अविरत श्रमणे संघजिणे

 विवेक मराठी  11-May-2019

 शुक्रवार, दि. 3 मे रोजी ओडिशा राज्याला फॅनी चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला. चक्रीवादळामुळे या राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक गरजांपासून आज ओडिशाची जनता वंचित आहे. पीडित जनतेसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या वादळग्रस्तांसाठी तातडीने मदतकार्य सुरू केले असून अनेक स्वयंसेवकांनी मदतकार्यामध्ये स्वत:स झोकून दिले आहे.

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून राज्याराज्यांत विविध टप्प्यांमध्ये मतदान पार पडत आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या चढाओढीने देशातील वातावरण पुरते ढवळून निघाले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीने वेधून घेतलेले असताना निसर्गाने पुन्हा आपण सर्वश्रेष्ठ असल्याचे चक्रीवादळाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर दि. 3 मे 2019 रोजी ॅफनी चक्रीवादळ येऊन आदळले आणि ओडिशा, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या परिसराला त्याचा जोरदार फटका बसला.

जगन्नाथपुरी हे भारतातील चार धामांमधील एक देवस्थान. दि. 3 मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास फॅनी वादळ  जगन्नाथपुरीच्या किनाऱ्यावर येऊन धडकले. वास्तविक, हवामान खात्याच्या माध्यमातून फॅनीची पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यामुळे जवळपास बारा लाख लोकांचे स्थलांतर तत्पूर्वीच करण्यात आले होते. पुरीच्या किनाऱ्यावर धडकल्यानंतर पुढे जवळपास तीन ते चार तास सुरू असलेल्या फॅनीच्या तांडवामुळे भुवनेश्वर, कटक अशा शहरांसह पुरी, खोरधा, केंद्रापडा, जगतसिंहपूर, जाजपूर आदी जिल्ह्यांमध्ये कित्येक वर्षे जुने वृक्ष उन्मळून पडले. वीजेचे खांब जमिनीवर आडवे झाले, तारा विखुरल्या, घरांचे छप्पर, दरवाजे, खिडक्यांच्या काचा हे सारे पाचोळयाप्रमाणे उडून गेले. रेल्वे प्लॅटफॉर्मचे छत वा विमानतळाचे छत यांचीही याहून वेगळी अवस्था नव्हती. ओडिशातील अनेक रेल्वे स्थानकांवर पाणी भरले. आज फॅनीच्या प्रभावामुळे ओडिशातील सुमारे तीस लोकांनी आपले प्राण गमावले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. फॅनी या शब्दाचा खरा अर्थ आहे कोब्रा. या चक्रीवादळाचे रौद्र रूप पाहिले, तर त्याला ॅफनी हे नाव किती समर्पक आहे हे आपल्या लक्षात येते, असो.

संघाचे सेवा क्षेत्र हा एक अभ्यासाचा विषय आहे. आज संघाची एक लाखाहून अधिक सेवा कार्ये देशभरात सुरू असून असंख्य लोक त्याचा लाभ घेत आहेत. देशात कुठेही जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा मदत करणाऱ्यांच्या पहिल्या फळीत संघाचे स्वयंसेवक नेहमीच दिसून येतात. गेल्या वर्षी केरळमध्ये आलेला पूर, तत्पूर्वी उत्तराखंडमध्ये आणि जम्मू-काश्मीरमध्ये आलेला पूर या वेळी संघाचे स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने व तत्परतेने विविध स्वरूपाची मदत करत होते. स्वत: पूरग्रस्त असूनही अन्य नागरिकांच्या मदतीला धावून गेल्याच्या घटना केरळमध्ये दिसून आल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या फॅनी या भीषण चक्रीवादळाची ओडिशातील लाखो लोकांना झळ पोहोचली असून त्यामध्ये सुमारे 30 जण मृत्युमुखी पडले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक सुविधांपासून तेथील असंख्य नागरिक वंचित आहेत. या वादळग्रस्तांसाठी देशभरातून आर्थिक तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा ओघ सुरू झाला आहे. 'उत्कल बिपन्न साहाय्यता समिती' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'सेवाभारती' विभागाशी जोडलेल्या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथपुरी, खोरधा आणि कटक या वादळाची सर्वात जास्त झळ पोहोचलेल्या क्षेत्रांसह अन्य क्षेत्रांतही स्वयंसेवकांनी मदतकार्य सुरू केले आहे.


संघाचे स्वयंसेवक उत्कल बिपन्न साहाय्यता केंद्राच्या माध्यमातून मदतकार्य करत आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीने, पहिल्या टप्प्यात घोडाबाजार शिशू मंदिर (जगन्नाथपुरी), घोडाबाजार बाल शिशू मंदिर (ब्रह्मगिरी), दंडमुलुकुंदपूर, चंदापूर, निमपाडा व सरस्वती शिशू मंदिर (भुवनेश्वर) अशी सात युनिट्स संस्थेच्या माध्यमातून स्थापन करण्यात आली असून या केंद्रांच्या माध्यमातून मदत पुरवली जात आहे. त्यानंतर कटक आणि जगतसिंहपूर येथेही ही केंद्रे सुरू करण्यात आली असून सर्व केंद्रांच्या माध्यमातून बिस्किटे तसेच सुक्या खाऊची पाकिटे, मेणबत्त्या, प्लास्टिकचे कापड, काडेपेटी अशा वस्तूंचा पुरवठा पूरग्रस्तांना केला जात असून सुमारे पेयजलाच्या दहा लाखांपेक्षा अधिक बाटल्यांचेही वितरण आजपर्यंत करण्यात आले आहे. यात पुढेही संख्यात्मक वाढ होत राहील.

संघस्वयंसेवकांनी चक्रीवादळानंतर तिसऱ्या दिवसापासून, दि. 5 मेपासून, शिजवलेल्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वितरण करण्यास सुरुवात केली असून जगन्नाथपुरी येथील युनिटमधून पहिल्या दिवशी 1000, दि. 6 मे रोजी 1200 व दि. 7 मे रोजी 1500 जणांना अन्नाचे वाटप करण्यात आले. अन्य युनिटमधून कमीअधिक प्रमाणात असेच वाटप करण्यात येत आहे. अन्न शिजवणे, त्याचे पॅकिंग व वितरण या सर्वच कामांत संघाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला असून अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते या सगळयात जातीने लक्ष घालत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह भागय्या यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उत्कल बिपन्न साहाय्यता केंद्राच्या या अन्ननिर्मिती व वितरण विभागाचे अवलोकन केले. जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासह संस्थेच्या माध्यमातून अन्य स्वरूपाचे बचावकार्यही करण्यात आले. लहान मुलांना-वृध्दांना स्थलांतरासाठी मदत, तसेच पूरस्थितीत अडकलेल्यांची सुटका केली जात आहे. परिसराची स्वच्छता करण्याचेही काम स्वयंसेवक निष्ठेने करत आहेत.

संघस्वयंसेवकांच्या माध्यमातून मदतकार्य केले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेल्या सर्व पूरपरिस्थिती असो, भूजचा-किल्लारीचा भूकंप असो - जेव्हा जेव्हा अशा नैसर्गिक आपत्ती ओढवतात, तेव्हा तेव्हा संपूर्ण समाज ही आपली जबाबदारी समजून संघस्वयंसेवक मदतीसाठी पुढे येतात. प्रसंगी स्वत:चे घर, आपले जवळचे नातेवाईक हेही त्याच आपत्तीत सापडले असतील, तरीही भावना दूर ठेवून 'इदं न मम राष्ट्राय स्वाहा' हा मंत्र आपल्या मनात, कृतीत जपण्याचा प्रयत्न प्रत्येक स्वयंसेवक करीत असतो. हेच त्याच्या जीवनाचे मर्म असते.

 

ओडिशातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

उत्कल बिपन्न साहाय्यता समिती (UBSS, नोंदणी क्र. 18869/9) ही स्वयंसेवी संस्था ओडिशातील प्रभावित क्षेत्रांत मदतकार्य करीत आहे. ही संस्था रा.स्व. संघाच्या सेवा क्षेत्राशी निगडित असणाऱ्या 'सेवाभारती' या विभागाच्या दिल्ली केंद्राशी जोडलेली आहे. उत्कल बिपन्न साहायता समितीच्या वतीने आर्थिक मदतीसाठी देशभरात आवाहन करण्यात आले आहे. आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तीला 80-जी अंतर्गत करसवलत प्राप्त होईल.

 

 मदतीसाठी बँकेचा तपशील

 देशांतर्गत अर्थसाहाय्यासाठी :

Account No : 024010100043982

Axis Bank, MANCHESWAR, BHUBANESWAR

IFSC Code : UTIB0001973, MICR Code : 751211012

 

परदेशातून येणाऱ्या अर्थसाहाय्यासाठी :

Account No : 024010100043991

AXIS BANK, SATYA NAGAR, BHUBANESWAR

IFSC Code : UTIB0000024

MICR Code : 751211002, SWIFT Code : AXISINBB024

FCRA Registration No.104860094