''जीवनशैली सांभाळा, आयुष्य सुंदर बनवा'' - डॉ. प्रमोद सावंत

 विवेक मराठी  26-Feb-2019

डिचोली तालुक्यातील साखळी मतदारसंघाचे आमदार व गोवा विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत हे भारतातील सर्वात तरुण सभापती आहेत. विशेष म्हणजे ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. राजकारण, समाजकारण करत असताना आपल्या डॉक्टरी पेशाकडे त्यांचे आज दुर्लक्ष होत असले, तरीही फावल्या वेळात ते आयुर्वेद उपचार पध्दतीबाबत रुग्णांना मार्गदर्शन करतात व आजही व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून जमेल तशी सेवा देण्याचा प्रयत्न करतात. 'आयुर्वेदिक उपचार पध्दती' या विषयावर डॉ. सावंत यांची मते जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

 

आजचे जीवन धावपळीचे झालेले असून बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर काय परिणाम होत आहेत?

बदलत्या जीवनशैलीचा, राहणीमानाचा आपल्या जीवनावर जो परिणाम खूप मोठा दिसून येत आहे. ताण, तणाव, बिघडलले मानसिक स्वास्थ्य, तसेच फिटनेसचा अभाव यामुळे आज कोलेस्टेरॉल, मधुमेह, रक्तदाब आदी रोगांना आमंत्रण दिले जात आहे. याचे कारण आहार व विहार असे दोन्ही आहेत, असे म्हणावे लागेल. जीवनशैलीत बदल झाल्याने तरुणांची मानसिक, शारीरिक अवस्था बदलत असून आज आम्ही निसर्गापासून दूर जाऊन कृत्रिमतेकडे झेपावत आहोत. त्याचे अनेक वाईट परिणाम दिसू लागले आहेत. व्यायामाचा अभाव, चमचमीत मसालेदार तेलकट खाणे, फास्ट फूड, रेडीमेड खाणे, निसर्गाच्या विरुध्द आहार-विहार करणे या अनेक कारणांमुळे आज अनेक आजार व अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

त्यावर आयुर्वेदाने काय उपचार सुचवले आहेत?

खरे म्हणजे आयुर्वेदाने दिनचर्या, ॠतुचर्या सांगितलेली आहे. रोग होऊच नयेत यासाठी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे रोग वाढत आहेत. निरोगी राहायचे असेल, तर ॠतुचर्या व दिनचर्या यांचे पालन करणे गरजेचे आहे. शोधन चिकित्सा व शमन चिकित्सा पंचकर्माद्वारे करावी, असे सूचित केलेले आहे.

आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा, तब्येत उत्तम राहावी यासाठी आपला दिनक्रम कसा असावा? आहार-विहार, व्यायाम आणि विश्रांती यांचे कसे नियोजन असावे?

स्वत:ला शिस्त घालून घेणे महत्त्वाचे आहे. हे शरीर आपले आहे, त्याची निगा राखणे याला प्राधान्य दिले पाहिजे. ते करताना आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टी वेळेवर काही प्रमाणात जरी करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा नक्की फायदा दिसून येईल. दिनचर्या पालन करणे गरजेचे आहे, पण सर्व गोष्टी साहाय्यक होताना दिसत नाही. परंतु खाण्यावर नियंत्रण ठेवणे, तीन वेळाच खाणे, आवश्यक तेवढेच (तहान लागेल तसे) पाणी पिणे, त्या त्या ॠतूंमधील पालेभाज्या, फळे खाणे, विरुध्द आहार न घेणे हे महत्त्वाचे आहे. आयुर्वेदाने साध्या साध्या गोष्टी सांगितल्या आहेत. पोहणे, चालणे, सकाळी प्राणायाम, योग या गोष्टींचा जीवनशैलीत समावेश करा. 90 टक्के आहारावर नियंत्रण व 10 टक्के व्यायाम यावर लक्ष दिले, तर रोग होणारच नाहीत. पहाटे उठून व्यायाम करणे, त्यानंतर न्याहरी (सकाळी 8 ते 9), दुपारी भोजन, सायंकाळी 7पूर्वी हलका आहार या गोष्टी आत्मसात करा, रोग होणारच नाहीत. विरुध्द आहार, फास्ट फूड आदी गोष्टी टाळा. थंड पिऊ नका. कोल्ड ड्रिंक्सना बायबाय करा, रोग होणारच नाहीत

बदलत्या जीवनशैलीत बदललेल्या आहारविषयक सवयीचा वाटा किती?

70 टक्के वाटा हा आहारविषयक सवयीचा आहे. प्रत्येकाची धावपळ सुरू आहे, प्रत्येक मिनिटासाठी पळापळ सुरू आहे. त्यामुळे घरगुती खाणे आपण विसरत आहोत. तयार खाणे, तेही साठवलेले, पॅकबंद, शिळे खाणे, पिझा-बर्गर आदी जीवनशैलीशी खेळ करणारी आहार पध्दती अवलंबिल्याने आपले आरोग्य दिवसेंदिवस बिघडत असून त्याचे मोठे दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यातूनच असाध्य रोगांची संख्या वाढू लागली आहे. व्यग्र वेळातही आहाराचे योग्य नियोजन करता आले, तर आपण कितीही व्यग्र असलो, तरी स्वस्थ राहू शकतो. मात्र त्यासाठी आपण आपला निग्रह करणे गरजेचे आहे.

पूर्णपणे आयुर्वेदिक उपचार पध्दती आजच्या आरोग्यविषयक तक्रारींवर उपाय ठरू शकते का?

निश्चितच. अगदी 100 टक्के. आरोग्यविषयक तक्रारींवर आयुर्वेदिक उपचार प्रभावी ठरू शकतो. असाध्य रोगावर ऍलोपॅथीने हार मानलेल्या ठिकाणी आयुर्वेदाने चमत्कारिकरीत्या असाध्य रोग पूर्ण बरे केलेले असून आज आयुर्वेदाला जागतिक पातळीवर मोठी मान्यता मिळत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून उपचार घेण्यासाठी लोक आज भारतात येत आहेत, ही भारतीय आयुर्वेदाची मोठी ताकद आहे. पूर्वी ऍलोपॅथी विकसित झालेली नव्हती, त्या वेळी तर 100 टक्के आजारांवर आयुर्वेदिक उपचार पध्दतीच होती. त्यामुळे आजही बहुतांश रोगांवर ही आयुर्वेदिक उपचार पध्दती प्रभावी ठरत असून काही असाध्य रोग बाजूला ठेवले, तर भारतीय उपचार पध्दती उपयुक्त आहे.

मुलाखत : विशांत वासुदेव वझे, डिचोली, गोवा

 9822582667