‘अवर प्लॅनेट’ अद्भुत सफर

 विवेक मराठी  14-May-2019

  आपले जग किती सुंदर आहे, आपण ते का जपले पाहिजे ह्याची थोडी जरी कल्पना आपल्याला यावी असे वाटत असेल, तर ‘अवर प्लॅनेट’ ही मालिका नक्की बघा. वाचवू शकलो तर त्यापेक्षा उत्तम काही नाही, पण वाचवू शकलो नाही, तर आपण उद्ध्वस्त काय करतो आहोत, हे तरी आपल्याला नक्की कळू शकेल!!

  
एप्रिल 2015मध्ये बातमी आली की नेटफ्लिक्स नॅचरल हिस्ट्रीवर आठ भागांची एक मालिका सादर करणार आहे. जंगलप्रेमी असल्यामुळे मला ह्या बातमीबद्दल विशेष उत्सुकता होती आणि उत्सुकता वाढवणारे आणखी एक मोठे कारण होते - जी टीम ही मालिका बनवणार होती, त्यांनी आधी बीबीसीसाठी अनेक उत्कृष्ट मालिका बनवल्या होत्या आणि या वेळी त्यांच्या पाठीशी नेटफ्लिक्स होते. खर्च आणि वेळ ह्यांची चिंता नव्हती आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातला सर्वोत्कृष्ट असा नेटफ्लिक्सचा रंगमंच त्यांना मिळणार होता. ही मालिका बनवताना घेतेलेले कष्ट काही आकड्यांतून आपल्याला कळू शकतील. चार वर्षे लागली ही मालिका बनवायला, चमूमध्ये सहाशे माणसे, पन्नास देशांतली लोकेशन्स, वेगवेगळी लोकेशन्स मिळून तीन हजार तीनशे पंचाहत्तर दिवसांचे चित्रीकरण, चार लाख तासांचे रॉ फूटेज, सहा हजार सहाशे ड्रोन फ्लाइट, नऊशे अकरा दिवसांचे सागरी चित्रीकरण, चित्रीकरणासाठी केलेल्या दोनशे ट्रिप्स, दोन वर्षे सायबेरियात ठाण मांडून बसलेली टीम आणि ह्या सर्व कष्टांना पडद्यावर बघताना ऐकू येणारा डेव्हिड अ‍ॅटनबरोंचा दैवी आवाज. सगळेच कसे भव्यदिव्य.. मॅग्नम ओपस.

आठ भाग आहेत या मालिकेमध्ये. पंचेचाळीस ते त्रेपन मिनिटांचे. आठही भाग कमाल आहेत यात वाद नाही, पण नववा बोनस भाग बघायला विसरू नका. हे सगळे आपल्यापर्यंत आणताना काय कष्ट पडले, याची गाथा आहे तो भाग. मालिका सुरू होते ‘अवर प्लॅनेट’ नावाच्या भागाने. आपले जग किती सुंदर आहे याची कल्पना देणारा हा भाग आहे. आपल्याला निसर्गाने काय दिले आहे आणि आपण ते कसे जपले पाहिजे, हा संदेश हळूहळू प्रेक्षकांना दिला जातो. निसर्गसंवर्धन (कॉन्झर्व्हेशन) म्हटले की लोक पळून जातात, उत्कृष्ट काम बघत नाहीत. पण इथे असे होत नाही. ह्या भागामध्ये असलेला आफ्रिकन रानकुत्र्यांनी केलेले भक्ष्याच्या पाठलागाचे दृश्य म्हणजे कम्माल सिनेमॅटोग्राफी आहे. त्या रानकुत्र्यांच्या कळपात असलेल्या एका रानकुत्र्याने हे दृश्य चित्रित केलेय की काय अशी शंका यावी, इतपत कम्माल.
 

ही मालिका बनवताना घेतेलेले कष्ट काही आकड्यांतून आपल्याला कळू शकतील. चार वर्षे लागली ही मालिका बनवायला, चमूमध्ये सहाशे माणसे, पन्नास देशांतली लोकेशन्स, वेगवेगळी लोकेशन्स मिळून तीन हजार तीनशे पंचाहत्तर दिवसांचे चित्रीकरण, चार लाख तासांचे रॉ फूटेज, सहा हजार सहाशे ड्रोन फ्लाइट, नऊशे अकरा दिवसांचे सागरी चित्रीकरण, चित्रीकरणासाठी केलेल्या दोनशे ट्रिप्स, दोन वर्षे सायबेरियात ठाण मांडून बसलेली टीम आणि ह्या सर्व कष्टांना पडद्यावर बघताना ऐकू येणारा डेव्हिड अॅटनबरोंचा दैवी आवाज. सगळेच कसे भव्यदिव्य.. मॅग्नम ओपस.

‘फ्रोजन वर्ल्ड’ नावाचा दुसरा भाग आहे. या भागामध्ये दाखवलेले ध्रुवीय अस्वलाचे शिकारदृश्य कदाचित मी बघितलेले सर्वोत्तम शिकारदृश्य असावे. पेंग्विनची दृश्येही अफाट आहेत. मुळात हा पक्षी देखणा आहे आणि त्याच्या देखणेपणात सिनेमॅटोग्राफरने आणखी भर घातली आहे. हंपबॅकचे फूटेज म्हणजे केवळ अद्भुत असेच म्हणावे लागेल. ह्या अवाढव्य जिवाला अत्यंत देखण्या रूपात दाखवण्यात ही टीम सफल झाली आहे. ह्या भागामध्ये डोळ्यात पाणी आणणारी काही दृश्ये आहेत. वॉलरसचे एक दृश्य भावनांच्या धरणाचे दरवाजे उघडते - दृश्य आपल्यासमोर उलगडत जाते आणि नकळत डोळे पाणावतात.
 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/


तिसर्‍या भागाचे नाव ‘जंगल’ असे आहे आणि हा भाग आपल्या नावाला अक्षरश: जागतो. विविध पक्षी आणि त्यांची प्रणयनृत्ये, त्यांचे त्या काळातले वागणे याची कमाल दृश्ये टीमने मिळवली आहेत. फूलपाखरांचे आयुष्य टीम आपल्यासमोर हळुवारपणे उलगडून दाखवते. जॅग्वारची कम्माल दृश्ये आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतात. जॅग्वारचे असे चित्रीकरण फार कमी वेळा बघायला मिळाले आहे. गरुडाचे ‘उड्डाण प्रशिक्षण’ आपल्यात एक जोश जागवून जाते. ती दृश्ये बघत असताना आपणही मुठी आवळून त्या गरुडाच्या पिल्लाला उडण्यासाठी प्रोत्साहित करत असतो.

चौथा भाग आहे ‘कोस्टल सीज’. पृथ्वीवरचा सर्वात जास्त भूभाग समुद्राने व्यापलेला आहे. समुद्राचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देणारा हा भाग आहे. ह्या भागाचे सुरुवातीचे शिकारदृश्य आपण श्वास रोखून बघतो आणि डॉल्फिन्सचे चित्रीकरण तर कहर आहे, अक्षरश: कहर. ड्रोनचा वापर करून डॉल्फिन्सनी केलेेल्या मासेमारीचे हे दृश्य अंगावर काटे आणणारे आहे. आठही भाग कम्माल आहेत, पण हा भाग म्हणजे सर्वोत्कृष्ट - ‘बेस्ट अमंग द व्हेरी बेस्ट’ असेच म्हणावे लागेल. असे म्हणतात की नैसर्गिक सौंदर्य बघायचे असेल तर समुद्रात बुडी मारा. ह्या भागामध्ये समुद्रात असलेले अप्रतिम सौंदर्य अतिशय कलात्मकरीत्या दाखवण्यात आले आहे. एव्हरग्लेडचे आणि फ्रेंच पॉलिनेशियात केलेले चित्रीकरण खरोखरच भन्नाट, जगावेगळे आहे. स्टिंग रे, बॉटल नोज डॉल्फिन्स, व्हाइट टिप रीफ शार्क अशा अनेक देखण्या जिवांचे अद्भुत चित्रीकरण ह्या भागामध्ये बघायला मिळते. ऑटर्सची आंघोळ तर ह्या भागाचा सर्वोत्तम बिंदू आहे - क्यूटनेस ओव्हरलोडेड.

 

पाचवा भाग आहे ‘फ्रॉम डेझर्ट टू ग्रासलँड्स’. नामीबियातल्या, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाळवंटी हत्तींचा अन्नपाण्यासाठीचा प्रवास बघून मन हेलावून जाते. ओमानमधील, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या  बिबट्यांचे प्रणयदृश्य तर माझ्यासाठी शहारे आणणारे होते. ज्या बिबट्याचे केवळ ओझरते दर्शनदेखील कठीण आहे, अशा बिबट्याचे प्रणयदृश्य मिळवण्यासाठी काय कष्ट पडले असतील याची कल्पना मी करू शकतो. पाच चित्त्यांनी मिळून केलेली शिकार सिनेमॅटोग्राफरने अद्भुत चित्रित केली आहे. अळी आणि मुंग्यांचे दृश्य बघितल्यावर हे चित्रित करणार्‍या माणसाचे मला अक्षरश: पाय धरावेसे वाटावे, हे साहजिकच होते.

सहावा भाग आहे ‘हाय सीज’. देवमाशांची शिकार, जेलीफिशचे चित्रीकरण, राजा अम्पटला घेतलेली अप्रतिम दृश्ये, अटकामा पाणकावळ्यांचे ड्रोनने चित्रीकरण केलेले संमेलन हे ह्या भागाचे हाय लाईटस आहेत. देवमाशांच्या नैसर्गिक वागणुकीचे चित्रीकरण करण्यात टीमने मिळवलेले यश केवळ अद्भुत आहे. सगळे कसे सुपरलेटिव्ह.

सातव्या भागाचे नाव आहे ‘फ्रेश वॉटर’. हा भाग अत्यंत नेत्रदीपक - व्हिज्युअली अमेझिंग असेच म्हणावे लागेल. ब्राझिलमध्ये आणि अर्जेंटिनात केलेले चित्रीकरण आउट ऑॅफ धिस वर्ल्ड. हा भाग आपल्याला भारावून टाकतो. ह्या भागाची खासियत आहे अद्भुत ड्रोन दृश्ये. आपण पक्षी बनून ह्या सगळ्या गोष्टींचे विहंगम (बर्ड्स आय व्ह्यू) दृश्य बघतो आहोत असे आपणास वाटले, तर त्यात नवल नाही.

 

आठव्या भागाचे नाव आहे ‘फॉरेस्ट’. सायबेरियन वाघाचे दृश्य मिळावे, म्हणून उणे तापमानात एका लपणामध्ये बसलेला माणूस आणि लावलेले काही छुपे कॅमेरे. माणसाच्या कष्टाची ही कथा आहे. दोन वर्षे एका ठिकाणी एखाद्या टेलीफोन बूथच्या आकाराच्या खोलीत बसून राहणे सोपे नसते. ते तिथे बसून राहिले आणि मग एक दिवस कॅमेर्‍यात सायबेरियन वाघ आला. सायबेरियन वाघाचे असले नैसर्गिक चित्रीकरण फारसे नाही. ह्या भागाचा आणि मालिकेचा शेवट चेर्नोबेलच्या घटनेने केला आहे, ही पाच मिनिटे एक अफाट संदेश देऊन जातात.

आपली लोकसंख्या बेफाट वाढते आहे, हे अगदी आपल्या नियंत्रणाबाहेर गेले आहे असे मी म्हणणार नाही. पण सध्यातरी परिस्थिती चिंताजनक आहे. मी जन्माला आलो, तेव्हा भारत हा सत्तर कोटी लोकांचा देश होता आणि आता तो एकशे तीस कोटी लोकांचा देश झाला आहे, अवघ्या पंचेचाळीस वर्षांत. सरासरी पाऊस कमी झाला, डेरेदार वृक्ष गेले, दुष्काळ आला. झडीचा पाऊस ही आता परिकथा झाली आहे. ज्या गतीने आपण जंगल साफ करतो आहोत, ते चिंताजनक आहे. जागतिक स्तरावर गेल्या चाळीस वर्षांत पर्यावरणाची जी हानी झाली आहे, त्याला तोड नाही. भारतातल्या अनेक शहरांतील, गावांतील माणसे पाण्यासाठी रानोमाळ भटकत आहेत. आपण आपल्या हाताने ही परिस्थिती ओढवून घेतली आहे. माणसे वाढली, त्यांना राहायला जागा, रस्ते आणि इतर अनेक सोईसुविधा तर लागणारच, पण त्या करताना आपण ‘शाश्वत’ (सस्टेनेबल) पद्धतीने करतो आहोत का? याचा विचार करायला हवा. चेर्नोबेलमध्ये अपघात झाला आणि किमान शंभर वर्षे आता इथे कोणतेही जीवन येणार नाही, जगणार नाही असे मानवाने घोषित केले. पण निसर्गात बेफाट शक्ती असते उसळी मारण्याची. चेर्नोबेलला निसर्ग परतला आणि तोही अवघ्या तीन वर्षांत. झाडे बहरली, पक्षी आले, प्राणी आले. चेर्नोबेल हिरवेगार झाले, पाऊस पडू लागला. झालेले नुकसान भरून काढण्याची जबरदस्त क्षमता निसर्गात असते. आपणही निसर्गाला संधी द्यायला हवी.

  • हर्षद बर्वे 
  • 9890700251