे योग्य नैसर्गिक अधिवासाची. यात एक बाब कटू असली तरी सत्य आहे, ती म्हणजे वन्यजीव प्राणी गरजेपेक्षा अधिक काहीच मागत नाहीत हे प्राण्यांच्या बाबतीत सत्य आणि मानवाच्या बाबतीत कटू आहे. मानव-वन्यजीव संघर्ष हा एकाच्या नैसर्गिक अधिवासात सुरू होऊन दुसऱ्याच्या अनैसर्गिक अधिवासात संपुष्टात येतो. यातला कुठला अधिवास नैसर्गिक आणि कुठला अनैसर्गिक, हे मात्र सर्व प्राण्यांत सर्वश्रेष्ठ असलेला मानव ठरवीत आला आहे आणि
पुढेही तोच ठरविणार आहे.

प्रतीक राजूरकर

9823020230