उस्मानाबादच्या दुष्काळी गावांना ज्ञान प्रबोधिनीचा आधार

 विवेक मराठी  11-Jun-2019

  हराळी येथील शैक्षणिक कामाच्या जोडीला ज्ञान प्रबोधिनी केंद्राने लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठीही महत्त्वाचे योगदान दिले. गेल्या चार वर्षात केंद्राने उस्मानाबादमध्ये केलेल्या दुष्माळी कामांविषयीचा आढावा घेणारा लेख.

 1993च्या प्रलयंकारी भूकंपाने मराठवाडयाची भूमी कंपित झाली होती. किल्लारी केंद्रबिंदू असणाऱ्या या भूकंपाने परिसरातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावे जमीनदोस्त केली. मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. अनेक जण मदतकार्यासाठी धावले. त्यात ज्ञान प्रबोधीनीचेही कार्यकर्ते होतेच. मदतकार्यासाठी धावून गेलेल्या प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांना मात्र हराळी (ता. लोहारा) गावाने परत जाऊ दिले नाही. शाळा चालू करण्याचा आग्राह धरला. शाळेसाठी गावची जमीन देणगी म्हणून देऊ केली. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनाही आणलेली मदत गावात वाटून टाकून पुन्हा शहराकडे माघारी निघून येण्याची घाई नव्हती. त्यामुळे मदतकार्य करणाऱ्या अन्य मंडळींनी आपले 'वाटपाचे व सेवेचे काम' संपल्यानंतर काढता पाय घेतला तरी प्रबोधिनी मात्र तिथे थांबून राहिली ती आजपर्यंत! तब्बल 25 वर्षे झाली. नुसते शाळा चालविण्यासाठी नाही, तर परिसर विकासाचे केंद्र बनून राहण्यासाठी. त्यामुळे आपल्या शैक्षणिक कामाबरोबरच प्रबोधिनीच्या हराळी केंद्राने 2016पासून दुष्काळनिवारणाच्या कार्याला निर्धारपूर्वक सुरुवात केली.

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

 

तावशी खोऱ्याच्या कामाला सुरुवात

हराळी गाव ज्या तावशी खोऱ्यात मोडते, त्या खोऱ्यातील 15 निवडक गावांच्या पाणलोट क्षेत्रविकासाच्या दृष्टीने सर्वेक्षणास गेल्या दोन वर्षांपासून सुरुवात करण्यात आली. विहिरींचे  सविस्तर सर्वेक्षण हाती घेण्यात आले. विहीर पातळीची नोंद ठेवण्यात आली. यासाठी इस्रायलवरून वर्षभरासाठी आलेल्या भूजलतज्ज्ञ दाना हरारी नावाच्या मुलीची मोठी मदत झाली. पुण्यातील ऍक्वाडॅम या भूजलाविषयी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत  हराळी परिसरातील पाच गावांमधील 10 व्यक्तींनी प्रशिक्षण घेतले.

हराळी केंद्रातील दोन कार्यकर्ते पुण्यातील सेवावर्धिनीच्या 'जलदूत' प्रकल्पांतर्गत एकूण सात पाणीविषयक प्रशिक्षण वर्गात सहभागी झाले. या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात तावशी खोऱ्यातील निवडक गावांचा पाणलोट क्षेत्रविषयक आराखडा सादर करण्यात आला. अभ्यासपूर्ण सादरीकरणासाठी ठेवण्यात आलेले दोन लाख रुपयांचे बक्षीस या वेळी हराळीच्या गटाला मिळाले.

लोकसहभागातून ओढा खोलीकरण व रुंदीकरण

तावशी खोऱ्यातील हराळी, तोरंबा व काटेचिंचोली या तीन गावात वर्ष 2016मध्ये प्रामुख्याने नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम लोकसहभागातून हाती घेण्यात आले. वर्षानुवर्षे नाल्यात साठलेला गाळ काढून हे काम करण्यात आले. सुमारे सात किलोमीटर लांबीच्या नाला खोलीकरणामुळे नाल्याची पाणी साठवणक्षमता एकूण पाच कोटी लीटरने नव्याने वाढली. सुमारे साडेदहा लाख रुपये खर्चून ही सर्व कामे करण्यात आली. प्रबोधिनीने ठिकठिकाणच्या देणगीदारांकडून हा सर्व निधी गोळा केला होता. या सर्व कामात ग्राामस्थांच्या लोकवर्गणीचा आग्राह धरण्यात आला होता. त्यातून 2.25 लाख रुपये - म्हणजे सुमारे 20 टक्के लोकवाटा उभा राहिला! नाला खोलीकरणाच्या कामामुळे तिन्ही गावांतील सुमारे 50 विहिरींमधील पाणीसाठयात लक्षणीय वाढ झाली आहे. नाल्यातील सुपीक गाळ शेतात टाकल्यामुळे पिकाच्या उत्पन्नातही वाढ दिसून आली. काटेचिंचोलीत काही शेतकऱ्यांनी तर विहिरीच्या शिल्लक पाण्यात जास्तीचे मक्याचे पीक घेतले. काही ठिकाणी शेतकऱ्यांना रब्बी पिकांना स्वतंत्रपणे पाणी द्यायची गरज पडली नाही.

वर्ष 2018मध्ये तावशीगड आणि काटेचिंचोली या गावांतून वाहणाऱ्या ओढयांचे अनुक्रमे तीन व एक किलोमीटरचे ओढा खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. ओढयालगतच्या एकूण 23 शेतकऱ्यांच्या शेतीला या कामामुळे थेट फायदा झाला. त्याचबरोबर आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील विहिरींमधील पाण्याची पातळी वाढली असल्याचे नमूद केले. हा गाळ काढल्याने सिंचनासाठी अथवा जमिनीत मुरण्यासाठी तर अधिकचे पाणी उपलब्ध झाले. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे  ओढयालगतच्या शेतात पूर्वी पावसाळयात पाणी उलटून पिकांचे मोठे नुकसान व्हायचे. ते होणे बंद झाले, कारण वर्षानुवर्षे गाळ साठून उथळ झालेले ओढे आता खोल व रुंद झाले होते. या कामापोटीचा दोन्ही गावांचा मिळून एकत्रित लोकवाटा 2.63 लाख रुपये इतका, तर सास्तूरचा 4.64 लाख रुपये इतका होता.

शेतीच्या बांधबंदिस्तीची कामे

वर्ष 2017च्या उन्हाळयात प्रामुख्याने शेतीची बांधबंदिस्तीची कामे हाती घेण्यात आली. यात एकूण 43 शेतकऱ्यांकडे 83 हेक्टरवर हे काम करण्यात आले. यासाठी सुमारे 3.75 लाख रुपये खर्च आला. शिवारातील पाणी शिवारातच मुरण्यास यामुळे मदत होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतातील बहुमूल्य माती वाहून जाण्याचे प्रमाण यामुळे लक्षणीयरीत्या कमी झाले. जमिनीच्या धुपीचे प्रमाण घटले. पावसाचा थेंब जिथे पडतो तिथे तो अडला गेला. पाणलोट विकासाच्या परिभाषेत याला 'मूलस्थानी जलसंधारण' म्हणतात. या संकल्पनेला अलीकडे मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे पावसाने ओढ दिलेली असतानासुध्दा मुरलेल्या पावसाच्या ओलाव्यामुळे पिकांना त्याचा ताण पडला नाही.


खारवट जमीन प्रतिबंध कार्यक्रम

तावशी खोऱ्यातील गावांमध्ये बहुतेक जमिनी चढ-उताराच्या असल्यामुळे  मोठा पाऊस झाल्यावर अनेकदा खोलगट भागांत पाणी साचून राहते. हे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी कुठलीच सोय नसल्यामुळे ते एका जागीच अनेक दिवस साठून राहते. यामुळे पाण्याबरोबर जमा झालेले क्षार जमिनीत मुरून कालांतराने जमिनी खारवट होत जातात. पिकांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात लक्षणीय घट येते. यावर एकच उपाय म्हणजे साठून राहिलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा करणे. यासाठी शेतात चर खणून साठून राहिलेले पाणी गावातील ओढयात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. हराळी व सालेगाव या दोन गावांत 15 शेतकऱ्यांकडे 2018मध्ये हे काम करण्यात आले. त्यापोटी 60 हजार रुपयांची लोकवर्गणीही शेतकऱ्यांकडून गोळा झाली, हे विशेष! या कामाचा दुहेरी फायदा झाला तो असा की, जमिनीत क्षार मुरण्याचा धोका तर कमी झालाच, त्याचबरोबर परिसरातील विहिरी आणि विंधन विहिरी (बोअरवेल) यांची पाणी पातळी काही प्रमाणात वाढल्याचे निरीक्षणही स्थानिक शेतकऱ्यांनी नोंदविले.

विहीर पुनर्भरण उपक्रम

या कामात 2018च्या उन्हाळयात विहीर पुनर्भरण या नवीन पण महत्त्वाच्या विषयाची भर पडली. या उपक्रमाला पुण्यातील रोटरी क्लब ऑफ लक्ष्मी रोड यांचे अर्थसाहाय्य लाभले. या  उपक्रमाच्या माध्यमातून एकूण लोहारा तालुक्यातील पाच गावांतील 52 विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले. यात तोरंबा (10), हराळी (16), धानुरी (9), उदतपूर (8) आणि  हिप्परगा (9) या गावांमध्ये काम झाले. सध्या पाऊस पडण्याच्या प्रमाणात मोठया प्रमाणात अनियमितता आढळून येत आहे.  कमी दिवसात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रसंगी जमा झालेले पाणी थेट ओढयात न जाता विहिरीत आल्यामुळे विहिरीतील पाण्याचा साठपा वाढला. 

जलयुक्त शिवार योजनेतील सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत सास्तूर येथील ओढयाच्या खोलीकरणाच्या  मोठया कामात प्रबोधिनीने 2018मध्ये मोठया धाडसाने सहभाग घेतला. ते या अर्थाने की शासकीय निधी वेळेत मिळेल का? अशी धाकधूक असतानासुध्दा प्रबोधिनीने हे धाडस केले. यातून ओढा खोलीकरणाचे मात्र मोठे काम झाले. तब्बल सत्तर हजार घनमीटर इतका गाळ ओढयातून काढण्यात आला. एकूण साडेतीन किलोमीटरपैकी अडीच किलोमीटरचे काम झाले. यामुळे ओढयाची पाणी साठवण क्षमता सात कोटी लीटरने वाढली! अपेक्षेप्रमाणे सरकारी यंत्रणेने वेळेवर कामांचे पैसे न दिल्याने कार्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळाले ते मात्र वेगळेच. काम सुरू होताना आश्वासक वाटणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. नंतरच्या मंडळींनी शासकीय इंगा दाखविला. अखेरीस मोठया पाठपुराव्यानंतर रक्कम पदरात पडली. परंतु तोपर्यंत प्रबोधिनीचा निर्णय झाला होता की आता यापुढे दुष्काळी कामांकडे सरकारी निधीसाठी हात पसरायचा नाही.

पाण्याच्या कामासाठी खरे तर पैसा मोठया प्रमाणात लागतो. पुण्या-मुंबईच्या कंपनी सीएसआरवाल्यांकडे मराठवाडयासाठी देणगी मागितली तर ते नाके मुरडतात. त्यांच्या नजरेतल्या दुष्काळाची सीमारेषा ही फक्त पुणे जिल्ह्यापुरती मर्यादित असते. तेवढयापुरतीच मदत करण्याबाबत ते 'प्रोफेशनल' असतात. त्यामुळे आता एकमेव मार्ग म्हणजे वैयक्तिक देणगीदारांकडून देणग्या मिळविणे. पण यातून मोठा निधी उभा राहण्यास मर्यादा असतात. या विवंचनेत असतानाच, 'जिथे खरी गरज आहे तिथे - म्हणजे मराठवाडयात आम्ही दुष्काळी कामांना अर्थसाहाय्य  करू इच्छितो' असे म्हणणारा पुण्यातील 'रमा-पुरुषोत्तम न्यास' उस्मानाबादमधील दुष्काळी कामांमागे ठामपणे उभा राहिला. त्यांनी मोलाचे व अगदी वेळेवर असे पंचवीस लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले. त्यामुळे 2018मध्ये दुष्काळी कामांना मोठी गती मिळाली.

पाणी शुध्दीकरण प्रकल्प

रुद्रवाडी तांडा या लमाण तांडयावर ग्राामस्थांना दूषित पाण्याशी संबंधित आजार होत असल्याचे निदर्शनास आले. गावातील विंधन विहिरीतील पाण्याच्या नमुन्यांची चाचणी  करण्यात आली असता पाणी दूषित व क्षारयुक्त असल्याचे आढळून आले. ओढयालगत असणाऱ्या साठवण सिमेंट बंधाऱ्यातील पाणी पावसाळयात विंधन विहिरीत शिरत असल्याचे लक्षात आले. ते टाळण्याची विंधन विहिरीच्या कठडयाची उंची वाढविण्यात आली. पाण्यातील क्षारांचे प्रमाण अतिरिक्त असल्यामुळे आर.ओ. प्रकारचे पाणी शुध्दीकरण संयंत्र बसविण्यावाचून गत्यंतर नव्हते. याचबरोबरीने पंधरा हजार लीटर क्षमतेची टाकी कमी खर्चाच्या फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आली. फेरोसिमेंट टाकीचा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग होता. याबरोबरच 2018 मध्ये गावासाठी पाचशे लीटर क्षमतेचे 'वॉटर एटीम'ही बसविण्यात आले.

ज्ञान प्रबोधिनी हराळी केंद्राने काही वर्षांपूर्वी माकणी धरणापासून ते केंद्रापर्यंत एक पाइपलाइन बसवली होती. उन्हाळयात होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाय म्हणून हराळी ग्राामपंचायतीकडे ही पाइपलाइन हस्तांतरित केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी जास्त क्षमतेचा नवीन सबमर्सिबल पंप बसवण्याची आवश्यकता होती. त्यासाठी 20 एच.पी. क्षमतेचा पंप खरेदी करून ग्राामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आला.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग

यंदाच्या वर्षी प्रबोधिनीच्या हराळी केंद्रातर्फे प्रथमच वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेण्यात आला. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील वलगुड, डकवाडी, चिलवडी,वरवंटी, दुधगाव, तुगाव व चिखली या पाच गावांत नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली. या गावांमध्ये ग्राामस्थांनी डिझेलसाठी लोकवर्गणी गोळा केली, तर मशीनचा भाडेखर्च प्रबोधिनीतर्फे करण्यात आला. याशिवाय सहा गावांमध्ये फेरोसिमेंट टाक्या बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. लोकसहभागातून विहीर खोलीकरण या विषयाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. युनिसेफ प्रकल्पाअंतर्गत कळंब तालुक्यातील तीन गावांत जनजागृतीचे काम गेले वर्षभर सुरू आहे. तेथील विहिरींची पातळी घेणे नियमितपणे घेणे चालू आहे. त्याआधारे भूजलातील उपशाचे प्रमाण व जलधर खडकातील पाणी साठवणक्षमता यांचा अंदाज घेता येणे शक्य आहे.

बहुआयामी जबाबदारी सांभाळणारे

प्रबोधिनीचे अभिजित कापरे

उस्मानाबाद जिल्ह्यातील या पाण्याच्या विविधांगी कामाची प्रमुख जबाबदारी ज्ञान प्रबोधिनीचे अभिजित कापरे यांच्याकडे आहे. त्यांचे स्थानिक सहकारी सचिन सूर्यवंशी, प्रदीप बिराजदार व कल्याण औटे यांचेही योगदान मोठे आहे. कापरे हे पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDAचे) स्नातक असून त्यांनी 20 वर्षे भारतीय नौदलात यशस्वीपणे काम केल्यानंतर 'नौदल कमांडर' म्हणून  स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते 2014मध्ये प्रबोधिनीच्या हराळी केंद्रात सपत्नीक दखल झाले. ते सध्या तेथेच राहत असून तेथील शिक्षणविषयक कामाबरोबरच उन्हाळातील दुष्काळी कामात गेल्या तीन वर्षांपासून सक्रिय आहेत. सागरी सीमांचे रक्षण करणारा हा नौसैनिक आता मराठवाडयातील भूजलाचे संरक्षण व संवर्धन करण्यात गढून गेला आहे. सीमांचे रक्षण जितके महत्त्वाचे, तितकेच देशांतर्गत प्रश्नांपासून देश मुक्त राहणेही आवश्यक! अमेरिकेसारखा बलाढय देश सलग तीन वर्षे पाऊस नाही पडला तरी आरामात तगून राहू शकतो. तर आपल्याकडे एक वर्ष पावसात घट झाली, आगमन लांबले किंवा दोन पावसातील अंतर वाढले तरी शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळते, अर्थतज्ज्ञ चिंतातुर होतात. तेव्हा पाण्याची सुरक्षाही महत्त्वाची आहेच !!

यंदाच्या वर्षी मराठवाडयासाठीच्या दुष्काळी कामांसाठी शहरात देणग्या गोळा करणारे, निधी संकलन करणारे यांची नव्याने भर पडली. पुण्यातील विनीत नित्सुरे व केदार जोशी यांनी फक्त संयोजकाचे काम न करता हराळी परिसरातील दुष्काळी कामांना त्यांनी भेट देऊन स्वतः या कामाची गरज व निकड जाणून घेतली. मुंबईच्या विदुला दंडवते यांनी आपल्या आजोबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने सर्व भावंडांना आवाहन करत व पाठपुरावा करत एका जलकुंभ टाकीसाठीचे अर्थसाहाय्य उभे करण्याची जबाबदारी स्वीकारली. प्रत्यक्षातले निधी संकलनाचे आवाहन नातेवाइकांच्या पलीकडे मित्रपरिवारात पोहोचले आणि चक्क दोन जलकुंभांइतकी रक्कम गोळा झाली. समाजाला उदार हस्ताने द्यायचे आहे, पण मागणारे हात कमी पडत आहेत! खेडी आजपर्यंत अन्नधान्य व राबणाऱ्या हातांच्या रूपाने शहरांना कायम 'देतच' आलेली आहेत. शेतीच्या वाटचे  पाणी उद्योगांसाठी पळविणाऱ्या शहरांनीही मागणीची किंवा एखाद्या किसान मोर्चाची वाट न पाहता शेतकऱ्यांच्या पाठीमागे आता भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे!!

 

विवेक गिरिधारी

9422231967

अभिजित कापरे - 8888802638, 9930662998.

Account Name - Jnana Prabodhini, Solapur

Bank : Axis Bank, Solapur Branch.

Account Number - 266010100020402

IFSC code - UTIB0000266 

(Donations are eligible for section 80G of Income Tax)