सामाजिक समस्यांची वस्तुनिष्ठ चर्चा

 विवेक मराठी  06-Jun-2019

 

 प्रा. श्रीकृष्ण केशव क्षीरसागर (1901-1980) हे गेल्या शतकातील ज्येष्ठ लेखक, समीक्षक व विचारवंत होते. वाङ्मयविश्वात त्यांचे 24 ग्रंथ त्यांच्या हयातीतच प्रसिध्द झाले, तर पाच ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रकाशात आले. 1948 ते 1979 या 32 वर्षांच्या काळात त्यांनी सामाजिक प्रश्नांवर जे चिंतनपर लेखन केले, ते नुकतेच 'जाती-पोटजाती व राष्ट्रैक्य' (जाने. 2019) या नावाने सा. विवेकच्या प्रकाशन विभागाने प्रसिध्द केले आहे. हे श्रीकेक्षींचे तिसावे पुस्तक असून त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. शकुंतला क्षीरसागर यांनी त्याचे नेटके संपादन व संकलन केले आहे.

श्रीकेक्षींच्या ग्रंथसंभारात लघुकथा, लघुनिबंध, व्यक्तिचित्रणे, चरित्र आणि आत्मचरित्र या वाङ्मयप्रकारांचा समावेश असला, तरी मराठी सारस्वतात ते प्रामुख्याने समीक्षक व भाषाशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक ग्रंथांचे साक्षेपी संपादनही केले आहे. 'टीकाविवेक' हा त्यांचा ग्रंथ समीक्षेच्या प्रांतात मैलाचा दगड गणला जातो. त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. वाङ्मयीन समीक्षेच्या जोडीला त्यांनी धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक व राजकीय विषयांवरही चौफेर व विपुल लेखन केले आहे. त्यांनी 1959 साली मिरज येथे भरलेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. इतर अनेक वाङ्मयीन परिषदांतून अध्यक्ष या नात्याने त्यांनी वैचारिक योग दिलेले दिसते.

'जाती-पोटजाती व राष्ट्रैक्य' या ग्रंथात श्रीकेक्षींचे सामाजिक समस्यांवरील 25 चिंतनपर लेख संकलित करण्यात आले आहेत. त्यातील 'हिंदू जातीयता' हा लेख 4 एप्रिल 1948 रोजी नवयुग, साप्ताहिकात प्रसिध्द झाला, तर 'लाँग मार्च' हा शेवटचा लेख 'तरुण भारत'मध्ये 1979 साली प्रसिध्द झाला. नुकतेच देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. या 30-32 वर्षांच्या काळात देश सामाजिक जीवनात कात टाकून नवी झळाळी मिळविण्याच्या प्रयत्नात होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रबोधन व समाजसुधारणा पर्वात अनेक सामाजिक समस्यांच्या संदर्भात जनजागृती करून समाज जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू होते. राजा राममोहन रॉय ते डॉ. आंबेडकर असा सुमारे 150 वर्षांचा हा कालखंड होता. अनेक जटिल सामाजिक प्रश्न सुटत आले होते. समाजात धिम्या गतीने पण सकारात्मक बदल होत होते. पण काही जुन्या प्रश्नांचे गुंते कायम होते, तर काही नव्या प्रश्नांची भर त्यात पडली होती. या व्यापक पार्श्वभूमीवर श्रीकेक्षींनी संवेदनाशील मनाने पण परखड व वस्तुनिष्ठ भूमिकेतून समाजचिंतनपर लेखन केले होते. कोणत्याही जागृत समाजात प्रबोधन व परिवर्तन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असते.

श्रीकेक्षींच्या या लेखसंग्रहात प्रामुख्याने ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद, जातिभेद, चातुरर््वण्य, दलितोद्वार, सवर्ण-अवर्ण या सामाजिक विषयांची चर्चा वाचावयास मिळते. त्याच्याच जोडीला बुध्दिवाद, पुरोगामित्व, समाजवाद्यांचे अपयश, संपूर्ण क्रांती, राष्ट्रीय समानता, समानत आणि ऐक्य या विषयांचाही मार्मिक ऊहापोह त्यांनी केलेला दिसतो. या लेखनात तात्त्वि चर्चा असली, तरी प्रामुख्याने या सर्व विषयांच्या व्यावहारिक अंगांवर त्यांचा अधिक भर असलेला दिसतो. या संग्रहातील आठ निबंध हे 'जात'केंद्री आहेत. सात निबंधांचा केंद्रबिंदू 'ब्राह्मण' हा आहे. तत्त्वचर्चा करणारे सहा लेख आहेत, तर चार निबंध हे प्रासंगिक विषयावर आहेत.

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या स्वरूपाची चर्चा करताना 'भारतातील चार हजार जाती या आचारशुध्दीच्या म्हणजेच रोटी (व बेटी) व्यवहाराच्या सोवळया कल्पनेमुळे आल्या' असे निरीक्षण ते नोंदवतात. ते पुढे म्हणतात, 'विशिष्ट जातीत जन्मलेल्या माणसांचा स्पर्श अपवित्र मानणे ही चाल हिंदुस्थानाबाहेर कोठे असेलसे वाटत नाही. या सोवळेपणाच्या पोरकट, क्षुद्र व छंदिष्ट कल्पनेतच जातीजातीतील उच्च-नीच भावाचे व द्वेषाचे मूळ आहे. झाले तर 'शिवू नको वादातच' सर्व समस्येचे मूळ आहे. सोवळयाओवळयाच्या व स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पनेने भारताच्या सामाजिक व राजकीय जीवनात किती धुमाकूळ घातला आहे, हे वेगळे सांगायला हवे का?'

मात्र या जमिनीवरील वास्तवाची मीमांसा लेखक अगदी वेगळया दृष्टीने करतात. त्यांच्या मते, 'सर्वांच्याच डोक्यात हे खूळ असल्यामुळे ब्रिटिशपूर्व काळात यातून जातिद्वेष फारसा निघाला नव्हता. ब्रिटिश काळात मात्र वेगळया धर्माचे व वेगळया मूल्यांचे लोक आमच्या समाजाबद्दल मतप्रदर्शन करू लागल्याने आतापर्यंतच्या छंदिष्टपणाचा त्रयस्थपणे विचार करण्याची वेळ आली. पण आताही स्वच्छ व निकोप मनाने विचार करणे शक्य नव्हते. कारण आमच्यात कलह लावून स्वत:चे आसन बळकट करणाऱ्या इंग्रजांच्या चश्म्यातून आमच्या सामाजिक समस्यांकडे पाहण्याचा नवाच विकार आम्हाला जडला होता. याचा परिणाम म्हणजे खऱ्या आत्मशोधाऐवजी न्यूनगंड, परप्रत्ययी बुध्दी व परस्परद्वेष यांचे पेव फुटले' असा त्यांनी निष्कर्ष काढलेला दिसतो. तो तथ्यहीन आहे, असे कसे म्हणता येईल?

याचा परिणाम काय झाला? ब्राह्मण लोक प्रत्येक नाकर्तेपणाचे खापर 'लबाड इंग्रजांच्या' माथी फोडू लागले, तर ब्राह्मणेतरांतील सुशिक्षित आपल्या मागासलेपणाचे खापर 'ब्राह्मणांच्या माथी फोडू लागले,' असे निरीक्षण ते नोंदवतात. विनोबा भावे यांच्या शब्दांत सांगायचे तर 'गहू पिकवतो तो शेतकरी अशिक्षित आणि 'ग-हू' ही अक्षरे लिहू शकतो तो ब्राह्मण सुशिक्षित, ही व्याख्याच खुळेपणाची आहे!' या सामाजिक विकृतीवर लेखकाने बोट ठेवले आहे.

जातभावना समाजात किती खोलवर रुजली आहे, याचे उदाहरण देताना लेखक म्हणतात, 'अद्यापही आपण जेव्हा सामाजिक विचार करतो, तेव्हा नकळत आपण आपली जातच डोळयासमोर आणतो.' अनेकानेक कारणांमुळे वा परिस्थितीच्या रेटयामुळे घराबाहेरचा जातिभेद संपला असला, तरी घरात मात्र तो सुरक्षित राहिला आहे, असे निरीक्षण ते नोंदवितात. याचा अर्थ जातभावनेची मानसिकता बदलल्याशिवाय जातिनिर्मूलन अशक्य आहे, असाच होतो. हिंदू समाजात जात हा असा एक पिंजरा आहे की त्यातून बाहेर पडता येते, पण आत जाता येत नाही. 'जात' ही जन्मसिध्द असल्यामुळे 'परधर्मीयाला अलीकडे 'हिंदू' होता येते पण ब्राह्मण, क्षत्रिय वा वैश्य होता येत नाही. त्यासाठी त्याला त्या त्या वर्णाच्या-जातीच्या-आईबापापोटीच जन्म घ्यावा लागतो' असा चमत्कारिक विरोधाभास ते नोंदवतात.

या गुंतागुंतीच्या सामाजिक प्रश्नाचे ते त्यांच्या परीने उत्तरही शोधतात. ते म्हणतात, 'समाजोध्दारात अशा कितीतरी गोष्टी आहेत, की ज्यांचा संबंध कायद्याशी नाही. त्यांचा संबंध आपल्या औदार्याशी, माणुसकीशी आणि सामाजिक सवयींशी आहे.' ते पुढे म्हणतात - 'विविध समाजांचे अंतरंग समजावून घेण्यासाठी कल्पनाशक्ती हवी. त्यांना जवळ करण्याला अगत्य, प्रेमळपणा, हौस व समारंभप्रियता हे गुण हवेत. कल्पनाशक्ती व भावनाशक्ती असल्याखेरीज नवा समाज निर्माण होणार नाही. बंडखोरपणे नुसत्या रूढी मोडणे व दुरावलेल्या समाजाला जवळ करणे यात फरक आहे.' हा विषय केवळ तत्त्वचर्चेचा नसून प्रत्यक्ष जीवन व्यवहाराचा आहे. म्हणूनच 'मागासलेला समाज हा माणुसकीत तथाकथित पुढारलेल्या समाजाहूनही अधिक पुढारलेला आहे हे ज्या दिवशी आपल्या हृदयात बाणेल, त्याच दिवशी जातिनिर्मूलनाची खरी सुरुवात होईल. ही सुरुवात केवळ सोयरिकींपासूननाही, तर हृदयपालटापासून आहे' असा रोखठोक निष्कर्ष ते काढतात.

आगरकरांच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भातील बुध्दिवादी मांडणीशी लेखक सहमत होत नाहीत. कारण त्यांच्या मते 'आगरकर संप्रदायी सुधारकात आढळणारा मोठा दोष म्हणजे भारतीयांच्या प्राचीन व सकल समाजसंस्थांचे त्यांचे आकलन अपूर्ण आहे.' 'मिल व स्पेन्सर यांचे व्यवहारपराङ्मुख व अंतराळवासी तत्त्वज्ञान आणि पाश्चात्त्य पंडितांनी भारतीय संस्थांसंबंधी काढलेले अडाणी निष्कर्ष यांचा सुधारकांच्या एका पिढीवर मोठा पगडा होता. त्याचा हा परिणाम आहे' असे लेखकाला वाटते. रूढीप्रेमी जनतेवर उपहासाचे शस्त्र उगारल्याने उगाच कडवटपणा येतो, असे ते बजावतात. एखादी गोष्ट अन्याय आहे हे लोकांना तर्कशुध्दपणे पटवून दिले वा सिध्द केले की काम झाले, अशी बुध्दिवाद्यांची समजूत असते व तेथेच त्यांची फसगत झालेली असते. समाजोध्दारात अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याचा बुध्दिवादाशी संबंध नाही, कारण सामाजिक सुधारणांचे मूळ तर्कशुध्द विचारांत नसून कल्पनाशक्ती व दिलदारपणा यात आहे, असे लेखक म्हणतात. बुध्दिवाद एखादी गोष्ट पारखून घेण्यापुरताच उपयोगी आहे, त्यामध्ये निर्माणक्षमता नाही, असे त्यांचे स्पष्ट मत आहे.

'समाजक्रांती', 'विषमतेविरुध्दचा लढा', 'वर्गयुध्द' या संकल्पनांचा जप करणारे समाजवादी, साम्यवादी व त्यांच्या चळवळी यांना अपयश का आले, याची बोचरी मीमांसा श्रीकेक्षी करतात. भारताच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचा पडलेला विसर ही या मंडळींची शोकांतिका आहे, असे ते म्हणतात. याच शीर्षकाच्या लेखात, 'हिंदुस्थानसारख्या प्राचीन देशाने आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात एक विचारसरणी (Ideology) विकसित केली आहे. तिजमधील दोष नष्ट करायचे तर तिची मूळ प्रकृती नष्ट न करता नष्ट करावे लागतात; पण ज्यांना राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व (National Identity) ही वस्तूच माहीत नाही आणि जे सामाजिक समतेच्या नावाखाली पाश्चात्त्यांची समाजरचना इकडे आयात करू पाहत आहेत, ते दलितांना किंवा अन्य मागास समाजगटांना न्याय मिळवून देण्याच्या खटपटीत या देशात नव्या जातिद्वेषाचे पोषण करीत आहेत' अशी घणाघाती टीका करीत कथित पुरोगाम्यांच्या मनोवृत्तीवर, विचारसरणीवर व कार्यप्रणालीवर श्रीकेक्षींनी प्रकाशझोत टाकला आहे.

आपण समाजशास्त्रज्ञ आहोत असा दावा लेखकाने कधीच केला नाही. आपण राजकारणबाह्य व्यक्ती आहोत, असे ते वारंवार बजावतात. कदाचित म्हणूनच ते संवेदनशील व समजूतदार मनाने सामाजिक प्रश्नांचे यथायोग्य आकलन करू शकले. 'धर्मैक्य, रार्ष्टै्रक्य व राष्ट्रप्रेम यांना आवाहन करणे' हेच सामाजिक प्रश्नांना स्थायी व दूरगामी उत्तर आहे, असा त्यांचा अभिप्राय आहे. या संदर्भात ते म. गांधींच्या विचारांची साक्ष काढतात. ‘Evil cannot be fought by directly’ हे त्यांच्या विचारांचे रहस्य आहे. कोणताही सामाजिक रोग झोडपून, ठोकून मरत नसतो. उलट तो चिघळण्याची शक्यता जास्त असते. त्या रोगाला पोषण मिळू न देणे, तद्विरुध्द प्रवृत्तींना पोषण देणे हा Indirect मार्ग शहाणपणाचा असतो! असे लेखक अधोरेखित करतात. किंबहुना तेच या ग्रंथातील चिंतनाचे सार आहे.

कोणत्याही लेखकाच्या सर्व निष्कर्षांशी वा मतांशी सहमत व्हावे, अशी अपेक्षा नसते. मात्र त्याने विचारला खाद्य द्यावे, नवी दिशा द्यावी अशी अपेक्षा नक्कीच असते. ती या छोटेखानी ग्रंथाने पूर्ण केली आहे. पतिनिधनानंतर सुमारे चाळीस वर्षांनी शंकुतला क्षीरसागर यांनी हे अनमोल विचारधन सुजाण वाचकांसाठी उपलब्ध करून दिले, याबद्दल त्यांचे आणि अशा प्रकारचे वैचारिक पुस्तक प्रसिध्द केल्याबद्दल प्रकाशकांचे आपण आभार मानायला हवेत.

प्राचार्य श्याम अत्रे 

9324365910

[email protected]