'हिंदुत्वाची' झूल उतरली

 विवेक मराठी  08-Feb-2019

 

 तीन राज्यांत सत्ता मिळवल्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बाहूंना भलतेच स्फुरण चढले आहे. प्रियंका वाड्रा यांना पक्षाचे महासचिव केल्यानंतर तर त्या पक्षाला आणि राहुल गांधींनाही बारा हत्तींचे बळ आल्याचा डांगोरा त्यांचे समर्थक पिटत आहेत. कौतुकाच्या रंगांची ही उधळण चालू असताना, राहुल गांधी मात्र आपला मूळ रंग दाखवू लागले आहेत. राहुल लवकरात लवकर आपल्या मूळपदावर आले, हे एका अर्थाने बरेच झाले. त्यामुळे त्यांनी पांघरलेली सौम्य हिंदुत्वाची झूल त्यांच्या अंगावरून गळून पडली आणि त्यांच्यासह त्यांच्या पक्षाचा ओंगळवाणा चेहरा जगासमोर आला.

काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्य विभागाच्या वतीने नुकताच दिल्लीत एक मेळावा भरला होता. या मेळाव्यात राहुल गांधींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत, ती म्हणजे काँग्रेसच्या मूळ बीभत्स आणि सत्तापिपासू रूपाचे दर्शन घडवणारी आहेत. काँग्रेस म्हणजे लांगूलचालन, द्वेष आणि हिंदुत्वाला कडाडून विरोध, काँग्रेसव्यतिरिक्त अन्य देशभक्त व्यक्तींचा अपमान आणि मानहानी हीच काँग्रेसची ओळख आहे, तीच ओळख दिल्लीच्या मेळाव्यातून पुन्हा अधोरेखित झाली.

हिंदुत्वाची पांघरलेली झूल इतक्या लवकर दूर करण्याची वेळ राहुल यांच्यावर का आली? अल्पसंख्याकांचे लांगूलचालन आणि हिंदुत्वाचा द्वेष हे दोन्ही राग त्यांना पुन्हा का आळवावेसे वाटले? प्रियंका वाड्रांना मिळालेल्या नवीन पक्षीय जबाबदारीनंतरही,  अंमलबजावणी संचलनालयाने - अर्थात ई.डी.ने आपली कारवाई ठरल्याबरहुकूम चालू ठेवल्याने तर राहुल आणि त्यांचा पक्ष बिथरलेला नाही ना? मुस्लीम तुष्टीकरणाची ही विकृत मानसिकता या पक्षाला अधिकाधिक गर्तेत नेत आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही का?

दिल्ली येथे झालेल्या अल्पसंख्याकांच्या मेळाव्यात राहुल गांधी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह हजर होते. पक्षाचा तुष्टीकरणाचा राग आळवताना महिला विभागाच्या प्रमुख सुष्मिता देव यांचे भान हरपले. त्याच धुंदीत त्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना पक्षाच्या वतीने आश्वासन दिले की, 'काँग्रेस सत्तेवर आली की तिहेरी तलाक विरोधी कायदा रद्द करण्यात येईल.' मुळात हा कायदा शेकडो वर्षे अन्याय-अत्याचार निमूट सहन करणाऱ्या मुस्लीम भगिनींच्या हितरक्षणार्थ आहे. तिहेरी तलाक विरोधातील शाह बानो खटल्यात निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक हा असांविधानिक असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्या निर्णयाला भाजपा सरकारने कायद्याचे रूप दिले. तिहेरी तलाक रद्द व्हावा अशी मागणी मुस्लीम भगिनी आणि अनेक मुस्लीम पुरोगामी संघटना वर्षानुवर्षे करत होत्याच. त्याच्या विरोधातला हा कायदा मुस्लीम भगिनींच्या आयुष्याला लाभलेला उ:शाप आहे, याची जाणीवही नसणाऱ्या सुष्मिता देव यांनी संसदेतही त्याला विरोध नोंदवला होताच. आता पक्षाच्या व्यासपीठावरून तो रद्दच करण्याचे जाहीर आश्वासन त्यांनी दिले आहे. हे आश्वासन किती महिलांच्या आयुष्याची राखरांगोळी करू शकते, याचे भान त्यांना आहे काय? अल्पसंख्य समाजाला कायम असुरक्षिततेच्या वातावरणात ठेवायचे, सुधारणेचा वाराही त्यांना लागू द्यायचा नाही, लाचार मानसिकतेतून त्यांना बाहेर येऊ द्यायचे नाही, किमान सामाजिक मूल्येही या समाजात रुजू द्यायची नाहीत असे काँग्रेसचे पहिल्यापासूनचे धोरण आहे. त्यामुळेच मुस्लीम महिलांना आधार ठरणारा, सुरक्षा प्रदान करणारा हा कायदा काँग्रेसला कसा मान्य होईल?

हे आश्वासन देणारी अन्य व्यक्ती असली, तरी उपस्थित असलेल्या राहुल गांधी यांनी त्याला विरोध दर्शवला नाही. त्यांचे हे मौनच पुरेसे बोलके आहे. या विषयावर जरी बोलले नाही, तरी याच मेळाव्यात त्यांनी उधळलेली मुक्ताफळे त्यांच्या अपरिपक्वतेची उदाहरणे आहेत. राणा भीमदेवी थाटात भाषण ठोकताना त्यांनी पंतप्रधान मोदींना 'डरपोक' म्हणत, केवळ पाच मिनिटे सामना करण्याचे आव्हान दिले. नरेंद्र मोदी कठपुतळी असून सरसंघचालक मोहन भागवत सत्ता राबवतात, असा आरोपही केला. उसने अवसान आणत केलेल्या या आवेशपूर्ण भाषणात मांडण्याजोगा कोणताही नवीन मुद्दा नसल्यामुळे केवळ द्वेष आणि हीन पातळीवरची टीका करण्यातच त्यांनी वेळ काढला. कदाचित 2014च्या आधी सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवत सोनिया गांधी ज्या प्रकारे सूत्रे हलवत होत्या, त्या अनुभवांचा या आरोपांना आधार असेल. आपल्या पक्षासारखेच वातावरण आणि एकाधिकारशाही अन्य पक्षात असेल, किंवा रिमोट कंट्रोल सत्तेबाहेरील व्यक्तीकडे असेल असे राहुल गांधींना वाटणे स्वाभाविक आहे. मोदींवर टीका करताना राहुल गांधी यांनी संबोधनही एकेरी वापरले. त्यामुळे मोदींचा अपमान नाही, तर राहुल यांची योग्यता सर्वांना समजली. जेव्हा टीका करण्यासाठी, प्रतिवाद करण्यासाठी ठोस मुद्दे नसतात, तेव्हा एकेरीसंबोधन हे अस्त्रासारखे वापरले जाते. मात्र हे अस्त्र बूमरँग ठरू शकते, याचे भान राहुल यांनी ठेवायला हवे आणि आपल्या बोलण्यावर नियंत्रण आणायला हवे.

विद्यमान सरकार वा पंतप्रधान यांची शेलक्या शब्दात निरर््भत्सना करून झाली की हिंदुत्वाच्या मुद्दयावर घसरायचे, हेही नेहमीचेच. हिंदुत्व या संकल्पनेचा अभ्यास न करता टीका करायची, हेही काँग्रेसच्या प्रथेला धरूनच. त्या बाबतीत पक्षाचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा वाचाळपणाचा वारसाच राहुल गांधी पुढे चालवत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रखर देशभक्ती,देशासाठी त्यांनी केलेला त्याग, समर्पण यातील कोणत्याही बाबीला महत्त्व न देता त्यांना 'डरपोक' म्हणण्याचे औध्दत्य राहुल यांनी दाखवले आहे. सावरकरांनी 13 वर्षे अंदमानच्या तुरुंगात काढली, केवळ मातृभूमीसाठी त्या प्रकारची शिक्षा 13 दिवस तरी सहन करायची राहुल यांची तयारी आहे का?

निवडणुका आल्या की हिंदुत्व, हिंदुत्वाची जाज्वल्य प्रतीके यांच्यावर टीका केली तरच आपण पुरोगामी ठरू, हा काँग्रेसचा पूर्वापार समज आणि तदनुसार व्यवहार आहे, त्याला राहुल गांधी तरी अपवाद कसे ठरतील? हिंदुत्व ही पांघरायची झूल नाही, तर समर्थपणे पेलायचा वारसा आहे, हे त्यांना कळण्याची अपेक्षा तरी कशी बाळगावी?