उत्तेजनार्थ - माझा छंद, माझी ऊर्जा

 विवेक मराठी  12-Mar-2019

नीलाक्षी पाटील, विर्लेपाले

 

लहानांपासून थोरांपर्यंत माणूस कसला न कसला तरी छंद जोपासत असतो. किंचितसा का असेना, पण आनंद मिळावा एवढीच आपल्याला अपेक्षा असते. यातून जे सुख मिळतं, त्याचे धनी केवळ तुम्ही असता.

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....
https://www.facebook.com/VivekSaptahik/

काही काळापूर्वी शारीरिक व मानसिक अस्थिरतेच्या उंबरठयावर उभी असताना माझी एका छंदाशी तोंडओळख झाली. 2012मध्ये माझं ऑॅपरेशन करावं लागलं. सगळेच माझी जिवापाड काळजी घेत होते. मात्र माझी मी माझ्या मनाला हवी तेवढी उभारी देऊ शकत नव्हते. शरीर आणि मन ताळयावर आणण्याचा माझा आटोकाट प्रयत्न एकीकडे अथकपणे सुरूच होता. मोबाइल हातात असायचा. चाळा म्हणून सोशल मीडियावर भटकंती व्हायची. मोबाइलवर काढलेल्या फोटोंची त्यात रेलचेल असायची. एखादा फोटो कधी मनाला स्पर्शून जायचा अन हे आपल्याला जमेल का, हा विचार मनातून उसळी मारून वर यायचा. काही काळ नुसतं पाहून बरंच काही शिकत होते. हळूहळू नजर तयार होत होती.

हे होण्याअगोदर काहीच दिवस निकॉनचा डीएसएलआर कॅमेरा आमच्याकडे आला होता. कुटुंबात आलेल्या या नव्या सदस्याकडे, माझ्या तब्येतीमुळे, आम्हा साऱ्यांचंच दुर्लक्ष झालं होतं. माझ्या शरीरात ताकद नव्हती. मन थकलं होतं. वेळ घालवायला मग कधीतरी काही वाचन सुरू असायचं. कधी कुणी भेटायला यायचं, त्यांच्याशी गप्पा व्हायच्या. खिडकीतून दिसणारं जग बघून बघून आता कंटाळा यायला सुरुवात झाली होती. वेळ जात होता, मात्र तो नुसताच जात होता. कुणाशी काही बोलावं असं वाटलं, तरी वेळ आली की नको वाटायचं. शरीरा-मनातलं चैतन्य जणू दिगंतरा गेलं होतं.

एके दिवशी विमनस्क होऊन खिडकीबाहेरल्या शून्यात बघत उभी होते. क्षणैक मनात विचार उमटून गेला... दुर्बीण असती तर..! ती तर नव्हती. मग मी आमचा नवा कोरा कॅमेरा काढून त्याच्या झूम लेन्समधून जगाची नव्याने ओळख करून घेऊ लागले. झळाळत्या उन्हात वाऱ्यावर डोलणारे झाडांचे हिरवेगार शेंडे माझ्या घरातून बसल्या बसल्या दिसतात. एके दिवशी लेन्स झाडांच्या शेंडयावर फोकस झाली अन माझ्यासाठी अलिबाबाची गुहाच उघडली. झाडावर स्वत:च्याच विश्वात रमलेले पक्षी त्या लेन्समधून मला हाताच्या अंतरावर दिसू लागले.


आता तो कॅमेरा अन त्यातून दिसणारे सूर्य, चंद्र, तारे, पक्षी या अवघ्यांशी माझं मैत्र नव्याने जुळून आलं. कामावर निघालेल्या नवरोबाची पाठ फिरली रे फिरली की मी कॅमेरा घेऊन त्या जादुई गवाक्षातून या अद्भुत दुनियेची सैर करू लागले. कॅमेरा कसा वापरतात हे मला तोवर ठाऊक नव्हतं. तरीही एक दिवस धीर एकवटून मी खटका दाबलाच. मग रोज काही ना काही त्यात टिपलं जाऊ लागलं. माझा उबलेला जीव पक्ष्यांच्या त्या अद्भुत दुनियेत आता खुशहाल झाला. गेली अनेक वर्षं मी इथे राहत्येय, मात्र आता त्या पक्ष्यांनी, त्या सूर्योदय-सूर्यास्तांनी माझ्या जगण्याला रूप, रंग अन स्वरही दिला. कष्टावलेलं मन आता काहीसं हुरूपलं.

एक दिवस अचानक नवरोबाने कॅमेरा काढला आणि मला थोडं दडपण आलं. कारण माझ्या उचापती त्याला आता समजणार होत्या. कॅमेरा बघत असताना मी टिपलेले फोटो त्याने बघितले अन तो अवाक झाला. मी असं काही यात टिपू शकेन असं त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. सगळे फोटो त्याने मग संगणकावर घेतले आणि बघून खूप कौतुक केलं. कॅमेऱ्याची काहीच माहिती नसताना मी पक्षी, सूर्य यांचे काढलेले फोटो पाहून त्यालाही आश्चर्य वाटलं. मग त्याने मला या माझ्या नव्या दोस्ताची तांत्रिक बाजूही समजावून दिली. आता घरात बसल्याबसल्या मी अनेक पक्षी अधिक उत्साहाने टिपू लागले. आता छायाचित्रातील पक्षी कोणता आहे या कुतूहलाची एक नवीन पायरी समोर दिसू लागली. मग त्यांची नावं शोधण्यासाठी माझा लेक माझ्या मदतीला धावला. झाडांच्या शेंडयावरले पक्षी आता जणू आमच्या घरात शिरले. गप्पांचा विषय होऊ  लागले. घराचं जग आता आणखी विस्तारलं. माझ्या सासूबाई नाहीतर घरातील काम करणाऱ्या मावशीही पक्षी दिसला रे दिसला की, हाक मारून फोटो काढायला सांगू लागल्या. माझ्यातलं लहान मूल जणू परिकथा नव्याने जगू लागलं.

या कॅमेऱ्याने मला माझ्या अवघड काळात उत्तम साथ दिली. माझ्यात लपलेल्या या छंदाची मला ओळख करून दिली. झाडावरल्या अन आभाळातल्या या नव्या दोस्तांनी माझं जगणं सुसह्य केलं. आता कॅमेरा, पक्षी अन् अनोखा निसर्ग माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. दर वेळी कधी फोटो काढताही येत नाहीत. मात्र या हुकलेल्या क्षणांची मातबरी मला वाटत नाही. ही दुनिया माझ्या अंगोपांगात आता भिनली आहे याची मला जाणीव आहे अन् ती माझ्या सुखाचं कारण आहे..!

9819106347

https://www.facebook.com/VivekSaptahik/