दरवाजांची आणि खिडक्यांची सुरक्षा

 विवेक मराठी  02-Apr-2019

घरातील चार भिंती सोडून मोकळा भाग असलेली जागा म्हणजे दारं आणि खिडक्या. यांचा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य बंदोबस्त केला तर आपण निश्चिंत राहू शकतो. दाराच्या बाहेरील बाजूस सुरक्षिततेसाठी  सेफ्टी डोअरची सोय केली जाते.

गृहसजावट करताना आपल्याला सर्वात प्रथम सुरुवात करावी लागते ती घराच्या मुख्य प्रवेशाच्या दरवाजापासून. घरात प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणजे त्या घराचं प्रवेशद्वार. आपल्या गृहप्रवेशाच्या वेळी, तसंच आपल्याकडे येणाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी हे प्रवेशद्वार केवळ सज्जच नाही, तर सजलेलं असलं पाहिजे. आपल्यापैकी अनेकांसाठी गृहप्रवेश आपल्या घराशी असलेल्या भावनिक नात्याशी संबंधित असतो. गृहप्रवेशाच्या बाबतीत अनेकांच्या निरनिराळया संकल्पना असतात. स्वत:च्या घरातला पहिला प्रवेश नेहमीच अविस्मरणीय असतो. तो सुरक्षितता ह्या दृष्टीकोनातूनदेखील अत्यंत महत्त्वाचा असतो.

मुख्य प्रवेशद्वारामुळे आणि त्याच्या संरचनात्मक सजावटीमुळे त्या घरात राहणाऱ्यांची संस्कृती, सौंदर्यदृष्टी, सर्जकता, सुरक्षितता, सामाजिक स्थान, आर्थिक कुवत, शैक्षणिक पात्रता अशा अनेक बाबींची कल्पना येत असते. आपल्या घराची सुरुवातच दरवाजाच्या संरचनेपासून होत असते. आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाच्या प्रथम भेटीतच आपल्याकडे आणि आपल्या घराकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन कसा असेल हे सर्वस्वी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अवलंबून असतं. ह्या कारणामुळे एकूणच आपल्या घर सजवण्याच्या सर्व कामांमध्ये अत्यंतिक महत्त्वाचं काम म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराची संरचनेच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सजावट करणं.

गृहसजावटीत प्रथम स्थान प्रवेशद्वाराचं

आपल्या दैनंदिन जीवनात आपण दिवसभरात अनेक वेळा आणि निरनिराळया कारणांनी प्रामुख्याने प्रवेशद्वाराचा वापर करत असतो. त्या घरात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला घराचा मुख्य दरवाजा वापरावाच लागतो. त्यामुळेच गृहसजावट करताना प्रवेशद्वाराचं स्थान मोलाचं आणि म्हणूनच मानाचं असतं. प्रवेशद्वार खरं तर त्या घराची एक प्रकारे ओळखच असते. शास्त्रीय दृष्टीकोनातून प्रवेशद्वाराची सजावट करण्याचं नेमकं महत्त्व काय, याचा अभ्यासपूर्वक विचार करणं जरुरीचं आहे. अपार्टमेंटमध्ये असलेल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार सर्वसाधारणपणे एकेरीच असतं. अशा दाराच्या बाहेरील बाजूस सुरक्षिततेसाठी आणखी एका सेफ्टी डोअरची सोय केली जाते. ते बनवण्यासाठी शक्यतो लोखंडाचा वापर करणं अधिक सयुक्तिक ठरतं. 

प्रवेशद्वाराची जागा आणि ठिकाण

आपल्या घराचं प्रवेशद्वार कशा प्रकारे सजवावं आणि अधिक सुरक्षित करावं, यासाठी सर्वसाधारणपणे आपल्या घराची जागा, ठिकाण, मुख्य प्रवेशद्वाराची जागा, त्या सभोवतालची जागा, घराची उंची, एकूणच आकारमान, घराची जमिनीपासूनची उंची, घराच्या बांधकामाचं स्वरूप, आजूबाजूचा परिसर अशा अनेक बाबींचा अभ्यासपूर्वक विचार होणं गरजेचं असतं. याशिवाय आपल्या स्वत:च्या, तसंच आपल्या कुटुंबीयांच्या लौकिक, अलौकिक गुणांचा आणि व्यक्तिगत तसंच मालमत्तेच्या सुरक्षिततेचादेखील विचार होणं आवश्यक असतं. आपला व्यवसाय तसंच शिक्षण हेदेखील आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या संरचनेवरून आणि सुरक्षिततेवरून नव्याने आपल्या घरी येणाऱ्यांना समजू शकलं पाहिजे.

स्थापत्यशास्त्र आणि अंतर्गत सजावट

आजही वाडा संस्कृतीच्या माध्यमातून साकारलेल्या घरांची प्रवेशदारं निरनिराळया प्रकारे सजवलेली पाहायला मिळतात. या घरांच्या मुख्य दाराची सजावट करताना प्रामुख्याने सभोवतालच्या भिंतींवरही सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून विविध प्रकारे त्या घराचं आणि दाराचं महत्त्व पटवून देण्याचाच एक प्रकारे प्रयत्न केलेला असल्याचं दिसून येतं. अशा घराच्या दाराबाहेरील ओसरीदेखील विशिष्ट प्रकारे सजवली जात असल्याचं दिसतं. घराचा उंबरठा, दाराची चौकट आणि मुख्य दार या सर्वच भागांचा सजावट करताना व्यक्तिगत तसंच मालमत्तेच्या सुरक्षेचा विचार केला जात असल्याचं आपल्या लक्षात येतं. आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करण्यासाठी असं सजवलेलं दार सज्ज असल्याची संकल्पना त्यामागे असल्याचं समजलं जातं. प्रामुख्याने लाकडाचा वापर करून आणि त्यावर कोरीवकाम, नक्षीकाम करून या दारांची सजावट केली जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. ही सजावट करत असताना काही वेळा पितळी वस्तूंचा वापर अधिक प्रमाणात केल्याचंही दिसून येतं. वाडा संकृतीच्या घरांना किमान मुख्य दोन दारं असतातच, परंतु तरीही कायम मुख्य प्रवेशद्वाराच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिलं जात असल्याचंही आपल्या लक्षात येतं.

प्रवेशद्वार म्हणजे त्या घराचा आरसा

हल्लीच्या घरांमध्ये आपल्याला नावीन्यपूर्ण प्रवेशद्वारांचा वापर केल्याचं दिसतं. फरक एवढाच की त्यांचं संरचनेचं स्वरूप बदललं आहे, त्यांच्या सजावटीच्या संकल्पना बदलल्या आहेत, आणि अर्थातच त्यांचे आकार तसंच आकारमानदेखील निराळं झालं आहे. त्यांच्या जागा वेगवेगळया असल्याचं आपल्याला दिसून येतं. अपार्टमेंटमधलं घर आणि बंगला यांच्या एकूणच संरचनेत खूप फरक असतो. त्या अनुषंगाने प्रवेशद्वार म्हणजे त्या घराचा आरसाच असल्यासारखं असतं.

खिडक्यांच्या संरचना आणि त्या घरातलं कुटुंब

प्रवेशद्वार आणि घराची इतर दारं जशी महत्त्वाची असतात, तशाच सुरक्षेसाठी खिडक्यादेखील अत्यंत महत्त्वाच्या असतात. खिडकीतून निर्सगाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद अनुभवताना घराची सुरक्षा विसरून चालणार नाही. खिडक्यांच्या बाहेरील बाजूस लोखंडी ग्रिल्स बसवलेली असणं आवश्यक असतं. खिडक्यांचे आकार, आकारमान, उंची ह्या सर्वच बाबींचा विचार होणं जरुरीचं असतं.

प्रवेशद्वाराची आणि खिडक्यांची संरचना

बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी आणि खिडक्यांसाठी सजावट करण्याच्या दृष्टीकोनातून बरंच काही करण्यासारखं असतं. मुख्य म्हणजे त्यांचे आकार आणि आकारमान दोन्हीही अपार्टमेंटमधल्या घराच्या तुलनेने मोठं असतं. त्यामुळे अशा ठिकाणी दोन दारांचं प्रवेशद्वार बनवता येऊ शकतं, मोठया आणि उंच खिडक्या बनवणं शक्य होतं. गरजेनुसार दाराचा आणि खिडकीचा आकार ठेवून उर्वरित भागात काचेचं पार्टिशन अथवा ग्लास वॉल बनवून घेता येऊ शकते. या काचेच्या पार्टिशनऐवजी आपण ग्लास ब्रिक्सदेखील वापरू शकतो. त्यामुळे एकतर नैसर्गिक प्रकाश तर उपलब्ध होतोच, शिवाय आपल्याला घराच्या आतून घराच्या बाहेरील सर्व काही व्यवस्थित दिसू शकतं. आपल्याकडे येणारी व्यक्ती कोण आहे हे आपल्याला नीट समजू शकतं. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे नेहमीच आवश्यक असतं.

विविध प्रकारचा माल वापरून बनवलेले दरवाजे-खिडक्या

दारं आणि खिडक्या - मग ते कोणत्याही घराच्या असो, ते बनवण्यासाठी प्रामुख्याने लाकडाचा अधिक उपयोग केला जातो. त्याबरोबर धातू, काच, स्टील, जी.आय., रॉट आयर्न अशा अनेक वस्तूंचा वापर केला जाऊ शकतो. प्रत्येक दारासाठी आणि खिडक्यांसाठी एक चौकट बनवून घ्यावीच लागते. या चौकटीच्या आकारावरून आणि ती बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तूंवरून त्या दरवाजा-खिडकीची मजबुती ठरत असते. हल्ली चौकट बनवण्यासाठी लाकडाचा वापर कमी करून त्याऐवजी लोखंडाची चौकट बनवण्याची पध्दत प्रचलित झाल्याचं दिसून येतं. चौकट कोणत्याही वस्तूपासून बनवली गेली, तरीही ती नेहमीच भिंतीमध्ये काही प्रमाणात गुंतवली जाते. त्यामुळे चौकटीला आणि दरवाजालाही मजबुती येऊ शकते.

प्रा. शैलेश कुलकर्णी

(ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि व्याख्याता.)

[email protected]