तृतीय क्रमांक - आई व्हावी मुलगी माझी

 विवेक मराठी  11-Mar-2019

 राधिका देशकर, पेण

वात्सल्य आणि त्याग यांचा संगम जेथे होतो, तेथे 'आई' हे माउली दैवत निर्माण होते. पुरुषापेक्षाही ती श्रेष्ठ ठरते. म्हणूनच आधी 'मातृदेवो भवः', मग 'पितृदेवो भवः' असे म्हटले जाते.

 

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/


'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' अशा शब्दात कवी यशवंतांनी ज्या मातेची थोरवी वर्णिली आहे, ती केवळ व्यक्ती नसून वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक प्राणिमात्राची पहिली गुरू असते.

जन्म दिल्यापासून (हल्ली गर्भातच) ते मूल स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत मुलाचे शैशव जपते, नंतर हाताला धरून बालपण फुलवते, सखी बनून तारुण्य खुलवते व पंखात बळ आल्यावर स्वावलंबी बनवते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शनाने व संस्कारांनी आपले व्यक्तिमत्त्व घडवते आणि जणू काही तिचेच प्रतिबिंब आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात बघतो. तर अशी ही मातृछाया मिळण्याचे परमभाग्य मलाही लाभले. या भाग्याची उतराई कशी होणार? मग ठरवले, मातृप्रेमाची परतफेड मातृप्रेमानेच करायची आईची आई होऊन.

कारणही तसेच घडले. 55 वर्षांच्या सुखी सहजीवनानंतर बाबांच्या जाण्याने आईला आलेले एकटेपण आणि 25 वर्षांच्या संसारानंतर बहुतांश जबाबदाऱ्या पार पाडून मला आलेले रितेपण. यामुळे आम्ही मायलेकी पुन्हा जवळ आलो. बाबांच्या आजारपणात केवळ पत्नी म्हणून नव्हे, तर आई बनून त्यांची सेवा केली, त्यामुळे त्यांचे नाते अधिकच दृढ झाले. 'दो जिस्म, एक जान है हम' अशी त्यांची एकरूपता झाली होती. 55 वर्षांच्या दीर्घ सहजीवनामुळे बाबांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आता कशी भरून निघणार? या कल्पनेने हळवी झालेली तिची नजर बघताच मी तिला कुशीत घेतले व त्या क्षणी मी तिची आई झाले. निरागस बालकाप्रमाणे ती मला भासली. निराधार व असुरक्षिततेची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. या मानसिक स्थितीतून बाहेर येण्यासाठी व नवीन आयुष्याला सामोरे जाण्यासाठी भक्कम आधाराची गरज होती. 25 वर्षांपूर्वी ज्या आईने जोडीदारासह नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी दिलेला धीर, तोच धीर मी आज तिला देत आहे. फक्त तिचा जोडीदार नसताना.

सत्य परिस्थिती स्वीकारण्यास तिला थोडा वेळ द्यायला लागला. नवीन आयुष्याची घडी बसण्यासाठी तिच्या उपजत समंजसपणा व सहनशीलता या गुणांबरोबरच तिच्यात असलेल्या पाककला, शिवणकला व वाचनाची आवड यांची मदत झाली. त्यात रमण्यासाठी मी रोज तिच्याशी संपर्कात असते. हल्ली संपर्क साधनांमुळे ते सहज शक्य होते. वाचन आणि पाककला ही आमची सामाईक आवड. त्यामुळे त्या विषयांवर आम्ही तासनतास बोलतो. शिवाय रोजचे रूटीन प्रश्न -'' जेवलीस का?'' ''औषधे घेतलीस का?'' अशी चौकशी केली की तिला खूप बरे वाटते.

आता मी तिच्याकडे माहेरपणाला न जाता तिलाच माझ्याकडे माहेरपणाला घेऊन येते. अशीच माझ्याकडे आली असताना मातोश्रींनी हात मोडून घेतला. त्यामुळे तर मला अक्षरशः लेकीप्रमाणे तिचे लाड करता आले. तिला रोज आंघोळ घालणे, मॉलिश करणे, केस विंचरून वेणी घालणे. एकदा तर मी तिला मस्त कलप लावून दिला. मी व तिने दोघींनी मस्त एन्जॉय केले. 'प्रौढत्वे निज शैशवास जपावे' या उक्तीप्रमाणे त्या आजारपणात कधी कधी हट्टीपणा करायची, मग रागे भरून मला माझा आईपणा दाखवावा लागलाच. त्याच काळात आम्ही दोघींनी मिळून दासबोधाचे वाचन केले. तेव्हाच तिने शिवथरघळी जाण्याची इच्छा बोलून दाखवली. तिची ही इच्छा तिच्याबरोबर माझ्या 4-5 मैत्रिणींना बरोबर घेऊन पूर्ण केली. या आध्यात्मिक सहलीचा आनंद तिला एक नवीन ऊर्जा देऊन गेला. तिला नाटक-सिनेमाची आवड असल्याने तिच्याबरोबर तो एक कार्यक्रम असतोच. पर्यटनालाही आम्ही तिला बरोबर नेतो. पहिल्या विमान प्रवासाने आम्ही हैदराबादला गेलो. विमानसफरीचा आनंद तिने लहान मुलांच्या कुतूहलाने व उत्सुकतेने घेतला. विमानातील ते क्षण नातवाबरोबर स्वतः कॅमेऱ्याने टिपले. तसेच बाबांची अपूर्ण इच्छा 'अंदमान यात्रा', तीही पूर्ण केली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे समाधान बघून आनंद झाला.

सणावारांना मी आवर्जून तिच्याबरोबर असते. तिच्या पाककलेला पूर्ण वाव मिळून तिचा वेळ कारणी लागल्याचे आंतरिक समाधान तिला मिळते व मलाही पारंपरिक पाककृतीशिवाय नवीन आधुनिक पाककृती तिला शिकवता येतात. तीही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने केक, पिझ्झा, उंदियो शिकली.

नवीन पिढीशीही ती छान जुळवून घेते. त्यामुळे नातवांबरोबर हॉटेलिंग, शॉपिंग करताना तिला मजा येते. हे ओळखून नातवाने तिच्या वाढदिवशी तिला स्मार्ट फोन घेऊन दिला. तेव्हा तर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. एेंशीव्या वर्षी फोन शिकण्याची तिची जिद्द आणि हौस पाहून कौतुक वाटले. फोन घेऊन गाणी ऐकते, व्हॉट्स ऍप मॅसेज करते, तेव्हा खूप गंमत वाटते. फोनची रिंग ऐकू येत नाही, म्हणून तिला कानाला यंत्र लावू या म्हटले, तर ठामपणे नकार दिला व म्हणाली, ''ए, मी अजून ठार बहिरी झाले नाही गं, अवघे 80 वयोमान माझे!'' असे म्हणून स्वतःच हसली. अजूनही डोळयांचा चश्मा न लावता पेपर वाचते, तेव्हा तर शाब्बास म्हणून पाठ थोपटावीशी वाटते.

तर अशी ही एेंशी वर्षांची माझी 'लेक' मला मातृत्वाचा नवा समृध्द अनुभव देत आहे व त्या आईच्या भूमिकेत मलाही खूप आनंद मिळतोय.

संत तुकारामांनी म्हटलेच आहे, 'संसाराचं सार काय तर ममताळू माय'.

7276482762