गृहसुरक्षेचं आधुनिकीकरण

 विवेक मराठी  02-Apr-2019

घरातील सुरक्षा यंत्रणा अधिक महत्त्वाची भूमिका बजावत असते. आधुनिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याअगोदर त्याच्या तांत्रिक बाबी घरातील प्रत्येकाने अभ्यासपूर्वक समजून घेणं जरुरीचं असतं. तंत्रज्ञान, संगणकीकरण आणि आधुनिकीकरण ह्यामुळे वेगळया रिमोटचीदेखील हल्ली गरज भासत नाही. आपण वापरत असलेल्या    स्मार्ट फोनच्या / मोबाइलच्या उपयोगातून अनेक उपकरणं आपण हाताळू शकतो. घरात असताना आणि घराबाहेर पडल्यावर त्याचा वापर करून आपण योग्य ती खबरदारी घेऊ  शकतो. याची माहिती यालेखात देण्यात आली आहे.

आपल्या लहानपणापासूनच 'घर' या विषयीची अनेक गाणी, गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. मग तो चॉकलेटचा सोनेरी चमचमता बंगला असेल किंवा चिऊताईच्या घराची गोष्ट असेल. अगदी लहानपणापासूनच आपल्या मनात घर करून राहिलेल्या 'घर'  या संज्ञेशी आपलं एक प्रकारे निराळंच नातं निर्माण झालेलं असतं. सतत कानावर पडणाऱ्या 'घर' या शब्दाचं एक प्रचंड आकर्षण लहानपणापासून आपल्याला वाटत असतं. घरातलं मन आणि मनातलं घर यांचं नातं अगदी दूध-पाण्यासारखं असतं. सहजासहजी ते वेगळं करता येत नाही. 'घर' या संज्ञेनेएक प्रकारे आपल्या मनातच घर करून ठेवलेलं असतं.

केवळ शरीरासाठी मूलभूत गरज भागवणं अशी आपल्याला घराची आवश्यकता नसून त्याची खरी गरज मनासाठी अधिक असते. आपल्या शरीरासाठी तो केवळ निवारा असतो, तर मनासाठी मात्र खूप काही असतं. आपल्या घरात आपण अनुभवलेला प्रत्येक क्षण आपल्यासाठी विलक्षण असतो. आपण जे काही अनुभवत असतो त्यांचा आपल्या मानसिकतेवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष परिणाम नेहमी होत असतो. आपण आणि आपलं अंतर्मनदेखील याचा प्रत्यय घेत असतं. शरीराने आपण जेव्हा घरापासून दूर असतो, तेव्हा अनेकदा मनाने मात्र घरात असतो, मनाने घरापासून दूर गेलेलो नसतो. हे आपल्या मनाचं आपल्या घराशी असलेलं अतूट नातं आपल्याला गृहसजावटीच्या कामात समजून घेणं म्हणूनच आवश्यक असतं. ह्या मनातील घराला आणि घरातील मनाला सुरक्षितता देणं निश्चितच महत्त्वाचं ठरतं. केवळ सुरक्षिततेमुळेच आपल्या मनाला आश्वस्त वाटेल अशी सुरक्षितता आणि यंत्रणा कार्यान्वित केलेली असणं सद्य:स्थितीत अधिकच आवश्यक आहे.

सुरक्षा रक्षक

हल्लीच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात आपली आणि आपल्या घराची, मालमत्तेची काळजी घेणारी, सुरक्षितता देऊ  करणारी सुरक्षा रक्षकाची नेमणूक पुरेशी ठरत नाही. सुरक्षा रक्षकाच्या नजरचुकीमुळे आणि काही वेळा अनवधानाने, अज्ञानामुळे काही अप्रिय घटना घडण्याची, नुकसान होण्याची शक्यता असते. काहीही झालं तरीही सुरक्षा रक्षक हादेखील माणूसच आहे, चूक त्याच्याकडूनदेखील होऊ शकते, अथवा ती यंत्रणा पुरेशी ठरू शकत नाही. काही वेळा लहान गृहरचनांसाठी ती खर्चीक होऊ शकते. सुरक्षा रक्षकाचा पगार, इतर खर्च ह्या सर्वच बाबींचा विचार केला तर कदाचित ही यंत्रणा आवाक्याबाहेर जाऊ शकते. काही वेळा  मनुष्यबळाची कमतरता आपल्या गृहसुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुर्लक्षित करून चालत नाही.

सुरक्षा यंत्रणेचं आधुनिकीकरण

हल्ली बाजारात निरनिराळया सुरक्षा यंत्रणेचे आधुनिक प्रकार उपलब्ध आहेत. डोअर कॅमेरा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, ऍक्सेस कंट्रोल लॉक, बायोमेट्रिक लॉक, इंटरकॉम, टेलिकम्युनिकेशन सिस्टिम, डिजिटल लॉक्स, नंबरिंग लॉक्स, रिमोट कंट्रोल लॉक्स, डोअर कॅमेरा विथ फोन, रिमोट ऍक्सेस कॅमेरा, कॉम्प्युटराइज्ड मेसेज सिस्टिम, मेसेज ऍलर्ट सिस्टम, सिक्युरिटी सायरन, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म सिस्टिम अशा विविध प्रकारांतून आपल्या घराला साजेशी, आपल्याला आर्थिकदृष्टया परवडतील अशा सर्वाधिक सुरक्षा योजना आपण कार्यान्वित करून घ्याव्यात. धावपळीत अनेकदा घरातले दिवे, पंखे, ए.सी., पाणी गरम करणारा गीझर, मायक्रोवेव्ह, टी.व्ही. इत्यादी बंद करायचे राहून जातात. कामासाठी घराबाहेर पडण्याची घाई असते. अशातच काही वेळा घरातील वीज गेलेली असते, तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही की आपण घरात असताना वापरत असलेली विजेवरील उपकरणं सुरूच राहतात आणि पुन्हा वीज आल्यावर चालू होतात. अशा वेळी विजेचा अनावश्यक वापर होत राहतो आणि काही वेळा आणीबाणी निर्माण होऊ शकते, काही विपरीत घडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.  

संकुलातील अंतर्गत सुरक्षा यंत्रणा

संकुलातील अंतर्गत सुरक्षा यंत्रणेची निवड आणि त्यानंतर ती कार्यान्वित करत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. ह्या यंत्रणांची निवड करताना निश्चितच संबंधित निर्मात्या कंपनीचा तज्ज्ञ, कुशल, अनुभवी, निष्णात इंजीनिअर यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी संकुलात येणं आवश्यक असतं. उपस्थित पदाधिकारी आणि संकुलातील निवडक रहिवासी ह्यांनी त्या यंत्रणेची जरुरी, उपयुक्तता, कार्यान्वित केल्यानंतरही करावा लागणारा वापर आणि देखभाल, इतर संबंधित बाबी अभ्यासपूर्वक समजून घेऊन, इंजीनिअरकरवी शंकांचं निरसन करून घेणं आवश्यक असतं. अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा केवळ सुरक्षा रक्षकांच्या भरवशावर टाकून चालत नाही. त्यातील तांत्रिक भाग आणि देखभालीच्या महत्त्वाच्या बाबी संकुलातील सुज्ञ व्यक्तींनी समजून घेणं जरुरीचं असतं. 

घरातील सुरक्षा यंत्रणा

घरातील सुरक्षा यंत्रणा अधिक महत्त्वाची भूमिका बजावत असते. आधुनिक सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याअगोदर त्याच्या तांत्रिक बाबी घरातील प्रत्येकाने अभ्यासपूर्वक समजून घेणं जरुरीचं असतं. तंत्रज्ञान, संगणकीकरण आणि आधुनिकीकरण ह्यामुळे वेगळया रिमोटचीदेखील हल्ली गरज भासत नाही. आपण वापरत असलेल्या    स्मार्ट फोनच्या / मोबाइलच्या उपयोगातून अनेक उपकरणं आपण हाताळू शकतो. घरात असताना    आणि घराबाहेर पडल्यावर त्याचा वापर करून आपण योग्य ती खबरदारी घेऊ  शकतो. घरातील प्रत्येक सदस्याच्या स्मार्ट फोनवरून विजेच्या अनेक  उपकरणांचं नियंत्रण करणं शक्य होतं. घराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अत्यंत जरुरीचं असतं, उपयोगाचं ठरतं.     

महत्त्वाचे दस्तऐवज, मालमत्ता आणि सुरक्षा यंत्रणा

जाहिरातीच्या माध्यमातून आपल्याला अनेक खाजगी संस्थांच्या, उत्पादकांच्या निरनिराळया सुरक्षा यंत्रणांची माहिती होत असतेच, परंतु त्याचा वापर मात्र म्हणावा तसा करायला तयार होत नाहीत. कदाचित त्याचं महत्त्व आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गांभीर्य आपल्या लक्षात येत नाही. हल्लीच्या दिवसांमध्ये खाजगी सुरक्षा रक्षक नेमताना ह्या सर्वच बाबी विचारात घेणं आवश्यक आहे. आपल्या मालमत्तेचं, घरात खर्चासाठी अथवा आणीबाणीच्या काळांत आवश्यक असणाऱ्या रोख रकमेचं, दागदागिन्यांचं, सोन्या-चांदीच्या वस्तूंचं सुरक्षिततेच्या कारणास्तव व्यवस्थापन करणं क्रमप्राप्त असतं. ह्यासाठी अग्निरोधक (फायर प्रूफ) आणि ऍसिड प्रूफ तिजोरी, एफ.आर.एफ.सी. (फायर रेझिस्टंट फायलिंग कॅबिनेट) अशा स्वरूपातील, तसंच केवळ घरातील प्रमुख व्यक्तीच्या अंगठयाच्या ठशाने कुलूप उघडणाऱ्या विशिष्ट स्वरूपातील तिजोरीची      व्यवस्था करता येऊ शकते. त्यालाच अलार्म सिस्टिमदेखील जोडली जाऊ शकते, जेणेकरून कोणीही ती तिजोरी उघण्याचा प्रयत्न केला तर अलार्म वाजून आपल्याला आपल्या मोबाइलवर त्याची सूचना मिळू शकेल आणि अर्थातच पुढील धोका टळेल.

प्रा. शैलेश कुलकर्णी

(ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि व्याख्याता.)

[email protected]

7709612655