ग्रामज्ञानपीठ - जगणं शिकण्यासाठी

 विवेक मराठी  13-May-2019

***कपिल सहस्रबुध्दे***

आपल्या देशात नैसर्गिक स्त्रोत मोठया प्रमाणात आहेत. या स्त्रोतांच्या आधारे नवीन क्षेत्र शोधून सामाजिक अर्थव्यवस्था स्थापन करता येते. त्यासाठी ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची योग्य जोड दिल्यास बऱ्याच सुधारणा होउ शकतात. याच दृष्टिकोनातून मेळघाट सारख्या जनजाती भागात 'ग्रामज्ञानपीठा'चे रचनतात्मक काम उभे राहिले आहे.  त्यासंबंधी आढावा घेणारा लेख.

''कोणतीही गोष्ट किती वापरायची हे ठरवत जीवन जगायचं, हे जनजाती (वनवासी) लोकांचं एक वैशिष्टय आहे. आपल्या आजूबाजूला निसर्गावर पूर्णपणे अवलंबून राहताना त्याला 'जपणं' हाच 'धर्म' स्वत: पाळण्याचा ते प्रयत्न करतात.'' संपूर्ण बांबू केंद्राचे सुनीलजी देशपांडे सांगत होते. बरेच दिवसांनी त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. त्यांचे अनुभव आणि त्यातून जनजाती समाजाची जीवन शैली समजून घेणे हा स्वत:लाच समृध्द बनवणारा अनुभव असतो.

जनजातींचा जीवनव्यवहार

''उत्तर भारतात गावाला 'देहात' म्हटलं जातं. 'देहात' म्हणजे देहाच्या आत. जसं आपल्या शरीरात विविध अवयव असतात, त्याचं विशिष्ट काम असतं, तसं गावाचं असतं. इथे प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे, त्यासाठी कोणतं नैसर्गिक संसाधन वापरायचं, किती, कधी, कसं, कुणी वापरायचं हेही ठरलेलं असतं. सेवा देऊन धान्य घेणं ही पध्दत अनेक शतकं वापरली गेली. खरं तर ही ग्रामीण भागासाठीची सुयोग्य पध्दत. सेवा तिथे, धान्य तिथलंच. काही बाहेर जाणार नाही. पण याला 'बार्टर' ठरवून बाद केलं गेलं. पण ही खूप विचारपूर्वक बनवलेली व्यवस्था होती,'' सुनीलजी पुढे सांगत होते. वस्तूंचा उपयोग हा जसा कामासाठी होतो, तसाच तो जीवन जगण्याच्या छोटया छोटया गोष्टी शिकवत असतो. घरच्या शेतीतून, उद्योगातून शिकत जायचं हीच शिक्षणाची पध्दत होती. हे सगळं 'घडत' असे, शाळेत बसून शिकवलं जायचं नाही. बाकी गाव सोडून गुरुकुलात जाऊन शिकण्याच्या गोष्टी तत्त्वज्ञानाच्या होत्या किंवा काही विशेष शिक्षणासाठीच जात असायचं.

ग्रामज्ञानपीठाची निर्मिती

गेली 23 वर्षं सुनीलजी संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून मेळघाट व अन्य जनजाती भागांमध्ये कोरकू आणि इतर स्थानिक समुदायांबरोबर काम करत आहेत. त्यामुळे स्थानिक जीवन पध्दती त्यांना जवळून बघायला मिळाली. जगण्याच्या कलेचं सोदाहरण दर्शन अनेक अनुभवांतून होत होतं.

बांबू या एका स्रोताच्या कामातून लोक कसे आजूबाजूच्या निसर्गाला आपल्या जीवनपध्दतीचा भाग बनवतात, याचा अभ्यास झाला होता. रवींद्र शर्मा गुरुजींच्या विचारातून भारतीय समाजव्यवस्थेसंबंधी एक दृष्टी मिळाली होती.  शाश्वत विकासाच्या आजच्या एकूण चर्चेसंदर्भातल्या अनुभवांच्या परीघात त्यांचा विचार सुरू होताच. फक्त काही कार्यक्रम करणं, संसाधनांमध्ये, तंत्रज्ञानात बदल हे गरजेचं असलं, तरी पुरेसं नाहीये हे लक्षात येत होतं.

खऱ्या अर्थाने शाश्वतता गाठायची असेल, तर जीवनपध्दतीला जास्तीत जास्त निसर्गानुकूल बनवलं तरच शक्य होईल, यावरचा विश्वास वाढत होता. जनजाती समाजाचं जगणं, टिकण्यामध्ये आजूबाजूच्या निसर्गाला समजून, त्याला हानी न पोहोचवता जगण्याची पध्दती विकसित होत गेली आहे. ती प्रक्रिया प्रवाही आहे या निष्कर्षावर त्यांचं चिंतन आलं. निसर्ग आधारित जीवन कसं जगावं याचं जनजाती समाजाचं ज्ञान संकलित करावं आणि ज्यांना हे ज्ञान समजून घेऊन जगायचं आहे, पसरवायचं आहे त्यांना ते समजून घेण्यासाठी एक जागा असावी, या जाणिवेतून 'ग्रामज्ञानपीठाची' सुरुवात झाली.

भारतीय जीवनशैलीच्या बीजांचं संकल, संरक्षण व संवर्धन करणं हे ग्रामज्ञानपीठाचं मुख्य कार्य आहे. त्यासाठी स्थानिक समाजाची स्मृतिजागृती करणं, शहरी, नागरी समाजाची जनजातीय समाजाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक करणं हा मार्ग त्यांनी निश्चित केला आहे.

पाच प्रकारे जनजाती लोकांच्या जीवन जगण्याच्या ज्ञानाचं संकलन इथे होत आहे. हे पाच प्रकार म्हणजे वस्तुरूप, शब्दरूप, भाष्यरूप, दृक-श्राव्यरूप आणि अनुभूतिरूप. हे संकलन कोणाच्या माध्यमातून करायचं, तर मुख्यत: गावातले कारागीर. भारतासारख्या कृषी वाणिज्य उद्योगप्रधान देशात कारागीर हा समाजातील विविध घटकांना जोडणारा दुवा असतो. त्याला स्वत:ला अनेक गोष्टींचं ज्ञान असावं लागतं आणि ते प्रत्यक्ष व्यवहारात आणावं लागतं. जोडीला त्यातील काही लोकांना द्यावंसुध्दा लागत. त्यामुळे ज्ञानसंकलन करताना गावातील कारागीर, त्यांची कला, त्याचं शास्त्र, ते शास्त्र वापरून कला प्रत्यक्षात आणण्याची पध्दत, त्याला जोडलेली भाषा, वापरलं जाणारं नैसर्गिक संसाधन, त्याची वापरायची प्रत्यक्ष जीवनपध्दत, त्यातील बदल इत्यादींसंबंधी ज्ञान जमा करण्याचा संकल्प ग्रामज्ञानपीठाने केला आहे. ग्राम ज्ञानपीठाने आपल्या कार्यपध्दतीमध्ये प्रशिक्षणाचा कालावधी, प्रमाणपत्र, फी, वयोमर्यादा या गोष्टींना स्थान दिलेलं नाही.


महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात मेळघाट क्षेत्र ही शिकण्यासाठीची कार्यपध्दती आहे. हे सातपुडयाचं पूर्वेकडील टोक आहे. संपूर्ण जंगलाने वेढलेलं आणि बहुविध जनजातींचा निवास असलेलं हे क्षेत्र. इथल्या धारणी तालुक्यातील कोठागावात हे ज्ञानपीठ सुरू झालं आहे. बांबू, लाकूड, धातू, चर्म, वस्त्र, कृषी, माती, दगड व लोककला या गोष्टींचं स्थानिक जनजीवनात काय महत्त्व आहे, यासंबंधीच्या माहितीचं 9 गुरुकुलांच्या माध्यमातून संकलन सुरू झालं आहे. यासाठी गुरुकुलाची रचना 8 एकरांवर केलेली आहे. तिथे गुरु व शिष्य यांच्या निवासाची, अध्ययनाची व्यवस्था असेल. याशिवाय एक गोशाळा, श्रध्दास्थान, रंगमंच असेल.

गुरुकुलांच्या रचनेत शिक्षणार्थी हा वरीलपैकी एक कारागिरी पध्दत निवडून त्यासंबंधी विविध गोष्टींचं अध्ययन करेल. हे गुरूच्या मार्गदर्शनात स्थानिक कारागीरांबरोबर केलं जाईल. यामध्ये प्रत्यक्ष त्या वस्तू बनवणं, कसं बनवतात हे समजून घेणं, त्यामागचं शास्त्र समजून घेणं, त्या संबंधीच्या लोककथा, लोकगीतं, समजुती समजून घेणं असे विविध उपक्रम असतील. वरील 5पैकी एका पध्दतीने या गोष्टींचं दस्तऐवजीकरण करायचं आहे. फक्त या 8 एकरातच काम न करता थेट गावांमध्ये आणि लोकांबरोबरसुध्दा काम होणार आहे. यासाठी 36 गावं नक्की केली आहेत. मेळघाटातील जनजाती समाजाबरोबर त्यांच्या कला-प्रथा-परंपरांच्या माध्यमातून शिकण्यासाठी म्हणून काही विशेष उपक्रम दर वर्षी केले जाणार आहेत. यामध्ये लोककला संस्कार शिबिर, ज्यामध्ये बाहुला-बाहुलीच्या लग्नाच्या माध्यमातून जीवनदर्शन देण्याचा प्रयत्न आहे. दिवाळीनंतर मेळघाटातील गोंड (थाठया) जनजाती परंपरेला घुंगरू बाजार भरवला जाईल. हे तेथील गुराखी लोक सेवा देत असल्याने त्यांच्या उपजीविकेची काळजी गावकरी घेतात. यात फक्त व्यवहार नसतो, तर त्यांना योग्य मानसुध्दा दिला जातो. दिवाळीच्या वेळी त्यांना कपडे देऊन वर्षभराच्या जेवणाचा वायदा केला जातो. विश्वकर्मा जयंतीच्या माध्यमातून पारंपरिक खेळ, त्यातून मिळणारं शिक्षण यावर प्रकाश टाकला जाईल.

सिपना नदीच्या आसपासचा अभ्यास करणारी 'सिपना शोध यात्रा'. यामधून आपल्या भोवतालच्या संपत्तीचं अध्ययन केलं जाईल. जल, वन, पशुपक्षी, भूमी या संपदेचं अध्ययन केलं जाईल. होळीनंतर येणाऱ्या रविवारी कोरकू जनजातीचा फागुआ महोत्सव भरवला जाईल. स्थानिक लोककला, त्यामधील जीवनदर्शन, त्याच्याशी जोडलेलं विज्ञान याची मांडणी येथे केली जाते. या कार्यक्रमामधून शिक्षणार्थी इथल्या पध्दतींविषयी अध्ययन करू शकतील. तसेच जनजाती तरुण-तरुणीमध्ये या पारंपरिक कार्यक्रमामागील विज्ञान, समाजज्ञान पोहोचवण्यात मदत होईल.

या परिसराचं एक वैशिष्टय म्हणजे या ठिकाणी वाहन नेण्यास परवानगी नाही. पारंपरिक समाजाची जगण्याची गती सावकाश होती. याचा अर्थ एखादी गोष्ट सगळया समाजाने स्वीकारण्याआधी सामाजिकदृष्टया विविध अंगांनी त्याचा विचार व्हायचा. तावून सुलाखून घेतलं जायचं. त्यामुळे नवीन गोष्टी समाजात हळूहळू प्रसृत व्हायच्या. वाहनांना परवानगी नसणं हे एक प्रतीकात्मक आहे. यात कशाला विरोध नाही, तर काही वेळा जरा थांबून, शांतपणे जगण्याचा विचार करण्याची ही जागा आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे. याबाबत  माहिती देणारं प्रवेशद्वार इथे तयार केलेलं आहे.

जीवन प्रवाह अनुभवण्यासाठी

समाजातील प्रत्येकासाठी या ज्ञानपीठाचे दरवाजे उघडे आहेत. शाश्वत विकासासाठी समाजाबरोबर (समाजासाठी नाही) प्रयत्न करायचे असतात. ते करण्यासाठी समाजाचं अध्ययन, चिंतन करण्याची गरज असते. हे ज्यांना करायचं आहे, ते इथे येऊन समाज व त्याच्या जगण्याच्या पध्दती यासंबंधी अध्ययन, चिंतन करू शकतात. ज्ञानसंकलनाच्या कामात त्यांनी मदत करावी हे अपेक्षित आहे. कारागिरी शिकू शकतात. त्या माध्यमातून काही प्रयोग, अध्ययन करावं, स्थानिक लोकांकडून शिकावं आणि परत आपल्या भागात जाऊन तेथील परिस्थतीनुसार काम करावं हे अपेक्षित आहे. जीवन व्यापक करण्यासाठी कारागिरीच्या कौशल्याचा उपयोग करता येऊ  शकतो.

समाजामध्ये पारंपरिक जीवनमूल्यं रुजवण्यासाठी कारागीर व त्यांची कला हिचा वापर कसा केला गेला आहे, हे बघणं व त्या माध्यमातून विकासाची भारतीय संकल्पना समाजात समजावून सांगणं यासाठीचा हा एक मंच आहे. काही दशकांच्या साधनेतून तो सुरू झाला आहे. हे पहिलं पाऊल आहे. पण कोणत्याही प्रवासाची सुरुवात पहिल्या पावलानेच होते. आपणही या प्रवासात सहप्रवासी होऊ शकता.

 

संपर्क

सुनीलजी देशपांडे ग्रामज्ञानपीठ,

कोठा, पो. नादुरी, ता. धारणी, जिल्हा - अमरावती

ई मेल- [email protected]

9764639457

www.gramgyanpeeth.org

 ----------------------------

***कपिल सहस्रबुध्दे***

9822882011