दुष्काळ दौरा की राजकीय चाचपणी...

 विवेक मराठी  15-May-2019

पवारसाहेब आपल्या दुष्काळी भाग दौऱ्यात नाराज राजकीय नेते, कार्यकर्ते, इतर पक्षातील नाराज नेते यांच्या भेटी अशी आखणी ठरलेली असते. त्यामुळे पवारसाहेबांचा यंदाचा दौरा राजकीय दृष्टीने प्रेरित असल्याचे समोर येत आहे. या दौऱ्यात आपला नातू रोहित पवार याला पवारसाहेबांनी सोबत घेतले आहे. या निमित्ताने रोहितला लाँच केले जात आहे. जामखेडमधील शेतकऱ्यांनी तर रोहितला तिकीट द्या अशी मागणी केली आहे. यातून काय अर्थ निघतो? 

महाराष्ट्रात दुष्काळ पडणे तसे नवीन नाही. महाराष्ट्रातील काही भागात दर वर्षी दुष्काळ पडत असतोच. मराठवाड्यातील काही भागांत तर दुष्काळ पाचवीलाच पूजलेला आहे. पण या वर्षी पाऊस कमीच पडल्याने दुष्काळाची तीव्रता अधिकच आहे. पाच हजारपेक्षा जास्त गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत, या भागात घोटभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. जनावरांना चारा, पाणी नाही. पाणी नसल्याने रोजगार नाही, त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुष्काळग्रस्तांना सरकार, सामाजिक संस्था, काही दानशूर व्यक्ती यांच्याकडून टँकरद्वारे पाण्याची सोय, चारा छावण्या आदी सोई केल्या जात आहेत. पण दुष्काळची तीव्रता एवढी आहे की, तेही कमी पडत आहे. विरोधी राजकीय पक्ष या सगळ्या परिस्थितीचा फायदा उठवणार नाहीत तर ते विरोधक कसले... कारण 'समस्या तेथे राजकारण' हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात दिसून येत आहे. मग पवारसाहेब या परिस्थितीचा फायदा उचलणार नाहीत, असे होईल का? कारण पवारसाहेब जेथे जातात तेथे राजकारण होत असते, किंवा ते घडवत असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीला राजकीय मापदंड लावलाच जातो. कारण त्यांच्या आजवरच्या इतिहासामुळे ते गृहीत धरले जाते.


पवारसाहेब महाराष्ट्रातील दुष्काळी भागाच्या पाहणी दौऱ्यावर निघाले आहेत. तसे ते दर वर्षीच जात असतात. पेपरमध्ये फोटो प्रसिद्ध होतात. त्यांनी तेथे दिलेल्या सल्ल्यावर शेतकऱ्यांचा कैवारी अशा मथळ्याने बातम्या, लेख प्रसिद्ध होतात. पण आश्चर्य याचे वाटते की, तरीही महाराष्ट्रातील दुष्काळ कमी झाला नाही. कारण पवारसाहेबांनी दुष्काळी पाहणी दौरा कधी दुष्काळग्रस्तांच्या भल्यासाठी केलाच नाही. केला असता, तर आघाडी सरकारच्या काळात सिंचन क्षेत्रात फक्त 0. १ टक्क्याने वाढ झाली नसती. त्यामुळे सर्वच दौरे हे राजकीय दृष्टीने प्रेरित असल्याचे आजवर समोर आले आहे. दौऱ्यात नाराज राजकीय नेते, कार्यकर्ते, इतर पक्षातील नेते अशी आखणी ठरलेली असते. त्यामुळे पवारसाहेबांचा यंदाचा दौरा राजकीय दृष्टीने प्रेरित असल्याचे समोर येत आहे. या दौऱ्यात आपला नातू रोहित पवार याला पवारसाहेबांनी सोबत घेतले आहे. या निमित्ताने रोहितला लाँच केले जात आहे. जामखेडमधील शेतकऱ्यांनी तर रोहितला तिकीट द्या अशी मागणी केली आहे. यातून काय अर्थ निघतो? त्याचबरोबर त्यांनी साताऱ्यातील माण तालुका दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला. हा भाग कायमच दुष्काळी राहिला आहे. या दौऱ्यातसुद्धा पवारांनी तेथील विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार उभा करायचा, याची चाचपणी केली. यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होते की, पवारसाहेब जेथे जातील तेथे राजकारण करतात किंवा ते आपोआप होतच असते. असो. आज जनता दुष्काळात होरपळत आहे आणि  पवारसाहेब विधानसभेची पेरणी करत आहेत, यापेक्षा गलिच्छ राजकारण कोणते नसेल.  असे म्हणतात की, पवारसाहेबांना महाराष्ट्रातील समस्या चांगल्या समजतात. त्यावर त्यांचे उपायही चांगले असतात. पण कोणताही उपाय सुचवताना त्यामागे राजकीय लाभाचा विचार असल्याने, त्यांनी सुचवलेल्या उपायांनी समस्या सुटल्याच नाहीत, हे वास्तव आहे. त्यामुळे वृद्धत्वाकडे  झुकलेल्या पवारसाहेबांनी आता तरी राजकारणविरहित दृष्टी ठेवून महाराष्ट्रासाठी काहीतरी करावे, हीच माफक अपेक्षा.

- अभय पालवणकर