जमेची बाजू मोठी

 विवेक मराठी  12-Apr-2019

 वैशाखवणव्याआधी प्रचारवणव्याने या देशाला सध्या लपेटलं आहे. ते स्वाभाविकही आहे. 'जगातली सर्वात मोठी लोकशाही' अशी ओळख असणारा हा देश 17व्या लोकसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. 11 एप्रिल ते 19 मे या कालावधीत 7 टप्प्यांत होणारी ही निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडणं, हे एक मोठं आव्हान आहे. 1 कोटीहून अधिक मनुष्यशक्तीच्या बळावर निवडणूक आयोगाने ते पेललं आहे.


प्रचारसभांना जसा वेग आला आहे तसाच किंवा त्याहून अधिक वेग आला आहे तो निवडणूकपूर्व कल घोषित करण्याच्या उद्योगाला. यातले किती निष्कर्ष अभ्यासाधारित, विश्वासार्ह असतात हा एक संशोधनाचाच विषय आहे. मात्र कल सांगण्याच्या उद्योगाला गेल्या काही काळात चलती आलेली असल्याने, निवडणुकीच्या हंगामात ही दुकानं जोरात चालतात.  हे कल म्हणजे एक शक्यता आहे, ती अस्तित्वात येऊही शकत नाही हे लक्षातही न घेता अनेकांचं भान सुटलेलं असल्याने कल सांगण्याची एकच चढाओढ सुरू असते. अंतिम निकाल सांगत असल्याच्या आविर्भावात जेव्हा हे कल वृत्तवाहिन्यांवरून सांगितले जातात आणि त्यांना गांभीर्याने घेत, त्यावर विसंबून जेव्हा स्वयंघोषित राजकीय विश्लेषक चर्चा करतात, तेव्हा त्यामुळे प्रेक्षकांचे वाहिन्यांवरील मालिकांपेक्षाही अधिक मनोरंजन होते.

राष्ट्रीय म्हणवणाऱ्या काही पक्षांना त्यांच्या तडाखेबंद प्रचारासाठी बाहेरून कुमक मागवावी लागली आहे. ती कुमकही कशी, तर जिच्या कर्तृत्वापुढे एक भलंमोठं प्रश्नचिन्ह आहे अशी. ज्याने मोठा गाजावाजा करत एका राजकीय पक्षाची स्थापना केली आणि राजकारणात त्या पक्षाचं स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात पूर्णपणे अपयश आल्यानंतर, कसलाही विधिनिषेध न बाळगता अन्य राजकीय पक्षांच्या प्रचाराची धुरा स्वत:च्या पिचलेल्या खांद्यावर घेतली, अशा व्यक्तीवर विसंबून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या धुरीणांनी मोठाच जुगार खेळला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून प्रत्येक निवडणुकीत ज्याने अपयशाचं सातत्य राखलं, त्याच्या प्रचारसभा आपल्याला यश मिळवून देतील असा भ्रम निर्माण होणं हे या पक्षश्रेष्ठींचा धीर सुटल्याचंच लक्षण आहे. जर जनतेचा या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास असता, तर त्याचाच पक्ष आज शेवटच्या घटका मोजताना कसा दिसला असता, हा प्रश्न यांच्या मनात कसा डोकावला नाही?

संपूर्ण बहुमताच्या आधारावर सत्तेची सूत्रं हाती घेण्याची भाजपाची ही पहिलीच वेळ. अनेक वर्षांनी कोणाशीही जुलमाची सोयरीक करावी न लागता सरकार स्थापन झालं. निवडणुकीच्या आधी त्यांनी जाहीरनाम्यातून/संकल्पपत्रातून जी वचनं दिली होती, त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली आहे का, हे जनतेने जरूर तपासायला हवं. तो तिचा अधिकारच आहे. मात्र, या अवाढव्य देशाचा कारभार पूर्णपणे वचननाम्याच्या आधारे लगोलग चालू होणं आणि पहिल्या पाच वर्षांतच दृश्य स्वरूपात त्याची मधुर फळं दिसतील अशी आशा बाळगणं हे भाबडेपणाचं किंवा दांभिकपणाचं लक्षण आहे. या दोन्ही बाबी भाजपाविरोधी पक्षांच्या प्रचारात ठळकपणे दिसताहेत.

मात्र जनतेचा परीक्षणाचा चश्मा त्या पलीकडचा असतो. बरेचदा तो अदृश्य असतो. मूल्यमापन करताना, सरकारच्या कामाच्या दृश्य परिणामांबरोबरच ठळकपणे न दिसणाऱ्या पण जाणवणाऱ्या परिणामांनाही जनता महत्त्व देत असते. दहा वर्षांच्या भोंगळ कारभाराने देशाची लागलेली वाट, गेलेली पत या पार्श्वभूमीवर सत्तेचं सुकाणू भाजपाच्या हाती देणारी इथली जनता आहे. ती भाबडी नाही. राजकीय पक्षांना जोखायचे तिचे मापदंड आहेत, निकष आहेत. 5 वर्षांत जादूची कांडी फिरल्यागत सगळं काही बदलेल ही तिची अपेक्षाच नाही. आणि बदलाच्या दिशेने सुरुवात होण्यासाठी नागरिकांनीही त्याच दिशेने पावलं टाकायला हवीत याचं भान इथल्या बहुसंख्यांना आलेलं आहे. त्यामुळेच विद्यमान भाजपा सरकारने मूलभूत बदलासाठी जी कठोर पावलं उचलली, त्याला इथल्या सुबुध्द नागरिकांनी झळा सोसूनही पाठिंबा दिला. विकासकामं काही एका रात्रीत घडत नाहीत. ती प्रत्यक्षात येण्याच्या प्रक्रियेत सर्वांना त्रास सोसावा लागतो, अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. ते सोसण्याचं शहाणपण इथल्या जनतेने गेल्या 5 वर्षांत दाखवलं, म्हणूनच विकासकामं गतिमान झाली. आर्थिक उतरंडीवर जे सगळयात शेवटच्या पायरीवर उभे आहेत, अशांसाठी मूलभूत कामं सुरू करण्यावर विद्यमान सरकारने भर दिला. ही कामं दीर्घकाळ चालणार याची कल्पना असूनही त्यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक केली. 'सब का साथ, सब का विकास' हा इथल्या जगण्याचा मंत्र व्हायला हवा, हे मनोमन पटल्यानेच सांपत्तिक स्थिती उत्तम असलेल्या या देशातल्या अनेकांनी वंचितांसाठी गॅस सबसिडीवर पाणी सोडलं. त्यामुळे अनेक माताभगिनींचे स्वयंपाकातले कष्ट वाचले. या मूलभूत कामांच्या बरोबरीनेच झालेली उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, आपल्या देशाचा जागृत केलेला स्वाभिमान आणि यशस्वीरीत्या राबवण्यात आलेल्या परराष्ट्रीय ध्येयधोरणांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेली प्रतिमा. यातूनच या विकसनशील देशाचा प्रवास विकसित, कणखर देश होण्याच्या दिशेने वेगाने चालू आहे याची जगाला जाणीव झाली.

एकाच वेळी अनेक बाजूंनी चालू असलेल्या या बदलांचा एकत्रित परिणाम दिसायला थोडा काळ जावा लागेल. तो जाऊ द्यायला हवा. ही सर्व कामं त्या दिशेने, नियोजित गतीने चालू ठेवणं ही आज आपल्या देशाची गरज असेल, तर विद्यमान सरकारला एक संधी देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांच्या खात्यात सर्वकाही जमेच्या बाजूलाच आहे असा आमचा अजिबात दावा नाही, पण जमेची बाजू खर्चाच्या बाजूपेक्षा नक्की मोठी आहे. त्याचा विचार व्हायला हवा. केवळ अन्य पर्याय नाही अशा नकारात्मक भावनेच्या आधारे मतदान होऊ नये, तर मताचं पारडं त्यांच्या बाजूला झुकण्याएवढं खरंच घडलं आहे, त्या विश्वासातून मतदान व्हावं.