द्वितीय क्रमांकअपूर्वाई नवं शिकण्यातली...

 विवेक मराठी  09-Mar-2019

 उज्ज्वला करमळकर, कोल्हापूर

गेल्या काही वर्षांपासून छंद म्हणून लेखन सुरू झालं आणि अधूनमधून ते स्थानिक वर्तमानपत्रं, मासिकं, दिवाळी अंक अशा माध्यमांतून प्रसिध्दही होत गेलं. पण आकाशवाणीवर लेखन सादर करण्याची वेळ आली, तेव्हा मात्र प्रत्येक रेकॉर्डिंगनंतर 'आपलं सादरीकरण फारसं चागलं होत नाहीये' याची अस्वस्थता मनाला अनेक दिवस त्रास द्यायची. यासाठी कुणाचंतरी मार्गदर्शन घ्यावं असंही वाटतं होतं. पण पन्नाशीत हे सगळं कसं शक्य आहे? हा प्रश्न होताच.

अखेर दोन वर्षांपूर्वी मला अभिवाचनाच्या एका कार्यशाळेत सहभागी व्हायची संधी मिळाली. हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. वाचन आणि लेखन दोन्ही जिव्हाळयाचे विषय, त्यामुळे आपल्याला हे सहज जमेल असा ठाम विश्वास होता. पण 'जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे' याची प्रचिती आली. पाच दिवसांची कार्यशाळा संपत आली, तरी समाधानकारक असं काहीच घडलं नाही असं वाटत होतं. मनाला अनामिक हुरहुर जाणवत होती. कार्यशाळेतल्या

'हिरवे हिरवेगार गालिचे

हरित तृणांच्या मखमलीचे..'

या कवितेच्या ओळी मनात पुन्हा पुन्हा ऐकू येत होत्या. भाषेचं सौंदर्य, शब्दांची ताकद दडपण वाढवणारी होती. हा अनुभव सर्वस्वी नवा होता.

वाचन व्यक्तीचं आयुष्य समृध्द करतं याच संस्कारात मी मोठी झाले. लहानपणापासून अनेक प्रकारची पुस्तकं वाचली. चांगला वाचक असण्याचा अभिमानही बाळगला. विकत घेतलेल्या पुस्तकांची काळजी स्वतःच्या मुलांप्रमाणे घेतली. मग त्या दिवशी कार्यशाळेत 'हिरवे हिरवेगार गालिचे' ही कविता म्हणताना हे शब्द इतके परके कसे झाले? त्यातला हिरवेपणाचा आनंद कुठे हरवला? त्याचा मखमली स्पर्श डबक्यातल्या शेवाळासारखा मृत का झाला? मनातल्या अस्वस्थतेबरोबर आता प्रश्नांची पानगळही सुरू झाली होती. पुस्तकाविषयीचं माझं पालकत्व खरंच सुजाण होत का? माझं प्रेम शब्दांवर होतं, भाषेवर होतं, पुस्तकावर होतं, लेखकावर होतं की चांगली वाचक असणाच्या माझ्या अभिमानावर? मनातला गोंधळ वाढतच होता.

अभिवाचन

''शब्दाचा अर्थ समजणं म्हणजे कविता समजली असं नाही. शब्दबध्द झालेल्या एकात्म जाणिवेपर्यंत प्रवास घडणं म्हणजे कवितेचा अर्थ कळणं. काव्यात विचार, संवेदना, भावना सगळंच असतं.'' विंदा करंदीकरांची वाक्यं मला आठवू लागली. त्यांच्या शब्दांत मला जाणिवेचे नवे अर्थ दिसू लागले. ते माझ्या तथाकथित साहित्यप्रेमातला फोलपणा स्पष्ट करत होते.

वाचन आणि अभिवाचन! दोन्हीतली भिन्नता आता प्रकर्षाने जाणवू लागली. चांगला वाचक होणं जितकं सोपं, त्यापेक्षा चांगला अभिवाचक होणं कितीतरी अवघड. वाचकाला पुस्तक वाचताना, त्यावर चर्चा करताना माणूसपणाच्या कुठल्याच कसोटया पार कराव्या लागत नाहीत. वाचकाला आपली बंद मूठ झाकून ठेवता येते, पण अभिवाचकाला या बंद मुठीबरोबरच पंचेंद्रियांची कवाडंही उघडावी लागतात. पुस्तकातले निर्जीव शब्द आपल्या जाणिवेच्या, संवेदनशील मनःशक्तीच्या आधाराने सजीव करावे लागतात. भाषेतील लय, गती, नाद, विराम या अभ्यासाबरोबरच स्वतः माणूस होऊन समोरच्याच्या माणूसपणाला साद घालावी लागते. हा साहित्य प्रकार व्यक्ताकडून अव्यक्ताकडे जाणारा, अर्थनिर्णयनाचे अनेक पदर उलगडत पुढे नेणारा. प्रत्येक वेळी त्याच्या अंतरंगात एकाच मार्गाने पोहोचता येईल असंही नाही. प्रत्येक नवा शब्द नव्या मार्गाची मागणी करणाराही असेल... ही वाट अवघड, तितकीच आव्हानात्मक!


पुस्तकावर चांगल्या अक्षरात नाव, तारीख घालणं, ती फाटू नये म्हणून प्लास्टिक कव्हर घालणं आणि वाचल्यावर नीट कपाटात ठेवणं यातच माझं पुस्तकाविषयीचं सुजाण पालकत्व खर्ची झाल्याची जाणीव आज प्रथमच होत होती. त्या शब्दांशी मी कधी खेळले नाही, कधी मैत्री केली नाही. सामग्री म्हणून त्यांचा वापर केला, पण त्यातली शब्दकळा कधी अनुभवली नाही. मालकी हक्क गाजवला, पण स्वामिनी होता आलं नाही.

माझं पालकत्व सुजाण नव्हतं, काळाशी सुसंगत होतं. प्रतिष्ठेची अनेक अस्तरं पांघरून स्वतःतलं माणूसपण दडपून टाकणारं. माझी चूक मला कळली होती. आता नव्या जाणिवेच्या प्रकाशात, प्रतिष्ठेची सगळी अस्तरं झुगारून देऊन त्या शब्दांच्या हिरवेपणात रंगायला, त्यांचा मखमली स्पर्श अनुभवायला मी आतुर झाले होते.

8698758595