नव्या नक्षली रचनेचा धोका

 विवेक मराठी  15-May-2019

यापुढे  पोलीस यंत्रणेला आता गाफील राहता येणार नाही. आता फक्त गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात नक्षली कारवाया दिसत असल्या, तरी यापूर्वी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नांदेडचा काही भाग यात नक्षली प्रभाव कमी-अधिक प्रमाणात होता. या जिल्ह्यातील जंगल क्षेत्र व आदिवासीबहुल भाग, तसेच त्यालगतचा परिसर आता नव्या व्यूहरचनेनुसार नक्षल्यांच्या टार्गेटवर राहणार आहे. याचाच अर्थ नक्षल चळवळ विस्ताराची स्वप्ने पाहू लागली आहे. मध्य प्रदेशातही ही चळवळ हातपाय पसरण्याची संधी शोधू लागला आहे. आता पोलीस व सुरक्षा जवानांचा सामना चलाख व गणपतीच्या तुलनेत तरुण असलेल्या बसवराजशी आहे. बसवराजला मिलिंद तेलतुमडेसारख्या ज्येष्ठाचा मदतीचा हात आहे आणि भास्कर, भूपती यासारख्या नव्या दमाच्या कमांडर्सचे पाठबळ आहे. हे जास्त धोकादायक आहे. 


नक्षल संघटनेचे नेतृत्व नंबाला केशवराज उर्फ बसवराज या आक्रमक नेत्याकडे गेल्यानंतर नक्षल संघटनेच्या एकूणच कार्यपद्धतीत, संरचनेत व कारवायांमध्ये मोठे बदल होतील, असा अंदाज अगोदरपासून व्यक्त केला जात होता. तो आता हळूहळू दिसू लागला आहे. गेले काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल प्रभावित क्षेत्रात वाढलेल्या कारवाया व विकास कामांना सुरू झालेला विरोध पाहता, बसवराज आपल्या मूळ आक्रमकतेत परत येत आहे, हे स्पष्ट झाले आहे. नक्षल संघटनेत हे बदल होत असताना पोलीस यंत्रणा अतिआत्मविश्वासात वावरत आहे.    

गेल्या वर्षी गडचिरोली जिल्ह्यातील कसनसूरच्या जंगलात पोलिसांनी नक्षल्यांच्या शिबिरावर योजनाबद्धपणे हल्ला चढवला. चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. मृत नक्षलवाद्यांमध्ये अनेक प्रमुख नक्षल्यांचाही समावेश होता. हा नक्षली चळवळीला मिळालेला जबरदस्त फटका होता. हा फटका दोन स्तरात प्रामुख्याने दिसून आला. पहिला परिणाम, नक्षल्यांच्या नव्या भरतीला हादरा बसला; तर, दुसरा परिणाम होता नक्षल्यांबाबत गावकऱ्यांमध्ये जी दहशत होती, त्या दहशतीला ओहोटी लागली. या वेळी नक्षल चळवळीची मुख्य संघटना सीपीआय (माओइस्ट)ची सूत्रे मुप्पल्ला लक्ष्मण राव उर्फ गणपती याच्याकडे होती. वयाची एक्काहत्तरी पार केलेल्या गणपतीच्या जागी नवा नेता निवडण्याच्या हालचाली अगोदरच सुरू झाल्या होत्या. कसनसूरच्या घटनेने गणपतीच्या गच्छंतीचे वारे वेगाने वाहू लागले आणि गेल्या वर्षीच्या शेवटी शेवटी नोव्हेंबरमध्ये नक्षली संघटनेच्या प्रमुखपदी ६३ वर्षीय बसवराज आरूढ झाला.

बसवराजने वारंगलच्या इंजीनियरिंग कॉलेजमधून इंजीनियरिंग केले आहे, असे सांगितले जाते. गेल्या २८ वर्षांपासून भूमिगत असलेल्या बसवराजचे अधिकृत म्हणावे असे छायाचित्र आजही पोलीस रेकॉर्डमध्ये नाही. स्फोटके हाताळण्यात व छुप्या युद्धाची परिणामकारक व्यूहरचना रचण्यात तज्ज्ञ मानला जाणारा बसवराज सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याला अधिक प्राधान्य देतो. २०१०मध्ये छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे झालेल्या हल्ल्यात ७६ सीआरपीएफ जवान हुतात्मा झाले होते. जीराम खोऱ्यातील हल्ल्यात प्रमुख कॉंग्रेस नेत्यांसह २७ जण ठार झाले होते. या दोन्ही हल्ल्यांचा मास्टरमाईंड बसवराज असल्याचे त्या वेळी पोलिसांनी जाहीर केले होते. याच महिन्याच्या प्रारंभी कुरखेडाजवळ १५ जवान भूसुरुंगस्फोटात ठार झाले. या हल्ल्याच्या संशयाची सुई बसवराजकडेच जात आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी व मे महिन्यात रस्ता बांधकामावरच्या वाहनांना आगी लावण्याच्या घटना वाढल्या आहेत.

 बसवराजच्या येण्याबरोबर नक्षल्यांच्या कारवाया वाढल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. याचबरोबर नक्षली संघटनेच्या संरचनेत एक नवीन आणि महत्त्वाचा बदल होत आहे. आजवर नक्षल चळवळीच्या दंडकारण्य झोनमध्ये महाराष्ट्र (गडचिरोली), छत्तीसगड, तेलंगण, आंध्र व ओडिशाचा काही भाग समाविष्ट होता. नव्या व्यवस्थेत या झोनची पुनर्रचना केली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. यासाठी अबुझमाड जंगलाचा भाग असलेल्या छत्तीसगडमधील बालाघाट परिसरात असलेल्या जंगलातील अतिशय दुर्गम भागात नुकतीच एक बैठक झाल्याचे बोलले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात बिनागुंडापासून छत्तीसगडच्या नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर; तेलंगणातील खम्मम, वारंगल ते ओडिशाच्या मलकानगिरीपर्यंत अबुझमाडचे जंगल आहे. या जंगलातील आदिवासी अजूनही आदिम जीवन जगतात. अतिशय घनदाट व दुर्गम असे हे जंगलक्षेत्र आहे. त्यामुळे हेच जंगल नक्षली चळवळीचे केंद्र आहे. या जंगलात झालेल्या बैठकीत बसवराजबरोबर मिलिंद तेलतुमडे, भूपती व अन्य प्रमुख नक्षली कमांडर हजर होते व त्यातच या झोन-पुनर्रचनेला हिरवा झेंडा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली नक्षली चळवळ पुन्हा वेगवान करणे, नव्या दमाची भरती सुरू करणे आणि कसनसूरसारख्या घटना भविष्यात होऊ न देण्यासाठी माहीतगारांचे जाळे विणणे, हा या पुनर्रचनेचा मुख्य हेतू आहे. 

 नव्या पुनर्रचनेतील सर्वात प्रमुख व चिंताजनक मुद्दा आहे नव्या रचनेत मध्य प्रदेशचा करण्यात आलेला समावेश व महाराष्ट्राचा विस्तार. या पुनर्रचनेनुसार एक नवा झोन तयार करण्यात आला आहे व या नव्या झोनमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश या तीन राज्यांचा समावेश करण्यात आहे. आजवर मध्य प्रदेश नक्षल चळवळीच्या झोनमध्ये नव्हता. मध्य प्रदेशात या कारवायाही नव्हत्या. पण नव्या रचनेत मध्य प्रदेश समाविष्ट झाला आहे. त्याचबरोबर सध्या केवळ गडचिरोलीतील काही तालुक्यापर्यंत सीमित राहिलेली चळवळ पुन्हा प्रभावाच्या जुन्या क्षेत्रात नेणे व नव्या भागातही चळवळीचे काम नेणे हेही उद्दिष्ट या रचनेमागे ठेवण्यात आले आहे. त्यासाठी नक्षल संघटनेने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यात आपले अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी स्थापन केलेल्या नवीन झोनच्या दलममध्ये युवकांच्या भरतीवर भर दिला जाणार आहे. नक्षली दलमसमोर सध्या नेतृत्वाचा प्रश्न गंभीरपणे भेडसावत आहे. कसनसूरच्या घटनेत ठार ४० नक्षलवाद्यांमध्ये काही प्रमुख दलम कमांडरचाही समावेश होता. त्याचमुळे या घटनेनंतर काही दिवस नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांत घट झाली होती. त्यामुळेच नव्या दमाच्या कमांडर्सचा शोध सुरू झाला आहे. तसेच नव्या झोनमधील तिन्ही राज्यांची जबाबदारी स्वतंत्रपणे सोपवण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय समितींच्या काही सदस्यांच्या नावांचा विचार सुरू झाला आहे.

 नक्षल प्रमुख बसवराज व केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुमडे हे दोघे या नव्या झोनवर विशेष लक्ष ठेवून राहणार असल्याचे कळते. तेलतुमडेचा वावर सध्या बालाघाट परिसरात असल्याचे पोलीस सूत्रे सांगतात. तसे पाहता त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली आहे. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. तरीही जास्त धावपळीची कामे करता येत नसल्याने सुरक्षित ठिकाणावरून तो नक्षल चळवळीचे काम पाहत आहे. त्याच्या मदतीला भास्कर हा नव्या दमाचा कमांडर असल्याचे बोलले जाते. कुरखेडा तालुक्‍यातील जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटाचा मास्टरमाईंड जरी बसवराज असल्याचे बोलले जात असले, तरी तो सारा कट यशस्वीरीत्या अंमलात आणण्यासाठी भास्करने आपली सारी ताकद लावली व तीनशेच्या वर सदस्यांना एकत्र आणून काम फत्ते केले. केंद्रीय समितीने त्याच्या या कामाची दखल घेऊन त्याच्याकडे नवीन झोनमधील एका राज्याची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती आहे.

 नक्षल संघटनेतील हा नवा बदल अतिशय गंभीर मानला पाहिजे. पोलीस यंत्रणा व सरकार या दोघांनाही या दृष्टीने गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कुरखेडानजीक झालेल्या स्फोटाला मुख्यत्वेकरून काही जबाबदार असेल तर ते पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष. कसनसूरच्या घटनेत प्रमुख कमांडर्ससह ४० नक्षली ठार होणे, त्यानंतर नक्षली हिंसाचारात झालेली घट यामुळे पोलीस अतिआत्मविश्वासात गेले होते. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात विक्रमी ७० टक्क्यांच्यावर मतदान झाले. ही टक्केवारी राज्यात सर्वाधिक आहे. नक्षल्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करूनही मतदारांनी केलेले हे दणदणीत मतदान हा नक्षल्यांसाठी एक मोठा धक्का होता. पोलीस यंत्रणेचेही ते यश होते. या विक्रमी मतदानाने तर पोलीस यंत्रणा हवेत तरंगत होती. नक्षल्यांनी अचूकतेने त्याचाच फायदा घेतला.

 त्यामुळे पोलीस यंत्रणेला आता गाफील राहता येणार नाही. आता फक्त गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यात नक्षली कारवाया दिसत असल्या, तरी यापूर्वी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नांदेडचा काही भाग यात नक्षली प्रभाव कमी-अधिक प्रमाणात होता. या जिल्ह्यातील जंगल क्षेत्र व आदिवासीबहुल भाग, तसेच त्यालगतचा परिसर आता नव्या व्यूहरचनेनुसार नक्षल्यांच्या टार्गेटवर राहणार आहे. याचाच अर्थ नक्षल चळवळ विस्ताराची स्वप्ने पाहू लागली आहे. मध्य प्रदेशातही ही चळवळ हातपाय पसरण्याची संधी शोधू लागला आहे. नक्षल्यांना त्यात यश येऊ नये, यासाठी तिन्ही राज्यांच्या पोलिसांना व सरकारला आतापासून प्रतिव्यूहरचनेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे अतिआत्मविश्वास व गाफीलपणा टाळावा लागेल. आता पोलीस व सुरक्षा जवानांचा सामना वृद्धत्वाने थंडावलेल्या गणपतीशी नाही, तर हा सामना चलाख व गणपतीच्या तुलनेत तरुण असलेल्या बसवराजशी आहे. बसवराजला मिलिंद तेलतुमडेसारख्या ज्येष्ठाचा मदतीचा हात आहे आणि भास्कर, भूपती यासारख्या नव्या दमाच्या कमांडर्सचे पाठबळ आहे. हे जास्त धोकादायक आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे लागेल. माहीतगारांचे जाळे मजबूत करावे लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या नक्षलप्रभावित जिल्ह्यांमध्ये शो-पीस म्हणून खुर्चीत बसलेल्या व पाहुण्या कलाकारांसारखे वागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना हटवावे लागेल... तरच हे युद्ध लढता येईल.

- लेखचंद्र धामणगांवकर