उत्तेजनार्थ - स्त्री-पुरुष समानतेचे माझे घरगुती प्रयोग

 विवेक मराठी  12-Mar-2019

 ***अनिल खरचे,  चिपळूण*

 माझे चार वर्षाचे पोर एकदा त्याच्या आईला विचारत होते, ''अगं, बाबांचे आई-बाबा आपल्यात राहतात, मग तुझे आई-बाबा आपल्यात का राहत नाहीत?'' मी हे ऐकत होतो. प्रश्न अगदी साधा, निरागस होता. पण कुठेतरी समान न्यायाची मागणी करणारा होता. माझ्या चार वर्षांच्या पोराला हे कळते, हा फरक लक्षात येतोय आणि मला नाही? किंवा मागच्या अनेक पिढयांना तो कळला नसावा का? समाजव्यवस्थेला ही असमानता, विषमता बोचली नसावी का? माझ्या आई-वडिलांना माझी पत्नी सांभाळते, त्यांचे आजारपण, दवाखाने करते, तसे मी जावई म्हणून बायकोच्या आई-बाबांची किती जबाबदारी घेतो? त्या कर्तव्यात मीही वाटेकरी आहे... हे तर मी विसरतोच. अर्धांगिनीचा अर्थ हिंदीत आणि इंग्लिशमध्ये खूप छान सांगितला आहे - 'एक खूबसूरत जीवनसाथी' असा हिंदीत, तर 'बेटर हाफ' असा इंग्लिशमध्ये अर्थ आहे. मग या अर्थानुसार जर माझी पत्नी माझी खरोखर अर्धांगिनी आहे, तर मीही स्त्री-पुरुष समानतेच्या प्रयोगातून माझ्या पत्नीचा बेटर हाफ निश्चित बनू शकतो.

मी स्त्री-पुरुष समानतेचे घरगुती प्रयोग सुरू केले. माझ्या सासऱ्यांची - म्हणजे पत्नीच्या वडिलांची ऍन्जिओप्लास्टी झाली. मी माझ्या सासू-सासऱ्यांना आरामासाठी ते नको म्हणत असताना महिनाभर आमच्या घरी घेऊन आलो. अर्थात तेव्हा त्यांच्या मुलाचा विवाह झालेला नव्हता, म्हणूनही त्यांना येणे जमले असावे. पण पुढेदेखील ते माझ्यावर अशी जबाबदारी बिनधास्त टाकू शकतात, हा विश्वास मी त्यांना दिला.

सकाळी उठल्यानंतर व्यायाम, ध्यान, प्राणायाम करण्यासाठी वेळ मिळण्याचा हक्क केवळ माझाच नसून ती आईची आणि पत्नीचीही गरज आहे, म्हणूनच त्यांना सकाळी यासाठी वेळ देणे मला महत्त्वाचे वाटू लागले. मग तिघेही एकत्र येऊन हे सारे करू लागलो. कोणीच कोणासाठी अडकून न पडल्यामुळे प्रत्येकाची साधनेची गरज पूर्ण होऊ लागली... नव्हे, असे म्हणता येईल की आम्हीच परस्परांची साधने बनलो.

माझी पत्नी अन्नपूर्णा सकाळी स्वयंपाक, डबे इत्यादींची धावपळ करते, तेव्हा कधी कांदा चिरून दे, कोथिंबीर चिरून दे, कामावर जायचे तिचे कपडे इस्त्री करून देणे, तिची गाडी पुसून ठेवणे, बिछाने आवरणे, वेळ मिळेल तसा मुलाचा अभ्यास बघणे अशी कामे मी माझी समजून करतो. प्रत्येक स्त्रीसुलभ काम आपणास जमतेच असे नाही. कारण त्यातली नजाकत आपण जपू शकत नाही. मग अशी पुरुषी, पण स्त्रीस मदत होणारी काम आपण निवडावी. यामुळे सौ.च्या मनातील श्रीं.ची प्रतिमा नक्कीच उंचावते.

माहेराहून परत येणाऱ्या पत्नीला प्रवासाचा थकवा अधिकच जाणवत असावा, असे मला वाटते. कारण माहेरी जातानाचा उत्साह आम्ही पाहिलेला असतो. तिथला आराम सौ.ने उपभोगलेला असतो. आता आल्याबरोबर किचन ओटयापाशी तिने उभे राहण्यापेक्षा मी कुकर लावून ठेवलेला असतो आणि भाजीचे पार्सल आणलेले असते. अर्थात हे सगळे सर्व पुरुषांना जमू शकते, जर आम्हां पुरुषांना स्वत:ला तिच्या जागी ठेवून पाहता आले तर.

नातलग, समाज इत्यादींमध्ये वावरतानादेखील तिचे कौतुक करणारे मला सांगतात, ''तू नशीबवान आहेस अशी बायको तुला मिळाली.'' असे कुणी सांगितल्यावर मी माझा 'अभिमान' चित्रपट होऊ  देत नाही. स्वत:ला समजावतो, 'अभी मान ही जा तू जो सब बोलते है।' ही माझी सौभाग्यवती माझे भाग्य म्हणून या जीवनप्रवासात मला सोबत करतीये. या संसाररूपी गाडयाची दोन्ही चाके परस्परांना पूरक असावी, समन्वयक असावी म्हणूनच समानतेचे प्रयोग सातत्याने करीत राहावे.

अर्थात, अर्थाचा अर्थ लावणाऱ्या, आर्थिकदृष्टया स्वावलंबी असणाऱ्या माझ्या गृहलक्ष्मीने स्वत:च्या मिळकतीचा विनियोग कसा करावा हे ठरविण्यात ती सक्षम आहे; पण ज्या आई-वडिलांनी शिक्षण देऊन तिला स्वावलंबी केले, त्यांना तिच्या मिळकतीतून, तिच्या इच्छेने, तिला वाटल्यास ती काही देऊ  शकते, हे स्वातंत्र्य तिला दिलेले आहे. घर दोघांच्या नावाने बांधले, कारण 'घर दोघांचं असतं, एकाने विस्कटलं तर दुसऱ्याने सावरायचं असतं.' यात 'विस्कटणारं' कोण असेल? ते परिस्थितीवर अवलंबून असतं. पण स्त्री-पुरुष समानता प्रत्येक पावलावर असेल, तर सावरणे कठीण नसते. अर्थात विस्कटणारच नाही मुळात.

मी बाहेरची कामे - बँका, इन्शुरन्स, माझे व्यवसायातले काम, माझे व्यवहार जे काही करतो, ते तिला दाखवतो आणि ते मला योग्यही वाटते. तिला मोटरसायकल, कार आणि गावी गेलो की वाडयावर ट्रॅक्टर चालवण्यास लावणारा मीच असतो. तिचा नकार असला तरी ते का गरजेचे आहे? समानता म्हणून नव्हे, तर सुरक्षा म्हणूनही ते किती आवश्यक आहे, ते पटवून सांगतो. लग्नानंतर तिचे पहिले नाव मी बदलले नाही, कारण तिची ती ओळख आहे. त्या नावाला ती अर्थ देते, याचे भान मी ठेवले. दोन्ही आडनावे मात्र ती स्वत:लाच लावू लागली, मग मी तिला माझ्यापेक्षाही अधिक घरंदाज, संपन्न मानू लागलो.

आजही लग्नाला सतरा वर्षे होऊन गेली, तरी मी एखाद्या सुट्टीच्या दिवशी मुलाला सोबत घेऊन ''आज आम्ही बापलेक तुला एक नवीन पदार्थ खाऊ  घालणार आहोत'' अशी घोषणा करतो. आदर्श सहजीवन कसे असावे हे माझ्या मुलाला कळावे म्हणून, आई-बाबांनी ही पुरुषप्रधान संस्कृती थोडीतरी सोडावी म्हणून आणि पत्नीस माहेरपणाचा, विसाव्याचा अनुभव द्यावा म्हणून.

आपला अहंकार, न्यूनगंड, दीडशहाणेपण यावर नियंत्रण असेल, पत्नीबाबत आदर आणि तिच्या गुणांची कदर असेल, गुणग्राहकता, विवेक असेल, तर स्त्री-पुरुष समानतेसाठी आपणास जाणीवपूर्वक योजना आखाव्या लागत नाहीत. ते आपोआप घडते. कारण यात आपण जबाबदारी टाळत नाही, ढकलत नाही, तर उचलत असतो.

पती म्हणून खूप आदर्श, उच्च पातळीवर मी काम करतोय असे मुळीच नव्हे, तर मी माझ्या पत्नीस तिच्या पातळीवर जाऊन समजून घेतो. तिला मैत्रीण, आयुष्याची सहप्रवासी, सहधर्मचारिणी, माझ्यासम माणूस, माझा बेटर हाफ .... जो मला पूर्णत्व देतो, एवढेच मानतो. जे एवढेसे मुळीच नाही.


  7774864765